मोरया गोसावी समाधि-मंदिर, चिंचवड.

मोरया गोसावी : (१३७५–१४६१ ?).महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध गणेशभक्त साधुपुरुष. त्यांना गणेशभक्तीचा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांच्या वडिलांचे नाव वामनभट्ट शाळिग्राम आणि आईचे नाव पार्वतीबाई. मूळचे कर्नाटकातील शाली या गावचे वामनभट्ट पुण्याजवळील मोरगावी येऊन स्थायिक झाले. उतारवयात मोरगाव येथे मयूरेश्वराच्या (गणेशाच्या) कृपेमुळे पुत्र झाला, या श्रद्धेमुळे वामनभट्टांनी मुलाचे नाव मोरया असे ठेवले.

लहानपणीच वेदाध्ययन पूर्ण केल्यावर सिद्ध योगिराज नावाच्या सत्पुरुषाच्या उपदेशानुसार मोरया यांनी थेऊरला जाऊन तपश्चर्या केली. तेथे त्यांना गणेशाचा साक्षात्कार झाला आणि तेव्हापासून ते ‘मोरया गोसावी’ बनले, असे म्हणतात. आईवडिलांच्या निधनानंतर ते पुण्याजवळ चिंचवड येथे पवना नदीच्या काठी आश्रमात राहू लागले. तेथेच गोविंदराव कुलकर्णी यांची मुलगी उमाबाई हिच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव चिंतामणी असे ठेवले. गणेशाच्या साक्षात्कारानुसार त्यांनी कऱ्हा नदीतून गणेशाची मूर्ती बाहेर काढली आणि चिंचवड येथे तिची स्थापना केली. त्यांनी गणपतीविषयीच्या भक्तीभावाने अनेक प्रसादिक पदांची रचना केली. १४६१ वा १६५५ मध्ये त्यांनी चिंचवड येथे जिवंत समाधी घेतली अशी मते आहेत. पुढे त्यांच्या मुलाने समाधीवर मंदिर उभारले. दरवर्षी मार्गशीर्ष वद्य तृतीया ते षष्ठी (षष्ठी ही समाधीची तिथी) या काळात चिंचवड येथे त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतो.

पुढे त्यांच्या घराण्यात अनेक सत्पुरुष निर्माण झाल्यामुळे या घराण्यास ‘देव’ असे नाव प्राप्त झाले. त्यांच्या वंशजांना आदिलशहा, संभाजी, राजाराम, शाहू इत्यादींनी इनामे दिली होती.

संदर्भ : १. गाडगीळ, अमरेंद्र, संपा. श्रीगणेशकोश, पुणे, १९६८.

             २. ढेरे, रा. चिं. विविधा, पुणे, १९६७.

दिक्षित, म. श्री.