ग्रहण : तारे, ग्रह, चंद्र व सूर्य यांपैकी एखादा खस्थ गोल दुसऱ्या गोलाच्या सावलीत गेल्यामुळे किंवा पहाणाऱ्याच्या दृष्टीने एका गोलाच्या आड दुसरा गोल गेल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला गोल तात्पुरता दिसेनासा होणे, या आविष्कारास ग्रहण असे म्हणतात. सूर्यबिंबाच्या आड ग्रह आला तर त्यास ⇨अधिक्रमण  म्हणतात. चंद्र, सूर्य यांच्या आड ग्रह किंवा तारे गेले तर त्यास ⇨पिधान  म्हणतात. ग्रहा आड ग्रह किंवा ग्रहा आड तारे जाणे हे फारच क्वचित दिसते. ही सर्वसामान्यपणे ग्रहणेच असली तरी सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या संबंधातच ग्रहण हा शब्द सामान्यतः उपयोगात आणतात. सूर्य व चंद्र यांची बिंबे जवळजवळ समान असल्यामुळे आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे सूर्यग्रहण व चंद्रग्रहण होते.

सूर्यग्रहण : चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र व सूर्य यांची युती (किंवा अमावस्या) असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. अशा परिस्थितीत चंद्राच्या प्रच्छायेत किंवा गडद छायेत पृथ्वीच्या सूर्यासमोरील गोलार्धापैकी काही क्षेत्र येते. या क्षेत्रावर सूर्यकिरण पोहचत नाहीत व या भागातील लोकांना सूर्यग्रहण दिसते. चंद्रकक्षा व क्रांतीवृत्त (सूर्याचा वार्षिक भासमान गतीमार्ग) ही एकाच पातळीत नाहीत. त्यांची प्रतले (पातळ्या) एकमेकांस छेदतात व त्यांमध्ये ५ ९’ एवढा कोन आहे. त्यांच्या छेदनबिंदूंना ⇨पात  म्हणतात. आरोही पात तो राहू  व अवरोही पात तो केतू  . अमावास्या जर राहू किंवा केतू यांच्या सान्निध्यात सूर्य असताना घडली, तरच सूर्यग्रहण घडते. राहू व केतू यांना विलोमगती (उलट गती) आहे. त्यामुळे प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण लागत नाही.

आ. १ मध्ये चंद्र व सूर्य यांना समस्पर्शी शंकू म्हणजे प्रच्छाया शंकू पृथ्वीच्या पृष्ठभागास साधारणपणे या वर्तुळाकार क्षेत्रात छेदतो. या क्षेत्राचा व्यास जास्तीत जास्त ३oo किमी. असू शकतो. या क्षेत्रात सूर्याचा प्रकाश अजिबात पोचत नाही म्हणून तेथील निरीक्षकाला सूर्यबिंब मुळीच दिसत नाही, अशा ग्रहणाला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्रगोल पृथ्वीच्या मानाने फार लहान असल्यामुळे पृथ्वीवरील थोड्याच भागात सूर्यग्रहण सूर्यग्रहण

दिसते. चंद्र व सूर्य यांना व्युत्क्रम (उलटा) स्पर्श करणारा जो व्युत्क्रम शंकू असतो. तो पृथ्वीला पूर्वीच्या वर्तुळाशी समकेंद्री पण मोठ्या वर्तुळाकार क्षेत्रात छेदतो. या वर्तुळाचा व्यास सु. १,००० किमी. असतो. चंद्राची या प्रदेशातील छाया विरळ (अंधुक) असते म्हणून या शंकूला उपच्छाया शंकू व छायेला उपच्छाया म्हणतात. या उपच्छाया प्रदेशात चंद्र सूर्याच्या थोडासाच आड आल्यामुळे सूर्याचा थोडासा भाग झाकला जातो. अशा ग्रहणाला खंडग्रास किंवा अल्पग्रास ग्रहण म्हणतात. पृथ्वी आणि चंद्र यांच्या गतींमुळे प्रच्छाया क्षेत्र व उपच्छाया क्षेत्र एखादा मोठ्या ढगाप्रमाणे पृथ्वीवरील निरनिराळ्या स्थानांवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत सरकत जाते. उंच विमानातून छायेचे सरकणे दिसू शकते. या सरकण्याचा वेग साधारणपणे सेकंदाला ०·५ ते २ किमी. असतो. यामुळे एकाच ठिकाणी खग्रास सूर्यग्रहण फारच अल्पकाळ दिसते. याची कमाल मर्यादा ७·५ मिनिटे असते. पृथ्वीच्या सूर्याकडील गोलार्धाच्या सर्व भागांत सूर्यग्रहण दिसत नाही. उपच्छाया असेल तेथे खंड व प्रछाया असेल तेथे खग्रास ग्रहण दिसते. तेही सर्व ठिकाणी एकाचवेळी दिसत नाही. ग्रहण दिसण्याची शक्यता असलेल्या पट्ट्यातील लोकांना ते पश्चिमेकडून पूर्वेकडे हळूहळू दिसत जाते. १९७३ जूनमध्ये दिसलेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी छायेच्या वेगाने विमानातून प्रवास करून शास्त्रज्ञांनी ग्रहणाचे दीर्घ काळ निरीक्षण केले.

आ. २. कंकणाकृती ग्रहणखंडग्रास व खग्रास यांखेरीज सूर्यग्रहणाचा आणखी एक प्रकार संभवतो. पृथ्वीची व चंद्राची कक्षा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) असल्यामुळे पृथ्वीपासून सूर्य कधी जवळ तर कधी दूर असतो. तसेच चंद्रही पृथ्वीपासून कधी जवळ तर कधी दूर असतो. सूर्य जवळ असेल तेव्हा सूर्यबिंब मोठे दिसेल व त्याच वेळी चंद्र दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसेल. ग्रहणाच्या वेळी अशी परिस्थिती असली तर प्रच्छायाशंकूचे टोक पृथ्वीपर्यंत पोहचतच नाही. ते आ. २ मध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीच्या अलीकडे या ठिकाणी असते. अशा वेळी च्या पूढे वाढविलेला शंकू पृथ्वीला या अगदी छोट्या वर्तुळाकृतीत छेदतो. या भागातील लोकांना सूर्यबिंबाचा मधला मोठा भागच अदृश्य होऊन कडेचा तेजस्वी भाग बांगडीसारखा दिसतो. अशा ग्रहणाला कंकणाकृती ग्रहण म्हणतात. या कंकणाचा रंग लालसर असतो. कंकणाकृती ग्रहणे फारच थोडी लागतात. ग्रहणाचा कंकणाकृती आकार फक्त १०–१२ सेकंदच टिकतो. अगदी क्वचित प्रच्छायाशंकूचे टोक आपल्या मार्गात पृथ्वीला फक्त किंचित स्पर्श करून जाते. अशा वेळी ग्रहण प्रथम कंकणाकृती नंतर किंचित्काल खग्रास आणि पुन्हा कंकणाकृती असे दिसते. ग्रहणाचे सर्व प्रकार अशा ग्रहणात येऊन जातात.

सूर्यग्रहण सुरू होण्याच्या वेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या पश्चिमेस असते म्हणून ग्रहण सुरू होताना चंद्रबिंब सूर्यबिंबाला पश्चिमेकडून स्पर्श करते. चंद्राची कोणीय गती सूर्याच्या कोणीय गतीच्या सु. १३ पट असल्याने चंद्रबिंब सूर्यबिंबाला उल्लंघून जाते.

ग्रहणाचा स्पर्श झाला म्हणजे सूर्यप्रकाश मंद मंद होत जातो. आकाश अभ्राच्छादित झाल्यासारखे दिसते. ग्रहण खग्रास असेल तेव्हा सूर्य पूर्णपणे ग्रस्त झाल्याबरोबर सूर्यास्तानंतरच्या संधिप्रकाशाइतका अंधार पडतो. तापमान थोडेसे उतरते. सूर्यसन्निध असलेले ग्रह व तारे दिसू लागतात. इतरत्रही आकाशात मोठे मोठे तारे दिसू लागतात. पक्षी घरट्याकडे जाऊ लागतात. काळ्या चंद्रबिंबाभोवती सूर्याच्या बिंबालगतचा तेजस्वी भाग म्हणजे किरीट अग्निशिखांनी वेढल्यासारखा दिसतो. चंद्राची अप्रकाशित बाजू पृथ्वीकडे असल्याने चंद्र काळाकुट्ट दिसतो, खग्रास ग्रहण लागल्यापासून सुटेपर्यंत दीड पावणेदोन तास लागतात. सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहणे डोळ्यांना हानिकारक असते. म्हणून गडद रंगाच्या किंवा काजळीने काळ्या केलेल्या काचेतून ग्रहण पाहणे आवश्यक असते.


  

चंद्रग्रहण : चंद्राच्या पृथ्वीभोवतालच्या प्रदक्षिणेत चंद्र–सूर्य युतीमुळे अमावास्येला सूर्य व पृथ्वी यांच्या मधे चंद्र येतो आणि छायाशंकू पृथ्वीवर पोचून सूर्यग्रहण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सूर्याची चंद्राशी प्रतियुती असते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी येते, पृथ्वीची चंद्रावर सावली पडते म्हणून चंद्रग्रहणाची शक्यता असते. परतु चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण मागे सांगितल्याप्रमाणे

चंद्रकक्षा व क्रांतिवृत्त समपातळीत नसून त्यांच्या पातळ्यांमध्ये ५ ९’ चा कोन आहे. त्यामुळे फक्त पातांच्या म्हणजे राहू–केतूंच्या सान्निध्यात जर पौर्णिमा झाली, तरच चंद्रग्रहणास अनुकूल परिस्थिती असते. यावेळी सूर्य, पृथ्वी व चंद्र यांचे मध्य जवळजवळ एका रेषेत येतात. पृथ्वीच्या प्रच्छायाशंकूतून चंद्र जातो. चंद्रकक्षा ज्या ठिकाणी प्रच्छायाशंकूचा छेद करते त्या ठिकाणी प्रच्छायाशंकूचा व्यास सु. ९,००० किमी. असतो.

आ. ३. चंद्रग्रहण

आ. ३ मध्ये सू हा सूर्याचा मध्यबिंदू, पृ ही पृथ्वी आणि हा चंद्र असून पृथ्वीचा प्रच्छायाशंकू पर्यंत पोचतो. दुसरा व्युत्क्रम स्पर्शरेषांनी बनलेला छायाशंकू असतो. याचा कोनबिंदू सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान असून च्या पुढे त्याचा व्यास वाढत वाढत जातो. याला व्युत्क्रमछायाशंकू म्हणतात. या शंकूमध्ये पृथ्वीपासून पुढे पृथ्वीची विरळ छाया पडते म्हणून हा शंकू उपछायाशंकू होय. याला जेथे चंद्रकक्षा छेदते तेथील व्यास सु. १५,००० किमी. असतो. प्रच्छायाशंकूचा छेद व उपछायाशंकूचा छेद हे दोन्ही समकेंद्री असतात. चंद्राची कोनीय गती छायेच्या कोनीय गतीच्या १३ पट असल्याने पृथ्वीवरील निरीक्षकाला चंद्रबिंब प्रच्छायाबिंबात काही काळ कमीअधिक अंतर्धान पावताना दिसते. याला चंद्रग्रहण म्हणतात. प्रच्छायाबिंबाचा कोनीय व्यासार्ध चंद्रबिंबाच्या व्यासार्धाच्या तिप्पट असल्याने कधीकधी चंद्र पूर्णपणे छायेत बुडून जातो. अशा वेळी खग्रास चंद्रग्रहण होते. उपच्छायाशंकूत चंद्र शिरला, तरी प्रकाशाचे मंदत्व जाणवत नाही. म्हणून चंद्राचे मंदच्छाया ग्रहण दिसून येत नाही. परंतु चंद्र जेव्हा प्रच्छायाशंकूत शिरतो तेव्हा चंद्रग्रहण सुरू झाले–स्पर्श झाला–असे आपण म्हणतो. सूर्य–पृथ्वी रेषेपासून चंद्र थोडासा दूर असला, तर चंद्र पूर्णपणे कधीच प्रच्छायेतून न जाता थोडा फार प्रच्छायेतून जातो व उरलेला चंद्राचा प्रकाशित भाग दिसतो, तेव्हा चंद्राचे खंडग्रास ग्रहण झाले असे म्हणतात. चंद्रकक्षेने प्रच्छायेचा केलेला छेद चंद्रबिंबापेक्षा नेहमी बराच मोठा असल्याने चंद्राला कधीच  कंकणाकृती ग्रहण लागत नाही. चंद्रग्रहण पृथ्वीवरील ज्या गोलार्धात रात्र आहे तेथील सर्व लोकांना दिसते. मात्र तेथे चंद्र क्षितिजाच्या वर असला पाहिजे.

आ. ४. चंद्राचा पृथ्वीच्या छायेतून प्रवासचंद्र पृथ्वीच्या प्रच्छायेत पूर्णपणे शिरला म्हणजे तो वास्तविक दिसेनासा व्हावयास पाहिजे. तथापि तसे होत नाही. पृथ्वीभोवती जे वातावरण आहे त्यातून जाणाऱ्या सूर्यकिरणांचे प्रणमन (वक्रीभवन) होऊन सप्तरंगांपैकी लाल रंगाचे किरण चंद्रपृष्ठावर पोचतात व परावर्तित होऊन पृथ्वीवर येतात. त्यामुळे चंद्र जरी पूर्ण ग्रस्त झाला, तरी त्याचे बिंब मंद तांबड्या रंगाचे दिसते. खग्रास चंद्रग्रहण पावणेदोन तास असू शकते. एकूण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा कालावधी साडेतीन तास असू शकतो. उपच्छाया ग्रहण ६ तासांपर्यंत टिकते पण ते जाणवत नाही. पृथ्वीची प्रच्छाया वातावरणामुळे रेखीव नसते. त्यामुळे चंद्रग्रहणाचा स्पर्श व मोक्ष काल अचूक टिपता येत नाही, पण चंद्रावर वातावरण नसल्याने सूर्यग्रहणाचे स्पर्श व मोक्ष काल टिपता येतात. खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र छायेमधून प्रवास कसा करतो, स्पर्शमध्ये-मोक्ष कसे होतात हे आ. ४ वरून स्पष्ट होईल. आकृतीतील बाहेरचे मोठे वर्तुळ उपच्छायेचा छेद व आतील मोठे वर्तुळ प्रच्छायेचा छेद आहे. चंद्रबिंब पश्चिमेकडून १ या ठिकाणी आल्यावर उपच्छायेला बाहेरून स्पर्श करते. या स्पर्शाला ग्रहण या दृष्टीने महत्त्व नाही. २ या ठिकाणी आल्यावर चंद्रबिंब आतील वर्तुळास म्हणजे प्रच्छायावर्तुळास बाहेरून स्पर्श करते. तेव्हा ग्रहणास सुरुवात म्हणजे स्पर्श होतो. ३ या ठिकाणी आल्यावर चंद्रबिंब प्रच्छायावर्तुळास आतून स्पर्श करते तेव्हापासून चंद्र संपूर्णपणे छायेत जातो व खग्रास ग्रहाणाला सुरुवात होते. पुढे चंद्रबिंब व छाया-छेद यांची केंद्रे एकत्र आली किंवा चंद्रबिंब छाया-छेद यांची केंद्रे जोडणारी रेषा ४ या ठिकाणी पपू या मार्गास लंब झाली म्हणजे ग्रहणाचा मध्य होतो. ५ या अवस्थेत चंद्रबिंब छायाबिंबास आतून स्पर्श करते म्हणून ग्रहण सुटण्यास सुरुवात होते व खंडित चंद्र दिसू लागतो. ६ या ठिकाणी आल्यावर बिंबाचा व छायाबिंबाचा बाहेरून स्पर्श होतो आणि ग्रहण संपूर्ण सुटते. या अवस्थेस मोक्ष असे म्हणतात. नंतर थोड्या वेळाने बिंब उपच्छायेतूनसुद्धा बाहेर पडते व चंद्र पूर्ववत तेजस्वी होतो. चंद्रग्रहणाचा स्पर्श पूर्वेकडून व मोक्ष पश्चिमेकडे होतो.

ग्रहणसंभव : विशिष्ट पोर्णिमेस चंद्रग्रहण आणि विशिष्ट अमावास्येस सूर्यग्रहण होईल की नाही, ग्रहणाचा प्रकार, स्पर्श-मध्य-मोक्ष यांचे काल, पृथ्वीवर (ते सूर्यग्रहण असेल तर) कोणत्या ठिकाणी केव्हा केव्हा व कसेकसे दिसेल, खंडग्रास असेल तर किती भाग ग्रस्त असेल या गोष्टी गणिताच्या साहाय्याने काढता येतात. सूर्य-चंद्राची युती किंवा प्रतियुती राहू किंवा केतू या बिंदूजवळ होईल तेव्हाच ग्रहणे होतात. म्हणजेच सूर्य अमावास्येला अगर पौर्णिमेला राहूच्या किंवा केतूच्या जवळच असावा लागतो.

राहू व केतू हे क्रांतिवृत्तावर स्थिर नसून ते चंद्राच्या उलट गतीने सरकतात. त्यांची क्रांतिवृत्तावरील एक प्रदक्षिणा सु. १८·६ वर्षांत होते. राहूसापेक्ष सूर्याच्या एका प्रदक्षिणेस ३४६·६२० दिवस लागतात. या अवधीला ग्रहणवर्ष म्हणतात. हा काळ सांपातिक वर्षापेक्षा सु. १८·५ दिवसांनी कमी आहे. पृथ्वी व सूर्य यांमधील अंतर सरासरी १४·९६ कोटी किमी. असल्यामुळे पृथ्वीवर दूरदूर राहणाऱ्या निरीक्षकांना खगोलावरील सूर्याच्या स्थानात पराशयामुळे (निरीक्षकाच्या स्थानात बदल झाल्यामुळे खस्थ गोलाच्या खगोलावरील स्थानात होणाऱ्या बदलामुळे) पडणारा फरक फारसा जाणवणार नाही. सूर्याचा पराशय ८ सेकंद आहे. पंरतु चंद्राचा पराशय जवळजवळ १ अंश असल्यामुळे दोन दूरदूरच्या स्थळांवरून चंद्र किंचित भिन्न ठिकाणी दिसेल.


आ. ५. सूर्यग्रहणाची शक्यता दर्शविणारी आकृती

आ. ५ मध्ये सूर्यग्रहणाच्या शक्यतेचा विचार केला आहे. ककहे क्रांतिवृत्त, गग ही चंद्रकक्षा, हा राहू, आणि ,र याअनुक्रमे सूर्याच्या च्या अगोदरच्या व नंतरच्या स्थिती तसेच , च आणि, च ही तत्कालिक चंद्राची स्थाने दाखविली आहेत. मोठी वर्तुळे असे दर्शवितात की, त्यांनी रविबिंबाचा छेद केला की, पृथ्वीवरील कोणत्या ना कोणत्या तरी निरीक्षकास ग्रहण दिसलेच पाहिजे. यांना ग्रहणसंभव-वृत्ते म्हणतात. म्हणून ही ठिकाणे ग्रहणसंभवाची मर्यादास्थाने आहेत. ते या अंतरात अमावास्या होईल त्याच वेळी चंद्र यांच्या दरम्यान असेल तर सूर्यग्रहण होईल किंवा हे अंतर १८३१’ पेक्षा जास्त असेल तर सूर्यग्रहण होणार नाही, १५ २१’ पेक्षा कमी असेल तर निश्चित होईल आणि त्यांच्या दरम्यान असेल तर होईल किंवा होणार नाही. सूर्यग्रहणाच्या बाबतीत ४ हे ३६-३७० अंतर जाण्यास सूर्याला सु. ३८ दिवस लागतात. दोन अमावास्यांत सु. ३० दिवसांचे अंतर असते. ३८ दिवसांच्या दरम्यान पाताजवळ सूर्य असताना एकच अमावास्या होईल आणि सूर्यग्रहण लागेल. परंतु याच अवधीत दोन अमावास्या येणे शक्य आहे. तशा आल्या तर लागोपाठ दोन अमावास्यांना दोन सूर्यग्रहणे होतील. पण ती पृथ्वीवरच्या एकाच ठिकाणी होणार नाहीत. सूर्यग्रहण खग्रास होण्यासाठी सूर्य पातापासून ११ अंशांच्या आत असावा लागतो. या मर्यादेत कंकणाकृतीचीही शक्यता आली.

आ. ६. चंद्रग्रहणाची शक्यता दर्शविणारी आकृती

अशीच चंद्रग्रहणाची शक्यता आ. ६ वरून लक्षात येईल. कक या क्रांतिवृत्तावर , छ, छ, छ ही  च्या अगोदरची व नंतरची छायाबिंबांची ठिकाणे गग या चंद्रकक्षेवर , च, च, चही अनुरूप चंद्रस्थाने आहेत. ते ४ यांमध्ये छाया असून पौर्णिमा होईल व चंद्र , चयांच्या दरम्यान असेल, तर चंद्रग्रहण होईल असा संभव असतो छाया , छ यांच्या दरम्यान पौर्णिमा असून चंद्र , च यांच्या दरम्यान असेल तर चंद्रग्रहण नक्की होईल. चंद्रग्रहणाच्या मर्यादा १२ १५’ व९३०’ अशा आहेत. म्हणजे सूर्य १२१५’ यापेक्षा पातापासून दूर असेल तरचंद्रग्रहण होणार नाही, ९ ३०’ यापेक्षा जवळ असेल तर नक्की होईल आणि दरम्यान असेल तर होईल किंवा होणार नाही.

सूर्य एका पातापासून दुसऱ्या पाताजवळ जाण्यास १७३ दिवस लागतात. सहा चांद्रमासांचे १७७ दिवस होतात. वर्षातले ग्रहणसंभवकालाचे दोन्ही पातबिंदूंजवळचे दिवस ७६ असतात. म्हणजे ३६५–७६ = २८९ दिवसांत ग्रहणे होतच नाहीत. यातल्या एका पाताजवळ सूर्यग्रहण, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण अशी तीन ग्रहणे झाली, तर खालीलप्रमाणे ग्रहणे अनुकूल परिस्थितीत होऊ शकतात (सू म्हणजे सूर्यग्रहण व चं म्हणजे चंद्रग्रहण).

राहूजवळ : सू, चं, सू (एका महिन्यात)

केतूजवळ : सू, चं, सू (तेथून सातव्या महिन्यात)

राहूजवळ : सू (बाराव्या महिन्यात)

          किंवा 

राहूजवळ : चं, सू (एका महिन्यात)

केतूजवळ : सू, चं, सू (तेथून सातव्या महिन्यात)

राहूजवळ : सू, चं (बाराव्या महिन्यात)

पुढील ग्रहण पुढच्या वर्षात जाईल.

एका वर्षात सूर्याची ५ व चंद्राची २, किंवा सूर्याची ४ व चंद्राची ३ अशी जास्तीत जास्त सात ग्रहणे लागतात. सूर्य, चंद्र व राहू, केतू यांच्या गती लक्षात घेतल्या म्हणजे एका वर्षात तीनपेक्षा जास्त चंद्रग्रहणे लागत नाहीत आणि हेही क्वचितच होते. १९८२ साली ९ जानेवारी, ६ जुलै आणि ३० डिसेंबर अशी तीन चंद्रग्रहणे आहेत. जरी परिस्थिती प्रतिकूल असली, तरी दोन तरी ग्रहणे होतातच आणि ती सूर्यग्रहणेच असतात. अशी १९३५ साली झाली होती व पुन्हा २१६० साली होतील.

खग्रास सूर्यग्रहण ही घटना विशिष्ट स्थळी फार विरळा दिसते. इंग्लंडमध्ये गेल्या ६०० वर्षांत अशी फक्त सातच ग्रहणे दिसली. ५० वर्षांच्या काळात विशिष्ट स्थळी ४० चंद्रग्रहणे व २० खंडग्रास सूर्यंग्रहण लागतात. परंतु चारशे वर्षांच्या अवधीत एखादेच खग्रास सूर्यग्रहण असू शकते.

सर्व पृथ्वीच्या दृष्टीने पाहता सूर्यग्रहणे चंद्रग्रहणांपेक्षा जास्त होतात. पण सूर्यग्रहणे फार थोड्या भागात दिसत असल्यामुळे विशिष्ट स्थळी सूर्यग्रहणांपेक्षा चंद्रग्रहणे जास्त दिसतात.  

थीओदर ओपोल्ट्‌सर या ऑस्ट्रियन ज्योतिर्विदांनी १८८७ साली इ. स. पू. १२०८ पासून इ. स. २१५१ सालापर्यंतची ८,२०० सूर्यग्रहणे व इ. स. पू. १२०७ ते इ. स. २१६३ सालापर्यंतची ५,२०० चंद्रग्रहणे स्थलकालादी तपशीलासह प्रसिद्ध केली आहेत. विसाव्या शतकात सूर्याची २२८ व चंद्राची १४८ ग्रहणे आहेत. एखादे सूर्यग्रहण प्रथम कंकणाकृती व नंतर लगेच खग्रास होऊ शकते. असे ग्रहण ३० मे १९८४ या दिवशी होईल. इ. स. १९७६ ते २००० या कालावधीत होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणांची माहिती कोष्टकात (पृ. ३३३) दिली आहे.

अनेक वर्षांच्या ग्रहणांचा अभ्यास केल्यावर असे आढळले की, १८ वर्षे ११ / दिवस किंवा लीप वर्ष असेल, तर १० / दिवस या काळाच्या अंतराने तीच ग्रहणे त्याच क्रमाने पुनःपुन्हा येतात. या कालखंडास सारोस किंवा ग्रहणचक्र म्हणतात. हे चक्र खाल्डियन लोकांना ठाऊक होते. या चक्रात सूर्याची ४१ व चंद्राची २९ ग्रहणे येतात किंवा एखादे वेळी एक सूर्यग्रहण जास्त असते. ४२ पैकी  ७  व २८पैकी १८ विशिष्ट ठिकाणी दिसतात. २२३ चांद्रमासांचे ६,५८५.३२१६ दिवस होतात. २४२ राहूसापेक्षा चांद्रमासांचे ६,५८५.३५७२ दिवस होतात. राहूचे सांवासिक वर्ष ३४६.६२ दिवसांचे व अशा १९ वर्षांचा काळही ६,५८५.७५ दिवसांचाच होतो म्हणून १८ वर्षे ११ / दि., २२३ चांद्रमास, २४२ राहूसापेक्ष चांद्रमास व १९ ग्रहणवर्षे हा काळ जवळजवळ सारखाच असतो , म्हणून या ग्रहणचक्रात तीच तीच ग्रहणे पुनःपुन्हा येतात. परंतु ही ग्रहणे पूर्वी दिसलेल्या ठिकाणापासून सु. १२० रेखांश अंतरावरच्या ठिकाणावरून दिसतात. कारण ग्रहणचक्र पूर्णदिवसांचे नसून ८ तासांच्या अवधीचा त्यात समावेश आहे. १९,७५६ दिवसांचेही असेच एक मोठे ग्रहणचक्र असते, हे ५४ वर्षांचे असते.

सूर्यग्रहण अगर चंद्रग्रहण ज्या वर्षी असेल त्या वर्षाच्या पंचांगात त्यांची समग्र माहिती देण्याची पद्धत आहे. त्यात ग्रहणांचे स्पर्श, मध्य, मोक्ष यांचे ठिकठिकाणचे काल व सूर्यग्रहण असेल, तर नकाशा देऊन त्यावर ते कोठे कोठे व किती दिसेल, या गोष्टी दिलेल्या असतात.


सूर्यग्रहणाचे वेध : भूभौतिकीतील आविष्कारांच्या उलगड्यासाठी सूर्यग्रहणांचे वेध फार उपयुक्त असतात. यासाठी सूर्यग्रहण विशेषतः खग्रास असेल अशा ठिकाणी ते दूर असले तरी संशोधक जातात. सूर्याचा किरीट (सूर्यबिंबाभोवतालचा तेजस्वी भाग), तेजःशृंगे (प्रदीप्त वायूंच्या लांब ज्वाला) व ज्वालमाला (सौरपृष्ठावरील अनियमित आकाराचा असामान्य तेजस्वी पट्टा) यांच्या अभ्यासासाठी खग्रास ग्रहणाचा काळ सोयीस्कार असतो. कारण या वेळी सूर्याचा मधला तेजस्वी गोल चंद्रबिंबाने थोडा वेळ झाकलेला असतो. म्हणून सूर्याच्या दीप्तमंडलाचे (दृश्य पृष्ठभागाचे) किरण दूरदर्शकापर्यंत पोचत नाहीत. सूर्याच्या अशा अभ्यासाकरिता खग्रास सूर्यग्रहण येण्यासाठी हल्ली थांबावे लागत नाही. किरीटलेखकाच्या (कृत्रिम रीतीने सूर्यग्रहणासारखी निरीक्षणे घेता येणाऱ्या उपकरणाच्या) साहाय्याने अशी बहुतेक प्रकारची निरीक्षणे करता येतात. खग्रास सूर्यग्रहण लागते पुष्कळ दिवसांनी, दिसते थोड्या व दूरदूरच्या ठिकाणी आणि तेही अगदी थोडा वेळच, अशा परिस्थितीत थोड्या मिनिटांत पूर्णपणे वेध घेणे कठीण असते. त्यातूनही आयत्या वेळी सूर्यबिंब अभ्राच्छादित झाले, तर सर्व खटपट वाया जाते. तरीही ग्रहणाच्या प्रत्यक्ष वेधाचेही उपयोग आहेतच. अगोदर गणिताने वर्तविलेल्या भाकितांचा वेधांनी प्रत्यय पाहता येतो. फरक आढळला तर सूर्यचंद्राच्या गतीत किंवा तद्विषयक इतर गोष्टीसंबंधीच्या माहितीत सुधारणा करता येते. सूर्य व चंद्र अगदी जवळ असल्यामुळे त्यांच्या स्थानांचे मापन एकाच यंत्रणेने करता येते. चंद्रकक्षेचे सूक्ष्म निरीक्षण होते व चंद्राच्या आकाराचे अधिक सविस्तरपणे ज्ञान होते.

आतापर्यंत ग्रहणाच्या वेधांवरून बरेच संशोधन झालेले आहे. दीप्तमंडलाला बाहेरून लागत असलेला वर्णमंडल हा भाग १६,००० किमी. उंचीचा आहे. यात पताकांसारखे फडफडणारे कित्येक तेजाचे पट्टे दिसतात. ग्रहण खग्रास झाल्यावर तेजस्वी तांबडे वर्णमंडल चांगले दिसते. त्यातून मधून मधून उंच उंच निघणाऱ्या ज्वाला दिसतात, यांनाच तेजःशृंगे म्हणतात. ही शुभ्र किरिटात घुसतात. किरीट लांबवर दिसतो. त्यातून निघणारे झोत सूर्याच्या ध्रुवांकडे झुकतात. वर्णमंडलाची सीमा अत्यंत अस्पष्ट असते. सूर्यपृष्ठाचे तापमान अतिशय उच्च असते. सूर्याच्या अंतर्भागात व पृष्ठावर कोणकोणती द्रव्ये आहेत, हे वर्णपटलेखकाच्या साहाय्याने समजते. खग्रास ग्रहणात दीप्तमंडल पूर्णपणे झाकले गेल्यावर सूर्यपृष्ठाच्या वरचे थर दिसतात. वर्णपटलेखकात एक स्वयंप्रकाशी वायूचा वर्णपट मिळतो. खग्रासत्व संपताच प्रकाशाची एक लकेर (चमक) एकदम दिसू लागते. तिच्या वर्णपटास क्षणदीप्तिवर्णपट म्हणतात. सूर्याचा किरीट चांगला तळपलेला दिसतो. जेथे सूर्यावर डाग कमीत कमी असतात तेथे पताकांसारखे झोत सूर्यबिंबाच्या चौपट पाचपट उंच दिसतात. डाग जास्तीत जास्त असतात तेथे किरिटात फुलाच्या पाकळ्यांप्रमाणे निळ्या प्रकाशाचे विभाग दिसतात. ते इतके अस्पष्ट असतात की, त्यांची तेजस्विता सूर्याच्या /५००००० असते.

३० जून १९७३ या दिवशीच्या सापेक्षतः दीर्घ मुदतीच्या खग्रास सूर्यग्रहणाचा पाठलाग करण्याकरिता कंकार्ड हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करणारे) विमान योजिले होते. ते पृथ्वीपासून १८,००० मी. उंचीवरून प्रवास करीत होते. यामुळे वातावरणाचा किंवा इतर कोणताही व्यत्यय न येता शास्त्रज्ञांना ते सूर्यग्रहण खग्रास स्वरूपात ९० मिनिटे पाहता आले. या दीर्घ मुदतीमुळे अधिक गुंतागुंतीचे प्रयोग शास्त्रज्ञांना करता आले. या विमानाचा वेग सेकंदाला २,००० किमी. होता. असे दीर्घ मुदतीचे ग्रहण यानंतर २०५० साली होणार आहे.

वर उल्लेखिलेल्या किरीटलेखकाने सर्व काम भागतेच असे नाही. प्रत्यक्ष खग्रास ग्रहणाचे वेध घेण्याची आवश्यकता उरतेच. कारण प्रत्यक्ष सूर्य व किरीट यांच्या तेजस्वितेत मोठा फरक असल्याने किरीटलेखकाने किरीटाचे वेध घेणे कठीण पडते. खग्रास सूर्यग्रहणामुळेच किरिटाचा सूक्ष्मतम तपशील व क्षीण भाग अभ्यासणे सोपे जाते. कित्येक ग्रहणांचे निरीक्षण करून सूर्याच्या बाह्यवातावरणाची पुष्कळ माहिती गोळा करता आली आहे. सूर्य हा पृथ्वीला सर्वांत जवळचा तारा असल्यामुळे अशा निरीक्षणांनी वैश्विक माध्यम व आंतरतारकीय अवकाश यांतील संक्रमणावस्थेतील स्वरूप व यंत्रणा यांसंबंधी अधिक ज्ञान झाले आहे. यांशिवाय अत्यंत तप्त पण विरल अवस्थेमुळे किरीट ही एक प्रकारची कित्येक आणवीय आविष्कारांची आदर्श प्रयोगशाळाच असते. अशी प्रयोगशाळा कृत्रिम तऱ्हेने निर्माण करणे अशक्य आहे. स्वनातीत विमानयोजनेने ग्रहणकाल दसपट वाढला. त्यामुळे किरिटात घडणाऱ्या तास-दीड तासाच्या दीर्घ अवधीत घडणाऱ्या फरकांचे निरीक्षण करता येते. अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगापलीकडील) तरंगलांबीच्याच प्रदेशात वावरता येते.

खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीच्या वातावरणातून प्रणमन झालेले किरण चंद्राच्या पृष्ठभागावर जातात, चंद्र कधीच पूर्णपणे अदृश्य होत नाही, त्याला तपकिरी रंग येतो यावरून पृथ्वीच्या उच्च वातावरणातील वरच्या थरातील त्यावेळच्या घटनेसंबंधी काही निष्कर्ष काढता येतात. उदा., मार्च १९४२ च्या ग्रहणाच्या वेळी स्तरावरणात १५ ते ३० किमी.पर्यंतच्या वरच्या थरात मुख्यतः ओझोनाचे वैपुल्य निश्चित करता आले.

ग्रहण खग्रास होण्याच्या अगोदर एक क्षणभरच काळ्या भागाच्या कडेवर तुटक तुटक बारीक तेजस्वी ठिपके दिसतात. बेली या शास्त्रज्ञांनी ते शोधून काढले म्हणून त्यांना बेली यांचे मणी (बेलीज बीड्स) म्हणतात. चंद्राच्या त्या वेळच्या अगदी कडेच्या भागावर असलेल्या दऱ्यांमधून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे किंवा विवर्तनामुळे (प्रकाश कडांशी वाकल्यामुळे) हे मणी दिसतात.

सापेक्षतावाद व सूर्यग्रहण :आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या पडताळ्यासाठी ग्रहणांचा फार उपयोग झाला. गुरुत्वीय क्षेत्रातून जाताना प्रकाशकिरण विचलित होतात हे ग्रहणाच्या वेळी प्रत्ययास आले. आइन्स्टाइन यांचे म्हणणे असे होते की, जे तारे ग्रहणकालात सूर्याच्या बिंबाच्या मागे दडल्यामुळे अदृश्य झालेपाहिजेत ते ग्रहणात दिसू लागतील. तसेच सूर्याच्या लगत असणारे तारे विचलित म्हणजे सूर्यापासून थोडे दूर दिसतील. कारण सूर्याच्या गुरुत्वीय क्षेत्रात प्रकाशकिरणांचे विचलन होते. ही गोष्ट प्रथम १९१९ च्या ग्रहणात अनुभवास आली आणि त्यानंतरही अनेक वेळा प्रत्यंतरास आली [→ सापेक्षता सिद्धांत].

चंद्रावरून ग्रहणे : चंद्रावरून ग्रहणांचे दर्शनसुद्धा उद्‌बोधक व आकर्षक होईल. परंतु दृश्यांमध्ये फारच फरक जाणवेल. जेव्हा पृथ्वीवर सूर्यग्रहण दिसते तेव्हा चंद्रावरून ते पृथ्वीग्रहण म्हणून दिसेल. परंतु चंद्राची सावली पृथ्वीवर लहान पडत असल्यामुळे चंद्रावरील रात्र असलेल्या विभागावरून ते पृथ्वीग्रहण अधिक्रमणासारखे दिसेल. एक मोठा काळा गोल पृथ्वीबिंबावरून सरकत सरकत जाईल किंवा थोड्या प्रमाणात खंडग्रास पृथ्वीग्रहण दिसेल. पृथ्वीला खग्रास ग्रहण कधीच लागणार नाही. कारण पृथ्वीवरील चंद्रच्छायेचा व्यास नेहमीच पृथ्वीच्या व्यासापेक्षा फारच कमी असणार. त्याचप्रमाणे पृथ्वीवरून जेव्हा चंद्रग्रहण दिसते तेव्हा चंद्रावरून तेच सूर्यग्रहण दिसेल परंतु ते कधीच कंकणाकृती असणार नाही. संपूर्ण खग्रास किंवा खंडग्रास दिसेल. या वेळी सूर्याच्या किरिटाचा देखावा दिसणार नाही. कारण तोही पृथ्वीमुळे झाकला जाईल. अमेरिकेच्या सर्व्हेयर—३ या चंद्रावर उतरलेल्या अवकाशयानाने चंद्राच्या पृष्ठभागावरून प्रथमच पृथ्वीमुळे झालेल्या सूर्यग्रहणाची २४ एप्रिल १९६७ रोजी रंगीत छायाचित्रे पाठविली होती. मात्र या दिवशी पृथ्वीवरून खग्रास चंद्रग्रहण दिसले होते.


ऐतिहासिक उल्लेख : चिनी बखरीत सर्वांत जुना ग्रहणासंबंधी उल्लेख आहे. तो इ. स. पू. २२ ऑक्टोबर २१३७ या दिवशी घडलेल्या ग्रहणाचा आहे. चीनमधील बांबूकक्स  या प्रसिद्ध ग्रंथात इ. स. पू. १९५२ या वर्षी ग्रहण झाल्याचा उल्लेख आहे. शू किंग  या पुस्तकात एका करुणरसप्रधान कवितेत चंद्रग्रहणानंतर लगेच १५ दिवसांनी सूर्यग्रहण झाल्याचा उल्लेख आहे. इ.स.पू. १९६१ चे चंद्रग्रहण आणि इ.स.पू. १२१७ चे सूर्यग्रहण ही पडताळून पाहिलेली आहेत.

होमर यांच्या ओडिसी  या महाकाव्यात दोन ठिकाणी ग्रहणांचा उल्लेख आहे. ते खग्रास सूर्यग्रहण इ. स. पू. १६ एप्रिल ११७८ या दिवशी झालेले असावे. इ. स. पू. ७६३–६२ या वर्षी असिरियात बंड झाले होते. तेव्हा (शिबन महिन्यात) इ. स. पू. १५ जून ७६३ रोजी सूर्यग्रहण झाले होते. या ग्रहणाचा बायबलातही उल्लेख आहे. मायलीटसच्या थेलीझ या ग्रीक साधूंनी इ. स. पू. १८ मे ६०३ च्या ग्रहणावरून ग्रहणचक्रांच्या मदतीने इ. स. पू. २८ मे ५८५ चे सूर्यग्रहण अगोदर वर्तविले होते.  इ. स. पू. ३ ऑगस्ट ४३१ च्या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याने चंद्रकलेचा आकार धारण केला होता असे नमूद आहे. इ. स. पू. ७१ या वर्षी कंकणाकृती ग्रहण झाल्याची नोंद आहे.

सम्राट अलेक्झांडर यांनी चंद्रग्रहण पाहून चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची पूजा केली होती. १ मार्च १५०४ रोजी झालेले चंद्रग्रहण कोलंबस यांना अगोदर ठाऊक असल्याने जमेकातील तद्देशीय लोकांना भीती घालून आपल्या सैन्याला अन्न मिळविण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला होता.

१९७६ ते २००० पर्यंत होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणांची यादी 

 

दिनांक 

भारतीय प्रमाण वेळ 

खग्रासपणाचा 

अवधी 

 

दुपारी १२ वाजता खग्रास 

असेल अशा ठिकाणांचे 

ग्रहणाचा मार्ग 

 

तास 

मिनिटे 

मिनिटे 

 

अक्षांश 

रेखांश 

 

२३ ऑक्टोबर १९७६ 

१० 

४० सकाळी 

५·० 

 

३१ द. 

९५ पू. 

मध्य आफ्रिका, हिंदी महासागर 

 

१३ ऑक्टोबर १९७७ 

२ 

०१ पहाटे 

२·९ 

 

१६ उ. 

१२७ प. 

पॅसिफिक महासागर, व्हेनेझुएला 

 

२६ फेब्रुवारी १९७९ 

२२ 

१७ रात्री 

३·० 

 

६१ उ. 

७७ प. 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा 

 

१६ फेब्रुवारी १९८० 

१४ 

२२ दुपारी 

४·४ 

 

१ उ. 

४८ पू. 

मध्य आफ्रिका, भारत, चीन 

 

३१ जुलै १९८१ 

९ 

२३ सकाळी 

२·२ 

 

५४ उ. 

१२७ पू. 

रशिया, सायबीरिया, पॅसिफिक महासागर 

 

११ जून १९८३ 

१० 

०८ सकाळी 

५·५ 

 

७ द. 

११ पू. 

हिंदी महासागर, सुमात्रा, न्यू गिनी, पॅसिफिक महासागर 

 

३० मे १९८४ * 

२२ 

१८ रात्री 

०·० 

 

३८ उ. 

७४ प. 

मेक्सिको, अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

 

२३ नोव्हेंबर १९८४ 

४ 

२७ पहाटे 

२·२ 

 

३९ द. 

१७० प. 

द. पॅसिफिक महासागर 

 

१२ नोव्हेंबर १९८५ 

१९ 

५० रात्री 

   

५२ द. 

१४६ प. 

सूर्योदयाच्या वेळी, अंटार्क्टिक महासागर 

 

४ ऑक्टोबर १९८६ 

० 

२५ रात्री 

   

६६ उ. 

२६ प. 

सूर्योदयाच्या वेळी , आर्क्टिक महासागर 

 

२९ मार्च १९८७ 

१८ 

१५ सायंकाळी 

०·४ 

 

१७ द. 

६ प. 

अटलांटिक महासागर, मध्य आफ्रिका 

 

१८ मार्च १९८८ 

७ 

३३ सकाळी 

४·१ 

 

२८ उ. 

१४६ पू. 

सुमात्रा, बोर्निओ, फिलिपीन्स 

 

२२ जुलै १९९० 

८ 

२४ सकाळी 

२·७ 

 

७३ उ. 

१४२ पू. 

रशिया, नोव्हाया, झेलिया, सायबीरिया, उत्तर महासागर 

 

१२ जुलै १९९१ 

० 

३६ रात्री 

७·२ 

 

२२ उ. 

१०५ प. 

मेक्सिको, यूकातान, व्हेनेझुएला, ब्राझील 

 

३० जून १९९२ 

१७ 

४९ सायंकाळी 

५·५ 

 

२६ द. 

५ प. 

द. अटलांटिक महासागर 

 

३ नोव्हेंबर १९९४ 

१९ 

०६ सायंकाळी 

४·६ 

 

३६ द. 

३१ प. 

पॅसिफिक महासागर, द. अमेरिका, द. अटलांटिक महासागर 

 

२४ ऑक्टोबर १९९५ 

१० 

०७ सकाळी 

२·४ 

 

१० उ. 

११० पू. 

भारत, मलाया, पॉलिनीशिया 

 

९ मार्च १९९७ 

६ 

४५ सकाळी 

२·९ 

 

७१ उ. 

१५४ प. 

मध्य आशिया, सायबीरिया 

 

११ फेब्रुवारी १९९८ 

१६ 

३८ दुपारी 

४·५ 

 

६ उ. 

८१ प. 

पॅसिफिक महासागर, पनामा, व्हेनेझुएला, अटलांटिक महासागर 

 

२६ ऑगस्ट १९९९ 

२२ 

५७ रात्री 

२·६ 

 

४६ उ. 

१८ पू. 

जर्मनी, रशिया, चीन, भारत 

 

* कंकणाकृती 

 

भारतीय पुराणांत ग्रहणांचे काही उल्लेख आहेत. पांडव वनवासात निघाले तेव्हा सूर्यग्रहण झाले होते. तसेच कौरव-पांडव युद्धापूर्वी कार्तिकी पौर्णिमेस चंद्रग्रहण व लगेच अमावास्येला सूर्यग्रहण झाले होते. दुर्योधनवधाच्या वेळी सूर्यग्रहण होते असे महाभारतात वर्णन आहे.

फडके, ना. ह.

धार्मिक दृष्ट्या ग्रहण : ग्रहणाबाबत जगातील विविध धर्मांत तसेच जातीजमातींत काही विशिष्ट समजुती चालत आल्याचे दिसते. सर्वसामान्यपणे चंद्राचे वा सूर्याचे ग्रहण सर्वत्र अशुभ, अरिष्ट तसेच आपत्ती, रोगराई, युद्धादींचे सूचक म्हणून मानले जाते आणि ह्या अशुभाच्या परिहारार्थ विशिष्ट प्रकारचे कर्मकांड व विधिनिषेध पाळले जातात. ग्रहण लवकर सुटून चंद्र वा सूर्याचे पूर्ववत बिंब दिसावे म्हणून वेगवेगळे उपाय सर्वत्र अवलंबिले जातात.


खाल्डियन लोकांत चंद्रग्रहण दिसणे हे चंद्रदेवतेच्या कोपाचे लक्षण मानत. त्यामुळे महामारीवा प्राणघातक साथींचे रोग, दुष्काळ, युद्धे, भूकंपादी आपत्ती येतात, अशी त्यांची समजूत होती. ग्रीक लोकांतही ग्रहण अशुभसूचक मानले जाई. चंद्र वा सूर्यदेवतेने आपले तोंड फिरवले म्हणजे ग्रहण लागते, अशी त्यांची समजूतहोती. मोहिमेवर असताना ग्रहण दिसले, तर ते अशुभसूचक समजून ग्रीक लोकांनी माघार घेतल्याचे वा तह केल्याचे उल्लेख आढळतात. रोमन इतिहासकार लिव्ही (इ. स. पू. ५९–इ. स. १७) याने चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राला ग्रासणाऱ्या पशूंना हुसकून लावण्यासाठी गोंगाट वा आरडाओरड करण्याच्या तत्कालीन प्रथेचा उल्लेख केला आहे. ढोल वा झांजा किंवा इतर कर्कश वाद्यांचा गजर केल्याने ग्रहण सुटते, या प्रथेचा टॅसिटस (इ. स. सु.५५–सु. ११७) या रोमन इतिहासकारानेही उल्लेख केला आहे. प्राचीन तूरिन विभागातील लोकही ग्रहण सुटावे म्हणून वाद्यांचा गजर करीत. आर्मेनियन लोकांत पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये एखादा कृष्णग्रह आला, तर ग्रहण लागते अशी समजूत होती. काही एस्किमो लोकांत ग्रहणामुळे पृथ्वीवर दूषित प्रभाव पडत असतो आणि ग्रहणकालात जर खाद्यपेयाची भांडी पालथी ठेवली नाहीत, तर त्यामुळे रोगराई पसरते अशी समजूत आहे. म्हणूनच ग्रहणकालात एस्किमो स्त्रिया सर्व भांडी पालथी करून ठेवतात. कुत्र्याने वा इतर हिंस्र प्राण्याने चंद्राचा वा सूर्याचा ग्रास केला म्हणजेच ग्रहण लागते, अशी चिनी लोकांत समजूत होती. चंद्रसूर्याचा ग्रास करणाऱ्या प्राण्याला पळवून लावण्यासाठी ते कर्कश घंटानाद करीत. सूर्यग्रहण हे एखाद्या भयंकर घटनेचे सूचक समजून त्याच्या परिहारार्थ ते ग्रहणकालात उपवास करीत. प्राचीन ईजिप्तमध्ये राजा हा सूर्यदेवतेचा अंश वा प्रतिनिधी मानला जाई. सूर्यग्रहणाच्या वेळी राजा ग्रहण सुटेपर्यंत देवतेच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत असे. सूर्याने आपला आकाशातील प्रवास अखंडपणे आणि निर्वेधपणे चालू ठेवावा, अशी कल्पना ह्या प्रदक्षिणांमागे दिसते. 

शिंतो धर्मात सूर्यग्रहणसमयी गळ्यातील विशिष्ट खड्यांचे ताईत पवित्र मानल्या गेलेल्या क्लेयेरा नावाच्या वृक्षाच्या फांद्यांवर टांगून ठेवण्याची चाल होती. ह्या खड्यांची चकाकी ही सूर्यप्रकाशाचे प्रतीक असून त्याद्वारे सूर्यप्रकाश पुन्हा पूर्ववत प्राप्त व्हावा, अशी कल्पना दिसते. ग्रहणकालात शेकोट्या पेटविण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. यामागेही शेकोटीचा प्रकाश हे सूर्यप्रकाशाचेच प्रतीक असून त्यामुळे ग्रहण सुटते, अशी समजूत दिसते. कुराणातही शेवटून दुसऱ्या सूरेत ग्रहणाच्या अशुभ परिणामांचे व त्यांच्या परिहारार्थ करावयाच्या काही कर्मकांडाचे निर्देश आहेत.

चंद्रावर एक ससा असून तो सापाने भक्षण केला म्हणजे चंद्रग्रहण लागते, अशी तोडा लोकांत समजूत आहे. ग्रहणकालात ह्या सापाला भिवविण्यासाठी ते प्रचंड आवाज व आरडाओरडा करतात. त्यामुळे साप निघून जातो व ग्रहण सुटते, अशी त्यांची समजूत आहे. ग्रहणकालात तोडा लोकही उपवास करतात. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील रहिवाशांत चंद्राचा सदैव पाठलाग करणाऱ्या सूर्याच्या छायेमुळे चंद्रग्रहण लागते, अशी समजूत असून ग्रहणकालात ते लोक रस्त्यावर एकत्र जमून जोराने ओरडतात आणि ‘त्याला सोड’, ‘दूर हो’, ‘निघून जा’ अशा अर्थाची वाक्ये ओरडून उच्चारतात. माओरी लोकांत चंद्रग्रहण हे शत्रूचा किल्ला पडण्याचे वा शत्रुवरील विजयाचे सूचक मानतात. ताहिती लोक चंद्रग्रहण भय अथवा पीडासूचक मानतात. दुष्टात्म्यांच्या प्रभावाने ग्रहण लागते, अशा समजुतीतून ते प्रार्थनास्थानी जमून चंद्राची ग्रहणापासून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करतात. मुंडा लोकांत चंद्रसूर्य हे राक्षसाकडून कर्ज घेतात आणि ते न फेडल्यामुळे धनको राक्षस त्यांना कोंडून ठेवतो व ग्रहण लागते, अशी समजूत आहे. तांदूळ, धातूची भांडी व लोखंडी हत्यारे ते ग्रहणसमयी अंगणातठेवतात. ह्या वस्तू देऊन चंद्रसूर्याने आपले कर्ज फेडावे व मुक्त व्हावे, अशी कल्पना त्यामागे आहे. ओजिब्वा लोकांत सूर्यग्रहण लागणे म्हणजे सूर्य विझणे, अशी समजूत आहे. ह्या कल्पनेतूनच ते ग्रहणकाली पेटलेल्या पलित्यांचे बाण सूर्याच्या दिशेने सोडतात. पेटलेल्या बाणांनी सूर्य पुन्हा प्रज्वलित व्हावा, अशी कल्पना त्यामागे असावी. श्रीलंकेतील आदिवासीही सूर्यग्रहण हे अशुभ व भयंकर घटनेचे सूचक मानून त्या दिवशी उपवास करतात.

जैन धर्मातही ग्रहणांबाबतच्या अशुभ परिणामांचा विचार होऊन त्यांच्या परिहारार्थ काही धार्मिक उपाय व कर्मकांड सांगितले आहे. सर्वसामान्यतः जैन धर्मात चंद्रसूर्याची ग्रहणे ही अरिष्ट व पीडा यांची सूचक मानली जातात. खग्रास सूर्यग्रहणामुळे राजाचा वा उच्चपदस्थ व्यक्तीचा मृत्यू होतो, असे मानले जाते. एकाच महिन्यात चंद्र व सूर्य यांची ग्रहणे आल्यास ते निश्चितपणे मोठ्या युद्धासारख्या आपत्तीचे सूचक मानले जाते. बौद्ध धर्मातही हिंदूंप्रमाणेच राहू व केतू चंद्रसूर्यास ग्रासतात म्हणून चंद्रसूर्यग्रहणे लागतात, अशी समजूत आहे. पीटकादी पाली ग्रंथांत अनेक ठिकाणी राहू व केतू ह्या असुरांनी चंद्रसूर्याला ग्रासले म्हणजे ग्रहण लागते, असे उल्लेख आढळतात.

हिंदू धर्मातील समजूती : वेद, महाभारत, पुराणे यांतून ग्रहण व ग्रहणकालीन धार्मिक कृत्यांचे विवरण आढळते. देवांच्या पंक्तीत बसून राहू अमृत प्राशन करीत असल्याची चहाडी चंद्र आणि सूर्य यांनी केली. त्यामुळे राहूचा शिरच्छेद झाला. तेव्हापासून राहू आणि केतू चंद्रसूर्यांना ग्रासतात अशी कथा भागवतात आहे.

भारतीय पंचांगांतून ग्रहणाचा स्पर्शकाल, मध्यकाल व मोक्षकाल दिलेला असतो. ग्रहण लागल्यापासूनते सुटेपर्यंतच्या काळात पर्वकाल अथवा पुण्यकाल म्हणतात. सूर्यग्रहणाचा वेध ग्रहणप्रहराच्या आधी चार प्रहर आणि चंद्रग्रहणाचा वेध आधी तीन प्रहर असल्याचे मानतात. वेधकालात भोजन करू नये, उपवास करावा. ग्रहणस्पर्श होताच स्नान, देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम ही कर्मे करावी. ग्रहण सुटावयाच्या वेळी दानधर्म करावा. ग्रहण सुटल्यावर म्हणजे चंद्राचे अथवा सूर्याचे बिंब शुद्ध झाल्यावर मोक्षस्नान करावे स्नान केल्याशिवाय राहूदर्शनाचे सुतक नाहीसे होत नाही. ग्रहणात सर्व वस्त्रांसह स्नान करावे. सुवासिनी स्त्रियांनी गळ्याखालून स्नान करावे डोक्यावरूनही स्नान करण्याची पद्धती आहे.

ग्रहणकालात सर्व उदक गंगेसमान असते तथापि वाहते पाणी, सरोवरे, नद्या, महानद्या आणि समुद्र यांचे जल क्रमाने अधिकाधिक पुण्यकारक असते. भाविक लोक ग्रहण-पर्वकालात पुण्यक्षेत्री किंवा समुद्रावर स्नानासाठी जातात. ग्रहणकालात दानधर्म केला असता फार पुण्य मिळते. म्हणून सुवर्ण, भूमी, अश्व, गाय, वस्त्र, द्रव्य इ. दाने देण्याची पद्धती आहे. श्रीमंताने ग्रहणात तुलादानादिक करावे. ग्रहणकालात गाय प्रसूत होत असता तिला प्रदक्षिणा केल्याने पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळते.

ग्रहणश्राद्ध आमान्नाने म्हणजे शिध्याने वा अपक्व अन्नाने अथवा हिरण्याने करावे. ग्रहणश्राद्धाला रात्रीचा निषेध नाही. जननाशौचाच्या किंवा मृताशौचाच्या कालात ग्रहण आले असता, ग्रहणासंबंधी स्नानदानादिक कृत्ये करण्यापुरती शुद्धी सांगितली आहे.

ग्रहणकालात मलमूत्रोत्सर्ग, स्त्रीसमागम, अभ्यंगस्नान इ. कृत्ये करू नयेत. गर्भिणी स्त्री तसेच बाल, वृद्ध आणि रोगी यांनी यथाशक्ती नियम पाळावे. ग्रहणाच्या पूर्वी शिजविलेले अन्न तसेच पाणीही टाकून द्यावे. दूध, दही, घृतपक्व व तैलपक्व पदार्थ, लोणची यांच्या शुद्धीसाठी तुलसीपत्र अथवा दर्भ त्यांवर ठेवावे. गर्भिणी स्त्रीने ग्रहण पाहू नये तसेच तिने सुई, कात्री, चाकू इ. वस्तूंनाही स्पर्श करू नये.


ग्रहणकालामध्ये मांग लोक ‘दे दान, सुटे गिराण’ असे ओरडत गावातून पैसा, धान्य, कपडे मागत हिंडतात. त्या वस्तू दान देताना मुलाबाळांच्या, रोग्याच्या अंगावरून त्या ओवाळून नंतर दान देतात.

ग्रहणकालात नवीन मंत्र ग्रहण करतात. मंत्रग्रहणास सूर्यग्रहण हा मुख्य काल सांगितला आहे. मंत्रग्रहणास सूर्यग्रहणासारखे दुसरे पर्व नाही. पूर्वी घेतलेल्या मंत्राचा ग्रहणकाळात जप न केल्यास तो मंत्र मलिन होतो. गुरूने सांगितलेल्या मंत्राचा, इष्टदेवतेच्या मंत्राचा आणि गायत्रीमंत्राचा जप ग्रहणकालात अवश्य करावा. ग्रहणात पाण्यात उभे राहून मंत्राचा जप केला असता, मंत्र सिद्ध होतो.

ग्रहणकालात स्त्री प्रसृत झाली असता, अनिष्ट परिहाराकरिता शांती करावी असे सांगितले आहे.

ग्रहण सुटण्यापूर्वीच चंद्र अथवा सूर्य अस्तात गेल्यास, अशा ग्रहणाला ‘ग्रस्तास्त’ ग्रहण म्हणतात. ग्रस्तास्त ग्रहण असता, ग्रहण सुटल्यानंतर स्नान करावे परंतु पुन्हा चंद्र वा सूर्याचा उदय होऊन शुद्ध बिंब दिसेपर्यंत भोजनाचा निषेध आहे. ‘ग्रस्तोदय’ ग्रहणाबाबतही याप्रमाणेच नियम आहेत. ग्रहणव्रत नावाचे एक काम्यव्रतही आहे. ते मुख्यतः विद्यार्थ्यांनी करावयाचे असून बुद्धीचा विकास व शास्त्रज्ञानाची वृद्धी ही त्यांची फले सांगितली आहेत.

संदर्भ : 1. Beynon, W. J. G. Brown, G. M. Ed., Solar Eclipses and the Ionosphere, New York, 1962.

   2. Link, F. Eclipse Phenomena in Astronomy, New York, 1969.

   ३. कमलाकरभट्ट, निर्णयसिंधु:, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९३५.

   ४. काशीनाथोपाध्याय, धर्मसिंधु:, वेंकटेश्वर, प्रेस, मुंबई, १९०७.

जोशी, रंगनाथशास्त्री