पुणे येथील एका कॉन्व्हेंटमध्ये साजरी होणारी मॅस

मॅस (मिस्सा) : क्रूसावर जाण्यापूर्वी शेवटच्या भोजनाच्या वेळी ⇨ येशू ख्रिस्ताने औपचारिक रीत्या स्थापन केलेली मॅस (मास) वा मिस्सा हा एक पवित्र संस्कार व धर्मविधी असून बहुसंख्य ख्रिस्ती  लोकांची  ती  प्रमुख आराधनाही आहे. Mass या शब्दाची व्युत्पत्ती Missio (लॅटिन), Misson (इंग्रजी) म्हणजे ‘ बाहेर पाठविणे’ अशी आहे. आशीर्वाद देऊन आणि ‘जाण्याचा’ आदेश देऊनच या विधीची सांगता झाली.

मॅस इतर काही नावांनीही ओळखली जाते. उदा., बायबलच्या ‘नव्या करारा’त-प्रभुभोजन (१ करिंथ ११:२०), भाकर मोडणे (कृत्ये २:४६), ⇨ युखॅरिस्ट म्हणजे स्तुतिपर आभारप्रदर्शन (१ करिंथ ११:२४) तसेच नंतरच्या काळात अर्पण , प्रभुविधी, प्रभुसेवाविधी इत्यादी, मराठीमध्ये मिस्साला मिस्साबली, ख्रिस्तप्रसादविधी, पवित्र बलिदान, ख्रिस्तयाग, पवित्र सहभागिता अशी नावे आहेत. मराठी  भाषिक ख्रिस्ती समाज ‘मिस्से’साठी इंग्रजी शब्द मॅस याचा क्वचितच वापर करतात.

ईजिप्तमधील गुलामगिरीतून झालेली मुक्ती आणि सिनाई पर्वतावर देवाशी झालेला करार यांच्या स्मरणार्थ यहुदी (ज्यू) लोकांनी पास्काभोजन केले. येशू ख्रिस्ताने आपल्या मरणापूर्वी शिष्यांसमवेत हे भोजन केले तसेच  त्यांच्याशी नवा करार केला आणि त्यावर त्याच्या मरणाद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले. भोजनाच्या वेळी त्याने भाकर मोडली आणि द्राक्षरसपानामध्ये त्याच्या शिष्यांना सहभागी केले.

पहिल्या शतकापासून भाकर व द्राक्षरस यांची तयारी, आभारप्रदर्शनाची  प्रार्थना, भाकर मोडणे आणि ख्रिस्तप्रसाद देणे हे पवित्र मिस्सेचे मुख्य भाग प्रचलित आहेत. पुढे काळाच्या ओघात बायबलवाचन, इतर प्रार्थना इत्यादींचाही त्यात समावेश करण्यात आला. वरील अत्यावश्यक विधी कायम ठेवून मिस्सेच्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या परंपरांप्रमाणे पुढे विविध बदल होत गेले.

पवित्र मिस्सेच्या अर्थाविषयी  रोमन कॅथलिक व ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांत पूर्वीपासून मतैक्य आहे परंतु सोळाव्या शतकात त्यांच्यात व प्रॉटेस्टंट यांच्यामध्ये पवित्र मिस्सेसंबंधीच्या समजुतींमध्ये तसेच धर्मगुरुदीक्षा, धर्माधिकारपरंपरा, ख्रिस्ताचे मरण आणि मिस्सा यांमधील संबंध तसेच ख्रिस्तप्रसादाचा अर्थ यासंबंधी मतभेद झाले. अगदी अलीकडील काळात रोमन कॅथलिक आणि अँग्लिकन तसेच रोमन कॅथलिक आणि ल्यूथरपंथी यांच्या संयुक्त मतप्रदर्शनांवरून पवित्र मिस्सेसंबंधीच्या बाबतीत मूलभूत मतैक्य असल्याचे दिसते. भारतातील कॅथलिक धर्ममंडळ (चर्च) आणि उत्तर व दक्षिण भारतातील प्रॉटेस्टंट धर्ममंडळे यांनी प्रसिद्ध केलेल्या एतद्‌विषयक लिखाणात बरेचसे मतैक्य आहे, असे दिसून येते.

गुरुदीक्षा मिळालेले धर्मगुरू मिस्सेची खास वस्त्रे परिधान करून भक्तजनांबरोबर रविवारी मिस्सेची उपासना साजरी करतात. बहुतेक चर्चेसमध्ये हा विधी दररोज साजरा करण्यात येतो. भजन-संगीतासह अनेकदा अनेक धर्मगुरू मिळून एकत्रितपणे जी मिस्सा साजरी करतात तिला मोठी  मिस्सा (हाय मॅस) म्हणतात. एक धर्मगुरू व एक अथवा अनेक क्लर्क यांनी साध्या पद्धतीने व गायकसमूहाशिवाय पठणशैलीत सादर केलेल्या मिस्सेला लहान वा साधी मिस्सा (लो मॅस) म्हणतात.

मिस्सेचा विधी गावातील अल्पसंख्याकांनी अगदी साध्या पद्दतीने साजरा केलेला असो किंवा भव्य चर्चमधील अथवा प्रशस्त मैदानावरील अफाट जनसमुदायासाठी असो, तो नेहमीच उत्कट, भक्तिपूर्ण आणि वेधक असतो.

लेदर्ले, मॅथ्यू-रायनर


संगीत : मॅसच्या (मास) धार्मिक महत्त्वामुळे आणि त्यातील सांगीतिक सहभागाच्या विपुलतेमुळे संगीताच्या विकसनातही  मॅसचा हातभार लागला.

मॅसमधील प्रतिदिनी सादर होणारे व ऋतुचक्रानुसार बदलणारे भाग पारंपरिक ‘प्लेन साँग’ (शैलीदृष्ट्या कमी आलंकारिक असलेली, पाश्चिमात्य ख्रिस्ती धर्मविधिगीते) शैलीत सादर होतात. केवळ शोकसंगीत म्हणून ज्याचे वर्णन करता येईल, त्या ‘रेक्किएम मॅस’ च्या चाली निराळ्या असतात. मॅसमधील न बदलणारे भाग ‘ऑर्डिनरी (कॉमन) मॅस’ म्हणून ओळखले जातात. त्यांची संख्या पाच असून गायकसमूह, एकत्र गायन करणारे आवाज यांच्यासाठी निरनिराळी रचना असते. या पाचही भागांना पाश्चात्त्य संगीतात स्वरसंवाद पद्धती रूढ  झाल्यावर निरनिराळ्या चाली लावण्यात आल्या. साथसंगतीशिवाय, पण गायकसमूहातील आवाजांची गुंतागुंतीची योजना करून चाली सिद्ध करण्याच्या तंत्राचा परमोत्कर्ष सोळाव्या शतकाच्या अखेरीस दिसून येतो. या काळातील या पद्धतीचे प्रमुख संगीतरचनाकार म्हणजे इटलीतील ⇨ जोव्हान्नी पॅलेस्ट्रीना (सु. १५२५–१५९४) व इंग्लंडमधील विल्यम बर्ड (सु. १५४३–१६२३) हे होत.

अठराव्या शतकपासून मॅसमध्ये वाद्यवृदांचा सहभाग वाढता राहिला. ⇨ हायडन,मोट्सार्ट, वेबर, ⇨ शूबर्ट इ. नामवंत संगीतकारांनी मॅस रचना केल्या पण त्यांच्या रचनांत भक्तिरस कमी असल्याचा तज्ञांचा अभिप्राय आहे.

मॅसचे मुख्य प्रकारभेद पुढीलप्रमाणे नोंदविता येतील :

हाय मॅस : प्रीस्ट, डीकन इ. धर्मोपदेशकांनी पूर्णतः गाइलेला हा प्रकारअसून त्याचे गायन प्लेन साँग शैलीत होते.

संग मॅस : हा प्रकार वरीलप्रमाणे असतो पण त्यात गायनाचा वापर जास्त होतो.

लो मॅस : गायकसमूहाशिवाय पण प्रीस्ट आणि एक क्लर्क यांनी पठणशैलीत सादर केलेला प्रकार.

व्होटिव मॅस : विशिष्ट ख्रिस्ती संताच्या सन्मानार्थ, तसेच व्रत वा नवस पूर्तीच्या संदर्भात सादर केला जाणारा प्रकार.

नप्शल मॅस : लग्नविधीतील भाग असणारा प्रकार.

मॅस ऑफ द प्रिसाँक्टिफाइड : ‘गुड फ्रायडे’ च्या दिवशी सादर केला जातो.

फोक मॅस : लो मॅस चालू असता, उपासकांच्या समूहाने प्रादेशिक भाषांत गाइलेली स्तोत्रे या प्रकारात मोडतात.

रानडे, अशोक

संदर्भ : 1. Jungman, J. A. The Mass of the Roman Rite, 2. Vols., London, 1952, 1955,

           2. Rahner, karl, Theological Investigations, Vol. II, Iv, London, 1966.