दरवेशी : सोळाब्या शतकातील एका इराणी चित्राधारे.

दरवेशी पंथ : सूफी फकिरांचा एक पंथ. ‘दरवेशी ’ हा शब्द फार्सी असून त्याचा अर्थ ‘दारोदार भिक्षा मागणारा’ असा काही विद्वान करतात, तर काहींच्या मते ‘दरवीश’ असा शब्द असून त्याचा अर्थ साधू असा होतो. बाराव्या शकतात सूफी फकीरांमध्ये अनेक पंथ निर्माण झाले. दरवेश्यांच्या धर्मगुरूंचा संबंध अल्लापर्यंत जोडला गेला. अल्लापासून निर्माण झालेल्या परंपरेला ‘सिलसिल’ असे म्हणतात. दरवेशीपंथाची स्थापना जीलानी अब्दुल कादिर (सु. १०७८–११६६) व अहंमद रिफी (मृ. ११८२) यांनी केली. पंथाच्या संस्थापकांना ‘शेख’ व पंथातील लोकांना ‘खलीफ’ म्हणतात. प्रत्येक दरवेशी ‘सिलसिल’ मानतो आणि आपणास मिळालेले ज्ञान इस्लामनेच दिले आहे, असा विश्वास बाळगतो. इस्लामने घालून दिलेले नियम पाळणारा व हे नियम न पाळणारा असे दरवेश्यांचे दोन वर्ग इराणमध्ये आढळतात. ईजिप्तमध्ये अहंमद बदवी (मृ. १२७६) याने ‘बेदवीया’ किंवा ‘अहमदीया’ या नावाने या पंथाचा पुरस्कार केला. मध्यपूर्वेकडे जलालुद्दीन रूमी (सु. १२७३) याने ‘मौलवीया’ या नावाने याच पंथाचा पुरस्कार केला. दरवेशी पंथातीलच हे उपपंथ म्हणता येतील.

या पंथाचे लोक भारतातही आढळतात. हा एक भक्तिसंप्रदाय आहे. या पंथातील लोक ‘ला इलह इल्लेल्लह’ या ओळीचा अनेक वेळा व निरनिराळ्या सुरांत जप करीत असतात. या पंथातील साधू लोकरी कपडे वापरतात, डोक्याला साफा (फेटा) गुंडाळतात, कमरेला बांधायच्या पट्ट्यात भुकेचे प्रतीक म्हणून दगड ठेवतात. मौलवी लांब झगा घालतात. दरवेशींजवळ गूढ सामर्थ असते, असे मानले जाते. ते जिवंत साप खाऊ शकतात, काचा खातात, अग्नित प्रवेश करून तो विझवू शकतात. या पंथाच्या प्रार्थनेच्या जागेस ‘झाविया ’ असे म्हणतात.

इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी या पंथाची स्थापना झाली असली, तरी कालांतराने या लोकांना अप्रतिष्ठा प्राप्त झाली व त्यांना दारोदार भिक्षा मागत फिरावे लागले. या पंथात स्त्रियांनाही प्रवेश मिळतो. दरवेशी नावाची एक जातही काश्मीर भागात आहे.

संदर्भ : Brown, J. P. The Dervishes or Oriental Spiritualism, London, 1868.

भिडे, वि. वि.