बंगालमधील दुर्गेची उत्सवमूर्ती

दुर्गापूजा : दुर्गापूजेचा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत म्हणजे नवरात्रात साजरा करतात. या काळात घटस्थापना करून दुर्गेची पूजा करतात. चंडीपाठ, कुमारीपूजन, ब्राह्मणभोजन, अखंड दीप प्रज्वालन, पुष्पमालाबंधन इ. विधी नऊ दिवस केले जातात.

दुर्गापूजेचे धार्मिक विधान अनेक पुराणांतून आढळते. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेथे दुर्गा ही अनेकांची कुलदेवता आहे. हा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा भाद्रपद वद्य नवमीपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत केला जातो. कलकत्ता येथे दुर्गेचे शक्तिपीठ असून तेथे दुर्गेला काली म्हणतात. आसाममधील कामाख्या हेही एक शक्तिपीठ आहे. या देवतेच्या उपासनेची आणि पूजापद्धतीची माहिती कालिकापुराणात सांगितली आहे. बंगालमधील या उत्सवासाठी मंदिराबाहेर दुर्गेची सिंहारूढ मूर्ती बसवितात. तिचे रूप महिषासुरमर्दिनीचे असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून पहिले चार दिवस देवीची सजावट करतात. पाचव्या व सहाव्या दिवशी देवीला आवाहन करून तिची षोडशोपचार पूजा करतात. सात, आठ, नऊ हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानतात. दहाव्या दिवशी देवीला असंख्य पशुबळी अर्पण करतात. काली ही रुधिरप्रिया आहे. देवीची पूजा करून तिला मिरवणुकीने मंदिरात आणतात. उत्सवमूर्तीचे विसर्जन करतात. या काळात दुर्गा माहेरी आलेली आहे, अशी समजूत असल्याने स्त्रिया आपापल्या माहेरी जाऊन हा उत्सव साजरा करतात.

नेपाळमध्येही दुर्गापूजेचा उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस होतो. नवव्या दिवशी शस्त्रांची आणि ध्वजांची पूजा करून देवीला रेड्याचा बळी दिला जातो. बळी दिलेल्या पशूच्या रक्तात हात भिजवून ध्वजांना ते रक्त लावण्याची प्रथा तेथे रूढ आहे.

उत्तर भारतात, विशेषतः बंगाल–आसाममध्ये दुर्गा ही तांत्रिकांची देवता मानलेली आहे. त्यामुळेच मंत्रतंत्र, पशुबली इ. गोष्टीना या उत्सवात विशेष महत्त्व दिले जाते. अनेक जातिजमातींमध्ये दुर्गापूजा केली जाते. प्राचीन शबर जमातीतील या उत्सवात जागरण व नृत्य करीत आणि पशूंना बळी देत. देवीला दिल्या जाणाऱ्या पशुबलींच्या संदर्भात कालिकापुराणाने नरबलीचाही उल्लेख केला आहे. बाणभट्टाने (सातवे शतक) आणि भवभूतीने (आठवे शकत) चंडिकेसमोर दिल्या जाणाऱ्या नरबलीचा उल्लेख केला आहे, तसेच हरिभद्रने (नववे शतक) समराइच्च कहा  नावाच्या ग्रंथात शबरांनी कालीला दिलेल्या नरबळीचा निर्देश केला आहे.

तांत्रिक पूजाप्रकारांत दुर्गापूजेमध्ये प्रत्यक्ष पशुबलीचा उल्लेख असला, तरी अन्य ठिकाणी पशूऐवजी देवीसमोर कोहळा कापण्याची पद्धत आहे. भारतातील निरनिराळ्या ठिकाणी दुर्गेची शक्तिपीठे असून त्या सर्व ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. कोल्हापूरची महालक्ष्मी हेही एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानतात.

संदर्भ : प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप (देवीकोश), ३ खंड, पुणे १९६७–६८.

भिडे, वि. वि.