ताजमहाल-प्रतिकृतीचा ताबूत : बारामती (जि. पुणे), १९७४.

ताबूत : (ताजिया). इस्लाममधील शिया पंथाच्या लोकांचे शोकप्रदर्शन कुराणात ‘ताजिया’ वा ‘ताबूत’ याऐवजी ‘इशीन’ हे रूप आढळते. पूर्वी हे शोकप्रदर्शन इमाम हुसेनच्या हौतात्म्याप्रीत्यर्थ त्याच्या कबरीजवळ व घरीही करीत असत. सध्या मुख्यतः हुसेनच्या करबला येथील कबरीची प्रतिकृती म्हणून मोहरमच्या उत्सवात दहा दिवस ताबूत बसवितात. शिया पंथाचे लोक आपल्या ऐपतीनुसार चांदी, हस्तिदंत, चंदन, शिसवी, काच, बांबू, कागद इत्यादींचा वापर करून ताबूत बनवितात. भारी किंमतीचे ताबूत विसर्जित न करता अनेक वर्षे ठेवतात, पण साधे बांबू, आणि कागद वापरून तयार केलेले ताबूत शेवटच्या दिवशी दफन करून विसर्जित करतात. या उत्सवासाठी श्रीमंत लोक घुमटाकृती ‘इमाम–बारा’ तयार करून तो आरसे, पताका, हंड्या–झुंबरे, उंची कापड इत्यादींनी सुशोभित करतात. त्यातच एका कोपऱ्यात भिंतीशी मक्केकडे तोंड करून ताबूताची स्थापना करतात. ताबूताजवळ हुसेनची शस्त्रे, कपडे व खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवतात. रोशणाई करून ताबूत सुशोभित करतात. ताबूताजवळच एक ओटा तयार करून त्यावर मौलवी ‘मज्लिस’ नामक भाग धर्मग्रंथातून वाचून दाखवतो. ‘मज्लिस’ म्हणजे शोकसभा. मज्लिस वाचनानंतर दररोज सकाळ–संध्याकाळ मर्सिए (शोकगीते) गाइले जातात. मर्सिया गायनानंतर हसन–हुसेन यांच्या नावाने सर्वजण छाती बडवून आक्रोश करतात.

 शेवटच्या दिवशी सर्व ताबूतांची मिरवणूक निघते. मिरवणूकीतील वातावरण, दुःखद, करुण व गंभीर राखले जाते. मिरवणुकीत एकजण हसन–हुसेनच्या हौतात्मप्रसंगाचे दुःखद वर्णन वाचत चालतो. शेवटी मिरवणूक कबरस्तानात नेऊन तेथे ताबूतांचे दफन करतात आणि सर्व अंत्यसंस्कार पार पाडतात. ताबूत जलात विसर्जित करण्याची प्रथा भारतात आढळते. ती भारतीय प्रभावातून आली असावी. लोक घरी परतल्यावर आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करतात.

ताजिया वा ताबूत हे शोकनाट्य हुसेनच्या वधानंतर दहाव्या दिवशी व आशूरा सणाला (मोहरम महिन्याची दहा तारीख) विविध प्रकारांनी होत असते. हुसेनच्या घोड्याची, त्याच्या मुलीच्या (फातिमा) वरातीची, त्याच्या अंतयात्रेची इ. मिरवणूका मुख्यत्वेकरून या दिवशी काढण्यात येतात. त्यांत सुन्नीचे उपहासप्रचुर दर्शन घडविले जाते. रजझ छंदात कुराणाचे शियाई पद्धतीने विवरणही करण्यात येते. ताबूत या ताजियांची सध्याची विकसित स्वरूपातील प्रथा त्या मानाने अलीकडच्या काळातील आहे. शिया पंथाचे तातर (तार्तर) लोक (तुर्कस्थानातील तातर प्रदेशाचे रहिवासी) ताबूतांना कासिमचे (इमाम हसनचा मुलगा) विवाहगृह मानतात. ताबूत–नाट्यात प्राचीन काळातील दैवतपूजाविषयक काही वैशिष्ट्येही उतरली असणे शक्य आहे. ताबूत थंडे करण्याची भारतातील पद्धत हिंदूंपासून उचलली असावी. ताबूताचे शोकनाट्य पाहण्यास हिंदूंना मुभा आहे, पण सुन्नी पंथाच्या लोकांना नाही. हुसेनचा पंजा, निशाने, दंडा इ. विशेष ताबूतांचे महत्त्वपूर्ण अंग मानले जातात.

संदर्भ : Pelly, Lewis, The Miracle Play of Hasan and Husain, 2. Vols, London, 1879.

करंदीकर, म. अ.