दस्तूर: जरथुश्त्रप्रणीत धर्माचा उपदेश करणारा आदरणीय विद्वान पारशी धर्मगुरू म्हणजे दस्तूर होय. प्राचीन काळी इराणात विद्वान आणि आदरणीय पारसिक ‘दस्तूर’ या पदवीस पात्र असे. हा शब्द‘दत’ म्हणजे नियम, कायदा आणि‘बर’ म्हणजे धारण करणारा, अनुसरणारा यापासून‘दतोबर’–‘दस्तोबर’–‘दस्तूर’ अशा प्रकारे सिद्ध झाल्या असल्याने, त्याचा अर्थ नियमांचे पालन करणारा, मार्गदर्शक, असा होतो. न्यायनिवाडा करण्याचेही काम त्याच्याकडे असे.

इराणमध्ये ससान वंशीय राजांच्या कारकीर्दीत आदराबाद मेहरास्पंद ह्या दस्तुराने अनेक दिव्ये करून जरथुश्त्री धर्माची सत्यता आणि थोरवी लोकांना पटवून दिली. त्याचप्रमाणे नवव्या शतकातील पार्स व केरमनचा दस्तूर मीनोचेहर यानेही धर्मप्रचाराचे उल्लेखनीय कार्य केले. त्याचे पेहलवी भाषेतील उपदेशपर लिखाण आजही उपलब्ध आहे.

भारतात पारशी धर्मगुरूसच दस्तूर असे संबोधण्यात येते. दस्तूर नइर्योसंघ धवल याने संपूर्ण अवेस्ता  ग्रंथ संस्कृमध्ये अनुवादित केला आहे. दस्तूर मेहेरजी राणा याने अकबराच्या दरबारात जरथुश्त्री धर्माची उदात्त तत्त्वे विशद करून सांगितली. त्यामुळे अकबराने खूष होऊन त्यास नवसारी जवळची जहागीर दिली. मेहेरजी राणा याचे वंशज आजही सर्वश्रेष्ठ दस्तूर समजले जातात.

उदवाडा येथे ‘इराणशाह आतश्–बेहराम’ नामक सर्वश्रेष्ठ अग्यारी आहे. या अग्यारीशी संबंधित असलेल्या दस्तुरांना विशेष मान दिला जातो. हे सर्व दस्तूर विद्वान, अवेस्ता  धर्मग्रंथ पूर्णपणे जाणणारे आणि पारसिकांना धार्मिक विधींबाबत योग्य मार्गदर्शन करणारे आहेत. पुणे येथील दस्तूर हा दक्षिण भारताचा दस्तूर म्हणून ओळखले जातो.

तारापोर, जे. सी. (इं.) सोनटक्के, ना. श्री. (म.)