जंगम : शिवोपासक लिंगायत लोकांचे धर्मगुरू अथवा पुरोहित ‘जंगम’ नावाने ओळखले जातात. ‘चल’ लिंगाचे ते उपासक म्हणून त्यांना जंगम म्हणतात. त्यांच्यात विरक्त (ब्रह्मचारी) आणि गुरुस्थल (गृहस्थ) असे दोन मुख्य भेद असून त्यांतील गुरुस्थल हे लिंगायतांच्या गृह्यसंस्कारांचे पौराहित्य करतात. विरक्त हे धार्मिक अध्ययन-अध्यापन करतात. ह्या दोन्हीही प्रकारच्या जंगमांचे वास्तव्य मठातच असते. शिवाच्या पाच मुखांपासून जंगमांतील पाच प्रमुख संप्रदायांचे प्रवर्तक निर्माण झाले. अशी त्यांची समजूत आहे. त्यांनी प्रवर्तित केलेले संप्रदाय असे : एकोरामाराध्य, पंडिताराध्य, मरुलाराध्य, रेवणाराध्य व विश्वाराध्य. ह्या प्रत्येक उपपंथाचे पुन्हा तेरा-तेरा ‘बगी’ (भेद) आहेत. एकाच बगीच्या जंगमांत विवाह होत नाहीत. प्रांतपरत्वेही त्यांच्यात विविध भेदोपभेद आढळतात.

 जगद्‌गुरू विश्वेश्वर शिवाचार्य, जंगमवाडी मठ, काशी.

केशरी वा बदामी रंगाची वस्त्रे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, कपाळावर व अंगास भस्म आणि गळ्यात किंवा कमरेला सोने, चांदी, तांबे इ. धातूंचे शिवलिंग असे त्यांचे रूप असते. या शिवलिंगाची ते त्रिकाळ बेलपत्रांनी पूजा करतात. ते हरवल्यास गुरूकडून पुन्हा दुसरे लिंग धारण करेपर्यंत ते काहीही सेवन करत नाहीत. नवजात बालकाचा ‘करुणा’ नावाचा लिंगधारणविधी ते करतात. मृतांना ते तोंडात शिवलिंग देऊन बसलेल्या स्थितीत पुरतात.

करंदीकर, ना. स.