बक्रईद : (बकरीद). एक प्रमुख इस्लामी उत्सव. ईद अल्अद्हा, ईद अल्-कुर्बान, ईद अल्-नहर, ईद अल्-कबीर (सर्वांत मोठा उत्सव) अशीही त्याची नावे विविध इस्लामी देशांत रूढ आहेत. तुर्कस्थानात त्याला ‘बुयुक-बराम’ किंवा ‘कुर्बान बैरामि’ म्हणतात. झुल-हिज्जह (जिल्हेज) महिन्याच्या दहाव्या दिवशी पशुबली देण्याची या उत्सवातील प्रथा मुळात अरबांची आहे. मक्केजवळील मिना येथे सर्व यात्रेकरू हा बलिविधी पूर्वापार साजरा करत. तीच प्रथा नंतर इस्लामनेही उचलली. केवळ ⇨हाजची यात्रा करणारेच मिनास येऊन हा बलिविधी करतात असे नव्हे तर सर्व ‘साहिबे-निसाब’ (आपल्या गरजेपेक्षा साडे सात तोळे सोने किंवा साडे बावन्न तोळे चांदी ज्या व्यक्तीजवळ अधिक आहे तो) असलेले मुसलमान ह्या दिवशी हा विधिउत्सव असतील तेथे यथापरी साजरा करतात. प्रत्येक मुसलमान व्यक्तीने धार्मिक दृष्ट्या हा विधिउत्सव साजरा करणे हे विहित व आवश्यक कर्तव्य मानले जाते. कुराणात (सूरतूल् हज क्र २२, सूरतूस् साफ्फात क्र.३७) या विधीबाबत उल्लेख आढळतात.

पशू विकत घ्यायची ऐपत असलेल्या साहिबे-निसाबाने दरडोई एक मेंढी अथवा धार्मिक दृष्ट्या वैध ठरविला गेलेला कोणताही पशू अथवा सात व्यक्तीमागे एक उंट बळी द्यायलाच हवा. बळी द्यावयाचा पशू ठराविक वयाचा व अव्यंग असावा लागतो. ‘सलात अल्-ईद’ पासून सुरू होणारा हा बलिविधी पुढे तीन दिवस म्हणजे ‘ऐयाम अल्तश्रीक’ पर्यंत चालतो. या बलिविधीच्या प्रसंगी ‘तस्मिया’ (‘बिस्मिल्ला’ असा जप) ‘तक्बीर’ (अल्लाहु अकबर) म्हणजे, पशुचे तोंड किब्लाच्या दिशेने ठेवणे आणि बलीच्या स्वीकारार्थ याचना करणे ह्या गोष्टी अपरिहार्य असतात. बली देण्यात येणाऱ्या पशूच्या मांसाचे तीन भाग करून त्यांतील एक स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी व तिसरा गरिबांना वाटण्यासाठी वापरतात.

या दिवशी सर्व मुसलमान शुचिर्भूत होऊन नवी वस्त्रे परिधान करतात व उघड्यावर ईदग्याच्या ठिकाणी सूर्योदयानंतर, पण सूर्य माथ्यावर येण्यापूर्वी एकत्र जमतात. नंतर इमामाच्या नियंत्रणाखाली सामूहिक प्रार्थना (नमाज) होते. प्रार्थनेनंतर इमाम ‘खुत्वा’ (धार्मिक प्रवचन) पढतो. धार्मिक दृष्ट्या खुत्वा ऐकणे आवश्यक आहे. खुत्वा पढल्यानंतर ‘ईद मुबारक’ म्हणून एकमेकांना भेटतात व शुभेच्छा व्यक्त करतात. त्यानंतर लोक आपापल्या घरी जाऊन बलिविधी करतात. भेटण्यासाठी आलेल्या लोकांना फराळाचे पदार्थ व पानसुपारी-अत्तर देतात.

पहा : रमजान, सण व उत्सव (इस्लामी).

करंदीकर, म. अ.