दीन–ए–इलाही : सम्राट अकबराने पुरस्कृत केलेला धर्मसंप्रदाय. १५८१ मध्ये प्रवर्तित केलेल्या दीन–ए–इलाहीचा (दीन–इ–इलाहीचा) संबंध सोळाव्या शतकातील सर्व अलफी पाखंडांशी होता हे उघड आहे. हजार वर्षांनंतर पैगंबरप्रणीत धर्मात सुधारणा व्हावी, असे म्हणणारे लोक मात्र निराळे होते. वरील धर्म उलेमांचा भ्रष्टाचार आणि अधःपात यांविरुद्ध उसळलेली नैसर्गिक प्रतिक्रिया होती. अकबराचा प्रमुख सहकारी अबुल फज्ल अल्लामी याचा बुद्धिनिष्ठ संशयवाद व स्वतः अकबराची सर्वधर्मसहिष्णुता व ईश्वरी निवडीवरील श्रद्धा यांमुळे तिला विशेष जोर आला. या पंथात जैनांची अहिंसा व कॅथलिक ख्रिस्त्यांचे ब्रह्मचर्य यांवर भर देण्यात आला. विषयासक्ती, लाचखोरी, कपट, निंदानालस्ती, छळणूक, धाकदपटशा आणि वृथाभिमान यांवर त्यामुळे निर्बंध घातला गेला. दुष्कृत्यांची नावड, क्रोधत्याग, सौम्यत्व, मद्यबंदी, घातक व इहवादी कृतींचा त्याग, धर्मनिष्ठा, भक्ती, शहाणपण, मार्दव आणि दया हे या धर्माचे विशेष कुराणातही आढळतात. यातील ईश्वरविषयक आतुर जीवनाचे पावित्र्य सूफीचे होय. कर्मकांडदृष्ट्या पारशी व हिंदू यांच्या सौर देवतैक्यवादाचा प्रभाव त्यात दिसून येतो. पैगंबर होऊ पहाणाऱ्या अकबराने ‘अल्लाहु अकबर’ आणि ‘जल्ल जलालुहु’ या घोषणा हे अभिवादनाचे व स्वागताचे नवे प्रकारही रूढ केले. मुळात स्वतःच्या दरबारातील व्यक्तिपूजक व निष्ठावंत अशा १९ धिकाऱ्यांपुरतेच हे ‘आध्यात्मिक मंडळ’ अकबराने स्थापले असावे. पुढे त्याचा विकास त्याने भिन्न धर्मांतून साकार केलेल्या धर्मातीत अशा संप्रदायात केला. ईश्वरप्रणीत धर्मग्रंथ व धार्मिक उपाध्यायवर्गाचा अभाव या संप्रदायाचा विशेष जाणवतो. अल्ला खां उझबेक यांना अकबराने असा निर्वाळा दिला होता, की हा संप्रदाय इस्लामवरील उत्कट भक्तीतूनच उदय पावला असून पैगंबरपदाची अभिलाषा त्याच्या मुळाशी बिलकुल नव्हती. अबुल फज्लच्या मते मात्र स्वतः मुसलमान नसल्याचा नुसता आभासच अकबर निर्माण करू पहात होता. या संप्रदायाचा मूळ साचा सूफी असला, तरी प्रकाशावरील भर मात्र सुहरवदींचा आहे. त्यांची दीक्षापद्धती चिस्ती आहे. स्वतः अकबर सूर्यसहस्त्रनामाचा पाठ करीत असे हे खरे असल्यास, तो हिंदू मूर्तिपूजेचाच प्रभाव ठरेल. भक्तीचे वा अन्य हिंदू सिद्धांत मात्र अकबराने चातुर्याने टाळलेले दिसतात. राजा बीरबलाने हा पंथ स्वीकारला पण मानसिंग व भगवान दास मात्र या संप्रदायाकडे वळले नाहीत. आधुनिक काळातील मुसलमान मात्र या संप्रदायाकडे एक पाखंद म्हणूनच सामान्यपणे पाहतात. अकबराबरोबरच नामशेष झालेला हा संप्रदाय शेख अहमद सिरहिंदीच्या नक्षबंदिया सूफी मताला व शेख अब्द अल्‌–हक्क दिहलवीच्या हदीसवरील नवीन धर्तींच्या भाष्यांना प्रेरक ठरला यात वाद नाही.

संदर्भ : Roychoudhury. Makhanlal, The Din-I-Ilahi, Calcutta, 1941

करंदीकर, म. अ.