पापक्षालन दिन :  (डे ऑफ अटोनमेंट). ज्यू धर्मीय लोकांचा सर्वात पवित्र व महत्त्वाचा दिवस. ज्यू पंचांगातील सातव्या तिशरी नावाच्या महिन्याचा हा दहावा दिवस. साधारणपणे तो सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला येतो. हिब्रू भाषेत ह्या दिवसात ‘योम-किप्पूर’ म्हणतात. तिशरी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे नववर्षदिनापासून सुरू होणाऱ्या दहा दिवसांच्या पश्चात्तापकालाची सांगता ह्या दिवशी होते. ज्यू राष्ट्राच्या पातकांचे क्षालन व्हावे म्हणून हा दिवस पाळला जातो. सर्व ज्यूंनी ह्या दिवशी कडक उपवास करावयाचा, दिवसभर प्रार्थना करावयाची व कसल्याही प्रकारचे काम करावयाचे नाही, असा रिवाज आहे.

ह्या दिवशी ज्यूंचा प्रमुख धर्मगुरू सर्व राष्ट्राकरिता, मंदिरांकरिता व लोकांकरिता वासराचा एक बलियज्ञ करतो. या दिवशी आपली नेहमीची वस्त्रेभूषणे न वापरता तो साधी व शुभ्र वस्त्रे परिधान करतो. वासरू हे सर्व राष्ट्राच्या पातकाचे प्रतीक समजून त्याचा बळी दिला जातो. पापक्षालन दिनाची सांगता शेवटी शिंग फुंकून होते. पापमुक्त होऊन ईश्वरी साक्षात्कार झाल्याचे प्रतीक म्हणून हा शिंगनाद असतो.

आयरन, जे. डब्ल्यू.