बगाड : एक नवसप्रकार.

नवस: एखाद्या देवतेने आपली विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट पदार्थ अर्पण करू किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करू, असे अभिवचन देणे म्हणजे नवस करणे होय. नवस बोलण्याचा प्रघात प्राचीन काळापासून सर्वत्र चालत आलेला आहे. नवस हे एक काम्य व्रत असले, तरी ते सशर्त आहे. देवाने आधी भक्ताची इच्छा पूर्ण करावयाची व मग भक्ताने नवस फेडायचा, असा क्रम त्यात असतो. म्हणजे नवसामध्ये एक प्रकारे देवाच्या देवत्वाला आवाहनाबरोबरच आव्हानही असते. म्हणूनच नवस हा व्यक्तीने धार्मिक श्रद्धेतून देवतेशी केलेला करार असतो आणि त्यात मोबदला, देवघेव, लालूच इ. स्वरूपांत व्यापारी वृत्ती दिसते, असे एक मत मांडले जाते. याउलट, नवसामुळे प्रार्थनेला एक विशेष सामर्थ्य प्राप्त होते आणि नवस फेडून मनुष्य देवाविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो, असेही मानले जाते.

‘नवस’ शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतमधील ‘नमस्’ (अनुकूल) या शब्दापासून मानली जाते. ‘नमस्’ या शब्दाचा ‘करार’ असाही अर्थ कोशात आढळत असून तोही ‘नवस’ या शब्दाच्या अर्थाशी जुळतो. ‘नमस्या’ (पूजा, आदर), ‘नमस्य’ (पूजा करणे वा पूज्य) आणि ‘नमसित’ (पूजित) या शब्दरूपांपासूनही ‘नवस’ या शब्दाची व्युत्पत्ती संभवते. प्रार्थना या अर्थाच्या फार्सी ‘नमाज’ आणि बलुची ‘नमाश्’ आणि ‘नवाश्’ या शब्दांचा नवस शब्दाच्या स्वरूपावर परिणाम झाला असावा, असेही एक मत आहे.

नवस हे स्वतःहून स्वीकारलेले एक बंधन आहे देव वा धर्म यांनी नवस बोलण्याची अपेक्षा केलेली नसल्यामुळे ते ऐच्छिक असते एकदा नवस बोलल्यानंतर मात्र ते फेडलेच पाहिजे, नाहीतर देवतेचा रोष होतो इ. समजुती आहेत. रोगनिवारण, विवाह, सुखरूप प्रसूती, अपत्यप्राप्ती, विजय, दारिद्र्यनाश, राज्यप्राप्ती इ. हेतूंबरोबरच दैनंदिन जीवनातील अनेक मागण्या नवस बोलण्यामागे असतात. नवस बोलताना क्लेश सोसण्याची वा त्याग करण्याची तयारी दर्शविलेली असते. तीनुसार नवस फेडताना मंदिर, मंदिराची पायरी, खांब इ. बांधून दिले जातात. जमीन, पैसे, दागिने, वस्त्रे, बळी, मूल इ. अर्पण करणे आणि पूजा, वारी, जप, पारायण, सत्यनारायण इ. कृत्यांप्रमाणेच विस्तवावरून चालत जाणे, बगाड घेणे, लोटांगण घालणे इ. गोष्टी केल्या जातात. स्वतःप्रमाणेच मुलगा, पती इत्यादींचे दुःख दूर व्हावे म्हणूनही नवस बोलले जातात. क्वचित नवसांचा अतिरेक होतो व त्यामागील नीतिमत्ता व श्रद्धा उरत नाही. नवस बोलताना अत्यंत मोठा त्याग करण्याची तयारी दर्शविणारी व्यक्ती संकट दूर होताच तो त्याग करणे अव्यवहार्य मानून पर्याय शोधते. काही देवस्थाने जागृत व नवसाला पावणारी मानली जातात परंतु नवसाला पावणाऱ्या देवता दुय्यम मानल्या जातात. संतांची समाधिस्थाने वा दर्गे यांच्यापुढेही नवस बोलले जातात. नवसफेडीसाठी दिलेल्या वस्तू बऱ्याच वेळा पुरोहितांना मिळतात.

हरिश्चंद्राने पुत्र झाल्यास तो वरुणाला अर्पण करण्याचा नवस केला होता परंतु नवस फेडण्याची टाळाटाळ केल्यामुळे त्याला जलोदर झाला व शेवटी त्याने पुत्राऐवजी शुनःशेपाला बळी देण्याचा प्रयत्न केला, अशी कथा ऐतरेय ब्राह्मणात आहे. शंकराचार्य व शिवाजी सारखे महापुरुष नवसानंतर जन्मले, अशा आख्यायिका आहेत. हिंदूंची अनेक मंदिरे नवसफेडीच्या वस्तूंनी भरलेली दिसतात. एकाच वेळी अनेक देवतांना नवस बोलण्याची पद्धतही दिसते. देवदासी, वाघ्यामुरळी इत्यादींचा वर्ग म्हणजे देवतांना वाहिलेल्या नवसाच्या व्यक्ती होत.

हिब्रू लोकांत घरातील कर्त्या व्यक्तीलाच नवस बोलता येई. पत्नीच्या वा कन्येच्या नवसाला विरोध करण्याचा अधिकार पुरुषांना होता. मुलगा झाल्यास येहोवाच्या सेवेत त्याला अर्पण करण्याचा हॅनाने हद्दपारीतून परत जेरूसलेमला आणल्यास येहोवाची सेवा करण्याचा ॲब्सालोमने आणि प्रवासातून सुखरूप परत आणल्यास मंदिरात खांब उभारण्याचा जेकबने नवस केला होता. अविचारपूर्वक, घाईने व क्षुल्लक गोष्टीसाठी नवस बोलू नये, नवस लवकर फेडावा, नवस फेडताना अनावश्यक आत्मक्लेश करू नयेत, वयात आलेला १२ वर्षांचा मुलगा किंवा ११ वर्षांची मुलगी यांना नवस बोलता येतो, नवस न फेडणाऱ्या माणसाला न्यायालयात साक्ष द्यायला परवानगी नाही, नवस फेडणे शक्य नसेल तर तो राब्बींकडून विधिपूर्वक रद्द करून घेता येतो इ. मते ज्यू लोकांत रूढ होती.

युद्धाच्या वेळी सार्वजनिक नवस बोलण्याची प्रथा ग्रीक लोकांत होती. अथीना देवतेने ट्रॉय नगरीवर दया केली, तर १२ कालवडी बळी देण्याचा नवस बोल, असे हेक्टरने आपल्या आईला सांगितले होते. सार्वजनिक नवसांपेक्षा वैयक्तिक नवसांना ग्रीकांमध्ये प्राधान्य होते. आकिलीझ ट्रॉयहून सुखरूप परत आला, तर त्याच्या केसाचे एक झुलूप अर्पण करण्याचा नवस पेलीअसने एका नदीदेवतेपुढे केला होता. व्यक्तीने नवस फेडला नाही, तर संपूर्ण जमातीला त्रास होतो, असे मानले जाई. देव इच्छापूर्ती करणार याविषयी ग्रीकांना संदेह नसल्यामुळे, क्वचित प्रसंगी नवस इच्छापूर्तीपूर्वीच फेडला जाई.

फुटलेल्या नावेतून वाचवण्यासाठी वा नावांच्या शर्यतीत विजय मिळण्यासाठी केलेले वैयक्तिक नवस रोमन लोकांत आढळत असले, तरी त्यांचा सार्वजनिक नवसांवर अधिक भर होता. युद्ध वा साथींच्या रोगांच्या वेळी सार्वजनिक नवस बोलले जात. सार्वजनिक नवसांचा विशिष्ट विधी होता. राज्य व देवता यांच्यामध्ये एक करार होई व त्याच्या अटी आधी जाहीर केल्या जात. राज्याचा प्रतिनिधी असलेला एक अधिकारी नवस फेडण्याची जबाबदारी स्वतःवर घेई. विशिष्ट नवस न फेडल्यास प्रायश्चित्त घ्यावे लागे. शत्रूच्या देवाला नवस बोलून आपल्या बाजूला आणता येते, अशी त्यांची समजूत होती. शत्रूंनी आपल्याविरुद्ध तेच तंत्र वापरू नये म्हणून स्वतःच्या संरक्षक देवतांची नावे मात्र ते लपवून ठेवत.

इस्लाममध्ये ‘नध्र’ (नवस) ची कल्पना इस्लामपूर्व अरबांतून आलेली आहे. आपल्या मेंढ्यांच्या कळपात शंभर मेंढ्या झाल्या, तर एक मेंढी बळी देण्याचा नवस बोलला जाई. अब्दुल मुतालिबने आपल्याला दहा पुत्र झाले, तर ‘काबा’ जवळ एका पुत्राचा बळी देण्याचा नवस केला होता परंतु नंतर पुत्राच्या बदली शंभर उंट बळी दिले गेले. पुत्र झाला तर शंभर मेंढ्या बळी देण्याचा वा मुलाला मंदिरात अर्पण करण्याचा नवसही बोलला जाई.

संदर्भ : 1. Hastings, James. D. Encyclopaedia of Religion and Ethics, Vol. XII, New York, 1958.

साळुंखे, आ. ह.