पराशर : एक गोत्रप्रवर्तक वैदिक ऋषी व स्मृतिकार. पराशर हे गोत्रनाम आहे. ते उपनाम म्हणून त्या गोत्रातील व्यक्तींना लागते हे ध्यानात घेतले, म्हणजे निरनिराळ्या कालखंडांतील ग्रंथकार पराशर होत, ह्याचा अर्थ कळतो. वसिष्ठाचा पुत्र शक्ती याच्यापासून अदृश्यंतीस झालेला पुत्र. शक्तीचा पुत्र म्हणून ‘पराशर शाक्त्य’ असेही त्याचे नाव आहे. शक्ती हा एकदा अरण्यात गेला असता पुराणाप्रमाणे विश्वामित्राच्या शिष्यांनी त्याचा वध केला. अदृश्यंतीने गर्भात असलेल्या बालकाचे बारा वर्षे संरक्षण केले. वेदांचे अध्ययन पराशराने मातेच्या गर्भातच केले. वसिष्ठाचे सात पुत्र मारले गेले त्यांत शक्तीही मेला. विसिष्ठाने वृद्धापकाली पराशराचे पालनपोषण केले. निरुक्तकार यास्काच्या मते तो वसिष्ठाचाच पुत्र होय. त्याला ‘पराशर’ म्हणजे पराशीर्ण (म्हणजे म्हातारा वसिष्ठ) याचा पुत्र, अशी व्युत्पत्ती निरुक्तात (६·३०) दिली आहे.

ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील ६५ ते ७३ ही सूक्ते त्याच्या नावावर आहेत. आपल्या पित्याचा वध करणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी त्याने ‘राक्षससत्र’ आरंभिले, अशी कथा अनेक पुराणांत आढळते (विष्णुपुराण  १·१ लिंगपुराण १·६४). वसिष्ठाच्या सांगण्यावरून त्याने हे सत्र बंद केले. तीर्थयात्रेच्या निमित्ताने तो यमुनेच्या तीरावर गेला असता, त्याचे मन उपरिचरवसूनामक राजाची कन्या सत्यवती हिच्यावर बसले. सत्यवतीला त्याच्यापासून जो मुलगा झाला तोच द्वैपायन व्यास होय, असे महाभारतात (आदिपर्व ५७·९९) म्हटले आहे. पार्जिटरने ‘पराशर शाक्त्य’ व ‘पराशर सागर’ अशा पराशर नावाच्या दोन व्यक्ती वसिष्ठकुलात होऊन गेल्याचे म्हटले आहे. पराशर शाक्त्य हा वैदिक सुदासाचा समकालीन व वसिष्ठाचा नातू होता. त्यानेच राक्षससत्र केले. पराशर सागर हा शंतनूचा समकालीन, सगर वसिष्ठाचा पुत्र, द्वैपायन व्यासाचा पिता होता, असे मत व्यक्त केले तथापि हे मत विवाद्य आहे.

पराशरकृत म्हणून पराशराच्या नावावर पराशरस्मृती  किंवा पाराशरस्मृति हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. त्यात बारा अध्याय व ५९२ श्लोक आहेत. आचार, प्रायश्चित्त, पुनर्विवाह, आपद्धर्म इ. अनेक विषयांची चर्चा त्यात आली आहे. या स्मृतीचा रचनाकाल पाचव्या शतकाच्या दरम्यानचा असावा, असे अभ्यासक मानतात. कृत, त्रेता, द्वापर व कली या चार युगांत अमुक्रमे मनू, गौतम, शंखलिखित व पराशर यांच्या स्मृती प्रमाणभूत मानाव्यात, असे या स्मृतीच्या आरंभीच्या भागात म्हटले आहे. पूर्वसूरींच्या एकोणीस स्मृतिग्रंथांची नावेही तीत आली आहेत. याज्ञवल्क्यस्मृतीत (१·४) धर्मावरील प्राचीन लेखकांत पराशराचा उल्लेख आहे. त्यावरून ही स्मृती बरीच प्राचीन असावी असे दिसते तथापि सध्या उपलब्ध असलेली पराशरस्मृति ही मूळ स्मृती नव्हे ती नंतर मूळ स्मृतीत भर घालून तयार केलेली स्मृती आहे. ती सुधारित स्मृती असण्याचीच जास्त शक्यता आहे. मिताक्षरा, अपरार्काची याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका स्मृतिचंद्रिका यांत तसेच हेमाद्री व विश्वरूप यांच्याही ग्रंथांत या स्मृतीतील वचने आलेली आहेत. त्यावरून नवव्या शतकाच्या पूर्वार्धात ती प्रमाणभूत मानली जात असावी. गरुडपुराणातही (१·१०७) एकूण ३९ पद्यांत या स्मृतीचा सारांश दिला आहे. यावरूनही ही स्मृती प्रमाणभूत मानली जात होती, असे दिसते.

कौटिलीय अर्थशास्त्रातसहा वेळा (१·८·७ १·१५·२३ १·१७.९ २·७·१२ ८·१·२४ व ८·३·३०) पराशर वा पाराशर याची राजकीय व प्रशासकीय विषयांवरील मते उद‌्धृत केलेली आहेत. त्यावरून पराशराचा राज्यशास्त्रावरही एखादा ग्रंथ असावा व त्यात राजव्यवहाराचे विवरण असावे, असे दिसते.

बृहत्-पराशर-संहिता नावाचा एक बृहद‌्ग्रंथ त्याच्या नावावर असून त्यात १२ अध्याय व इंद्रवज्रा आणि वसंततिलका वृत्तांतील सु. ३,३०० श्लोक आहेत. सुव्रताने मूळ पराशरस्मृतीत भर घालून हा ग्रंथ तयार केला असावा, असे मूळ स्मृती व यातील साम्यावरून दिसते. या ग्रंथाचा काल मूळ स्मृतीच्या बराच नंतरचा असावा.

या दोन ग्रंथांंशिवाय त्याच्या नावावर पुढील धर्मशास्त्रविषयक ग्रंथांचे निर्देश आहेत. वृद्धपराशरस्मृति याचा निर्देश अपरार्काच्या याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीकेत (२·३१८) व माधवाच्या पराशर माधवीय (१·१·३२३०) यांत आढळतो. ज्योति पराशर या स्मृतिग्रंथाचा निर्देश हेमाद्रीने व भट्टोजी दीक्षिताने केला आहे.

धर्मशास्त्राव्यतिरिक्त पराशराच्या नावावर पराशरसंहिता, बृहत्पाराशर होराशास्त्र, लघुपाराशरी, पाराशर्यकल्प हे ज्योतिषविषयक ग्रंथ तसेच पराशरतंत्र, वृद्धपराशर, हस्तिआयुर्वेद, गोलक्षण, वृक्षायुर्वे हे वैद्यकविषयक ग्रंथ पराशरोपपुराण नावाचा एक पुराणग्रंथ पराशर केवलसार हा वास्तुशास्त्रविषयक ग्रंथ असल्याचे निर्देश आढळतात.

पराशर हा गोत्रर्षी त्याच्या वंशाच्या गौरपराशर, नीलपराशर, श्यामपराशर, कृष्णपराशर, श्वेतपराशर व धूम्रपराशर अशा सहा शाखा झाल्या.

भिडे, वि. वि.