कृष्णाची मूर्ती: कृष्णमंदिर, उडिपी (द. कॅनरा).माध्व संप्रदाय : मध्वाचार्यांनी (सु. ११९९–सु. १२७८) प्रवर्तित केलेला भक्तिमार्गी वैष्णव संप्रदाय. हा भक्तिमार्ग विष्णूने ब्रह्म्याला सांगितला व त्याने वायूच्या साहाय्याने त्याचा प्रचार केला, अशी कथा असल्यामुळे या संप्रदायाला ‘ब्रह्म संप्रदाय’ असेही म्हणतात. ⇨ शंकराचार्यांनी प्रतिपादिलेल्या मायावादाचे व अद्वैताचे खंडन करून मध्याचार्यांनी द्वैतमताचा पुरस्कार केला असल्यामुळे हा संप्रदाय द्वैती आहे. स्वतंत्र व अस्वतंत्र अशी दोन तत्त्वे असून निर्दोष व सर्वगुणसंपन्न असा भगवान विष्णू हे त्यांपैकी स्वतंत्र तत्त्व असल्याचे मानल्यामुळे या द्वैतमताला ‘स्वतंत्रास्वतंत्रवाद’ असेही म्हणतात. जीवेश्वरवाद, जीवजडभेद, जीवदजीवभेद, जडजडभेद व जडेश्वरभेद असा पाच प्रकारचा भेद असतो, असे मानल्यामुळे हा संप्रदाय भेदवादी आहे.

प्रत्यक्ष, अनुमान व श्रुती (वेद) ही ज्ञानाची तीन प्रमाणे असून या तीनही प्रमाणांनी भेद सिद्ध करता येतो वेद अपौरुषेय आहेत त्यांना स्वतःप्रामाण्य आहे जग सत्य आहे ईश्वर हा जगाचे फक्त निमित्तकारण आहे फक्त विष्णूच्या उपासनेनेच मोक्ष मिळू शकतो, मोक्षांमध्येही जीव विष्णूशी एकरूप होत नाही लक्ष्मी, श्रीवत्स व जग निर्माण करण्याची शक्ती ही तीन वैभवे जीवाला कधीच मिळत नाहीत सर्व दुःखांचा नाश होऊन विष्णूच्या सान्निध्यात राहणे हाच मोक्ष होय इ. सिद्धांतांवर हा संप्रदाय आधारलेला आहे.

संप्रदायामध्ये ईश्वराची उपासना अंकन, नामकरण आणि भजन अशी त्रिविध मानण्यात आली आहे. विष्णूच्या रूपाचे स्मरण व्हावे व इष्ट असा मोक्ष प्राप्त व्हावा, म्हणून आपल्या शरीराच्या अवयवांवर विष्णूच्या आयुधांची चिन्हे वा मुद्रा अंकित करणे, हे अंकन होय. हे अंकन गोपीचंदनाच्या गंधाने केले जाते तसेच तप्तमुद्रेच्या स्वरूपातही केले जाते. मठात गेल्यावर गुरूकडून ही मु्द्रा घेतली जाते. उजव्या दंडावर सुदर्शनचक्र आणि डाव्या दंडावर शंख अंकित केला जातो. [⟶ मुद्राविधि]. सदैव ईश्वराचे नामस्मरण घडावे, या हेतूने पुत्रादींना केशव वगैरे नावे ठेवणे, हे नामकरण होय. भजनाचे दहा प्रकार मानण्यात आले असून त्यांमध्ये सत्य वाणी वगैरेंचा अंतर्भाव आहे [⟶ भजन].

संप्रदायाचे अनुयायी शाळग्रामाच्या रूपाने ⇨ विष्णूची पूजा करतात. गळ्यात तुलसीमाला घालतात. कपाळावर गोपीचंदनाच्या दोन उभ्या रेषा, त्यांच्यामध्ये उभी काळी रेषा आणि तिच्या शिरोभागी हळदीचा बिंदू अशी मुद्रा घेतात. गुरूविषयी अत्यंत आदर असल्यामुळे त्याचे स्मारक म्हणून वृंदावन बांधतात व त्याची पूजा करतात. हे लोक मोठ्या प्रमाणात ⇨ उपवास करतात परंतु वैष्णव व्रतांखेरीज अन्य व्रते मान्य नसल्यामुळे महाशिवरात्रीला उपवास न करता पुरणपोळीचे जेवण करतात.

कर्नाटकातील उडिपीजवळील पाजकक्षेत्र हे मध्वाचार्याचे जन्मस्थान आहे तसेच त्यांनी ⇨ उडिपीमध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली होती. त्यामुळे उडिपी आणि या गावचा परिसर हे सांप्रदायिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. मध्वाचार्यांनी कृष्णमंदिरातील पूजादी धार्मिक कृत्यांची जबाबदारी आठ शिष्यांवर सोपवली होती आणि त्यांच्यासाठी या भागातआठ मठांची स्थापनाही केली होती. त्या शिष्यांची व मठांची नावे पुढीलप्रमाणे : ऋषीकेशतीर्थांचा पालीमारमठ, नृसिंहतीर्थांचा अडमारमठ, जनार्दनतीर्थांचा श्रीकृष्णपुरमठ, उपेंद्रतीर्थांचा पुत्तिगेमठ, वामनतीर्थांचा शिरूरमठ, विष्णुतीर्थांचा सोडेमठ, रामतीर्थांचा कणियूरमठ आणि अधोक्षजतीर्थांचा पेजावरमठ. हे आठ शिष्य प्रत्येकी दोन वर्षे या पद्धतीने मंदिरात पूजा करीत असत. दोन वर्षांनी होणाऱ्या बदलास ‘पर्याय’ असे नाव होते. येथील मंदिरात मकरसंक्रांतीपूर्वी दहा दिवस मोठा उत्सव होत असतो. उडिपी येथे या प्रमुख मठांखेरीज राघवेंद्रस्वामी मठ, व्यासरायमठ, उत्तराद्रिमठ, भीमनाकट्टेमठ, भंडारकेरीमठ, मूलबागलमठ इ. मठ आहेत तसेच उडिपीपासून काही अंतरावर सुब्रह्मण्यमठ, मध्यवटमठ इ. मठ आहेत. संप्रदायाचे अनुयायी प्रामुख्याने कर्नाटकातच आढळतात.


उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता, मध्वाचार्यांचे ३७ ग्रंथ, त्यांच्या ग्रंथावरील जयतीर्थ, व्यासतीर्थ वगैरेंच्या टीका इ. ग्रंथ हे संप्रदायाचे प्रमाणग्रंथ होत. नारायणीय उपनिषदाचे विशेष महत्त्व मानले जाते तसेच पंचरात्रग्रंथही आधारभूत मानले जातात [⟶ पांचरात्र]. पद्मनाभतीर्थ, नरहरितीर्थ, माधवतीर्थ व अक्षोभ्यतीर्थ हे मध्वाचार्यांचे प्रसिद्ध शिष्य होते. अक्षोभ्यतीर्थांचे शिष्य जयतीर्थ हे मध्वाचार्यांच्या ग्रंथांचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार मानले जातात. जयतीर्थांनंतरचे प्रमुख ग्रंथकार म्हणजे व्यासतीर्थ वा व्यासराय हे होत. व्यासतीर्थांचे शिष्य वादराज, वादिराजांनंतर होऊन गेलेले राघवेद्रतीर्थ, रघुत्तमतीर्थ आणि त्यांचे शिष्य रामाचार्य व वेदेश भिक्षू, वनमाली मिश्र, त्रिविक्रमभट्ट या मध्वशिष्याचा पुत्र नारायण पंडित हे संप्रदायात होऊन गेलेले काही प्रमुख ग्रंथकार होत.

संप्रदायात विष्णूच्या खालोखाल वायूचे स्थान मानले जाते. ⇨ हनुमान, भीम व मध्वाचार्य हे वायूचे तीन अवतार मानले जातात या श्रद्धेवर आधालेल्या आणि मध्वाचार्यांचे चमत्कार करण्याचे अलौकिक सामर्थ्य दर्शविणाऱ्या अनेक कथा संप्रदायात रूढ आहेत. मोक्ष मिळविण्यासाठी वायूला म्हणजेच वर्तमानयुगात मध्वाचार्यांना शरण जा, असा उपदेश केला जातो.

महाभारतातील भीमाच्या विविध पराक्रमांपैकी मणिमत् राक्षसाला मारण्याची कथा संप्रदायात सर्वांत अधिक महत्त्वाची मानली जाते. मणिमत् राक्षस मोहशास्त्रे निर्माण करणाऱ्या शंकराचार्याच्या रूपाने अवतरला, तर भीम मध्वाचार्यांच्या रूपाने, असे सांप्रदायिक मानतात. तुलनेने कमी महत्त्वाचा असा मणिमत् राक्षसाच्या हत्येचा प्रसंग संप्रदायामध्ये फार महत्त्वाचा मानला गेला, याचा अर्थ मध्वाचार्य इराणमधील मणि संप्रदायाशी परिचित झालेले असावेत, असा तर्क काही पाश्चात्य विद्वानांनी मांडला आहे. त्यांच्यावर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव असल्याचे मतही मांडण्यात आले आहे परंतु या मतांना निर्णायक पुरावे देण्यात आलेले नाहीत.

मध्ययुगीन भारताच्या धार्मिक व सामाजिक जीवनावर माध्व संप्रदायाचा मोठा प्रभाव पडला होता. शंकराचार्यांच्या मायावादाला विरोध करून मध्वाचार्यांनी जी वास्तव भूमिका घेतली, तिच्यामुळे सर्वसामान्य माणसाचा आशावाद व आत्मविश्वास वाढला आणि पुढे विजयानगरचे साम्राज्य उभे राहण्यास तो प्रेरक ठरला, असे काही अभ्यासकांचे मत आहे. चैतन्यांचे गुरू माध्व संप्रदायी असल्यामुळे ⇨चैतन्य संप्रदायावरही माध्व संप्रदायाचा प्रभाव होता. कर्नाटकातील ‘दासकूट’ नावाचा हरिदाससंप्रदाय मध्वानुयायी होता आणि त्याने कन्नड भाषेतील भक्तिसाहित्यात फार मोलाची भर घातली आहे [⟶कन्नड साहित्य]. मध्वाचार्यांचे शिष्य नरहरितीर्थ यांच्या साहित्यापासून दासकूटांच्या साहित्याचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. दासकूट संप्रदायाची प्रत्यक्ष स्थापना मात्र पद्मनाभतीर्थांच्या मूलबागलमठाचे मठाधिपती श्रीपादराज यांनी केली. व्यासराय हे त्यांचे शिष्य होत. ⇨पुरंदरदास व⇨कनकदास हे व्यासरायांचे विख्यात शिष्य असून त्यांनी रचलेली भक्तिगीते कर्नाटकात अजूनही घरोघरी म्हटली जातात. वादिराज, विजयदास, जगन्नाथदास इ. संत याच परंपरेत होऊन गेले. माध्व संप्रदायाने देवदासींच्या प्रथेला विरोध केला आहे, हे त्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय तसेच त्याने यज्ञामध्ये पशूचा बळी देण्याऐवजी पिष्टपशू अर्पण करण्याचा पुरस्कारही केला आहे.

मध्वाचार्य माघ शुद्ध नवमीला हिमालयात बदरिकाश्रमाजवळ बर्फातून चालत चालच कायमचे अदृश्य झाले. म्हणून तो दिवस मध्वनवमी या नावाने ‘बदरिकाश्रमप्रवेश’ म्हणून साजरा केला जातो.

पहा: द्वैतवाद मध्वाचार्य वैष्णव संप्रदाय.

संदर्भ : 1. Narain, K. An Outline of Madhva Philosophy, Allahabad, 1962.

            2. Sharma, B. N. K. Madhva’s Teaching in His Own Words, Bombay, 1961.

            3. Sharma, B. N. K. Philosophy of Shri Madhvacharya, Bombay, 1962.

            ४. अवधानी, रा. वा. श्रीमन् मध्वाचार्य व त्यांचे तत्त्वज्ञान, पुणे, १९४९.

            ५. मणूरकर, रा. ह. श्रीमन्मध्वचरित्रामृत, पुणे, १९१६.

            ६. माधवाचार्य संपा. ऋषि, उमाशंकर शर्मा, सर्वदर्शनसंग्रह, वाराणसी, १९७८.

साळुंखे, आ. ह.