नाथ संप्रदाय : एक भारतीय शैव संप्रदाय. या संप्रदायाचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव याच्यापासून झाला, अशी सांप्रदायिकांची समजूत असल्यामुळे, याला नाथ संप्रदाय म्हणतात. ‘नाथ’ म्हणजे रक्षण करणा रा, स्वामी व नाथ संप्रदाय म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा संप्रदाय होय. नाथयोगी ‘नाथ’ परमेश्वर हे परमपद मानून ते मिळविण्यासाठी योगाचरण करतात. संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर साधक आपल्या नावापुढे ‘नाथ’ ही उपाधी लावतात. योगमार्गाने सिद्धावस्था किंवा अवधूतावस्था प्राप्त करणे, हे या पंथाच्या अनुयायांचे ध्येय असल्यामुळे हा पंथ योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय आणि ⇨अवधूत संप्रदाय या नावांनी ओळखला जातो. तसेच त्याला दर्शनी (‘दर्शन’ कर्णकुंडल धारण करणारा), गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय [→कानफाटे], गुरू संप्रदाय इ. नावेही आढळतात परंतु नाथ संप्रदाय वा नाथ पंथ हेच नाव अधिक रूढ आहे.

आदिनाथ शिव हे संप्रदायाचे मूळ प्रवर्तक असले, तरी त्यांचे शिष्य ⇨मच्छिंद्रनाथ (मत्स्येंद्रनाथ) हेच संप्रदायाचे पहिले मानवी गुरू होत. संप्रदायाला नावारूपाला आणण्याचे खरे श्रेय मात्र गोरख (क्ष)- नाथांनाच द्यावयास हवे. मत्स्येंद्राचा गुरुबंधू जालंधर आणि जालंधराचा शिष्य कानिफनाथ यांनाही संप्रदायात मोठी मान्यता होती. संप्रदायाचा उगम कदलीबनात झाला, असे अनेक जण मानतात परंतु हे कदलीबन कोठे होते, याविषयी मात्र मतभेद आहेत. संप्रदायाचे उगमस्थान म्हणून हिमालय, नेपाळ, पंजाब, उत्तर प्रदेश, आसाम, बंगाल, महाराष्ट्र, आंध्रमधील श्रीशैलम् पर्वत इ. स्थाने वेगवेगळ्या विद्वानांनी सांगितली आहेत.

तत्त्वज्ञान व साधना : शंकराने पार्वतीला सांगितलेले तत्त्वज्ञान मच्छिंद्राने मासोळीच्या पोटातून ऐकले व तेच पुढे मानवांना प्राप्त झाले, अशी आख्यायिका ज्ञानेश्वरीत ज्ञानदेवांनी सांगितली आहे. मच्छिंद्राने समाजाच्या प्राथमिक अवस्थेपासून चालत आलेला सुफलता विधी म्हणजे योगिनी कौल मार्ग व नाथ संप्रदाय या दोहोंचे एकीकरण केले. मच्छिंद्रांच्या ग्रंथांतून प्रामुख्याने योगमुक्त कौल मार्गाचे विवेचन आहे, तर गोरखनाथांच्या सिद्धसिद्धांतपद्धतीमध्ये नाथ संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची चर्चा आहे.

शिव अनन्य, अखंड, अद्वय, अविनाशी, धर्महीन व निरंग असल्यामुळे ‘अकुल’ मानला जातो. विश्वाची निर्मिती करण्याची शिवाची इच्छा हीच शक्ती असून ती निर्मितीचे कारण असल्यामुळे ‘कुल’ मानली जाते. नाथयोगी व तांत्रिक कौलमार्गी या दोघांचेही एकच अंतिम ध्येय असते आणि ते म्हणजे शिव व शक्ती यांचे सामरस्य प्राप्त करणे हे होय. त्यांच्या साधनापद्धतीत मात्र फरक असतो. योगी प्रथमपासूनच कुंडलिनी जागृत करण्याची अंतरंग साधना करतात, तर तांत्रिक प्रथम बहिरंग उपासना करून नंतर अंतरंग साधनेकडे वळतात. योगी भोग वर्ज्य करून अष्टांगयोगसाधनेच्या द्वारे समाधीतील आनंद प्राप्त करतात, तर कौल साधक पूजा करताना मद्य, मांस, मत्स्य, महिला (मैथुन) व मुद्रा या पंचमकारांचे म्हणजे कुलद्रव्यांचे सेवन करून सिद्धी मिळवितात व सातव्या उल्लासाच्या अवस्थेत पोहोचतात. योग व भोग यांचा एकाच वेळी अनुभव घेण्याची ही कौल साधना नाथमार्गात काहींनी मान्य केली आहे. नाथ संप्रदायावर बौद्धांच्या वाममार्गाचा म्हणजे वज्रयान आणि सहजयान पंथांचा प्रभाव पडला, असेही एक मत आहे. म्हणूनच वशवर्तिनी स्त्रीची अपेक्षा करणाऱ्या वज्रोली मुद्रेचा उल्लेख नाथ संप्रदायात आढळतो. ही साधना गुप्त ठेवण्याचा प्रयत्‍न वाममार्गात असतो.

आदिनाथ म्हणजेच शक्तियुक्त परशिव. हा शिव हेच अंतिम सत्य आणि तोच पिंड ब्रह्मांडाचा आधार होय. तो स्वयंप्रकाश, स्वसंवेद्य, अनंत, निर्गुण आणि द्वैताद्वैतविलक्षण असतो. विश्वनिर्मितीच्या वेळी त्याच्यापासून क्रमाने शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर, शुद्ध विद्या, माया, विद्या (किंवा अविद्या), कला, राग, काल, नियती ही ११ तत्त्वे आणि त्यातून सांख्यांनी मानलेली २५ तत्त्वे क्रमाने निर्माण होतात. सांख्यांच्या पुरुषाला येथे ‘जीव’ म्हटले जाते. प्रलयाच्या वेळी शक्ती या सर्व तत्त्वांना आत्मसात करून परशिवात राहते. या अवस्थेत शिवाजवळ कर्तृत्व असत नाही. तो कुल-अकुल यांच्या पलीकडे अव्यक्त अवस्थेत राहतो, म्हणून तो पर वा स्वयं शिव होय. निर्मितीच्या वेळी शिव व शक्ती (निर्मितीची इच्छा) ही पहिली दोन तत्त्वे बनतात. शक्ती निजा, परा, अपरा, सूक्ष्मा व कुंडलिनी या पाच अवस्थांतून व शिव परम, अपर, शून्य, निरंजन आणि परमात्मा या पाच अवस्थांतून जातो. परमात्मा व कुंडलिनी म्हणजेच क्रमाने शिव व शक्ती ही दोन सूक्ष्म तत्त्वे होत. शिव आणि शक्ती चंद्र व चांदण्याप्रमाणे अभिन्न असतात. शक्तीविना शिव हा केवळ शव ठरतो. शक्तीच्या प्रभावामुळेच विश्वचक्र चालू असते. वेदान्ती लोक शक्तीला जड माया मानतात पण नाथ तिला चेतन मानतात. ही शक्ती क्रमाने स्थूल होऊ लागते आणि सदाशिव, ईश्वर इ. क्रमाने तत्त्वांची निर्मिती होते. ही निर्मिती होत असताना शिव व शक्ती यांच्या संयोगाने ‘परपिंड’ तयार होतो. सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या या तत्त्वांपासून ‘आद्यपिंड’ होतो. मायेपासून प्रकृतीपर्यंतच्या तत्त्वांनी ‘साकार’ वा ‘महासाकार पिंड’ बनतो. ‘महत्’पासून पंचतन्मात्रांपर्यंतच्या तत्त्वांनी ‘प्राकृत पिंड’ बनतो. ११ इंद्रियांनी ‘अवलोकन पिंड’ व पंचमहाभूतांनी स्थूल ‘गर्भपिंड’ बनतो. सत्त्व, रज, तम, काल व जीव यांच्यामुळे विविध पिंडांतील वेगळेपणा निर्माण होतो. विकासाच्या उपरिनिर्दिष्ट सर्व अवस्था सत्यच असतात. पिंडी तेच ब्रह्मांडी असते. शिव हा केवळ ज्ञेय असून विश्वनिर्मितीचे खरे कर्तृत्व ‘शक्ती’चेच असते. शक्तीच्या उपासनेसाठी दूर जाण्याची गरज नसते कारण ती प्रत्येक पिंडात असतेच. या पिंडातील षट्‌चक्रे, सोळा आधार, दोन लक्ष्ये, पाच व्योम, एक स्तंभ, नऊ द्वारे, पाच स्वामी इत्यादींचे ज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मिळत नाही.

पिंड (देह) म्हणजे ब्रह्मांडाची छोटी आवृत्तीच होय. मस्तकातील सहस्त्र पाकळ्यांच्या सहस्त्रार चक्रात परमशिव राहतो, हृदयात जीवात्मा राहतो आणि महाकुंडलिनी शक्ती माकडहाडाजवळील अग्‍निचक्रात कुंडलिनीच्या रूपाने राहते. जीवात्मा परमशिवाकडून चैतन्य आणि कुंडलिनीकडून शक्ती घेतो. म्हणूनच कुंडलिनी ही जीवशक्ती होय. ही कुंडलिनी घेऊनच जीवाने गर्भात प्रवेश केलेला असतो. जीवाच्या जागृत, सुषुप्ती व स्वप्‍न या अवस्थांत ती सुप्त राहून शरीर धारण करते. अग्‍निचक्रातील स्वयंभू लिंगाला सर्पिणीप्रमाणे साडेतीन वेटोळी घालून ती राहत असते. या स्थानाला लागूनच मूलाधारचक्र असते व कुंडलिनी या मूलधारचक्रात राहते, अशीही वर्णने आढळतात. त्याच्यावर नाभीजवळ स्वाधिष्ठान चक्र, त्याच्यावर मणिपूर चक्र, हृदयाजवळ अनाहत चक्र, कंठाजवळ विशुद्धाख्य चक्र आणि भुवयांमध्ये आज्ञा चक्र अशी सहा चक्रे असतात. अनेक जन्मांच्या मलभाराने दबलेली कुंडलिनी योगसाधनेने जागृत केली, की ती पाठीच्या कण्यातील सुषुम्‍ना नाडीच्या मार्गे ही षट्‌चक्रे ओलांडून सहस्त्रार चक्रात जाते आणि तेथे तिचे परमशिवाशी मीलन होते. शिवशक्तींचे हे मीलन म्हणजेच सहज समाधी, पिंडब्रह्मांडैक्य किंवा शिव व शक्तीचे सामरस्य होय. या अवस्थेलाच नाथपद, सिद्धावस्था वा अवधूतावस्था असे म्हणतात. नाथ संप्रदायाच्या दृष्टीने हाच मोक्ष व हेच साधकांचे ध्येय असते. पातंजल योगापेक्षा गोरक्षप्रणीत योग फारसा वेगळा नाही परंतु कुंडलिनी जागृत करण्याचा हा विचार म्हणजे नाथ संप्रदायाने योग विचारात घातलेली भर, असे मानले जाते. त्यामुळे कायायोग हे नाथ संप्रदायाचे एक वैशिष्ट्य ठरले आहे. हठयोगाने बिंदू (वीर्य), वायू, मन व वाणी यांना वश केले, की सामरस्य प्राप्त होते, असे मानले जाते.

ही सर्व साधना गुरूच्या मार्गदर्शनानेच करावयाची असल्यामुळे नाथ संप्रदायात गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. गुरुहीन राहू नये, असे गोरक्षनाथाने स्पष्टपणे सांगितले आहे. गुरूविषयी आदर, मनाची शुद्धता व दृढता, विकारांचा अभाव, गर्वहीनता, धैर्य, शील, सदाचरण, खाण्यापिण्यात मध्यम मार्ग, ब्रह्मचर्य इ. गुण साधकाच्या अंगी हवेत. नाद (वाणी) व बिंदू (वीर्य) यांचे संयमन करणारा योगी साक्षात शिवरूप होय. याउलट मादक वस्तूंचे सेवन करणारा नरकाला जातो, असे सांगितले आहे.

गोरक्षसिद्धांतसंग्रह या ग्रंथातील महत्त्वाचे विचार पुढीलप्रमाणे आहेत : ओंकार हा सूक्ष्म वेद आहे मुक्ती म्हणजे नाथस्वरूपात स्थिर होण्याची अवस्था होय. शक्ती सृष्टी करते, शिव पालन करतो, काल संहार करतो व नाथ मुक्ती देतात. नाथ हाच एकमात्र शुद्ध आत्मा असून बाकीचे जीव असतात. नाथ हे सगुण-निर्गुणाच्या पलीकडचे असतात. अद्वैताच्या वर सदानंददेवता असून सदानंदावस्था हेच साध्य असते.


वेष : नाथ संप्रदायी योग्यांचा एक विशिष्ट वेष असतो. मलिक मुहंमद जायसी, मीरा, सूरदास, कबीर, अरब पर्यटक इब्‍न बतूता इत्यादींनी या वेषाची वर्णने केली आहेत. मत्स्येंद्रनाथांनी शंकराला प्रसन्न करून त्याचा वेष प्राप्त केला, अशी एक आख्यायिका आहे. वसंत पंचमीसारख्या शुभ दिवशी कान फाडून त्यांत मंत्रपूर्वक कुंडले (मुद्रा) घातली जातात. ती कुंडले माती, हरिणाची शिंगे किंवा धातू यांपैकी कशाची तरी असतात. संप्रदायातील विधवा व गृहस्थ योग्यांच्या स्त्रियाही कुंडले धारण करतात. कुंडले धारण करणाऱ्या योग्यांना कानफाटे आणि इतरांना ‘औघड’ योगी म्हणतात. किंगरी हे सारंगीसारखे एक वाद्य असून त्याच्या साथीवर नाथयोगी भर्तूहरीची गीते गात हिंडतात. मोळाच्या दोरीची वा काळ्या मेंढीच्या लोकरीची एक मेखला असते. हालमटंगा नावाची मेखला धारण केली, की लगेच भिक्षेसाठी बाहेर पडावे लागते. योग्यांच्या गळ्यांतील रुद्राक्षाच्या माळेत ३२, ६४, ८४ किंवा १०८ मणी असतात. १८ किंवा २८ मण्यांची स्मरणी ते मनगटावर बांधतात. लाकडी पट्ट्या वा लोखंडी सळ्या यांचे बनवलेले धंधारी हे एक चक्र असून त्याच्या छेदातून दोरा ओवणे व तो मंत्रपूर्वक बाहेर काढणे, या क्रियेला ‘गोरखधंधा’ म्हणतात. जाणकारालाच हे जमते. ज्याला हे जमते, त्याच्यावर गोरक्षनाथाच्या कृपेने ईश्वर प्रसन्न होतो व त्याला भवजालातून मुक्त करतो, अशी समजूत आहे. योगी काळ्या मेंढीच्या लोकरीचे किंवा क्वचित सुताचे बनवलेले शिंगीनाद-जानवे धारण करतात. त्यात हरिणाच्या शिंगाची बनवलेली एक शिटी असते. उपासनेच्या व भोजनाच्या आधी ती वाजवतात. हे जानवे शरीरावर धारण न करता हृदयात अथवा त्वचेच्या आत धारण केले आहे, असे काही जण मानतात. पार्वतीने आपल्या रक्तात भिजवून एक कंथा गोरक्षाला दिली होती, अशी समजूत असल्यामुळे अजूनही योगी कंथा म्हणजे भगव्या रंगाची गोधडी धारण करतात. योगी भिक्षेसाठी फुटक्या मडक्याचा जो तुकडा वापरतात, त्याला खापरी म्हणतात. हल्ली नारळाची करवंटी किंवा काशाची वाटी वापरतात. योगी शरीरावर भस्म लावतात. कपाळ, बाहुमूल व हृदयदेशावर त्रिपुंड्र लावतात. यांखेरीज ‘कुका’ हे एकतारी वाद्य, पुंगी, दंडा, त्रिशूळ, अधारी (एक आसनपीठ) डमरू, खड्‍ग, झोळी, कुबडी, मृदंग, टाळ, चिमटा, खडावा, कौपीन, धुनी, गोपीचंदन, गुलाल, बुक्का इ. वस्तू वा चिन्हे धारण करतात. चर्पटीनाथांनी मात्र या बाह्य वेषांच्या अवडंबराला प्रखर विरोध केला होता.

नाथयोगी : नाथयोग्यांना ‘नाथ’, ‘योगी’, ‘जोगी’, ‘सिद्ध’, ‘कानफाटे’, ‘अवधूत’ इ. नावांनी ओळखले जाते. नाथांची ‘नवनाथ’ ही गणना अत्यंत प्रसिद्ध आहे परंतु हे नऊ नाथ कोण, याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. एकाच नावाच्या अनेक रूपांतरांमुळे वा एकाच नाथाच्या अनेक नावांमुळेही अनिश्चिततेत भर पडली आहे. उदा., कृष्णपाद, कण्हपा, कान्हूपा, कानपा, कानिफनाथ इ. एकाच नावाची रूपांतरे असल्याचे दिसते तसेच चौरंगीनाथ म्हणजे पूरन भगत आणि जालंधर म्हणजेच हाडिपा, असे मानले जाते. नवनाथ म्हणजे भागवताच्या एकादशस्कंधात सांगितलेल्या नवनारायणांचे अवतार, अशी एक कल्पना आहे. त्या कल्पनेनुसार मत्स्येंद्रनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटीनाथ, नागनाथ, रेवानाथ, भर्तृनाथ व गोपीचंद्रनाथ हे नवनाथ मानले जातात. ⇨गोरखनाथाचे नाव या नवनाथांत नाही याचे कारण म्हणजे, नऊ नाथांची उत्पत्ती त्याच्यापासून झाली वा त्यानेच हे नवविध अवतार घेतले, अशी श्रद्धा असल्याचे सांगितले जाते. नवद्वारांचे अधिष्ठाते ते नवनाथ, असेही मत आहे. गोरक्षनाथ, आदिनाथ, जडभरत, चौरंगीनाथ इत्यादींची नावे नवनाथांत देणाऱ्या परंपराही आढळतात. ८४ नाथसिद्ध ही गणनाही नवनाथांप्रमाणेच प्रसिद्ध आहे परंतु हे ८४ ⇨सिद्ध कोण, या बाबतीतही एकमत नाही. त्यांपैकी घोडाचोली, गरीबनाथ, देवलनाथ, पृथ्वीनाथ, चुणकरनाथ, लक्ष्मणनाथ, ढैण्टस, चमरीनाथ, तंतिपा, दरिपा इ. अनेक नाथ प्रसिद्ध आहेत.

नाथपंथाचे कित्येक प्राचीन योगी अजूनही जिवंत आहेत योगी अद्‍भुत चमत्कार करतात त्यांना जादूटोणा करता येतो  त्यांना विविध सिद्धी अवगत असतात मुलांना वाईट नजरेपासून वाचविण्याची शक्ती त्यांच्याजवळ असते ते कोणताही रोग बरा करू शकतात हिंस्त्र पशू, सर्प, विंचू इत्यादींवर त्यांचे नियंत्रण असते  ते वाघावर आरूढ होतात कोणताही आकार धारण करतात स्वर्गनरकांना भेटी देतात मृतांना जिवंत करतात अन्नाविना राहतात त्यांना दिव्यदृष्टी असते ते मादक द्रव्यांचा व औषधांचा उपयोग करतात इ. समजुती आहेत. त्यांच्या जादूच्या चटया व आकाशस्थ नगरे यांचाही उल्लेख आढळतो. कबीराच्या काळात त्यांची एक सैनिक संघटना होती सोळाव्या शतकात त्यांचे शिखांशी युद्ध झाले होते सोळाव्या शतकातच त्यांनी कच्छमध्ये लोकांना जबरदस्तीने कानफाटे बनविण्याचा प्रयत्‍न केला परंतु नंतर ते पराभूत झाले इ. माहिती त्यांच्याविषयी मिळते. १९२१ च्या जनगणनेनुसार भारतात नाथपंथी जोग्यांची संख्या सात लाखांहून अधिक होती. त्यांत स्त्रियांची संख्या बरीच मोठी होती आणि मुसलमान जोग्यांची संख्या ३१ हजारांहून अधिक होती. भारताबाहेर अफगाणिस्तानापर्यंत नाथजोगी आढळतात.

अनेक नाथयोगी गृहस्थाश्रमी बनले असून हिमालयाचा काही भाग, सिमला, गढवाल, अलमोडा, बंगाल, बुंदेलखंड, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक इ. भागांतून त्यांच्या वेगवेगळ्या जाती विखुरलेल्या आहेत. अर्थातच, या योग्यांत विवाहाची प्रथा आहे. बुंदेलखंडातील धनगरांच्या विवाहमंत्रांत गोरखनाथ व मत्स्येंद्रनाथ यांची नावे असतात. बंगालमध्ये हे लोक स्वतःला योगी ब्राह्मण म्हणवून घेतात. डाक्का व त्रिपुरा भागांतील योगी वस्त्रे विणण्याचा, तर रंगपूर जिल्ह्यातील योगी कपडे विणणे, ते रंगविणे, चुना बनविणे, भीक मागणे इ. व्यवसाय करतात. पंजाबात अशा योग्यांना ‘रावळ’ म्हणतात. भिक्षा मागणे, चमत्कार करणे, हात पाहून भविष्य सांगणे इ. मार्गांनी ते उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रात काही मराठे गृहस्थ योगी आहेत. साधारणतः सुताच्या धंद्याशी संबंधित अशा साळी, कोष्टी, शिंपी इ. जातींचे लोक नाथपंथी गृहस्थयोगी आहेत. गृहस्थयोग्यांच्या बऱ्याच जाती मुसलमान झाल्या आहेत. ⇨कबीर अशाच एका जातीत जन्मला होता, असे काही अभ्यासक मानतात. नाथपंथी लोक आचारी, सावकार, फेरीवाले, सैनिक, शेतकरी इ. व्यवसायी बनले आहेत. त्यांच्यात काही ठिकाणी मृतांना बसलेल्या अवस्थेत, तर काही ठिकाणी स्वतःच्या घरातच पुरण्याची प्रथा आढळते. भिक्षेवर उदरनिर्वाह करणारे नाथपंथी भिक्षा मागताना ‘अलख निरंजन’ व ‘आदेश’ हे शब्द उच्‍चारतात. त्यांच्यापैकी डवरी गोसावी हे डमरू वाजवून भिक्षा मागतात.

शाखा : विस्कळित असलेल्या नाथपंथी लोकांना संघटित करून गोरखनाथाने त्यांच्या बारा शाखा बनविल्या, असे म्हणतात. शिवाचे बारा (किंवा १८) व गोरखनाथाचे बारा पंथ आपापसांत भांडत असत. म्हणून गोरखनाथाने शिवाचे सहा (किंवा १२) व आपले सहा पंथ कमी करून एकूण बारा शाखा शिल्लक ठेवल्या, अशी परंपरा आहे. या बारा शाखांची नावे वेगवेगळ्या परंपरेमध्ये वेगवेगळी सांगितली जातात. सामान्यतः सत्यनाथी, धर्मनाथी, रामपंथ, नाटेश्वरी, कन्हड, कपिलानी, माननाथी, आईपंथ, पागलपंथ, ध्वजपंथ, गंगानाथी व बैरागपंथ या बारा शाखा सांगितल्या जातात. यांखेरीज लक्ष्मणनाथी, दरियानाथी, रावळ, जालंधरि (र) पा, कानिपा, चोलिका, घोडाचूडी, हाडीभरंग, कायिकनाथी, पायलनाथी, उदयनाथी, आरयपंथ, फीलनाथी, चर्पटनाथी, गहिनीनाथी, निरंजननाथी, वरंजोगी, काममज, काषाय, अर्धनारी, नायरी, अमरनाथ, कुंभीदास, तारकनाथ, अमापंथी, भृंगनाथ इ. शाखा भारतभर आहेत. धर्मसाधनेचे वेगवेगळे मार्ग अवलंबणाऱ्या साधकांना गोरखनाथाने नाथ संप्रदायामध्ये एकत्र केले होते. गोरखनाथानंतर त्या साधकांना आपली पूर्वीची साधनावैशिष्ट्ये महत्त्वाची वाटल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भिन्नभिन्न शाखा झाल्या असण्याची शक्यता आहे.


साहित्य : संप्रदायाच्या प्रचारासाठी लोकभाषांचा स्वीकार करावा, असा संप्रदायप्रवर्तकांचा दृष्टिकोन असल्यामुळे आधुनिक भारतीय भाषांपैकी बहुतेक सर्व भाषांच्या प्रारंभिक साहित्यावर नाथ संप्रदायाचा प्रभाव आढळतो. संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये नाथ संप्रदायाचे नानाविध ग्रंथ आहेत. विविध भाषांतील लोककथा, लोकगीते, म्हणी इ. लोकसाहित्यातूनही नाथांच्या आचारविचारांचे दर्शन घडते. संस्कृत ग्रंथांतून साधनामार्गाची चर्चाच अधिक असते, तत्त्वज्ञान व नैतिक उपदेश त्या मानाने कमी असतो. नाथ संप्रदायाच्या साहित्यात प्रामुख्याने शांत व अद्‌भुत रसाचा प्रवाह आढळतो.

हिमालयाच्या महादेवगिरिनामक शिखरावरील एका शिळेवर काही सूत्रे आहेत, असा आदिनाथांनी वसुगुप्त नावाच्या काश्मीरी शिवभक्तास स्वप्‍नात आदेश दिला, अशी एक आख्यायिका आहे. ती सूत्रे म्हणजेच शिवसूत्रे असून नाथ संप्रदायाचे सर्व तत्त्वज्ञान या शिवसूत्रांवर आधारलेले आहे, असे एक मत आहे. कार्तिकेयाने कुलागमशास्त्र समुद्रात फेकले व शिवाने मत्स्येंद्राचा अवतार घेऊन त्याचा उद्धार केल्यावर तेच पुढे नाथ तत्त्वज्ञानाच्या रूपाने विकसित झाले, अशीही आख्यायिका आहे. कौलज्ञाननिर्णय, अकुलवीरतंत्र, कुलानंद इ. अनेक ग्रंथ मत्स्येंद्रनाथांच्या नावावर आहेत परंतु त्यांचे ग्रंथ नाथ संप्रदायापेक्षा शाक्त पंथाचेच वर्णन अधिक करतात, असे म्हटले पाहिजे. गोरखनाथाचा सिद्धसिद्धांतपद्धति हा ग्रंथ मात्र अत्यंत महत्त्वाचा असून त्याचाच संक्षेप सिद्धसिद्धांतसंग्रह या नावाने प्रसिद्ध आहे. सिद्धांनी सांगितलेले तत्त्व तो सिद्धांत म्हणूनच सांप्रदायिक ग्रंथांना सिद्धांतग्रंथ असे म्हणतात. अमनस्क, अमरौघ शासन, गोरक्षपद्धति, गोरक्षसंहिता इ. जवळजवळ २८ ग्रंथ गोरखनाथाच्या नावावर आहेत. त्याच्या नावावर हिंदीतही जवळजवळ ४० ग्रंथ असून गोरखबानी नावाने त्यांचे संकलन प्रकाशित झाले आहे. त्याच्या नावावर हिंदीत अनेक पदे असून त्यांतील कित्येक म्हणींच्या रूपाने प्रचलित झाली आहेत. कन्नडमध्येही गोरखनाथाची वचने आढळतात. या साहित्यातील विचार प्राचीन असले, तरी हे सर्व साहित्य स्वतः गोरखनाथाचे असण्याची शक्यता नाही.

दोन महात्म्यांच्या संवादाच्या रूपाने धर्मविचार मांडण्याची पद्धत नाथयोग्यांनी अंगीकारली आहे. तिचा नंतरच्या संतसाहित्यावर खूपच प्रभाव पडलेला आहे. मछींद्रगोरखबोध म्हणजेच गोरखबोध, गोरखदत्तगुष्टि, गोरषगणेशगुष्टि, महादेवगोरषगुष्टि इ. ग्रंथ या प्रकारचे होत. हठयोगप्रदीपिका गोरक्षसिद्धांतसंग्रह हे गोरक्षोत्तरकालीन ग्रंथही संप्रदायात प्रमाण मानले जातात. मराठीत नवनाथभक्तिसार आणि तेलुगूमध्ये नवनाथचरित्रमु हे चरित्रात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यांखेरीज इतर नाथांच्या व लेखकांच्या नावावर असलेले असंख्य ग्रंथ विविध भाषांतून आढळतात.

अमावस्येच्या घरी चंद्र चमकत आहे किंवा पृथ्वी आकाशाकडे धावत आहे इ. प्रकारचे उलटबाँसी किंवा उल्टवाँसी प्रकारचे साहित्य नाथांनी निर्मिले आहे. या गूढ आणि विरोधाभासयुक्त साहित्याचे प्रतीकात्मक व सांकेतिक अर्थ सांगितले जातात. कबीरादी संतांनी त्या साहित्याचा वारसा नाथ संप्रदायाकडूनच घेतला आहे. गोरखनाथाच्या असल्या वचनांना ‘गोरखधंधा’ असे म्हटले जाते.

उपास्य दैवते : नाथ हा शैव संप्रदाय असल्यामुळे शिव हे त्याचे मुख्य दैवत होय. या संप्रदायात शाक्तांचा समावेश झाल्यामुळे शक्तीची काली, दुर्गा, बालसुंदरी, त्रिपुरासुंदरी, अंबा, जगदंबा इ. रूपे उपास्य ठरली. यांशिवाय, भैरवी अष्टनायिका, मातृका, योगिनी, शाकिनी, डाकिनी आणि इतर उग्रस्वभावी देवींची उपासनाही संप्रदायात केली जाते. त्रिपुरासुंदरीशी एकरूप होऊन अभेदज्ञान प्राप्त करण्यासाठी काही योगी स्वतःला स्त्री मानून तिचे चिंतन करतात. शिवाची भैरव, नंदभैरव, कालभैरव, एकलिंग इ. रूपेही उपास्य आहेत. भैरवाकडून जारणमारणाचे सामर्थ्य मिळविण्याचा प्रयत्‍न केला जातो. भैरवाचा प्याला नाथयोग्यांत प्रसिद्ध आहे. उत्तर व पूर्व भारतात अजूनही नाथयोगी भैरवाच्या मंदिरांतून पुरोहिताचे काम करतात, तसेच ग्रामदेवतांना बळी देण्याचे कामही करतात. गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ आणि ⇨दत्तात्रेय यांच्या मूर्तीची पूजा केली जाते. नेपाळमध्ये मच्छिंद्राची अवलोकितेश्वराच्या रूपाने पूजा करतात. बंगालमध्ये हाडिपाची, तर अनेक ठिकाणी नवनाथ व ८४ सिद्धांच्या मूर्तींचीही पूजा केली जाते. नाथ पंथात हिंदूंच्या इतर देवतांचीही काही ठिकाणी पूजा चालते.

तीर्थक्षेत्रे : नाथ संप्रदायाने तीर्थाटनाला विरोध केला होता तथापि प्रत्यक्षात मात्र नाथयोगी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा करीत असतात. प्रयाग, अयोध्या इ. हिंदू क्षेत्रांना ते भेटी देतात. भारतात सर्वत्र त्यांचे मठ व मंदिरे आहेत. गोरखपूर येथे गोरक्षनाथाचे मंदिर असल्यामुळे ते क्षेत्र सर्वांत अधिक प्रसिद्ध आहे. पाकिस्तानातील पूर्णनाथकूप, बलुचिस्तानातील देवी हिंगलाज, पंजाबमधील गोरखटिल्ला, नेपाळातील काठमांडू, सौराष्ट्रातील गिरनार पर्वत, कच्छमधील धिनोधर मठ, बंगालमधील आदिनाथ, तमिळनाडूमधील काद्रिमठ, मुंबईजवळील पांडुधुनी, ग्‍वाल्हेरजवळील भर्तृगुंफा, कर्नाटकातील हाडी भरंगनाथाचे मंदिर, गंभीरमठ (जि. पुणे), बत्तीसशिराळा (जि. सांगली), त्र्यंबकमठ (जि. नासिक), मत्स्येंद्रगड (जि. सातारा), वृद्धेश्वराचा डोंगर (जि. नगर) इ. अनेक स्थाने ही नाथांची तीर्थक्षेत्रे होत. गोव्यातील चंद्रनाथ, मंगेशनाथ इ. शिवमंदिरे नाथ संप्रदायाशी संबंधित असावीत, असे एक मत आहे.

आख्यायिका : मच्छिंद्राने शंकराकडून तत्त्वज्ञान व वेष मिळविला, त्याने एका राजाच्या प्रेतात प्रवेश करून राजवैभव भोगले, गोरखनाथाने त्याला स्त्रीराज्यातून सोडवून आणले, उकिरड्यावर फेकलेल्या विभूतीपासून गोरखनाथाचा जन्म झाला, गोरखनाथाने काली आणि हनुमान यांना हरवले होते, हाडिपा हा महादेवाच्या हाडापासून जन्मला, चौरंगीनाथाच्या सावत्र आईने त्याचे हातपाय तोडले होते इ. आख्यायिका नाथजोग्यांचे तत्त्वज्ञान, वेष, जन्म इ. बाबतींत आढळतात.

इतर संप्रदायांशी संबंध : भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात या संप्रदायाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. गोरखशिष्य अमरनाथ आणि प्रामुख्याने गहिनीनाथ हे महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष होत. ज्ञानेश्वर-नामदेवांसारखे वारकरी संप्रदायातील संत परंपरेने नाथ संप्रदायाशी संबद्ध असल्यामुळे नाथ संप्रदायातील विचारप्रवाह वारकरी संप्रदायात प्रविष्ट होऊन वाहू लागला. ज्ञानेश्वरांचे पणजे त्र्यंबकपंत यांना गोरखनाथांचा आणि ज्ञानेश्वरांचेच आजे गोविंदपंत, आजी नीराबाई व बंधू निवृत्तीनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह होता. निवृत्तिनाथांकडूनच ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाचा वारसा मिळाला. ज्ञानेश्वरी हा नाथ तत्त्वज्ञानाचा ठेवा आहे, असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. नाथजोग्यांची वंशावळी हीच ज्ञानदेवादी भावंडांची जातिकुळावेगळी वंशावळी, असे मानले जाते. ज्ञानेश्वरांची सर्व भावंडे, मराठीतील आद्यकवी मुकुंदराज, विसोबा खेचर इ. व्यक्ती नाथपरंपरेतीलच होत्या. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांचे गुरू गुंडम राऊळ व आजेगुरू चांगदेव राऊळ हे दोघेही नाथसिद्ध होते. स्वतः चक्रधरांचा इतर अनेक नाथसिद्धांशी संबंध आला होता. ते नाथवाणीची स्तुती करताना आढळतात. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी महानुभाव पंथ स्थापन केला असला, तरी त्या अगोदर त्यांच्यावर नाथ संप्रदायाचाच प्रभाव असल्यामुळे एका दृष्टीने महानुभाव पंथाचा उगम नाथ संप्रदायातूनच झाला, असे म्हणता येते. ⇨दत्त संप्रदाय व नाथ संप्रदाय यांचाही निकटचा संबंध आहे. नाथ आणि दत्तात्रेय या दोघांनाही ‘अवधूत’ हे नाव आहे. नाथ संप्रदायात गुरूचे स्थान महत्त्वाचे असते आणि म्हणूनच आदर्श गुरू असलेल्या दत्तात्रेयाला नाथपंथी पूज्य मानतात. अवधूतगीता दत्ताने गोरक्षाला सांगितली, अनेक नाथांना दत्ताचा अनुग्रह होता, आदिनाथाच्या सांगण्यावरून दत्त्ताने मत्स्येंद्राला उपदेश केला इ. कथा आढळतात. दत्त संप्रदायी ⇨एकनाथांनी नारायण–ब्रह्मा–अत्रिनाथ–दत्त–जनार्दन–एकनाथ अशी आपली परंपरा सांगितली आहे. समर्थ संप्रदाय आणि नाथसंप्रदाय यांचा प्रत्यक्ष संबंध आढळत नसला, तरी समर्थ रामदासांनी व त्यांच्या शिष्यांनी नाथांविषयीही आदर व्यक्त केला आहे. समर्थांनी दासबोधाच्या आधारग्रंथात अवधूतगीतेचा समावेश केला असून त्यांनी नाथसिद्धांचा आरतीत उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात इतरही अनेक नाथपरंपरा आढळतात.


वैष्णव, बौद्ध, जैन, शाक्त, सांख्य, योग इ. अनेक मार्गांचे लोक गोरखनाथाचे अनुयायी झाले आणि त्यामुळे नाथ संप्रदायाचा भारतातील इतर अनेक धर्मपंथांशीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंध आलेला आहे. त्याचा वैष्णव संप्रदायाची संबंध असल्याचे पुढील अनेक गोष्टींवरून सूचित होते. मत्स्येंद्र हा महाविष्णू, निवृत्तिनाथ हा शिव आणि ज्ञानदेव हा विष्णू अशी सांप्रदायिकांची समजूत आहे गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना कृष्णभक्तीचा उपदेश केला ‘कपिलानी’ ही नाथ संप्रदायाची शाखा मूळची वैष्णव योगावर आधारलेली होती आणि अवधूत हा नाथवाचक शब्द वैष्णव संन्याशांनाही लावला जातो. काश्मीरी शैव संप्रदाय म्हणजेच नाथ संप्रदाय, ⇨काश्मीर शैव संप्रदायाचा नाथ संप्रदायावर प्रभाव आहे इ. मते आढळतात. महाराष्ट्रात पाशुपात भराडी हे नाथ संप्रदायाचे अनुयायी बनले, त्यामुळे नाथ संप्रदाय व ⇨पाशुपत पंथ यांचाही संबंध आला. ईशान्य बंगालमधील रंगपूर जिल्ह्यातील एका परंपरेनुसार कानफाटे हे शंकराचार्यांचे शिष्य होते परंतु ते मद्यपी बनल्यामुळे शंकराचार्यांनी  त्यांच्याशी असलेला आपला संबंध तोडून टाकला. शंकराचार्य शेवटी नाथ संप्रदायी बनले, अशीही एक दंतकथा आहे. एका तिबेटी परंपरेनुसार गोरखनाथ व त्याचे शिष्य हे मूळचे बौद्ध होते. मत्स्येंद्रनाथांच्या कौल मार्गाचा बौद्ध (किंवा शाक्त) तंत्राशी संबंध होता, प्रथम बौद्ध असलेले जालंधर नंतर नाथ संप्रदायी बनले. चर्पटीनाथ हा मूळचा रसायनवादी बौद्ध होता बौद्ध मताचा नाथ संप्रदायावर प्रभाव होता, वा तसा तो नव्हता इ. विविध मते आढळतात. कृष्णपाद व इतर काही नाथसिद्धांची नावे बौद्ध सिद्धांशी जुळतात. ‘नीमनाथ’ आणि ‘पारसनाथ’ हे जैन योगी नाथानुयायी होते. नाथ संप्रदाय योगप्रधान असल्याने पातंजल योगाशी त्याचा निकटचा संबंध होताच. सांख्यांची २५ तत्त्वे स्वीकारल्यामुळे सांख्य मताशीही त्याचा संबंध आला. नाथयोगी हे तंत्रमार्गी होते, असे एक मत आहे. नाथ संप्रदायाप्रमाणेच ⇨कापालिक मतही आदिनाथानेच सुरू केले. शाबरतंत्रात दिलेल्या कापालिकांच्या १२ आचार्यांपैकी आदिनाथ आणि १२ शिष्यांपैकी अनेकजण नाथ संप्रदायाचे आचार्य होते. त्रिपुरा मताचे तांत्रिक आचार्य स्वतःला नाथानुयायी मानत. कानिफनाथाने स्वतःला कापालिक म्हटले आहे. कानफाटे तंत्रपूजा करताना आढळतात. नाथ संप्रदायात तंत्रिकांचे लिंगयोनिपूजा, पंचमकार इ. अनेक वामाचार घुसले होते. तंत्रमार्गातील मंत्र, बीज, यंत्र, कवच, न्यास आणि मुद्रा या सर्वांचा नाथ संप्रदायात प्रयोग केला जात होता. नाथ संप्रदायात किमया वा रसवादही (अल्केमी) अंतर्भूत झाला होता. अनेक नाथपंथी सिद्धांचे रसग्रंथ अजूनही वैद्यांमध्ये प्रचलित आहेत. उदा., नागार्जुनाचा रसरत्‍नाकर, नित्यनाथाचा रसरत्‍नाकर इत्यादी. पारा हे शिवाचे वीर्य आणि अभ्रक हे पार्वतीचे ‘रजस्’ असून त्यांच्या मिश्रणाचे विशिष्ट यंत्राद्वारा ऊर्ध्वपातन केले असता शरीराला अमर बनविणारा रस तयार होतो, अशी त्यांची कल्पना होती. गोरखनाथ हे रसविद्येचे आविष्कारक मानले जात, तर चर्पटीनाथ हा रससिद्धच होता. नाथ संप्रदायाचा ‘चीनाचारा’ (तंत्राचा चिनी प्रकार) शीही संबंध होता कारण बोगर हा चीनमध्ये जाऊन आलेला तमिळ सिद्ध आणि पुलिपाणी हा त्याच्याबरोबर भारतात आलेला मूळचा चिनी सिद्ध हे भारतातील सिद्ध, नाथ व रसवाद या संप्रदायांचे सिद्ध असून ते चीनाचाराचे संचालक होते, असे म्हटले जाते.

नाथ संप्रदाय व ⇨वीरशैव पंथ (लिंगायत) यांमध्ये शिव ही आराध्य देवता मानणे, शिवशक्तीचे सामरस्य अनुभवणे इ. बाबतींत साम्य आहे. ⇨बसवेश्वरांचे गुरुतुल्य सहकारी ⇨अल्लमप्रभू व गोरखनाथ यांची भेट झाली होती आणि या भेटीत अल्लमप्रभूंनी गोरखनाथांना प्रभावित केले होते, अशी आख्यायिका आहे. अल्लमप्रभू आणि गोरखनाथ हे दोघेही मत्स्येंद्रांचे शिष्य असल्यामुळे गुरुबंधू होते अल्लमप्रभू, रेवणसिद्ध व मरूळसिद्ध हे प्रथमतः नाथसिद्ध होते इ. मते आढळतात. नाथयोग्याचे स्वरूप, नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान, साधनापद्धती, भाषा आणि आविष्कारपद्धती या सर्वांचा कबीरावर सखोल परिणाम झालेला होता. आदिग्रंथाच्या प्रारंभी असलेल्या गुरू नानकांच्या ‘जपुजी’ वर व इतर शीख गुरूंच्या वाणीवरही नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसतो. गुरू ⇨नानकदेव व गोरखनाथ यांची भेट झाल्याची दंतकथाही आहे. बंगालमधील धर्मसंप्रदायांवर, सूफी कवी जायसीच्या [→जायसी मलिक मुहंमद] लेखनावर व संत दादूच्या  [→दादू पंथ दादू दयाळ] आचारविचारांवर नाथ संप्रदायाची छाप आढळते. मीरेचा कृष्ण नाथजोग्याच्या रूपात आहे, ही गोष्ट लक्षणीय होय. उत्तरेतील सगळी निर्गुणोपासक परंपरा नाथ संप्रदायामुळे परिपुष्ट झाल्याचे मानले जाते. नाथ संप्रदायाच्या काही शाखा वामाचारी विकृतींनी भरल्या परंतु नाथ संप्रदायाने प्रभावित केलेल्या अखिल भारतातील या अनेक पंथांनी आणि संप्रदायांनी भारतीय संस्कृतीला उज्ज्वल बनविले.

प्रभाव व कार्य : मध्ययुगीन धर्मसाधनेमध्ये उफाळलेल्या अनाचारांना विरोध करून नाथ संप्रदायाने विशुद्ध आचार व निष्कलंक चारित्र्याचे महत्त्व वाढवले. वाममार्गी तांत्रिकांचा प्रभाव क्षीण केला. तीर्थयात्रा, रूढी, कर्मठता, शब्दप्रामाण्य, पंडिती वाद इ. बाह्याचारांच्या अवडंबराला विरोध करून आत्मप्रामाण्याचे महत्त्व वाढवले. अडबंगनाथासारखे शेतकरी आणि हाडिपासारखे अंत्यज यांना संप्रदायात स्थान देऊन जातिभेद दूर करण्याचा प्रयत्‍न केला. याउलट, भर्तृहरी, गोपीचंद इ. राजेही नाथ संप्रदायाचे अनुयायी बनले. मुसलमानांना पंथात घेतल्यामुळे हिंदुमुसलमानांतील विरोध कमी झाला. गोपीचंद राजाची आई मनावती, योगिनी मुक्ताबाई, गुप्तनाथ हे नाव धारण केलेली राशीनची गंगाबाई इ. स्त्रियांनाही पंथात प्रवेश दिला गेला. लोकोद्धाराच्या तळमळीने नाथ संप्रदायाने लोकभाषांचा स्वीकार करून सर्वसामान्यांसाठी मोक्षमार्ग सुलभ केला. योगमार्गाला एक व्यवस्थित रूप देऊन त्यात कुंडलिनी शक्ती व मानवी शरीरातील षट्‍चक्रे यांची उपपत्ती मांडून


आपल्या तत्त्वज्ञानात उत्तम व विशुद्ध गोष्टींचा समन्वय साधला. अशा रीतीने धार्मिक वातावरण शुद्ध व उदात्त बनविल्यामुळे मध्ययुगात नाथ संप्रदायाचा प्रभाव भारतात सर्वत्र पडून तो मध्ययुगीन साधनेची गंगोत्री ठरला. ज्ञानदेवपूर्व तीन-चार शतके तर हा संप्रदाय लोकमान्यतेच्या अगदी शिखरावर होता परंतु इतके माहात्म्य असलेला हा संप्रदाय फार काळ आपला प्रभाव टिकवू शकला नाही. गोरखनाथ व नाथ संप्रदाय यांच्याकडून अनेक संतमहात्म्यांनी प्रेरणा घेतली असली, तरी त्यांनी नाथ संप्रदायाहून वेगळे असे आपपाले पंथ चालू केले. महाराष्ट्रात हा पंथ चालू होतो न होतो, तोच त्याच्याच तत्त्वांचा वारसा घेऊन वारकरी संप्रदाय प्रबळ झाला आणि त्यामुळे मूळचा नाथ संप्रदाय मात्र क्षीण झाला. चक्रधरांसारख्यांनी काही बाबतींत या संप्रदायावर टीका करण्यासही प्रारंभ केला.त्यामुळेगोरखनाथाच्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष नाथ संप्रदायाची धुरा वाहणारी व सर्व शाखांचा समन्वय साधणारी त्याच्या तोडीची व्यक्ती संप्रदायात उरली नाही. अशा स्थितीत बौद्ध, शाक्त, कापालिक इ. सिद्धांचे पूर्वीचे वामाचारी संस्कार पुन्हा उचल खाऊ लागले. पंचमकारादींचे सेवन सुरू झाले. शुद्ध आचरण उरले नाही. शिवाय सर्वसामान्य समाज वर्णाश्रमव्यवस्था मानणारा असल्यामुळे त्याला नाथांचे वर्णाश्रमविरोधी वर्तन मानवले नाही. काही योगी मठ स्थापून गृहस्थ बनले. मनाची शुद्धता जाऊन बाह्मवेषाला अधिक महत्त्व आले आणि संप्रदाय उपजीविकेचे साधन बनला. म्हणूनच एकनाथ, तुकाराम, रामदास, कबीर इत्यादींनी या पंथातील दोषांवर कठोर टीका केली. पुढे पुढे कानफाटे हा शब्द तुच्छतेने वापरला जाऊ लागला. नाथ संप्रदायाने योगाला अत्यधिक महत्त्व दिल्यामुळेही तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिला नाही. नाथ संप्रदायातील शुष्कता व गृहस्थाश्रमाविषयीचा अनादर यांमुळेही तो नीरस व लोकविद्विष्ट बनला.

संदर्भ : 1. Briggs, G. W. Gorakhnath and the Kanphata Yogis, Calcutta, 1938.

           2. Gopinath, K. Some Aspects of the History and Doctrines of the Nathas, Banaras, 1931.

           3. Mallik, K. Siddha-Siddhanta &amp other Works of the Nath Yogis, Poona, 1954.

           4. Mohan Singh, Gorakhnath and Medieval Hindu Mysticism, Lahore, 1937.

           ५. ढेरे, रा. चिं. श्रीगुरु गोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, मुंबई, १९५९.

           ६. द्विवेदी, हजारीप्रसाद,नाथसंप्रदाय, अलाहाबाद, १९५०.

 

साळुंखे,आ.ह.