बैलपोळा : बैलाचे पूजन

पशुपूजा :पशूला देव मानून जी पूजा केली जाते ती पशुपूजा. विशिष्ट पशूमध्ये अलौकिक (सुपरनॅचरल) वा दिव्य शक्ती असते. अशा भावनेमुळे त्या शक्तीला प्रसन्न करण्याच्या हेतूने त्या पशूची पूजा केली जाते. आधुनिक दृष्टीच्या माणसांनी पशूला मानवापेक्षा हीन मानले असल्यामुळे ही पूजा अनेकांना विचित्र वाटते. परंतु ही पूजापद्धती आदिमानव समाजांपासून विद्यमान सुसंस्कृत अनेक समाजांमध्ये प्रचलित आहे. आदिम मानव स्वतःला पशूपेक्षा श्रेष्ठ वा भिन्न मानत नव्हता उलट, काही वेळा पशूच श्रेष्ठ वाटत असल्यामुळे, निदान काही आदिम मानवांना पशूकडे पाहूनच देवाच्या अस्तित्वाची पहिली जाणीव झाली असण्याची शक्यता आहे. आज विद्यमान असलेल्या अनेक आदिम समाजांमध्ये विशिष्ट पशू हा देवक अथवा आपल्या गोत्राचे मूळ म्हणून पवित्र मानला जातो व तत्संबंधी विशिष्ट कर्मकांड आचरले जाते. येथे पशू या शब्दाने पशू, पक्षी, जलचर, सरपटणारे प्राणी, कीटक इ. मानवेतर प्राणी अभिप्रेत आहेत. जगातील बहुतेक सर्व लोकांत प्रागैतिहासिक काळापासूनच, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पशुपूजा चालत होती असे दिसते. विशेषतः व्याधसंस्कृती, पशुपालनसंस्कृती व कृषिसंस्कृती यांमध्ये ती अधिक प्रमाणात होती. पशुपूजेच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती बहुधा प्रतिकात्मक असते ही होय. कारण विशिष्ट पशूची पूजा करताना, बहुधा त्या पशूची एक पशू म्हणून पूजा केली जात नाही, तर त्या पशूमध्ये असलेल्या निसर्गातीत शक्तीची वा देवतेची पूजा केली जाते. काही समाजांत हा पशू पुराणकथेतला असतो. प्रत्यक्ष एखाद्या  पशूलाच देवता मानल्याची उदाहरणेही आढळतात. उदा., विशिष्ट वानर म्हणजे हनुमान वा विशिष्ट गरुड हे विष्णूचे वाहन वा  नंदी हे महादेवाचे वाहन हे देव होत, असे हिदूंनी मानलेले आहे.

पशुरूपात देवता: कधी पूज्य पशुदेवता पूर्णपणे एखाद्या पशूच्या रूपात (उदा.,गाय), तर कधी मानव व पशू यांच्या संमिश्र रूपात आढळते. कधी मस्तक मानवाचे व धड पशूचे, कधी मस्तक पशूचे व धड मानवाचे, तर कधी शिंग, शेपटी इ. पशुचिन्हांनी युक्त असे मानवी शरीर आढळते. ईजिप्तच्या सेबेक या देवाचे पूर्ण शरीर वा फक्त मस्तक मगरीचे असते. हिंदूंचे नरसिंह व गजानन हे संमिश्र स्वरूपाचे देव होत.उत्तर युरोपात लीशी या देवतांना बोकडाची शिंगे, कान व पाय असतात. डीमीटर या ग्रीक देवीला घोड्याचे, तर सेख्मेत या ईजिप्ती देवीला सिंहाचे मस्तक होते. प्रारंभी देवतेची पशूच्या रूपात वा पशूची देवतेच्या रूपात कल्पना केलेली असली, तरी क्रमाक्रमाने देवतेचे पशुरूप मागे पडून तिला मानवी रूप प्राप्त होत असे. उदा., ऑस्ट्रेलियातील एका जमातीत प्रारंभी ‘ईगल हॉक’ च्या रूपात कल्पिलेली देवता पुढे मानवी रूपात कल्पिली गेली. मानवाच्या धर्मविषयक जाणिवा जसजशा विकसित होत गेल्या, तसतसे देवतेचे पशुरूप टाकून तिला मानवी रूप देण्याची प्रक्रिया घडत गेली. परंतु एकदा मानवी रूप दिल्यानंतर ते टाकून देवतेची पुन्हा पशुरूपात कल्पना करण्याची प्रक्रिया मात्र कधीही घडलेली नाही.

पूजेसाठी सजविलेला रेडा

पशूपूजेमागचे उद्देश व कारणे: पशूची आणि तीही विशिष्ट पशूचीच पूजा करण्यास मानव का प्रवृत्त होतो, याची विविध कारणे असतात. पशुपूजकाला पूज्य पशू हा पशू वाटतच नाही, त्या पशूत त्याला काही वेगळी शक्ती दिसते. वासावरून माग काढणे, आकाशात उडणे,पाण्यात पोहणे, कात टाकून पुन्हा तरूण होणे, दृष्टी तीक्ष्ण असणे, बिळातून अचानक प्रकट होणे, सुफलतेची क्षमता प्रचंड प्रमाणात असणे इ. गोष्टींमुळे कुत्रा, पक्षी, मासा,नाग, बैल यांसारख्या पशूंजवळ काही विलक्षण, गूढ व अनिर्वचनीय सामर्थ्य आहे, असे अादिम मानवाला वाटत असे. तसेच मानवाप्रमाणेच पशूमध्येही आत्मा असतो, एवढेच नव्हे तर पशू, देव व मानव यांत काही समानता आहे, देवता व मृतात्मे पशुरूपात राहतात आणि प्रसन्न झाल्यास कृपा व रुष्ट झाल्यास हानी करू शकतात इ. समजुतींमुळेही मनुष्य पशुपूजेस प्रवृत्त होत असे. विश्वाची निर्मिती वा रक्षण यांसारख्या उद्देशांनी देवता पशूच्या रूपात अवतरतात किंवा पशू हे त्यांचे निवासस्थान बनते, अशी एक समजूत आहे. उदा., ग्वातेमालातील सर्वश्रेष्ठ देव हरिणाच्या, तर यू जमातीचा एक देव तरसाच्या रूपात प्रकट झाल्याचे मानले जाते. यांखेरीज, जगाच्या विविध भागांत फुलपाखरे, सरडे, मासे, घोडे, वराह इत्यादींच्या रूपांत देव प्रकट झाला, अशा समजुती आहेत. सामोआसारख्या ठिकाणी एकच देव दोनतीन पशूंमध्ये प्रकट झाल्याची कल्पना आढळते. अनेक कुले वा खेडी एका छत्राखाली येणे वा एकाच देवाने भिन्नभिन्न काळी भिन्नभिन्न पशूंचे अवतार घेणे, यांसारखी कारणे त्यामागे असतात. आपल्या मृत पूर्वजाच्या आत्म्याने विशिष्ट पशूमध्ये प्रवेश केला आहे, या समजुतीनेही त्या पशूची पूजा केली जाते. उदा., पश्चिम अाफ्रिकेत पाकोळीच्या, तर सयामात पांढऱ्‍या हत्तीच्या शरीरात पूर्वजांचे मृतात्मे प्रविष्ट झाल्याचे मानून, त्या पशूंची पूजा केली जाते. मगर, हरिणे, मासे, कोल्हे, माशा, उंदीर, नाग इत्यादींमध्ये पूर्वजांच्या मृतात्म्यांनी प्रवेश केल्याची कल्पना जगातील अनेक जमातींमध्ये आढळते. विशिष्ट पशूपासून आपल्या मूळ पूर्वजाची व पर्यायाने वंशाची उत्पत्ती झाली, या समजुतीने त्या पशूला ⇨देवक मानून त्याची पूजा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. विविध ठिकाणी गवा, पतंग, गरुड, कावळा, मुंगी, मासा, बेडूक, ससा, अस्वल इत्यादींना देवक व पूर्वज मानून त्यांची पूजा केली जाते. विशिष्ट पशूने वा पशुधर्म अंगी असलेल्या देवतेने विश्वाची वा संस्कृतीची निर्मिती केली, या समजुतीने त्या पशूला माहात्म्य प्राप्त झालेले दिसते. अशा अर्थाच्या अनेक ⇨ पुराणकथाही आढळतात. उदा., एस्किमो लोकांत कावळ्याने विश्व निर्माण करून अग्नी आणला, अशी कथा आहे. पृथ्वीचा भार वाहणारे हत्ती, नाग, बेडूक इ. अनेक कथांत आढळतात. प्रत्येक पुरुषाला तो वयात यावयाच्या वेळी स्वप्नात एक पशू दिसतो व तो त्याची संरक्षक चित‌्शक्ती बनतो, असे काही लोक मानतात. उदा., काही अमेरिकन इंडियन जमातींत अशा प्रकारच्या ‘मॅनितू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या संरक्षक शक्तीची पूजा केली जाते. काही ठिकाणी विशिष्ट पशूला देवदूत म्हटले जाते. उदा., जपानमध्ये ऐनू लोक पूज्य अस्वलाला मारून त्याच्याबरोबर देवाकडे निरोप पाठवितात. काही वेळा कृतज्ञतेपोटी पशुपूजा केली जाते. उदा., भारतातील पोळ्याच्या वेळी केली जाणारी बैलाची पूजा. पशूंची संख्या वाढावी व आपल्याला भरपूर पशू मिळावेत, म्हणून शिकारी लोक पशुदेवतांची पूजा करीत. पशुदेवता शिकार शिकवते, मार्गदर्शन करते इ. समजुतीही असत. वाहनादी मार्गांनी पशू हे देवतेशी संबद्ध झाल्यामुळेही लोकांना पशूंविषयी पूज्यभाव वाटतो. उदा., नंदी हे शंकराचे व बोकड हे ग्रीक ॲफ्रोडाइटीचे वाहन, शेषनाग ही विष्णूची शय्या इ. कल्पना असतात. कुटुंबदेवता, संरक्षक देवता, जलदेवता, वनदेवता इ. रूपांत पशूंची पूजा केली जाते. उदा., सामोआ लोक फुलपाखराला कुटुंबदेवता आणि एस्किमो लोक अस्वलाला संरक्षक देवता मानतात. यूरोपमध्ये घोडा, कोंबडा, बोकड इत्यादींच्या रूपांत धान्यदेवता कल्पिलेल्या होत्या. घुबडाजवळ बुद्धिमत्ता, पक्ष्यांजवळ वेग, सिंहाजवळ सामर्थ्य इ. गुण असल्यामुळे त्या गुणांच्या देवतांचे त्या पशूंशी ऐक्य मानले जाते. उदा., बुद्धीची ग्रीक देवता अथीना ही घुबडाच्या रूपात कल्पिलेली होती. उपजीविकेला लागणाऱ्‍या गोष्टी ज्या पशूंपासून मिळतात, त्यांच्याविषयी पूज्यभाव असतो. भीषण पशूंपासून आपले संरक्षण व्हावे, म्हणून त्यांची पूजा केली जाते. कधीकधी पशू मृत्यूपासून वाचवतात आणि त्यांना अमरत्वाचे रहस्य माहीत असते, यांसारख्या कल्पनाही आढळतात. शकुनसूचक, देवाला सोडलेल्या, स्वप्नात येऊन मार्गदर्शन करणाऱ्‍या  व ⇨ जादूटोण्यात उपयोगी पडणाऱ्‍या पशूंचीही पूजा केली जाते. अवेस्तातील माशीचे रूप घेतलेला मृत्यू, टॅलमुड (तलमूद ) या ज्यू धर्मग्रंथातील कोंबड्याचे पाय असलेला दैत्य, ड्रॅगन इ. प्रकारे दुष्ट शक्तीही पशूच्या रूपात कल्पिलेल्या आढळतात.  


विविध पशुदेवतांची पूजा :विविध समाजांतून विविध पशूंची पूजा चालते. कधी हनुमंताप्रमाणे विशिष्ट वर्गातील एकाच पशूची, तर कधी गायीप्रमाणे विशिष्ट वर्गातील सर्व पशूंची, तर काही वेळा विशिष्ट रंगाच्याच पशूंची पूजा केली जाते. उदा., पांढरे हत्ती, पांढरे घोडे, पांढऱ्‍या गायी, कपिला गाय इत्यादी. सर्पांची पूजा [⟶ नागपूजा] हा या पूजेचा एक मुख्य प्रकार होय. पॉलिनीशियात सरड्यांची, अमेरिकेत कासवांची, उत्तर बोर्निओत ससाण्यांची, ज्यू लोकांत गाढवांची, जपानात अस्वलांची, मँचुरियात वाघांची इ. प्रकारे पूजा चालत असे किंवा अजून चालते. यांखेरीज जगातील विविध लोकांत मोर, गरुड, माकडे, लांडगे, ससे, मुंग्या, अस्वले इत्यादींची पूजा चालते. इतर सर्व देशांपेक्षा ईजिप्तमध्ये पशुपूजा अधिक प्रमाणात चालत होती. मेंढा, मांजर, कुत्रा, अस्वल, बैल (विशेषतः ॲपिस ही वृषभदेवता) इ. पशूंची तेथे पूजा चाले. एकदा कॅम्बायसीझने सैन्यापुढे मेंढ्या, कुत्री, मांजरे इ. पशूंना उभे करून हल्ला केला, तेव्हा पशूंवर हल्ला न करण्याच्या ईजिप्ती लोकांच्या वृत्तीमुळे त्यांनी पिलूशीअम हे नगर गमावले, असे म्हणतात. मांजराला मारल्यास मृत्युदंड देण्याची प्रथाही तेथे होती. तेथील ओसायरिस हा प्रमुख देव वराह व बैल यांच्या रूपात प्रकट होतो, असे मानले जाई. भारतात विष्णूचे मत्स्य, कूर्म व वराह हे अवतार पशुरूपी आहेत. गायीच्या शरीरात ३३ कोटी देव राहतात, अशी हिंदूंची समजूत असते. ऋग्वेदातही गायीला अवध्य मानलेले असले, तरी महाभारतकालापासून गोपूजा अधिक प्रचलित झाली, असे दिसते. गरुड हे विष्णूचे, मोर हे कार्तिकेयाचे आणि उंदीर हे गणपतीचे वाहन अशा कल्पना आहेत. सिंहामध्ये दुर्गा, मेषामध्ये चंद्र, घोड्यामध्ये बारा आदित्य इ. अधिष्ठात्री देवता राहतात, अशाही समजुती आढळतात.  

पूजापद्धती :पूजेच्या पद्धतींतही बरीच विविधता आढळते. काही वेळा पशूविषयी भीती व आदर असतो आणि त्याला पवित्र मानले जाते परंतु त्याची प्रत्यक्ष पूजा मात्र केली जात नाही. काही वेळा पशूंची प्रत्यक्ष पूजा चालते व त्यासाठी विधींचे पालन केले जाते. नाहुआ लोकांच्या प्रदेशात कोयोतचे, सँडविच बेटात शार्क माशाचे आणि हानोईमध्ये वाघाचे मंदिर आहे. कलंग लोक तांबड्या कुत्र्यांची वा त्यांच्या प्रतिमांची पूजा करतात. कॅरीब लोकांत बेडकाची व उत्तर बोर्निओत नव्या घरापुढे ससाण्याची प्रतिमा असे. फ्रिकहाउझन आणि वूरहेम्बर्ग या ठिकाणी गावाची संरक्षक देवता म्हणून गाढवाची प्रतिमा असे. व्याधसंस्कृतीमध्ये सर्व पशूंचा स्वामी असलेल्या देवाची मूर्ती असे.नेपाळमधील नेवार लोक भात, तूप इ. पदार्थांनी बेडकाची पूजा करतात. राजपूत मुली दसऱ्‍याच्या वेळी कोकिळेचे चित्र काढून त्यावर फुले, तांदूळ इ. वाहतात व प्रत्यक्ष कोकिळा येईपर्यंत नृत्य करतात. जर्मन न्यू गिनीमध्ये कुत्र्याच्या आत्म्याला अन्नबली देतात.

हॉटेंटॉट लोक भुंगेरा (बीटल) या कीटकदेवाला मेंढ्या व बैल बळी देत. पशुदेवतेची वा देवकाची चित्रे अंगावर गोंदून घेणे आणि शरीराचे अवयव, घर , वस्त्रे, भांडी, शस्त्रे इत्यादींवर त्यांची चित्रे रेखाटणे हा पशुपूजेचाच एक प्रकार होय. प्रागैतिहासिक काळात गुहांतून काढलेली पशूंची चित्रे आढळतात. एखाद्या पशूचे पूजक हे त्या पशूचे कातडे पांघरून वा मुखवटे धारण करून नृत्य करतात व अशा पूजेद्वारे त्या पशुदेवतेशी तन्मयता साधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच अनेकदा अशा भक्तांना त्या पशूचेच नाव दिले जाते. उदा., ग्रीसमध्ये मूळची भ्रमरदेवी असलेल्या डीमीटरच्या उपासिकांनाही भ्रमरी म्हटले जाई. बॅकसच्या उपासकांना अश्व, आर्टेमिसच्या उपासकांना अस्वल, डायोनायससच्या पुरोहितांना बैल इत्यादीप्रकारे संबोधिले जाई. यातुक व शामानही पशूचे रूप घेत असत. पशुदेवतेसाठी उत्सव साजरे केले जातात. उदा,. पूर्व रशियातील चूव्हाशेस लोक भ्रमरदेवाचा उत्सव व द. अमेरिकेतील चिब‌्चा लोक मंडूक देवाचा वार्षिक उत्सव साजरा करीत. देवाप्रमाणेच पशूंच्या नावाने शपथ घेण्याचे प्रकारही चालत. गाला लोक मेंढ्यांच्या नावे, तुंगूस लोक कुत्र्यांच्या नावे, तर जुआंग लोक मुग्यांच्या वारुळावर शपथ घेत. ईजिप्तमध्ये मांजर, बैल, कुत्रा इत्यादींच्या ‘ममी’ आढळतात. पशूंची प्रार्थनाही केली जाते. उदा., ट्यूटॉन लोक कोळ्याला मारत परंतु त्याची प्रार्थनाही करीत असत. आपल्या वंशाला देवकपशूचे नाव देणे, हा पूज्यभाव व्यक्त करण्याचाच एक प्रकार होय. काही मंदिरांतून पशुदेवतांचे प्रतीक म्हणून विशिष्ट पशू ठेवले जात. आफ्रिकेत काही ठिकाणी माश्यांच्या मंदिरांत माशा ठेवल्या जात. ईजिप्तमध्ये ॲपिस हा बैल देवळात होता. ग्रीसमध्ये ॲफ्रोडाइटीच्या मंदिरात कबुतुरे, अपोलोच्या मंदिरात मासे, अथीनाच्या मंदिरात घुबड इ. पशू असत. हा पशुपूजेचाच एक प्रकार म्हटला पाहिजे.

पूज्य पशूची हत्या :पूज्य पशू अवध्य मानला जात असल्यामुळे भूतदया, अहिंसा इत्यादींना प्रोत्साहन मिळून आपल्या सहानुभूतीच्या कक्षा विकसित होतात हे खरे असले, तरी पूज्य पशूची देवतेचा बळी म्हणून हत्याही केली जाते आणि ती हत्या हाही बहुधा पूजेचाच एक भाग असतो. काही ठिकाणी पशूला मारण्यापूर्वी मिरवणुकीने त्याला प्रत्येकाच्या घरी नेऊन त्याची पूजा करतात. मध्य आफ्रिकेतील माडी लोक पवित्र कोकराला आणि द. भारतातील तोडा लोक पूज्य रेड्याला वर्षातून एकदा मारून खातात पूज्य आणि अवध्य मानलेल्या देवकप्राण्याला विशिष्ट प्रसंगी मारून त्याचे मांस खाण्याची प्रथा असते. कॅलिफोर्नियातील इंडियन लोक तीसा (बझर्ड) या पक्ष्याची पूजा करतात परंतु तो पक्षिवंश नष्ट होऊ नये म्हणून समारंभापूर्वक एका पक्ष्याची हत्याही करतात. त्यामुळे त्या पक्षिवंशाचा विस्तार होतो, असे त्यांना वाटते. न्यू मेक्सिकोतील झूनी लोक पूज्य कासवाची हत्या करतात हत्येमुळे कासव मरत नाही तर नव्या घरी जाते, असे ते मानतात. जपानमधील ऐनू लोक एका अस्वलाची वर्षभर पूजा करून त्याची समारंभपूर्वक हत्या करतात.मारलेल्या अस्वलाची कवटी टांगून, त्या कवटीत तो प्राणी आहे, अशा समजुतीने तिची पूजा करतात. कॅलिफोर्नियातील ॲकाग‌्चेमन हे लोक पूज्य अशा पेन पक्ष्यांतील एकाला प्रत्येक खेड्यातील वार्षिक उत्सवास मारतात परंतु दरवर्षी व प्रत्येक खेड्यात मारला जाणारा पक्षी एकच असतो, वेगवेगळा नसतो, असे मानतात. क्वचित प्रसंगी पशूच्या रूपात देवता येते व तिला आपल्या स्वर्गीय निवासाकडे जाता यावे म्हणून तिची हत्या करून भक्षण केले पाहिजे, अशाही समजुती आढळतात.

जे. जी. फ्रेझरच्या मते परस्परविरूद्ध अशा दोन प्रकारांनी पशुपूजा होत असते. पहिल्या प्रकारात पशू पूज्य असल्यामुळे तो अवध्य व अभक्ष असतो. दुसऱ्‍या प्रकारात तो भक्ष्य असल्यामुळेच त्याची पूजा केली जाते. मारल्या जाणाऱ्‍या पशूच्या आत्म्याने व मागे राहिलेल्या त्याच्या साथीदारांनी सूडभावनेने आपल्याला छळू नये, म्हणून अशा प्रकारची पूजा केली जाते. या दोन्ही प्रकारांत पशूकडून काही लाभ होत असतो. पहिल्या प्रकारात त्याच्याकडून संरक्षण, सल्ला व मदत मिळते तसेच इजाही होत नाही. दुसऱ्‍या प्रकारात त्याचे मांस, कातडे इ. मिळते. उत्तर अमेरिकन इंडियन लोकांत हे दोन्ही प्रकार आढळतात. ते देवकपशूंना मारत नाहीत आणि ज्या पशूंवर त्यांची उपजीविका चालते, त्यांच्याविषयी ते पूज्यभाव बाळगतात. फ्रेझरच्या आणखी एका मतानुसार काही वेळा विशिष्ट देवतेच्या उत्सवात पशूचा बळी दिला जातो. तेव्हा तो पशू म्हणजे स्वतः ती देवताच असते आणि देवतेचा देवतेलाच बळी दिला जातो. उदा., ईजिप्तमध्ये ॲमन देवतेचे पूजक पूज्य व अवध्य मेंढ्याला ॲमनच्या वार्षिक उत्सवात मारून त्याचे कातडे ॲमनच्या प्रतिमेवर घालत. येथे मेंढा हा पशुबली नसून स्वतः ॲमनच असे. प्रतिमेवर कातडे घालण्याच्या प्रथेवरून मेंढा व ॲमन यांचे ऐक्य स्पष्ट होते. प्रारंभी हे कातडे एखाद्या वस्तूवर घालून तिला देव मानले जाई परंतु पुढे देवाची लाकूड, धातू वा दगड यांनी बनवलेली स्थिर प्रतिमा आल्यामुळे, मारलेला पशू म्हणजे देवाला दिलेला बळी अशी समजूत बनत गेली. मारलेला पशू हा देवच असल्यामुळे हत्येच्या वेळचे कर्मकांड व नंतरचे भोजन हे देव व भक्त यांचे नाते दृढ करण्यासाठी असते, असेही मानले जाई.

संदर्भ : 1.Frazer, J.G. The Golden Bough, London, 1963. 2. Kristensen, W.B. The Meaning of Religion, The Hague, 1960.

साळुंखे, आ, ह.