साईबाबासाईबाबा : (१८५६–१५ ऑक्टोबर १९१८). महाराष्ट्रातील एक सत्पुरुष. त्यांच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. ते इ. स. १८७२ मध्ये एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीला (जिल्हा अहमदनगर) आले. त्यावेळी त्यांचे वय सोळा असावे. या वऱ्हाडाचा मुक्काम गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ होता. शिर्डीतील म्हाळसापतिनामक एक सुवर्णकार दररोज खंडोबाच्या दर्शनास येत असत. एक दिवशी त्यांनी या तरुण मुलास पाहिले आणि त्याला एकदम ‘आवो साई’ अशी प्रेमाने हाक मारली आणि तेव्हापासून ‘साईबाबा’ हे त्यांचे नाव रूढ झाले. साईबाबा अखेरपर्यंत शिर्डीत राहिले. म्हाळसापती हे पुढे त्यांचे निस्सीम भक्त बनले. साईबाबांच्या आध्यात्मिक अधिकाराचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय अनेकांना येऊ लागल्यानंतर एक थोर सत्पुरुष म्हणून त्यांचे नाव शिर्डी गावाच्या सीमांपलीकडे दूरवर पोहोचले आणि शिर्डीला एका पवित्र स्थळाचे माहात्म्य प्राप्त झाले.

साईबाबांचा धर्म कोणता, हे कधीच कोणाला कळले नाही. त्यांचे दिसणे एखाद्या मुसलमान फकिरासारखे होते. शिर्डी येथील एका पडक्या मशिदीत त्यांचे वास्तव्य असे परंतु त्या मशिदीला ते ‘द्वारकामाई’ म्हणत आणि तेथे सदैव एक धुनी पेटलेली असे. ‘अल्ला’, ‘अल्लामालिक’ असे परमेश्वरवाचक शब्द त्यांच्या तोंडून अनेकदा बाहेर पडत परंतु ते स्वतः रामाची उपासना करीत. त्यांचे वागणे धार्मिक भेदांच्या पलीकडचे असे. म्हणूनच त्यांच्या भक्तांमध्ये सर्वधर्मीयांचा समावेश होत गेला. ते ‘यादे हक्क’ (मी देवाचे स्मरण करतो) परंतु मी देव नाही, असे नेहमी पुटपुटत. ‘सबका मालिक एक’, ‘श्रद्घा’ आणि ‘सबुरी’ हा त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. आपण ईश्वर किंवा ईश्व राचा अवतार आहोत (अनल हक्क), असे त्यांनी कधीही म्हटले नाही.

कफनीसारखा एक सैल अंगरखा ते घालीत. डोक्याला फकिरासारखे एक फडके बांधलेले असे. खांद्याला मळकट कापडाची एक झोळी आणि हातात पत्र्याचे एक टमरेल असे साहित्य घेऊन शिर्डी गावात ते पाच घरी भिक्षा मागून खात. ते चिलीम ओढीत असत. त्यांनी कधीही कोणाकडून दक्षिणा घेतली नाही मात्र तरीसुद्घा त्यांच्यासमोर भक्तांकडून येणारे पैसे, मिठाई, अन्य वस्तू ते गोरगरिबांना वाटून टाकीत. मुक्या प्राण्यांवरही त्यांची फार माया होती. द्वारकामाईत कायम पेटलेल्या धुनीतील उदी ते भक्तांना प्रसाद म्हणून देत. आपल्या कृपाप्रसादाने त्यांनी अनेकांच्या अनेक प्रकारच्या दु:खांचे निवारण केले.

शिर्डी येथे त्यांनी देह ठेवल्यानंतर, त्या गावी त्यांच्या समाधि- मंदिराच्या दर्शनार्थ जाणाऱ्यांची संख्या वाढत राहिली. अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे उभारली गेली आणि जात आहेत. त्यांच्या वास्तव्यामुळे शिर्डी एक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले आहे. दरवर्षी चैत्र शुद्घ नवमीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या सभामंडपातील डावीकडील काचेच्या दालनात साईबाबा वापरीत असलेल्या चिलीम, हुक्का, सुरई, पादुका, छत्री इ. वस्तू ठेवल्या आहेत.

कुलकर्णी, अ. र.