अकाली : एक शीख धर्म. ‘अकाल’ म्हणजे ज्याच्यावर कालाची सत्ता चालत नाही असा, म्हणजे परमेश्वर. ह्या परमेश्वराची उपासना करणारे ते ‘अकाली’ होत. धार्मिक दृष्ट्या हा पंथ कर्मठ असून राजकीय दृष्ट्या तो जहालमतवादी आहे. आपणास गुरू ⇨गोविंदसिंग (१६६६-१७०८) यांच्यापासून पंथ स्थापण्याची प्रत्यक्ष स्फूर्ती मिळाल्याचे अकाली सांगतात. तसेच ते स्वत:स खालसा पंथाचे वारसदार म्हणवितात. औरंगजेबाच्या अत्याचारांच्या प्रतिकारार्थ अकालींनी संघटित होऊन आपल्या दलाची उभारणी केली प्रतिकारासोबतच त्यांनी शीख धर्माचा प्रचारही केला. रणजितसिंहांच्या काळातही अकाली दलाने फुलासिंगांच्या नेतृत्वाखाली आपले शौर्य व प्रभाव दाखविला, ‘अकाल सत् श्री अकाल’ ही त्यांची रणगर्जना होती.

अकाली दल १९२० मध्ये धर्मसुधारणेसाठीपुन्हा संघटित झाले. दुराचारी महंतांनी पवित्र गुरूद्वारांत फार गैरव्यवस्था माजविली होती. अकालींनी ह्या महंतांची हकालपट्टी केली व गुरूद्वारांचे पावित्र्य टिकविले. या कामी त्यांना महात्मा गांधींची फार मदत झाली. यानंतर लवकरच अकाली दलाचे रूपांतर ⇨ मास्तर तारासिंगाच्या नेतृत्वाखाली एका राजकीय पक्षात झाले. सुरूवातीस ह्या पक्षाने मुख्यत्वे महात्मा गांधीच्या असहकारितेच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. अगदी अलीकडे अकाली दलाने भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार स्वतंत्र पंजाबी सुभ्याची म्हणजे पंजाबराज्याची हिरिरीने मागणी केली व त्यासाठी आंदोलन करून हे उद्दिष्ट प्राप्त करून घेतले (१ नोव्हेंबर १९६६). यानंतर संत फत्तेसिंगाच्या (१९११-१९७२) नेतृत्वाखाली अकालींनी चंडीगड हे राजधानीचे ठिकाण पंजाबला मिळावे म्हणून उपोषणादी प्रकारे उग्र आंदोलने करून आपली मागणी मान्य करून घेतली (२९ जानेवारी १९७०).

पहा : शीख धर्म शिखांचे धर्मपंथ.

आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं) सुर्वे, भा. ग. (म.)