कार्तिकेय : हिंदू पुराणकथांतील शिव-पार्वतीचा जेष्ठ पुत्र व देवांचा सेनापती. त्याच्या जन्माबाबत पुराणांत विविध कथा आहेत. रामायणात तो अग्नी व गंगा यांचा पुत्र असल्याचे म्हटले आहे. स्कंद, कुमार, षडानन, अंगार, सेनानी, देवसेनापती, अग्निभू, द्वादशकर, गुह, गंगा-पुत्र, महासेन, मंगळ (ग्रह), शक्तिधर, सिद्धसेन विशाख इ. नावांनीही त्याचे उल्लेख आढळतात. कृत्तिकांनी त्याचा प्रतिपाळ केला म्हणून त्याला कार्तिकेय नाव आहे.

कार्तिकेय : चिदंबरम् येथील एक शिल्प

दक्षिण भारतात त्याला मुरुग (मूरूगण) अथवा सुब्रह्मण्य असे नाव आहे. त्याच्या विविध मूर्तीही आहेत. तो युद्धदेव मानला जातो. दक्षिण भारतात मात्र तो विद्येचा देव मानला गेला. देवांचे सेनापतीत्व करून त्याने तारकासुर व महिषासुर ह्या दैत्यांचा वध केल्याच्या कथापद्म, मत्स्यादी  पुराणांत तसेच महाभारतात आहेत. काही कथांत तो ब्रह्मचारी असल्याचे, तर काही कथांत त्याची पत्नी देवसेना (दक्षिण भारतात तिचे नाव वळ्ळी) व पुत्र शाख, विशाख व नैगमेय असल्याचे म्हटले आहे. विश्वामित्राने त्याचे उपनयन केले; विष्णूने त्याला गरुड, मयूर व कुक्कुट; वायूने पताका; सरस्वतीने वीणा; ब्रह्मदेवाने बोकड व शिवाने मेंढा दिला. इंद्र व स्कंद यांच्या संघर्षाची कथा महाभारतात आहे.

कार्तिकेय ही मुळात आर्येतरांची देवता असावी असे काही विद्वान मानतात. उत्तर भारतात गुप्तकालानंतर त्याची स्वतंत्र देवता म्हणून उपासना होत असल्याचे अथवा त्याची स्वतंत्र मंदिरे उभारल्याचे दिसत नाही. शिवमंदिरातील शिवपरिवारात पार्श्वदेवता म्हणून मात्र तो विराजमान झाला. दक्षिण भारतात मात्र चोलादी राजांनी त्याची स्वतंत्र मंदिरे उभारली. तो ब्रह्मचारी असून स्त्रियांनी त्याचे दर्शन घेतल्यास वैधव्य येते, असा समज महाराष्ट्रात आहे.

उत्तर भारतात त्याच्या कुशाण व गुप्तकालातील अनेक मूर्ती सापडल्या तसेच दक्षिण भारतातही त्याच्या विविध मूर्ती सापडल्या आहेत. षण्मुख, चतुर्भुज, मस्तकी मोरपीस, रक्तवस्त्र, मयूरवाहन, उजव्या हातात कुक्कुट व घंटा, डाव्या हातांत वैजयंती व शक्ती अशी त्याची मूर्ती असावी, म्हणून हेमाद्री (हेमाडपंत) सांगतो. बृहत्संहितेत द्विभुज, मयूरवाहन, कुमाररूप आणि हातात भाला असे त्याचे वर्णन आहे; तर अंशुमद्‌भेदागमात षण्मुख स्कंदाचे द्विभुज, चतुर्भुज, षड्‌भुज व द्वादशभुज असे चार प्रकार वर्णिले आहेत.

 

सुर्वे, भा. ग.