पोप : ‘पोप हा मूळ ग्रीक शब्द असून त्याचा ‘वडील असा अर्थ आहे. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या परंपरेनुसार ‘पोप म्हणजे चर्चचा प्रीस्ट वा धर्मगुरू. रोमन कॅथलिक चर्च व अँग्लिकन चर्चमध्ये प्रीस्टला ‘फादर म्हणतात ‘पोप म्हणजे रोमचा बिशप वा जागतिक रोमन कॅथलिक चर्चचा सर्वाधिकारी. अर्थात ‘पोप व ‘फादर ह्या दोन्ही संज्ञांचा अर्थ एकच आहे.

चर्चच्या इतिहासात प्रारंभी पोप आणि बिशप या संज्ञा समानार्थी वापरत असत परंतु १०७६ साली सातव्या ग्रेगरीच्या सूचनेनुसार रोम शहरात भरवण्यात आलेल्या महत्त्वाच्या परिषदेत असे ठरवण्यात आले, की फक्त रोमच्या बिशपलाच ‘पोप ही संज्ञा देण्यात येऊन त्यास चर्चचा सर्वोच्च धर्माधिकारी मानण्यात यावे. त्या विचारसरणीनुसार पोप हा जागतिक ऐहिक चर्चचे (चर्च यूनिव्हर्सल अर्थ्‌ली) मस्तक असून पर्यायाने येशू ख्रिस्ताचा ह्या जगातील प्रतिनिधी आहे, असे मानण्यात आले. पापाचे क्षालन करणे. बायबलमधील विधांनाचा अंतिम अर्थ सांगणे, चालू समस्यांच्या बाबतीतील देवाची इच्छा मानवाला सांगणे इ. हक्क पोपला असत.

रोमन कॅथलिक चर्चची रोम ही आध्यात्मिक राजधानी असून रोममधील व्हॅटिकन टेकडीवर पोपचे निवासस्थान आहे. म्हणूनच ह्या राजधानीस व्हॅटिकन असे नाव दिले आहे.

पोपचे पद हे सर्वोच्च असून त्या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीकडेच ते आमरण राहते. कार्डिनल्सची नियुक्ती पोपच करतो. त्यांची संख्या निश्चित नाही. कार्डिनल्स आपल्यामधून नव्या पोपची निवड चिठ्ठ्या टाकून करतात. व्हॅटिकनच्या पटांगणात लाखो लोक निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. एका विशिष्ट धुराड्यातून काळा धूर निघाल्यास निवडणूक अनिर्णित वा पांढरा धूर निघाला, तर निर्णायक झाली असे समजतात. निवडून आलेला कार्डिनल पोपची वस्त्रे धारण करून एका ठराविक सज्जात येतो वा लोकांना पहिले ‘पाँटिफिकल देतो. त्यात अभिष्टचिंतन व आशीर्वचन असते.

संदर्भ : Brezzi, Paola Trans. Yannone, H. J. The Papacy : Its Origins and Historical Evolution, Westminster, 1958.

आयरन, जे. डब्ल्यू.