टेंबेस्वामी : (१८५४–१९१४). आधुनिक काळातील एक दत्तोपासक सत्पुरुष आणि प्रख्यात वेदाभ्यासक. संपूर्ण नाव वासुदेव गणेश टेंबे वा टेंभे. ‘वासुदेवानंद सरस्वती’ ह्या नावानेही ते प्रसिद्ध आहेत. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील माणगाव येथे श्रावण वद्य ५ शके १७७६ रोजी. त्यांचे प्राथमिक संस्कृत शिक्षण त्यांचे आजोबा हरिभट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आणि नंतर त्यांनी विविध पाठशाळांतून संस्कृतचे अध्ययन केले. लहानपणापासूनच वेदाध्ययनाची आवड असल्याने उत्तरोत्तर त्यांचा वेदव्यासंग वाढत गेला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांचा अन्नपूर्णाबाईंशी विवाह झाला.

टेंबेस्वामी

ते प्रथम नरसोबाच्या वाडीस गेले असता, तेथे गोविंदस्वामी ह्या सत्पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दत्तोपासना सुरू केली. त्यांना पुढे वारंवार दत्तात्रेयाचे साक्षात्कार होऊ लागले आणि प्रत्यक्ष दत्तात्रेयानेच त्यांना मंत्रोपदेश दिला, असे सांगतात. त्यांनी तेथे योगाभ्यासही केला. १८८२ मध्ये त्यांनी चांद्रायण व्रत केले. पुढे माणगाव येथे त्यांनी दत्ताचे मंदिर उभारले आणि तेथेच मौनव्रताने राहू लागले. सात वर्षे त्यांनी अशी निग्रहपूर्वक दत्तोपासना केली. १८८९ मध्ये त्यांनी तीर्थयात्रा करण्यासाठी पत्नीसमवेत माणगाव सोडले. १८९१ मध्ये यात्रा करीत असतानाच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पत्नीनिधनानंतर तेराव्या दिवशीच त्यांनी संन्यास घेतला आणि पुन्हा तीर्थयात्रा सुरू केली. विविध ठिकाणी ते राहत व पुराण-प्रवचनांद्वारे लोकांत धर्मजागृती करीत. त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची प्रतिष्ठापना केली दत्तोपासनेचा प्रचार केला व ह्या उपासनेला प्रेरक अशी विपुल ग्रंथरचनाही केली. गरुडेश्वर (गुजरात राज्य) येथे ज्येष्ठ वद्य ३० शके १८३६ रोजी त्यांचे निधन झाले. तेथे त्यांची समाधी असून दत्तपादुकांची स्थापनाही केलेली आहे. त्यांचा पुण्यतिथीउत्सव तेथे दर वर्षी साजरा होतो. सात्त्विक वृत्ती, वेदोक्त आचार व संयम यांद्वारे टेंबेस्वामींनी स्वतःचा आदर्श समाजापुढे ठेवला. त्यांची पाच-सहा चरित्रेही भक्तांनी लिहिली आहेत.

त्यांची ग्रंथरचना संस्कृत व मराठीत असून ती प्रासादिक आणि हृदयाचा ठाव घेणारी आहे. श्रीदत्तलीलामृताब्धिसार (१९०३), दत्तमालावर्णांकित माघमाहात्म्य (१९०४), कुमारशिक्षा (१९०९), प्राकृत मननसार (१९१०), श्रीदत्तमाहात्म्य (१९११), स्त्रीशिक्षा व स्त्रीगीते (दुसरी आवृ., १९२१), अज्ञानतिमिरदीपक (१९२६) इ. त्यांचे ग्रंथ महत्त्वपूर्ण होत.

संदर्भ : दीक्षित, धुंडिराज, वासुदेवचरित्रामृत, पुणे, १९४९.

फरांडे, वि. दा.