आद्य शीखगुरू नानकदेव

नानकदेव : (१५ एप्रिल ? १४६९ – २२ सप्टेंबर १५३९). शीख धर्माचे प्रवर्तक व आद्य गुरू. त्यांचा जन्म लाहोर जिल्ह्यातील तळवंडी (पाकिस्तान)गावी वेदी शाखेच्या एका क्षत्रिय (खत्री) हिंदू कुटुंबात झाला. तळवंडी हे स्थान नानकदेवांमुळेच आता ‘नानकाना साहिब’ ह्या नावाने ओळखले जाते. त्यांच्या आईचे नाव त्रिपताका व वडिलांचे काळूचंद होते. नानकदेव हे एकुलते एक पुत्र असल्यामुळे लाडात वाढले. वडील काळूचंद वेदी हे सरकारी पटवारी होते. नानकदेवांचे शिक्षण घरीच झाले. लहानपणीच गणित तसेच हिंदी, अरबी, फार्सी ह्या भाषा ते शिकले. वेद व कुराणाचेही त्यांनी अध्ययन केले. बुद्धीने ते कुशाग्र होते. त्यांची वृत्ती लहानपणापासूनच सात्त्विक व धार्मिक होती. त्यांचा बहुतेक वेळ साधुसंतांच्या व फकिरांच्या सहवासात व एकान्तात बसून चिंतन करण्यात जाई. वडिलांना अर्थातच त्यांची ही वैराग्यशील वृत्ती आवडत नव्हती. नानकदेवांना गुरे चारणे, शेते राखणे इ. कामे त्यांनी दिली, तरी त्यांची वृत्ती पालटली नाही. त्यांचे मन लौकिक व्यवहारात रमावे म्हणून त्यांनी नानकदेव अठरा वर्षांचे झाल्यावर (१४८७)त्यांचा विवाह करून दिला. बटाला येथील मूलचंद खत्री यांची मुलगी सुलखनी ही नानकदेवांची पत्‍नीनानकदेवांना काळूचंदांनी आपली मुलगी आणि जावई अनुक्रमे नानकी व जयराम यांच्या ओळखीने सुलतानपूर येथील सरकारी मोदीखान्यावर (धान्यकोठी) नोकरीस लावून दिले. नानकदेवांना पुढे श्रीचंद व लक्ष्मीदास असे दोन पुत्र झाले. सुलतानपूर येथील मोदीखान्यावरील नोकरी त्यांनी व्यवस्थितपणे केली व लौकीक अर्थाने संसारही नेटका केला तथापि खऱ्या अर्थाने त्यांचे मन परमार्थाकडेच धाव घेत राहिले. ते परमेश्वरचिंतनात तल्लीन असत. दररोज सकाळी उठून ते जवळच्या ओढ्यावर स्‍नानास जात व नंतर काठावर येऊन प्रार्थना करत. एके दिवशी स्‍नानानंतर ते जवळच्या एका गुहेत जाऊन ध्यान करू लागले व त्यातच त्यांची समाधी लागली.ह्या अवस्थेत ते ओढ्यात वाहून गेले असावेत असा लोकांचा समज झाला. समाधी-अवस्थेत त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि दिव्य मार्ग दिसला.ह्यासाक्षात्कारी दिव्य मार्गानुसार उपदेश करण्यासाठी, समाजातील लोकांचे दुःख दूर करण्यासाठी ते बाहेर पडले. गुहेतून बाहेर येताच ते ‘कोणी हिंदूही नाही व कोणी मुसलमानही नाही’ असे ओरडून सांगू लागले. त्यांच्या ह्या म्हणण्याचा इत्यर्थ हा, की हिंदु-मुस्लिम हे भेद खरे नसून सर्वजण प्रथम मानव आहेत व ते सर्व त्या एकमेव परमेश्वराची लेकरे आहेत. त्यांनी पुढील पाच तत्त्वांच्या आचरणावर आपल्या धर्मात भर दिला: (१) नाम व गान : ईश्वर नामाचा उच्चार करून त्याचे गुणगान करणे. (२) दान:सर्वांना दानधर्म करणे. (३) अश्‍नान (स्‍नान) : दररोज सकाळी स्‍नान करून शुचिर्भूत होणे. (४) सेवा : परमेश्वराची व मानवाची सेवा करणे आणि (५) सिमरन (स्मरण): आत्मसाक्षात्कार होण्यासाठी व ईश्वराची कृपा होण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करणे व त्याची प्रार्थना करणे. नानकदेवांना साक्षात्कार होताच त्यांनी आपली मोदीखान्यावरील नोकरी सोडून दिली व ते सद्‍धर्मप्रचारार्थ घराबाहेर पडले.

नानकदेवांच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडित असून त्यांनी अनेक चमत्कार केल्याचेही सांगतात. साक्षात्कारानंतर १४९७ पासून सु. चोवीस वर्षे त्यांनी दूरवरच्या चार यात्रा करण्यात व्यतीत केली. ह्या यात्रांमध्ये त्यांनी विविधधर्मांच्या अधिकारी व्यक्तींशी, साधुसंतांशी, फकिरांशी, योग्यांशी, सूफींशी चर्चा, विचारविनिमय, संवाद केला. विविध चालीरीती, रूढी, श्रद्धांचा परिचय करून घेतला व दुष्ट रूढींविरुद्ध प्रचार करून त्यांच्या निर्मूलनाचेही प्रयत्‍न केले. त्यांनी केलेल्या चार प्रदीर्घ यात्रा अशा : (१) पूर्वेकडील यात्रा (१४९७ ते १५०९) : बांगलादेश व ब्रह्मदेशापर्यंत.(२) दक्षिणेकडील यात्रा (१५१० ते १५) : श्रीलंकेपर्यंत.(३) उत्तरेकडील यात्रा (१५१५ ते १७) : हिमालय व तिबेटपर्यंत (काहींच्या मते चीनपर्यंतही). (४) पश्चिमेकडील यात्रा (१५१७ ते २१) : मध्यपूर्वेतील इराक, इराण, मक्का-मदीना, बगदाद, अफगाणिस्तान इत्यादींपर्यंत.

तळवंडी येथील मर्दाना नावाचा एक मुसलमान हा नानकदेवांचा पहिला अनुयायी होय. तो नानकदेवांच्या भजनात रबाब नावाचे वाद्य वाजवून त्यांना साथ करीत असे. नानकदेवांचा आवाज मधुर होता व त्यांना संगीताचेही चांगले ज्ञान होते. स्वराचित उत्स्फूर्त भजने ते रागदारीत आपल्या मधुर आवाजात आळवीत. त्यांची ईश्वरभक्तीने ओथंबलेली भजने ऐकण्यासाठी अनेक लोक जमत.

चौथ्या यात्रेहून (पश्चिमेकडील) परतल्यावर त्यांनी रावी नदीच्या पूर्वकिनाऱ्यावर कर्तारपूर नावाचा नवीन गाव वसविला. तेथे ते स्वतः नांगर चालवून शेती करू लागले. सकाळ-संध्याकाळचा त्यांचा वेळ कीर्तन, भजन, निरूपण व धर्मोपदेश यांत व्यतीत होई. त्यांना तेथे अनेक अनुयायी लाभले.  त्यांचे उर्वरित सर्व आयुष्य तेथेच आपल्या कुटुंबियांसमवेत व अनुयायांसमवेत व्यतीत झाले.

मृत्युसमय जवळ येताच त्यांनी त्यांचा पट्टशिष्य भाई लेहणा याचे अंगद असे नामकरण करून त्याला आपला वारस नेमले. ‘अंगद’ याचा अर्थ स्वतःच्या शरीराचा भाग.१५३९ मध्ये आपली ज्योती अंगददेव यांच्या देहात ठेऊन त्यांनी देहत्याग केला. हिंदू आणि मुसलमान अनुयायांनी त्यांच्या मृत देहावरील चादर अर्धी अर्धी वाटून घेतली व आपापल्या धर्मांनुसार तिचा अंत्यसंस्कार केला. मधे एक आडवी भिंत उभारून दोन्ही समाजांनी त्यांचे कर्तारपूर येथे स्मारक उभारले.

ग्रंथसाहिब ह्या शीखधर्मग्रंथात नानकदेवांची एकूण ९४७ पदे अंतर्भूत आहेत. ग्रंथसाहिबाच्या सुरुवातीसच ‘जपजी’ म्हणजे ‘ईश्वर चिंतन’ या नावाने आलेला ३८ कडव्यांचा जो भाग आहे, तो नानकदेवांनी पंजाबीत रचला आहे. उदात्त सौंदर्य व आध्यात्मिक समृद्ध आशय यांचा उत्स्फूर्त काव्याविष्कार त्यात दिसून येतो. जपजीची संहिता ही प्रत्येक शीखव्यक्तीच्या घरी नित्यनेमाने म्हटली जाणारी प्रातःप्रार्थना झाली आहे.जपजीच्या सुरुवातीस‘मूलमंत्र’नावाचे लहानसे स्तोत्र असून त्यात ईश्वराच्या स्वरूपाचे संक्षिप्त वर्णन आलेले आहे.उर्वरित जपजीत याच मूलमंत्रातील प्रमुख विषयाचा विस्तार आहे. याशिवायसिधगोष्ट (सिद्धांशी वा योग्यांशी संवाद), अशदीवार (हा भागही दररोज सकाळी गुरुद्वारांतून म्हटला जातो), बारमाह (बारा महिन्यांचे गीत) इ. रचना नानकदेवांनी केल्या आहेत. ह्या आपल्या काव्यरचना त्यांनी संगीतातील विविध रागांत निबद्ध केलेल्या आहेत.

इस्लाममधील एकेश्वरवाद, ख्रिस्तीधर्मातील कृपेची (ग्रेस) कल्पना आणि हिंदूधर्मातील आत्म्याच्या अमरत्वाची कल्पना (ईश्वर मानवरूपात अवतार धारण करतो, ही हिंदूंची अवतार कल्पना मात्र त्यांना मान्य नाही), यांचा आपल्या शीखधर्मात समन्वय व स्वीकार केला. एक शांतीचा दूत, प्रेम व विश्वबंधुत्वाचा पुरस्कर्ता, मानवतेचा पूजक म्हणून नानकदेवांनी केलेले कार्य व प्रस्थापित केलेला धर्म महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी केवळ सदाचार संपन्न असा नवा धर्मच स्थापन केला नाही, तर उत्तर भारतात जातिव्यवस्था, अस्पृश्यता, सतीची चाल, मूर्तिपूजा, पुरोहितवर्गाने लादलेले जाचक कर्मकांड, वाईट रूढी इ. विरुद्ध सतत लढा देऊन सामाजिक क्रांतीही घडवून आणली.‘संगत’(धर्मसंघ) व ‘लंगर’(अन्नच्छत्र) ह्यांचा त्यांनी पाया घालून त्यांद्वारे जातिधर्मातील प्रत्यक्ष आचरणात्मक सामाजिक परंपरेची सुरुवात केली. आजही समता व लोकशाहीपद्धतीचा उत्तम आदर्श म्हणून ह्या दोन संस्थांचा निर्देश करता येईल.

पहा : शीख धर्म.

संदर्भ: 1. Ganda Singh, Ed. Sources of The Life and Teachings of Guru Nanak, 1969.

           2. Gurbachan Singh ‘Talib’, Guru Nanak : His personality and Vision, Delhi, 1969.

           3. Gurumukh Nihal Singh, Ed. Guru Nanak : His Life, Time and Teachings, Guru Nanak Foundation, Delhi, 1969.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)