नचिकेतस् : गौतम (गोतम) कुळातील उद्दालक ऋषीचा पुत्र. नचिकेताची मूळ कथा तैत्तिरीय ब्राह्मणात आहे. तेथे दक्षिणेचे माहात्म्य सांगितले असून नाचिकेत चयनाची माहिती सांगितली आहे. कठोपनिषदात नचिकेताची कथा आढळते ती अशी : उद्दालकाने यज्ञामध्ये केलेले निरुपयोगी गाईचे दान सहन न होऊन नचिकेताने ‘मला कोणाला देणार?’ असे आग्रहाने पित्याला विचारले. ‘तुला मृत्यूला (यमाला) देतो’, असे रागाने पित्याने उत्तर दिले. तेव्हा तो यमाकडे गेला. यम घरात नसल्याने तो यमाच्या दारात तीन दिवस उपाशी बसून राहिला. यम परत आल्यावर संतुष्ट होऊन त्याने नचिकेतास तीन वर दिले. नचिकेताने तीन वरांच्या बदल्यात पुढील गोष्टी मागितल्या : (१) मी याच शरीराने शांत झालेल्या पित्याकडे पुन्हा जावे. (२) स्वर्गसाधन असलेली अग्‍निविद्या मिळावी. (३) मृत्यूनंतर आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान व्हावे. यमाने ह्या गोष्टी त्याला दिल्या.

महाभारतात गोदानमाहात्म्यपर वेगळ्या प्रकाचे नाचिकेताख्यान आहे (अनुशासन पर्व १०६·२). उद्दालकाने रागाने ‘मर’ असे म्हणताच नचिकेत मरून पडला. पिता शोक करून लागला. एक दिवसानंतर नचिकेत पुन्हा जिवंत झाला. त्याने यमाच्या दरबारातील हकीकत पित्याला सांगितली व गोदानाचे माहात्म्यही सांगितले. नाचिकेताख्यान वराहपुराणातही (१७०–७६) आढळते.

केळकर, गोविंदशास्त्री