डीमीटर : ग्रीक देवतासमूहातील एक स्त्रीदेवता. कृषिअवस्थेनंतरच्या स्थिर, सुसंस्कृत व शांततामय मानवी जीवनातील डीमीटर ही एक कृषिदेवता असून ती क्रोनस व रीया यांची मुलगी तसेच झ्यूस, पोसायडन, हेडीझ, हीरा व हेस्टिआ यांची बहीण. अन्नधान्याची ती जननी. तिनदा नांगरलेल्या क्रीटच्या सुपीक जमिनीत ती आयाझिऑनसोबत झोपते आयाझिऑनपासून तिला प्लूटस (संपत्तीचा देव) झाला. तिचा भाऊ व पती झ्यूस ह्या देवापासून तिला पर्सेफोनी ही सुंदर कन्या आणि दुसऱ्या एका भावापासून आरायऑनचा पोसायडन हा पुत्र झाला.

डीमीटरचे प्राचीन पक्वमृदाशिल्प, रोम.

डीमीटर व पर्सेफोनी या मायलेकींचे संबंध इतके अतूट होते, की एकीचा उल्लेख दुसरीशिवाय होत नव्हता. पर्सेफोनीला पाताळदेवता हेडीझ याने पळवून नेले. डीमीटरने तिचा नऊ दिवस पृथ्वीवर अविरत शोध केला पण ती सापडली नाही. खरा प्रकार कळल्यावर डीमीटर झ्यूसवर फार रागावली आणि ऑलिंपस (स्वर्ग) सोडून ती पृथ्वीवर राहू लागली. एका म्हातारीचे रूप घेऊन ती ॲटिकातील इल्यूसिस येथे आली. तेथील राजाचा मुलगा ट्रिप्टॉलीमस (या नावाचा अर्थ तीनदा नांगरलेली जमीन) यास तिने कृषिविद्या व तदानुषंगिक इतर कला शिकविल्या. ट्रिप्टॉलीमसला तिने पेरण्यासाठी गव्हाचे बी तसेच ड्रॅगन वा सापांनी ओढला जाणारा रथ दिला. ह्या रथात बसून कायदा, शिस्त, संस्कृती, कृषिविद्या व एका जागी स्थिर व शांत जीवन जगून विवाह करण्याचे वरदान त्याने मानवजातीला दिले.

पर्सेफोनी परत येत नाही म्हणून डीमीटरने दुष्काळ पाडण्याचे ठरविले. आता पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडणार म्हणून झ्यूसला आपली चूक उमगली आणि त्याने आपला दूत हर्मीझ यास पाताळात पर्सेफोनीला परत आणण्यासाठी पाठविले. पर्सेफोनीने आठ महिने आपल्या आईकडे व चार महिने पाताळात हेडीझकडे रहावे, या अटीवर ती परत आली. त्यामुळे डीमीटरने पृथ्वी परत सुफला केली. डीमीटरच्या ह्या पौराणिक कथेत तिची कन्या पर्सेफोनी ही केंद्रस्थानी आहे.

धान्याची देवता म्हणून मुख्यत्वे डीमीटरच्या कथा व निर्देश आहेत. धान्य विपुल पिकावे म्हणून तिचा उपासनासंप्रदाय मुळात सुरू झाला असावा, असे अभ्यासक मानतात. अश्वमुखी ‘ब्लॅक डीमीटर’ असेही तिचे एक रूप असून त्याबाबत अभ्यासक विविध भाष्ये करतात. डीमीटर ही आरोग्य, जन्म व विवाहाचीही देवता मानली जाई. तिचे विविध उत्सव ग्रीसमध्ये साजरे होत. ‘हलोआ’ नावाचा तिचा उत्सव इल्यूसिस येथे डिसेंबरमध्ये होई. त्यात पहिली फळे तिला अर्पण केली जात व स्त्रीपुरोहिताकडून तिला बलीही अर्पण केला जाई. पुरुषांना या उत्सवात मज्जाव असे. स्त्रियांना स्त्रीपुरोहिताकडून तेथे दीक्षाही दिली जाई. उत्सवात अश्लील हावभाव तसेच लिंगसूचक गोष्टींचा सर्रास वापर होई. ‘क्लोइआ’ नवाचा उत्सव, पिके उगवण्याच्या वेळी तिला संतुष्ट करण्यासाठी साजरा होई. ‘प्रोइरोसिआ’ हा उत्सव सुगीच्या वेळी विपुल धान्य मिळावे म्हणून होई आणि त्यात तिची प्राथनागीते म्हटली जात. यांतील सर्वांत महत्त्वाचा विधी म्हणजे तीन वेळा करण्यात येणारी भूमीची नांगरटी. ‘थॅल्यूसिआ ’ हा उत्सव कास बेटावर सुगी संपल्यावर शरद ऋतूत साजरा होई. ‘थॅस्मोफोरिआ’ हा सर्वस्वी स्त्रियांनी करावयाचा उत्सव बियाण्याची उत्पादनक्षमता वाढावी म्हणून करण्यात येई.

डीमीटर ही मुख्यत्वे कृषिदेवता व वनस्पतीची देवता असल्यामुळे तिच्याजवळ एक परडी (कॅलथॉस) असून तीत सर्व प्रकारची फुले, फळे व पक्व धान्याचे घोस असत. प्राण्यांत तिला डुक्कर विशेष प्रिय. गायीचा व डुक्कराचा तिला बली दिला जाई. सर्प, नार्सिसिसचे फूल, मिर्ट्‌ल (पांढऱ्या सुगंधित फुलांचे झाड), भुईकमळ तिला प्रिय आहेत.

ग्रीक कलेत ती हेरासारखी दिसत असली, तरी हेराहून ती अधिक पोक्त व सौम्य वाटते. तिचा बांधा रुंद व परिपूर्ण असून ती कधी अश्व वा ड्रॅगन्स जोडलेल्या रथावर आरूढ तर कधी चालत असलेली तर कधी सिंहासनाधिष्ठित एकटी वा मुलीसमवेत बसलेली आढळते. ब्रिटिश म्यूझीयममधील ‘नाइडसची डीमीटर’ म्हणून प्रख्यात असलेला तिचा पुतळा इ. स. पू. चौथ्या शतकातील एक अभिजात कृती मानला जातो. कन्येची प्रतीक्षा करणारी विरहव्याकुळ डीमीटर त्यात कलात्मकपणे साकार झालेली आहे.

संदर्भ : Kereny, C. The Gods of the Greeks, New York, 1960.

सुर्वे, भा. ग.