दुर्वास : अत्री ऋषीचा अनसूयेपासून शंकराच्या अंशापासून झालेला पुत्र. और्वमुनीची कन्या कंदली ही दुर्वासाची पत्नी होय. रागाने दुर्वासाने एकदा तिला शाप दिला व जाळून टाकले (ब्रह्मवैवर्त पुराण ४·२४). यांच्या संबंधीच्या अनेक कथा महाभारतात आणि पुराणांत आढळतात. दुर्वास हा अतिशय उंच, हिरवट–पिवळ्या रंगाचा, बेलाचा दंडा हातात धरणारा व तिन्ही लोकांत संचार करणारा होता, असे महाभारतात (अनुशासन पर्व १५९·१४·१५) वर्णन आहे. तापट स्वभाव असल्याने राग येताच शाप देणे, हा त्याचा स्वभावच झालेला दिसतो.

याने इंद्राला शाप दिला (विष्णुपुराण १·९). अंबरीष राजाचे सत्त्वहरण केले (भागवत पुराण ९·४). लक्ष्मणावरही हा एकदा रागावला होता (रामायाण, उत्तरकांड १०५). श्रीकृष्ण व पांडव यांची सत्त्वपरीक्षा यानेच पाहिली. शकुंतलेलाही यानेच शाप दिला.

जैमिनीगृह्यसूत्रांत त्याचा निर्देश आहे. यावरून तो सामवेदी आचार्य असावा. आर्याद्विशती, देवीमहिम्नस्तोत्र, परशिवमहिम्नस्तोत्र, ललितास्तवरत्न  इ. ग्रंथ याच्या नावावर आहेत. अठरा उपपुराणांत एक ‘दुर्वासपुराण’ ही आहे.

जोशी, रंगनाथशास्त्री