ज्यूपिटर : प्राचीन इटालियन व रोमन देवतासमूहातील एक श्रेष्ठ देव. ज्यूनोचा तो भाऊ व पती. ग्रीकांच्या  ⇨ झ्यूस  देवाशी त्याचे बरेच साम्य असून ज्यूपिटर आणि झ्यूस एकच असल्याचे अभ्यासक मानतात. मुळात ज्यूपिटर हा आकाशाचा देव असून अनेक नावांनी त्याची उपासना होत होती असे दिसते. उदा., ‘ज्यूपिटर ल्यूसेटिअस’ ह्या नावाने तो प्रकाश आणणारा म्हणून -‘एलिसिअस’ वा ‘–प्लूव्हिअस’ नावाने तो झ्यूसप्रमाणेच अवर्षणाच्या वेळी पाऊस पाडणारा पर्जन्यदेव म्हणून ‘–फल्ग्यूराइटर’ वा ‘–फल्मिनेटर’ नावाने तो विद्युल्लतेचा देव म्हणून ‘–टोनस’ नावाने तो वादळाचा व विजेच्या कडकडाटाचा देव म्हणून पूजिला जाई.

ज्यूपिटर

‘ज्यूपिटर लॅपिस’ ह्या नावाने त्याची रोम येथील कॅपिटोलाइन टेकडीवरील मंदिरात उपासना होई. ह्या मंदिरात ठेवलेल्या दगडांतील चैतन्य म्हणून ज्यूपिटरची पूजा होई. हे दगड म्हणजे विजा होत अशी लोकांची समजूत होती. शपथ घेताना ह्या दगडांना स्पर्श करून लोक शपथ घेत.

‘ज्यूपिटर लॅटिआरिस’ नावाने तो लॅटिन संघातील सर्वश्रेष्ठ देव म्हणून नगरानगरांतून पूजिला जाई. लॅटिन संघात रोमचे स्थान व महत्त्व जसजसे वाढीस लागले, तसतसे त्याच्या उपासनेलाही महत्त्व आले व तो प्रभावशाली देव बनला. ज्यूपिटर हा रोमन लोकांचे केवळ संरक्षण करणारा श्रेष्ठ देव म्हणूनच नव्हे, तर ज्याच्या उपासनेत नैतिक संकल्पनाही अनुस्यूत आहे, असा एकमेव देव होता. त्याचा संबंध शपथ, करार, तह इत्यादींशी असून सर्वांत प्राचीन असा पवित्र रोमन विवाहाचा प्रकारही ज्यूपिटर देवतेच्या पुरोहिताच्या साक्षिनेच पार पडत असे.

इट्रुस्कन राजांनी ‘ज्यूपिटर ऑप्टिमस मॅक्झिमस’ (म्हणजे सर्वश्रेष्ठ व सर्वोत्कृष्ट ज्यूपिटर) याच्या उपासनेचा संप्रदाय रोमन साम्राज्यात सुरू केला. त्यांनी रोम येथील कॅपिटोलाइन टेकडीवर ज्यूपिटरचे इट्रुस्कन शैलीतील प्रचंड मंदिर उभारून ते ज्यूपिटरच्या उपासनेचे प्रमुख केंद्र केले. १३ सप्टेंबर रोजी तेथे ज्यूपिटरचा मोठा उत्सव साजरा होई व विविध खेळांचे सामने भरविले जात. मुळात हे खेळ यु्द्धात विजय मिळाल्याबाबत ज्यूपिटरविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी व्रत म्हणून खेळले जात.

अनेक वेळा ज्यूपिटरचा उल्लेख ‘जोव्ह्‌ज पीटर’ म्हणजे ‘देव-पिता’ असाही केला जातो. रोमन लोकांचा तो सर्वश्रेष्ठ देव तसेच दैवी शक्तीचे सार मानला जाई. इतर देव त्याच्या तुलनेत गौण मानले जात. कॅपिटोलाइन मंदिरात त्याची सर्व साम्राज्याचा प्रमुख व आदर्श देव म्हणून उपासना होई. रोमन साम्राज्याची शक्ती वाढविणारा तसेच त्याचे संरक्षण करणारा देव म्हणून तो पूज्य होता. त्याच्या पुरोहितांना (फेटिॲलिस) रोमन साम्राज्याच्या वतीने युद्ध पुकारण्याचे वा तह करण्याचे अधिकार असत. या मंदिरात त्याच्या समवेत ‘फायडीझ’ ही विश्वास व निष्ठा यांची देवता तसेच ‘व्हिक्टोरिया’ ही विजयाची देवता आहे. ज्यूपिटर, ज्यूनो व मिनर्व्हा ह्या देवतात्रयीच्या रूपातही तेथे त्याची उपासना होत असे. इतर ठिकाणीही त्याची अनेक स्थाने, मंदिरे व पुतळे आहेत.

लॅटिन संघात ‘ज्यूपिटर लॅटिआरिस’ नावाने तो प्रमुख देव मानला जाई व त्याच्या उपासनेचे प्राचीन केंद्र आल्बा पर्वतावर होते. त्याचा ‘फेरी लॅटिनी’ नावाचा वार्षिक धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होई. यावेळी त्याला दुधाचा अभिषेक होई आणि एक पांढरी कालवड बली देण्यात येई. 

पौर्णिमेचे दिवस त्याला विशेष प्रिय म्हणून पवित्र मानले जात. हवामानाची देवता म्हणून त्याची शेतकरी उपासना करीत. १९ ऑगस्ट या दिवशी ‘व्हेनालिया रस्टिका’ नावाचा आणि ११ ऑक्टोबर रोजी ‘मेडिट्रिनालिया’ नावाचा असे त्याचे दोन उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होत. गरुड हा त्याचा प्रिय पक्षी, ओक हा त्याचा प्रिय वृक्ष व वीज हे त्याचे आयुध. त्याच्या सर्वभौम दैवी अधिकाराचे प्रतीक म्हणून त्याच्या हातात राजदंडही दाखविला जातो. त्याला पांढऱ्या रंगाचे पशू बली देण्यात येत. त्याचे पुरोहितही पांढऱ्या टोप्या घालत. त्याच्या रथास चार पांढरे अश्व जोडलेले असल्याचे दाखविले जाते. 

सुर्वे. भा. ग.