श्री : एक प्राचीन हिंदू देवता.ती ऐश्वर्य, समृद्धी, सौंदर्य इत्यादींची देवतामानली जाते. श्री व लक्ष्मी या देवता समुद्रमंथनातूनवेदोत्तर काळात, विशेषत: पौराणिक काळात, एकच झाल्याचे आढळते. वाच्यार्थाने श्री व लक्ष्मी ह्या एकच होत मात्र त्यांच्या मूर्तिशिल्पांतभिन्नताआढळते.लक्ष्मी क्षीरसागरातून वर येताच ऋषींनी श्रीसूक्ताने तिचे स्तवन केले, हे पुराणांतर्गत वर्णन श्री ही प्राचीन असल्याचे आणि ती लक्ष्मी स्वरूपात विलीन झाल्याचे निदर्शक आहे तथापि श्री आणि लक्ष्मी या दोघी पुरूषरूपी विष्णूच्या दोन पत्नी होत्या, असा उल्लेख वाजसनेयसंहिते त मिळतो. त्यामुळे श्री ही लक्ष्मीपेक्षा वेगळी देवता असून पारंपरिक इतिहासाचा मागोवा घेतला असता मूलत: या स्वतंत्र देवता आहेत. वैदिक वाङ्‌मयात श्री हा शब्द शोभा, सुंदरता आणि सजावट या अर्थाने प्रयुक्त झाला आहे. विष्णू हा प्रजापती आहे, तर श्री ही सृष्टी-पृथ्वी आहे. तो तिचा मूलाधार आहे. विष्णू हा सर्व पुरूषांत एकरूप झाला आहे, तर श्री ही सर्व स्त्रियांत एकात्म पावली आहे. रूक्मिणी ही श्रीचाच अवतार मानली असून, ती विष्णु-कृष्णाशी विवाहबद्ध झाली. ऋग्वेदा नुसार श्री ही बह्मवादिनी देवी आहे.विष्णुपुराणामध्ये लक्ष्मी अथवा श्रीला मातृदेवता मानलेली आहे. याचाच अर्थ ती विश्वाची माता असून जगद्धात्री या नावाने संबोधिली आहे.

श्रीशिल्प ही संकल्पना वैदिक व बौद्ध वाङ्‌मयाच्या आधारे विकसित झाली. श्रीच्या अनेक स्वतंत्र मूर्ती उपलब्ध झाल्या असून अदयापि त्या सापडतात मात्र तशा लक्ष्मीच्या मिळत नाहीत, त्या बऱ्याच दुर्मिळ आहेत. श्रीच्या काही मूर्ती विष्णूच्या सान्निध्यातही आढळतात. विष्णूबरोबर भूदेवी किंवा सरस्वती खोदली असल्यास, श्री अवश्य असते व तेव्हा तिला बहुधा श्री हे नाव देतात. विष्णूच्या संगतीत जेव्हा ही एकटीच खोदली असेल, तेव्हा हिला लक्ष्मी म्हणतात. स्वतंत्र असेल, तेव्हा हिला लक्ष्मी किंवा श्री या दोन्ही नावांनी संबोधीत असले, तरी प्रत्येक नावाच्या वेळी तिचे भिन्न रूप असते.

अभिलषितार्थचिंतामणि, चतुर्वर्गचिंतामणि, मत्स्यपुराण, मानसार, शिल्परत्न अशा काही शिल्पशास्त्रावरील गंथांत श्रीची मूर्ती कशी घडवावी, याविषयी तपशीलवार माहिती दिलेली आहे. यांतून सर्वसाधारणपणे ती गौरवर्णी, पद्मासनात बसलेली, हातात श्रीफळ व पद्म धारण केलेली, अशी द्विभुज तर कधी चतुर्भुज वर्णिली आहे. क्वचित तिच्या मागे चामरधारी दोन स्त्रिया किंवा स्नान घालणारे दोन हत्ती दोन्ही बाजूला असतात, यांचाही यांत निर्देश आढळतो.

आतापर्यंत उपलब्ध झालेल्या श्रीच्या मूर्तींत ⇨मथुरा आणि ⇨भारहूत येथील मूर्ती सर्वांत प्राचीन आहेत. मथुरा शिल्पपट्टावरील श्रीस दोन हात असून त्यांपैकी उजवा अभय मुद्रेत आणि डावा कमरेवर व देठासह (सनाल) उत्फुल्ल कमलधारी आहे. कुशाणकालीन इतर मूर्तींप्रमाणे तिच्यावर फणा आहे. भारहूत येथे सिरिमा नावाची देवता कोरलेली आहे. तिने उजव्या हातात धरलेल्या कमळावरून आणि सिरि+मा या सादृश्यावरूनही ती श्रीचीच मूर्ती आहे, हे निर्विवाद होय. महाबलिपुरमची मूर्ती भद्रासनात, कमळावर बसलेली आणि तिच्या दोन हातांत कमळे दर्शविली आहेत. तिच्या माथ्यावर वासुदेव टोपीसदृश मुकुट आहे. गळ्यात कंठा व चन्नवीर, हातांत कंकणे, कानांत पत्रकुंडले वगैरे अलंकार तिने घातले आहेत. तिच्या दोन्ही बाजूंस दोन दासी असून मागील बाजूस ऊर्ध्वशुंड व अध:शुंड असे दोन हत्ती आहेत. हत्ती, कमलासन व हातांत कमळे यांवरून ही श्रीचीच मूर्ती आहे, हे उघड होते. भारताबाहेर तिबेट व जावा येथे श्रीच्या प्रत्येकी दोन मूर्ती आढळल्या. त्यांपैकी एक खेचरावर स्वार झालेली ( तिबेट ) व दुसरी मनुष्यवाहिनी आहे तर जावातील श्री वर्तुळाकार बैठकीवर उभी असून व्दिभुज आहे. तिच्या अंगावर भरपूर दागिने आहेत. दुसरी वजासनातील व व्दिभुज असून तिच्या डोक्यावर मुकुट व पाठीमागे प्रभावळ असून तीवर छत्र आहे.

पहा : लक्ष्मी.

संदर्भ : 1. Battacharji, Sukumari, Indian Theogony : A Comparative Study of Indian Mythology From Vadas to the Puranas, New York, 1970.

२. खरे, ग. ह. मूर्तिविज्ञान, पुणे, १९३९.

देशपांडे, सु. र.