त्रिभुवन : हिंदू पुराणातील एक कल्पना. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीन लोकांना त्रिभुवन म्हणतात. स्वर्गलोक मृत्युलोकाच्या वर असून पाताळलोक खाली आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये मृत्युलोक आहे. स्वर्गामध्ये देव राहतात. तेथे चित्रविचित्र पल्लवांनी व पुष्पांनी नटलेले वृक्ष, सुंदर उपवने, कमलांनी सुशोभित सरोवरे आणि ज्यांच्यामधून दांपत्यांच्या सुरतक्रीडा चालतात असे लताकुंज असतात. लोक चिरतरुण, भूक–तहान विरहित, दयाळू, यजनशील आणि नित्यतृप्त असतात. थोडक्यात स्वर्ग ही फलभूमी आहे. स्वर्गातील फल भोगून झाले, म्हणजे पुण्य नष्ट झाले, की सर्व सुखोपभोग सोडून मृत्युलोकात यावे लागते. पाताळामध्ये दैत्य, दानव, नाग आणि सर्प यांचे वास्तव्य आहे. बळी राजा पाताळातच राज्य करतो. येथे स्वर्गातील सर्व सुखे भोगावयास मिळतात. मयासुराने निर्माण केलेली सर्वसंपन्न नगरे पाताळातच आहेत. पाताळाला अधोलोक, अधोभुवन, रसातल, नागलोक, अक्रुरभवन इ. नावे आहेत. पाताळांची संख्या सात असून त्यांची नावे अतल, नितल, वितल, गभस्तिमान, तल, सुतल व पाताळ अशी आहेत. पद्‌मपुराणात ही नावे थोडी वेगळी आहेत. ह्या एकाखाली एक असलेल्या सात पाताळांत मयासुर, हाटकेश्वर शिव, बळी राजा, दानवेंद्र मय, काद्रवेयनामक सर्पगण, कद्रुपुत्र, नागलोक, यांचा वास असल्याचे म्हटले आहे. पाताळकल्पना जगात सर्वत्र आढळते. पाताळ अंधकारमय असल्याची कल्पना ईजिप्शियन, बॅबिलोनियन, हिब्रू, ग्रीक, रोमनादी लोकांत दिसते.

मृत्युलोक ही कर्मभूमी आहे. ‘करावे तसे भरावे’ ही उक्ती येथे सार्थ होते. स्वर्ग आणि पाताळ यांच्या विरूद्ध मृत्युलोकाची अवस्था आहे.

पाताळाऐवजी नरक हा त्रिलोकातील एक लोक म्हणूनही मानल्याचे दिसते. पाताळाशिवाय सात लोकांची कल्पनाही आढळते. हे सात लोक असे : (१) भूर्लोक–पृथ्वी, (२) भुवर्लोक–पृथ्वी व सूर्य यांच्या मधील अंतराळ, (३) स्वर्लोक–इद्रांचा स्वर्ग म्हणजे सूर्य व ध्रुवतारा यांच्या मधील भाग, (४) महर्लोक–भृगू इ. महर्षी व ब्रह्मा यांचे निवासस्थान, (५) जनलोक–ब्रह्‌म्याचे पुत्र व सनत्कुमार यांचे निवासस्थान, (६) तपोलोक–बैरागीनामक देवतांचे निवासस्थान व (७) सत्य लोक वा ब्रह्मलोक–ब्रह्‌म्याचे निवासस्थान. हा शेवटचा लोक प्राप्त झाला, की मनुष्य जननमरण फेऱ्यांतून मुक्त होतो. ह्या सप्तलोकांची वेगळी नावेही आढळतात. सांख्य व वेदान्त दर्शनांत आठ लोकांची कल्पना आहे. ब्रह्म, पितृ, सोम, इंद्र, गंधर्व, राक्षस, यक्ष व पिशाचलोक अशी त्यांची नावे होत.

सप्तलोकांतील पहिले तीन लोक प्रत्येक कल्पांतसमयी नष्ट होतात व शेवटचे तीन लोक ब्रह्‌म्याच्या आयुष्याच्या अंती नष्ट होतात. तोपर्यंत महर्लोक जरी शाश्वत राहत असला, तरी पहिले तीन लोक जळत असतात. त्यांच्या उष्णतेमुळे महर्लोकात निवास करता येत नाही.

जोशी, रंगनाथशास्री