इमाम : अनुकरणीय आचरण असलेला आदर्श नेता हा मुसलमानांचा ‘इमाम’ (प्रमुख) नेमला जातो. तो मुहंमदाचा साहाय्यक या नात्याने राज्यशासन व धर्मसंरक्षण करतो. इमामचे अधिकार हेच इस्लाममधील सर्व वादांचे मूळ ठरले. सुन्नी हे इमामाला परंपरेच्या आधारे लोकनियुक्त आदर्श नेता मानतात, तर शिया त्याला ईश्वरनियुक्त व ईश्वरी ज्ञान लाभलेला आणि म्हणूनच पापमुक्त मानतात. खारिजी या धर्मपंथाच्या मते तो केवळ सोयीसाठीच समाजानुमते नेमलेला असतो. मोतझीलांचा (मुताझिला) आग्रह इमामची नियुक्ती विवेकाधिष्ठित असावी असा असतो. साम्राज्याच्या वाढीबरोबर मुख्य इमाम, प्रार्थना चालविण्यासाठी  ‘खतीब’ व कुराण  पठनासाठी  ‘रतीब’ असे दुय्यम इमाम नेमू लागला. तुर्कस्तानात हे काम शासकीय मंत्र्यांकडे असे. सुंता, विवाह, दफन इत्यादींचे दायित्व त्यांच्याकडे असे. काही इमाम धर्मनिर्णयाचेही काम पहात. इराणमध्ये मात्र इमामांचा शासनाशी संबंध नाही. स्थानिक मशिदींसाठी राजप्रतिनिधीची आवश्यकता नसल्याने, तेथील इमाम स्थानिक जमातच निवडते. अबू हनिफासारख्या धर्मवेत्त्यांना केवळ सन्मानाने इमाम म्हणतात.

करंदीकर, म. अ.