धर्मनिबंध : चार वर्ण आणि चार आश्रम या स्वरुपातील व्यवस्था हे हिंदूंच्या समाजरचनेचे एक मोठे वैशिष्ट्य होते. या सर्व वर्णाश्रमातील लोकांना आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्ते यांविषयी मार्गदर्शन करण्याचे काम हिंदूंच्या धर्मविषयक ग्रंथांनी केलेले आहे. हे ग्रंथ म्हणजे वेद, धर्मसूत्रे, स्मृतिग्रंथ, स्मृतिग्रंथांवरील टीका आणि धर्मनिबंध हे होत.

यांपैकी टीका आणि निबंध यांचा एक स्वतंत्र विभाग होतो. या प्रकारचे ग्रंथ सर्वांत शेवटी म्हणजे इ. स. ७०० ते १८०० या जवळजवळ एक हजार वर्षांच्या कालखंडात लिहिले गेले असून त्यांची संख्या अक्षरशः शेकडोंच्या घरात जाते. भारताच्या सर्व भागातून कोणत्या ना कोणत्या स्वरुपात असे निबंधलेखन झालेले आहे.

टीका एका विशिष्ट स्मृतिग्रंथावरच लिहिलेली असते. निबंध मात्र अशा एखाद्या विशिष्ट ग्रंथावर लिहिलेला नसतो. हा एवढा भेद सोडला, तर आशयाच्या बाबतीत टीका म्हणजे एक प्रकारचा निबंधच असतो. प्राचीन काळातील वेगवेगळ्या धर्मग्रंथांतून जी शास्त्रवचने आढळतात, त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या निबंधग्रंथांतून केलेला असतो. हे करीत असताना लेखकाने अनेक धर्मग्रंथांतील अवतरणे उद्धृत केलेली असतात. वेगवेगळ्या धर्मग्रंथांची वचने परस्परविरुद्ध नसतील, तर निबंधकाराने त्यांचा समुच्चय केलेला असतो. ती वचने परस्परविरुद्ध असतील, तर विकल्प व अनुकल्प या पद्धतीने त्यांना संमती दिलेली असते. अशा रीतीने धर्मवचनांचा समन्वय करून धर्माविषयीची एक सुसंगत पद्धत मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो.

हिंदू माणसाच्या धार्मिक जीवनाशी निगडित असलेल्या अनेक विषयांची सांगोपांग चर्चा या निबंधातून आढळते. विविध वर्णाश्रमांतील लोकांची भिन्न भिन्न कर्तव्य या निबंधातून सांगितलेली असतात. त्यांचे आचार, व्यवहार व प्रायश्चिते असे तीन प्रमुख विषय असतात. त्यांपैकी ‘आचार’ या विभागात ब्रम्हचाऱ्याची कर्तव्ये, विविध संस्कार, विवाह, वर्णजाती, गृहस्थधर्म, स्नातकधर्म, भक्ष्याभक्ष्यविचार, द्रव्यशुद्धी, दानविचार, श्राद्ध, ग्रहशांती, राजधर्म इत्यादींचे विवेचन येते. ‘व्यवहार’ या विभागात न्यायसभा, साधारण व्यवहार, असाधारण व्यवहार, ऋणादान (कर्ज घेणे), ठेव, साक्षी, दस्तऐवज, दिव्य वारसाहक्क, सीमाविवाद, स्वामिपालविवाद (एखाद्याने पाळलेल्या प्राण्यावरून निर्माण झालेली भांडणे), अस्वामिविक्रय (दुसऱ्याची वस्तू विकणे), दत्ताप्रादानिक (दान दिलेली वस्तू पुन्हा परत घेऊ इच्छिणे), क्रीतानुशय (विकत घेतलेली वस्तू नको असल्यास परत करणे), सेवाविचार, संविद्‌व्यतिक्रम (करार मोडणे), वेतन, द्यूत, वाक्‌पारुष्य, दंडपारुष्य, साहस, विक्रीयासंप्रदान (वस्तू विकूनही खरेदी करणाराला तिचा ताबा न देणे), संभूयसमुन्थान (समूहोद्योग), चोरी, स्त्रीपुरुषसंबंध इत्यादींचे विवेचन येते. ‘प्रायश्चित’ या विभागात आशौच, आपद्धर्म, वानप्रस्थधर्म, यतिधर्म, प्रायश्चिते इ. विषयांची चर्चा येते. विशेषतः श्राद्ध, दत्तक, दानपद्धती, वारसाहक्क आणि गोत्रप्रवर या विषयांवरील निबंधांची संख्या प्रचंड आहे. त्यांपैकी मेधातिथी, विश्वरूप, विज्ञानेश्वर, अपरार्क व हरदत्त यांच्या निबंधस्वरूपी टीका आणि जीमूतवाहन, लक्ष्मीधर, देवण्णभट्ट, हेमाद्री, माधवाचार्य, कमलाकरभट्ट, मित्रमिश्र, काशीनाथ उपाध्याय इत्यादींचे निबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत.

असहाय (सु. ६००–८०० च्या दरम्यान), भर्तृयज्ञ (सु. ८००) व भारुची (सु. ९००) हे फारसे प्रसिद्ध नसलेले टीकाकार प्रारंभीच्या काळात होऊन गेले. नवव्या शतकात मेधातिथीने (सु. ८२५–९००) मनुस्मृतीवर विस्तृत टीका लिहिली. ही टीका मनुस्मृतीवरील सर्व टीकांत जुनी मानली जाते. मेधातिथी हा पूर्वमीमांसेचा गाढा अभ्यासक होता. अविवाहित मुलीला पैतृक संपत्तीचा वाटा मिळावा, संन्यास म्हणजे अहंकाराचा त्याग, यांसारख्या कल्पना त्याने मांडल्या होत्या. मनुस्मृतीचा आशय स्पष्ट करताना त्याने अनेक लोकन्यायांचा आधार घेतला असून इतर अनेक ग्रंथकारांची अवतरणे उद्‌धृत केली आहेत. नवव्या शतकातच विश्वरूप नावाच्या लेखकाने याज्ञवल्क्यस्मृतीवर बालक्रीडा  नावाची टीका लिहिली. शंकराचार्यांचा शिष्य सुरेश्वर म्हणजेच बहुधा हा विश्वरूप होय. याच कालखंडात मिथिलेच्या श्रीकराने (सु. ८००–१०५० च्या दरम्यान) विधवेला वारसाहक्क दिलेला आहे.

बंगालच्या जितेंद्रियाने (सु. १०००–५०) तिथी, मास, संक्रांती इ. कालांविषयी महत्त्वाचे लिखाण केले असून न्यायालयातील कार्य पद्धतीचेही विवेचन केले आहे. विद्वानांचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारच्या भोज राजाने (सु. १०००–५५) धर्मशास्त्रावरही लेखन केलेले आहे. त्याने विधवेच्या वारसाहक्काविषयी असलेल्या विविध मतांचा समन्वय केलेला आहे. गोविंदराजाने (सु. १०५०–११४०) मनुस्मृतीवर एक टीका लिहिली आहे. बालक (सु. ११००) हा बंगाली लेखक असे सांगतो, की विद्येच्या जोरावर एखाद्याने संपत्ती मिळवली, तर तीवर भावांचा हक्क नसतो.

कल्याण नगरीत विक्रमार्क नावाचा राजा राज्य करीत असताना विज्ञानेश्वराने (सु. १०७०–११००) याज्ञवल्क्यस्मृतीवर मिताक्षरा या नावाची टीका लिहिली. धर्मशास्त्रावरील ग्रंथांत या टीकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्यापूर्वी दोन हजार वर्षांच्या कालखंडात झालेली धर्मविषयक चर्चा लेखकाने या ग्रंथात एकत्रित केली असून पुढच्या काळातील लेखकांनाही त्याच्यापासून मोठी प्रेरणा मिळाली आहे. बंगाल व पंजाबचा अपवाद वगळता भारताच्या सर्व प्रांतातील न्यायालयांतून निवाडे देताना ही टीका आधार मानली जात होती. या टीकेत अनेक स्मृतींची मते चर्चेला घेऊन त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुराणे आणि मीमांसासूत्रे यांचा आधार घेणे, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. व्यवस्थित व अव्यवस्थित विकल्पाची विभागणी आणि प्रायश्चित्तांचे विस्तृत विवरण हेही या टीकेचे एक वैशिष्ट्य आहे. जीमूतवाहन (सु. १०९०–११३०) हा बंगालच्या विष्वक्‌सेन या राजाचा प्रमुख न्यायधीश होता. त्याने कालविवेक, व्यवहारमातृका आणि दायभाग  हे तीन ग्रंथ लिहिले. कालविवेकात धार्मिक कृत्ये करण्याच्या योग्य काळाची चर्चा आहे. व्यवहारमातृका या ग्रंथात न्यायदानाच्या पद्धतीची चर्चा आहे. दायभाग  हा जीमूतवाहनाचा सर्वांत प्रसिद्ध ग्रंथ होय. हिंदूंच्या कायद्यातील वारसाहक्क, स्त्रीधन, भावाभावांत पैतृक धनाची वाटणी इ. बाबतींत बंगालमध्ये हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा मानला जाई. या ग्रंथाच्या प्रभावामुळेच भारताच्या इतर सर्व भागांतून मान्य झालेला मिताक्षरा हा ग्रंथ बंगालमध्ये मान्यता पावला नाही.


लक्ष्मीधर (सु. ११००–५०) हा कनौजच्या गोविंदचंद्र राजाचा मंत्री होता. त्याचा कल्पतरु हा धर्मनिबंध मिथिला, बंगाल व उत्तर भारत या ठिकाणी अत्यंत प्रभावी होता. पश्चिम आणि द. भारतातही त्याचा बराच प्रभाव होता परंतु तो मिताक्षरेपेक्षा कमी दर्जाचा ग्रंथ आहे. बाराव्या शतकातच बल्लाळसेन या बंगाली राजाने धर्मशास्त्रावर चार ग्रंथ लिहले होते. अपरार्क (सु. ११२५) हा कोकणातील शिलाहार वंशाचा राजा होता. त्याने याज्ञवल्क्यस्मृतीवर एक धर्मशास्रनिबंध लिहिला होता. काश्मीरमध्ये जयसिंह नावाचा राजा राज्य करीत असताना अपरार्काने जे राजदूत काश्मीरात पाठविले, त्यांच्याबरोबर हा ग्रंथ काश्मीरमध्ये गेला. अगदी अलीकडच्या काळापर्यंत काश्मीरी पंडित, अपरार्काची टीका म्हणजे कायद्यावराचा प्रमाणभूत ग्रंथ मानत असत. हरदत्त (सु. ११००–१३०० च्या दरम्यान) हा एक दाक्षिणात्य निबंधकार होता. त्याने धर्मसुत्रे व गृह्यसूत्रे यांवर विविध टीका लिहिल्या असून त्यांपैकी अनाकुला, अनावला, मिताक्षराउज्ज्वला या प्रसिद्ध आहेत. बंगालच्या कुल्लूकभट्टाने (सु.११५०–१३०० च्या दरम्यान) मनुस्मृतीवर मूळ ग्रंथाला काटेकोरपणे अनुसरणारी अशी मन्वर्थमुक्तावली नावाची सुप्रसिद्ध टीका काशीमध्ये लिहिली. श्रीधराने (सु.११५०–१२००) स्मृत्यर्थसार  नावाचा निबंध लिहिला. बाराव्या शतकातच बंगालच्या बल्लाळसेन राजाचा गुरू व न्यायाधीश असलेल्या अनिरुद्धाने हारलता  व पितृदयिता हे ग्रंथ लिहले. देवण्णभट्टाचा (सु. १२००) स्मृतिचंद्रिका हा एक विस्तृत निबंध आहे. धर्मशास्त्रावरील प्राचीन निबंधांपैकी हा एक होय. संस्कार, आन्हिक, व्यवहार, श्राद्ध वगैरे विषयांवर यात सविस्तर विवेचन आहे. द. भारतात याचा अधिक प्रचार होता. मिथिलेचा श्रीदत्त उपाध्याय (सु. १२७५–१३१०) यानेही अनेक निबंध लिहिले. शुद्राने वैश्वदेवादी पंचमहायज्ञ करावे, असे त्याने म्हटले आहे. हरिहराने (सु. १३००) आपले लेखन प्रामुख्याने व्यवहारावर केले आहे.

धर्मशास्त्रावर लिहिणाऱ्या दाक्षिणात्य लेखकांत हेमाद्री प्रमुख होय. त्याचा चतुर्वर्गचिंतामणी (सु. १३४०) हा निबंधग्रंथ प्रचंड आहे. देवगिरीच्या यादवांचा मंत्री असलेला हेमाद्री हा एक प्रख्यात पूर्वमीमांसक होता. मोडी लिपी व हेमाडपंथी मंदिरे यांसाठी त्याचे नाव प्रसिद्ध आहे. त्याच्या ग्रंथातील दान व व्रत हे विभाग द. भारतात अत्यंत प्रसिद्ध आहे. चौदाव्या शतकातच दक्षिणेत होऊन गेलेले माधवाचार्य हे एक अष्टपैलू विद्वान होते. विद्यानगरच्या बुक्क राजाचा मंत्री व गुरू असलेल्या या लेखकाने पुष्कळ विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. पराशरस्मृतीवरील पराशरमाधवीय आणि कालनिर्णय हे त्याचे दोन ग्रंथ तमिळनाडूमध्ये विशेष मान्य होते. मदनपाल नावाचा राजा दिल्लीच्या उत्तरेला यमुनेच्या काठी असलेल्या काष्ठा नगरी येथे राज्य करीत होता. त्याच्या आश्रयाला असलेल्या विश्वेश्वरभट्ट (सु. १३६०–९०) याने पारिजात मदन नावाचा ग्रंथ लिहिला. शूलपाणी (सु. १३७५–१४६०) या बंगाली लेखकाचे दीपकलिका, प्रायश्चितविवेक, श्राद्धविवेक  इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. हा शूलपाणी बंगालच्या लक्ष्मणसेन या राजाचा न्यायाधीश होता, असे परंपरागत मत आहे. याच काळात मिथिलेतील चंडेश्वराने अनेक निबंध लिहिले. त्यांपैकी रत्नाकर हा निबंध अत्यंत प्रसिद्ध असून त्यातील ‘विवाद-रत्नाकर’ हा भाग मिथिलेच्या हिंदू कायद्यात महत्त्वाचा मानला जाई. हा चंडेश्वर हरिसिंहदेव या मिथिलेच्या राजाचा मंत्री होता. त्याचप्रमाणे याच शतकातील मिसरुमिश्राचा विवादचंद्र हा ग्रंथही मिथिलेत हिंदू कायद्यावरचा प्रमाणग्रंथ म्हणून मानला जाई. मिथिलेचा राजा चंद्रसिंह याची पत्नी लछिमादेवी हिच्या आज्ञेवरून त्याने हा ग्रंथ लिहिला होता. चौदाव्या शतकातच हरिनाथ नावाच्या लेखकाने स्मृतिसार नावाचा ग्रंथ लिहिला.

पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या वाचस्पतिमिश्रांचा विवादचिंतामणि हा ग्रंथ उच्च न्यायालयांनी आधारभूत मानला होता. मिथिलेचा भैरवेंद्र व त्याचा मुलगा रामभद्रदेव या राजांच्या आश्रयाने वाचस्पतीने हा ग्रंथ लिहिला. याच शतकात मिथिलेतच लिहिला गेलेला एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ म्हणजे वर्धमानाचा दंडविवेक हा होय. फक्त गुन्हे व त्यांवरील शिक्षा यांचा स्वतंत्रपणे विचार करणारा संस्कृतमधील हा बहुधा एकमेव ग्रंथ होय. मिथिलेच्याच रुद्रधराने (सु. १४२५–६०) शुद्धिविवेक आणि श्राद्धविवेक हे ग्रंथ लिहिले. नृसिंहप्रसाद नावाचा एक प्रंचड ग्रंथ दलपतीने (सु. इ. स. १४९०–१५१२) लिहिला. दलपती हा देवगिरीच्या निजामशाहाचा मुख्यमंत्री होता.

सोळाव्या शतकात ओरिसामध्ये कटक येथे राज्य करणाऱ्या प्रतापरुद्रदेवाने सरस्वतीविलास नावाचा ग्रंथ लिहिला. गोविंदानंदाने (सु. १५००–४०) अनेक निबंध लिहले असून शुद्धिकौमुदी, श्राद्धकौमुदी हे त्यांपैकी प्रमुख होत. रघुनंदन हा बंगालमधील धर्मशास्त्रावरचा शेवटचा मोठा ग्रंथकार सोळाव्या शतकातच होऊन गेला. सुप्रसिद्ध वैष्णव संत चैतन्य यांचा तो गुरूबंधू होता. त्याचा अठ्ठावीस विभागातील स्मृतितत्त्व  नावाचा एक प्रचंड ग्रंथ प्रसिद्ध आहे. बनारसच्या नारायणभट्टाने (सु. १५४०–७०) अन्त्येष्टिपद्धति, त्रिस्थलीसेतु, प्रयोगरत्न  इ. निबंध लिहिले. सोळाव्या शतकातच राजा तोडरमल या अकबराच्या मंत्र्याने अनेक विद्वानांना एकत्र आणून त्यांच्याकडून टोडरानंद नावाचा ग्रंथ लिहून घेतला. बनारसच्या नंदपंडिताचा (सु. १५८०–१६३०) दत्तकमीमांसा हा दत्तकविधानावरील प्रमाणग्रंथ होय. त्याने वेगवेगळ्या राजांच्या आश्रयाने वेगवेगळे ग्रंथ लिहिले होते.

बनारसच्या कमलाकरभट्टचा (सु. १६१०–४०) निर्णयसिंधू हा ग्रंथ प्रसिद्ध असून तो राजनीती, व्यवहार व इतर विषयांवर एक प्रमाणग्रंथ म्हणून मानला जातो. शूद्रकमलाकर आणि विवादतांडव हे त्याचे आणखी दोन महत्त्वाचे ग्रंथ होत. नीलकंठभट्ट (सु. १६१०–४५) या श्रेष्ठ निबंधकाराने भगवंतभास्कर हा बारा मयूखांत विभालेला ग्रंथ लिहिला. या ग्रंथातील व्यवहारमयूख हा भाग १९५६ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाचा मानला जात होता. तो कोकण, गुजरात इ. प्रदेशात मान्य होता. बुंदेलखंडाची राजधानी ओर्छा येथे वीरसिंह नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या आज्ञेवरून मित्रमिश्राने (सु. १६१०–४०) वीरमित्रोदय नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात धर्मशास्त्राच्या सर्व शाखांचा समावेश होतो. विस्ताराच्या बाबतीत हेमाद्रीच्या ग्रंथाखालोखाल हाच प्रचंड ग्रंथ होय. सतराव्या शतकातच सुप्रसिद्ध मराठी संत एकनाथ यांच्यानंतरच्या चौथ्या पिढीतील अनंतदेवाने स्मृतिकौस्तुभ हा ग्रंथ लिहिला. त्यातील ‘संस्कारकौस्तुभ’ हा भाग सोळा संस्कारांच्या विवेचनामुळे प्रसिद्ध आहे. अलमोडा आणि नैनीताल येथे राज्य करणाऱ्या बाजबहादूरचंद्राच्या आज्ञेने अनंतदेवाने हा ग्रंथ लिहिला.

सुप्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत यांचे व्याही असलेल्या काशीनाथ उपाध्यायांचा धर्मसिंधु (सु. १७९०–९१) हा ग्रंथ दक्षिणेत धार्मिक बाबतीत प्रमाण मानला जात असे एवढेच नव्हे, तर न्यायालयातही त्याचा आधार घेतला जात असे. यांचे कुटुंब मूळचे कोकणातले परंतु नंतर ते पंढरपूरात स्थायिक झाले होते. याच काळात नागोजी भट्ट या महाराष्ट्रीय ब्राम्हणाने आचारेंदुशेखर, आशौचनिर्णय  इ. ग्रंथ लिहिले. अलाहाबादजवळील शृंगवेर नगरीचा राजा, राम हा या नागोजीभट्टाचा आश्रयदाता होता. अठराव्या शतकातच मिताक्षरेवर बालंभट्टी  नावाची टीका लिहिली गेली. लक्ष्मीदेवी नावाच्या स्त्रीच्या नावावर ही टीका आहे. कदाचित ती तिचा मुलगा बालंभट्ट याने लिहिली असण्याची शक्यता आहे. बालंभट्ट हा एक दाक्षिणात्य ब्राम्हण होता. इंग्रजांनी सत्ता हस्तगत केल्यानंतर अठराव्या शतकात वॉरेन हेस्टिंग्ज व सर विल्यम जोन्स यांनी हिंदू कायद्यासाठी विद्वानांकडून काही निबंध लिहून घेतले परंतु त्यांना मान्यता मिळाली नाही.

यांखेरीज वरदराज, विद्यापती, हलायुध, देवस्वामी, गोपाल, भवदेवभट्ट इ. लहानमोठ्या निबंधकारांनीही आपापल्या परीने या निबंधवाङ्‌मयात भर घातली आहे.

हे निबंधवाङ्‌मय अत्यंत विस्तृत आहे. हिंदू समाजाच्या धार्मिक व व्यावहारिक जीवनाला मार्गदर्शन करण्यात या निबंधकारांनी फार मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी आपल्या निबंधांतून विविध नियम लोकांपुढे मांडले आहे आणि त्यांना ऐहिक व पारलौकिक सुखाचा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला. वस्तुतः विविध वर्णातील लोकांचे हितसंबंध आणि मनोवृत्ती परस्परभिन्न होत्या. या ग्रंथांनी त्यांची एकसूत्रता राखली आणि भारतात परकीय सत्ता राज्य करीत असतानाही हिंदू संस्कृती आणि साहित्य टिकून ठेवण्यास मदत केली.

संदर्भ : Kane, P. V. History of Dharmasastra, Vol. 1, Part I and II, Poona, 1938, 1975.

साळुंखे, आ. ह.