त्रिपुरी पौर्णिमा : कार्तिकी पौर्णिमेस हे नाव आहे. या नावासंबंधीची कथा व्रतराजात आली आहे. ती थोडक्यात अशी : त्रिपुर नावाच्या दैत्याने अनर्थ माजविला आणि आपल्या दुष्ट व हिंसक कृत्याने देवादिकांना गुलाम बनवून धुमाकूळ घातला. हा अनर्थ सहन न होऊन भगवान शंकराने त्रिपुर दैत्याबरोबर युद्ध करून त्यास कार्तिक महिन्यातील पौर्णिमेस प्रदोषकाळी ठार मारले. लोकांनी दीपोत्सव करून त्रिपूरसंहाराचा आनंद व्यक्त केला. लिंगपुराण (१·७०–७२), पद्मपुराण (सृष्टिखंड ५९), मत्स्यपुराण (१३०–३७), शिवपुराण (रुद्रीसंहिता ४·५) व महाभारत (द्रोणपर्व २०२) यांत ह्या कथेचे थोडे वेगळे पर्याय आढळतात. या दिवशी घरोघरी तसेच शिवमंदिरातून आणि इतर देवालयांतून दीपोत्सव साजरा करतात. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे. मत्स्यावतारही याच पौर्णिमेस झाला. दुष्टांचा संहार या दिवशी झाल्याने हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करतात. देवस्थानातील दगडी दीपमाळाही या दिवशी पाजळतात व नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडतात. त्रिपुरांतक रूपातील शिवाची सुंदर शिल्पे भारतात अनेक ठिकाणी आहेत. ‘त्रिपुरज्वलनव्रत’ या नावाचे एक व्रत या दिवशी करतात. शिवापुढे वाती लावणे, दीपपात्रे दान देणे, शिवाची पूजा करणे हा या व्रताचा विधी असतो.

करंदीकर, ना. स.