गौरी

गौरी : शंकराची पत्नी पार्वती हिच्या अनेक नावांपैकी एक नाव. हिमालयाची कन्या. शंकराने एकदा पार्वतीला ‘काली’ असे संबोधिले म्हणून पार्वतीने तपश्चर्येने गौरवर्ण प्राप्त करून घेतला. त्यावरून तिला गौरी नाव पडले. चैत्रात व भाद्रपदात वैयक्तिक तसेच सामुदायिक स्वरूपात गौरीपूजन करतात. चैत्र शुक्ल तृतीया, ‘गौरीतृतीया’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी सुगंधी द्रव्ये, सुवासिक पुष्पे, धूप, दीप इत्यादिकांनी व विशेषतः दवणा नावाच्या सुगंधी वनस्पतीने शंकरासहित गौरीची पूजा करण्याची प्रथा आहे. याच तृतीयेपासून एक महिनाभर गौरीहर-दोलोत्सव साजरा करतात. या उत्सवात गौरीपुढे उत्तम आरास करून सायंकाळच्या वेळी सुवासिनींना बोलावून हळदीकुंकू, आंब्याची डाळ व पेय म्हणून कैरीचे पन्हे अथवा उसाचा रस देतात. ऐपतीप्रमाणे इष्टमित्रांनाही बोलावितात.

भाद्रपद मासातील शुक्ल पक्षात ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन करतात. जेष्ठा नक्षत्रावर पूजन करतात म्हणून या गौरींना ‘ज्येष्ठा-गौरी’ म्हणतात. या गौरींचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन होते. आपापल्या कुलाचाराला अनुसरून कोणी धातूच्या, कोणी मातीच्या प्रतिमेचे पूजन करतात. तर कोणी नदीतील पाच लहान खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजा करतात. कोकणात तसेच देशावर हे गौरीव्रत फार महत्त्वाचे समजले जाते. 

जोशी, रंगनाथशास्त्री