मैत्रेय बुद्ध : आपल्या धर्मपंथाची परंपरा जुनी आहे, हे दाखविण्यासाठी जैनांनी जशी चोवीस तीर्थकरांची संकल्पना मांडली आहे. तशी बौद्धांचीही चोवीस बुद्धांची परंपरा रूढ आहे. सिद्धार्थ गौतम हा तेविसावा बुद्ध होता, असे बौद्ध मानतात. त्यांच्यानंतर चार हजार वर्षांनी मैत्रेय हा चोविसावा बुद्ध अवतरणार आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. मैत्रेयाच्या प्रतिमा सर्व बौद्ध जगतात आढळतात. साधनमाला या ग्रंथात मैत्रेयाच्या प्रतिमेचे व साधनेचे वर्णन आढळते. सद्धर्मपुण्डरीकसूत्रातही मैत्रेयाच्या उल्लेख येतो. फाहियान, यूआनच्वांग, इत्सिंग वगैर चिनी प्रवासी मैत्रेयाचा आदराने उल्लेख करतात. स्थविरवादी बौद्धांप्रमाणे थिऑसॉफिस्ट लोकांचाही असा विश्वास आहे, की मैत्रेय बुद्ध भविष्यकाळात येणार आहे.

पहा : बोधिसत्त्व बौद्ध देवता.

संदर्भ : वैद्य, प. ल. संपा. सद्वर्मंपुण्डरीकसूत्र, दरभंगा, १९६०.

बापट, पु. वि.