अर्हत् : बौद्ध व जैन धर्मांत अत्यंत पूज्य व्यक्तीस ही उपाधी लावली जाते. व्युत्पत्तीप्रमाणे अर्हत् शब्दाचा अर्थ ‘अंगी योग्यता बाळगणारा’ किंवा ‘पूज्य’ असा होतो. अर्हत्‌चे पाली ‘अरहा’ आणि अर्धमागधी ‘अरिहंत्’ असे रूप आहे. प्राचीन पाली व अर्धमागधी ग्रंथांतून ‘बुद्ध’, ‘संबुद्ध’ म्हणजेच ‘जागृत झालेला’, ‘ज्ञान प्राप्त झालेला’ ह्या समान पातळीवर अर्हत् शब्द वापरलेला आहे. बौद्धाच्या धर्ममार्गावर चार टप्पे सांगितले आहेत त्यांत हा सर्वांत वरचा, श्रेष्ठ टप्पा समजला जातो. ‘स्थविरवादी’ ग्रंथांतून ‘अर्हत्त्व’ प्राप्त करून घेणे हेच ध्येय आहे. अर्हत्त्वाचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ सांगितले आहेत. तथापि राग, द्वेष, मोह यांचा नाश करणे, मनुष्याला जखडून टाकणाऱ्‍या दहाही बंधनांचा संपूर्ण नाश करणे, हा अर्थ बव्हंशी मान्य केलेला दिसतो. अर्हताच्या ठिकाणी कोणतीही आसक्ती शिल्लक राहिली नसल्याकारणाने त्याच्या क्रियांना ‘कुशल’ किंवा ‘अकुशल’ अशी संज्ञा देता येत नाही त्या केवळ क्रियाच (क्रियामात्र) आहेत, असे स्थविरवादी तत्त्वज्ञान सागंते. अर्हत् आपल्या प्राप्त केलेल्या स्थानापासून च्युत होत नाही, असाही त्यांचा सिद्धांत आहे. पण हा सिद्धांत ‘सर्वास्तिवादी’ वगैरे सांप्रदायिकांना मान्य नाही.

 

जैन धर्माप्रमाणे तीर्थकरांनाच ‘अर्हत्‘ ही संज्ञा लावतात. ‘केवली ’ च्यापेक्षा त्याचे गुण अंतिम उत्कर्षाला प्राप्त झालेले असतात. सर्वज्ञता, वीरतागता, सत्य, विनय, तप, आत्मक्लेश, सेवा, दानशीलता हे गुण अर्हतामध्ये उत्कर्षाप्रत पोचलेले असतात.

बापट, पु. वि.