जगन्नाथाचा रथ : ओरिसातील पुरी किंवा जगन्नाथपुरी हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून भारतातील चार प्रसिद्ध धामांपैकी ते पूर्वेकडील धाम आहे. आद्य शंकराचार्यानी येथेच एक धर्मपीठ स्थापून जगन्नाथपुरीचे धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्व चिरंतर केले आहे. जगन्नाथाचे मंदिर समुद्रकिनाऱ्यावरच असून त्यात जगन्नाथ (श्रीकृष्ण), सुभद्रा आणि बलराम यांच्या हस्तपादरहित अशा तीन लाकडी मूर्ती आहेत. पुरी येथे वर्षभर उत्सवसमारंभ चालू असतात त्यांत रथयात्रा, रथोत्सव वा गुंडीचायात्रा हा फार महत्त्वाचा उत्सव समजला जातो. रथोत्सवाचा प्रारंभ आषाढ शुद्ध द्वितीयेला होतो व तो आठ दिवस चालतो. दरसाल हजारो रुपये खर्च करून ह्या तीन देवांकरिता तीन नवीन रथ तयार करतात व त्यांत देवांच्या उत्सवमूर्ती ठेवतात. जगन्नाथाचा रथ सर्वांत मोठा असतो व त्यास १६ चाके असतात. बलरामाच्या रथाला १४ चाके असतात व सुभद्रेच्या रथाला १२ चाके असतात. मंदिरातील मूर्ती रथात नेऊन ठेवणारे लोक ठराविकच असतात त्यांना दैतपती म्हणतात. हे दैतपती ब्राह्मणेतर असून ते स्वतःला ओरिसातील प्राचीन जमातीचे वंशज म्हणवतात. यांचे जगन्नाथाशी प्रत्यक्ष बंधुत्वाचे नाते असल्याबाबत एक आख्यायिकाही सांगतात. मंदिरातील सिंहद्वारापासून रथयात्रेस प्रारंभ होतो व येथून सु. दीड किमी. अंतरावर असलेल्या जनकपूर वा इंद्रद्युम्नप्रासाद नावाच्या स्थानापर्यंत ती जाते. तेथे तीन दिवस थांबून ही रथयात्रा परत येते. गोकुळातून श्रीकृष्ण मथुरेला जातो, अशी या रथयात्रेमागील कल्पना आहे. तेथेच जगन्नाथाला भेटण्यासाठी साक्षात लक्ष्मीदेवी येते, अशी भाविकांची समजूत आहे. जगन्नाथाचा रथ हजारो यात्रेकरू हाताने ओढत, मिरवत नेतात. हा रथ ओढण्यासाठी जो साहाय्य करतो, तो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे रथ ओढण्यासाठीच नव्हे, तर रथाच्या चाकाखाली सापडून मरण यावे म्हणूनही यात्रेकरू संधी शोधीत असतात. रथयात्रा संपल्यानंतर या लाकडी रथांचा लिलाव केला जातो.

 जगन्नाथाचा रथ

जोशी, रंगनाथशास्त्री