नायन्मार : दक्षिण भारतातील त्रेसष्ट तमिळ शैव संतांना ही संज्ञा लावली जाते. तमिळ भाषेत ‘नायन्मार’ म्हणजे ‘धनी’ वा ‘देव’. समाजाच्या विविध स्तरांतून आलेले हे त्रेसष्ट शैव सिद्ध व संत होते आणि त्यांच्याविषयी दक्षिण भारतातील शैवांना आजही कमालीचा आदर वाटतो. तमिळ साहित्याच्या तिसऱ्या संघमपासून इ. स. अकरावे शतक ह्या दरम्यानच्या काळात हे नायन्मार होऊन गेले. त्यांच्यातील बहुतेकजण कवी होते व त्यांनी शिवभक्तिपर विपुल काव्यरचनाही केली आहे.

माणिक्कवाचगर व अप्पर (तिरुनावुक्करसर) : कुट्टालम् (जि. तंजावर) येथील चोलीश्वरम् मंदिरातील चोलकालीन (दहावे शतक) ब्रॉंझमूर्ती.

शेक्किळार नावाच्या एका शैव संताने बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात पेरियपुराणम् (महापुराण) नावाचा एक काव्यग्रंथ लिहिला असून त्यात ह्या त्रेसष्ट नायन्मारांची चरित्रे त्याने विस्तारपूर्वक वर्णिली आहेत. पेरियपुराणम् हा तमिळ शैवांचा पवित्र ग्रंथ त्याला त्यांच्या जीवनात आदराचे स्थान आहे. शेक्किळार हा चोलराजा अनबय याचा मंत्री होता. तमिळ काव्याचाही हा ग्रंथ उत्कृष्ट नमुना मानला जातो. या ग्रंथात आलेली त्रेसष्ट नायन्मारांची नावे व इतर ग्रंथांत आलेली नायन्मारांची नावे यांत थोडाफार फरक आढळतो. 

ह्या नायन्मारांत चोल, चेर व पांड्य घराण्यांतील काही राजे, माणिक्कवाचगर व शेक्किळारसारखे राजनीतीज्ञ, अप्पुरी अडिगळसारखे विद्वान ब्राह्मण, तिरुनावुक्करसर (अप्पर) सारखे शेतकरी, ⇨ कारैक्काल अम्मैयार (सु. सहावे शतक) सारखी स्त्री तसेच शिकारी, कोळी, कुंभार, व्यापारी इ. लोकांचा समावेश होता. या सर्वांनीच शैव मताचा प्रभावी पुरस्कार केला व शैव मताच्या सिद्धांतांनुसार आदर्श जीवन व्यतीत करून मुक्ती प्राप्त करून घेतली. नायन्मारांच्या जीवनाशी अनेक आख्यायिका निगडित झालेल्या आहेत. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचेही सांगितले जाते. द. भारतात पाचव्या शतकापर्यंत बौद्ध आणि जैन धर्मांचा विशेष प्रभाव होता. पाचव्या शतकानंतर नायन्मारांनी व ⇨ आळवार नावाने ओळखल्या जाणाऱ्या बारा वैष्णव संतांनी आपापल्या शैव आणि वैष्णव संप्रदायांची शास्त्रशुद्ध पायावर सैद्धांतिक मांडणी करून आपापल्या मतांचा प्रभावी प्रचार-प्रसार केला. नायन्मार व आळवार संतांची ही प्रभावी परंपरा कित्येक शतके अखंडपणे आपले कार्य द. भारतात करीत असल्याचे दिसते. त्यांनी अनेक सभांतून, धार्मिक स्वरूपाच्या वादविवादांतून आणि चर्चांतून आपापल्या मतांचे प्रभावी प्रतिपादन करून बौद्ध व जैन धर्मांची पकड सैल केली व आपल्या मतांची छाप जनमानसावर पाडली. नायन्मारांचे व आळवारांचे हे कार्य निःसंशयपणे ऐतिहासिक महत्त्वाचे म्हणावे लागेल. तिरुनावुक्करसर या नायन्माराच्या प्रभावाने जैन धर्माचा अनुयायी असलेल्या पल्लव राजाने आपला धर्म सोडून देऊन शैव मताचा अंगीकार केला. हा पल्लव राजा म्हणजे पहिला महेंद्रवर्मन् असावा, असे अभ्यासक मानतात. तिरुज्ञानसंबंधर या नायन्माराच्या प्रभावाने मदुरेच्या पांड्य राजानेही जैन धर्माचा त्याग करून शैव मताचा अंगीकार केला. सुंदरर हा नायन्मार चेर राजा चेरमाण पेरुमाळ याचा मित्र होता.

दक्षिणेतील शैव संप्रदाय हा वैदिक संप्रदायापासून वेगळा आहे. संस्कृत ग्रंथांतून या संप्रदायास ‘पाशुपत’ अशी संज्ञा दिली जाते. या पाशुपत मतानुसार पशू, पती व पाश (बंधन) हे तीन नित्य पदार्थ आहेत. मुक्तीचे चार मार्ग किंवा सोपान आहेत : (१) चर्यामार्ग किंवा दासमार्ग, (२) क्रियामार्ग किंवा गुणमार्ग, (३) योगमार्ग किंवा सखामार्ग व (४) ज्ञानमार्ग किंवा सन्मार्ग. ‘ॐ नमः शिवाय’ या षड्क्षरी किंवा ‘नमः शिवाय’ या पंचाक्षरी शिवमंत्राचा जप तसेच विभूती व रुद्राक्ष यांचे धारण हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे, असे या संप्रदायात मानले जाते.

शैव मतातील उदात्त सिद्धांत असे आहेत : सर्वांवर प्रेम, समाजसेवेसाठी जीवन अर्पण करण्याची सिद्धता, स्त्रीस्वातंत्र्य, अहिंसा, व्यक्तिविकासासाठी सर्वांस अवसर, पूजास्वातंत्र्य, समाजसुधारणा, शौर्य, निर्भयता इत्यादी.

त्रेसष्ट नायन्मारांतील चार नायन्मार शैव मताचे श्रेष्ठ अध्वर्यू मानले जातात. हे चौघेजण शैव ‘समयाचार्य’ म्हणून प्रख्यात आहेत. आपल्या शिव ह्या उपास्यदेवतेविषयीची अपार व अढळ श्रद्धा तसेच भक्ती व प्रेम यांचा अखंड स्रोत त्यांच्या काव्यरचनेतून वाहताना दिसतो. त्यांच्या भक्तीत विविध छटांचे मनोज्ञ आविष्कार व भावनेची खोलीही आढळते. तिरुनावुक्करसर वा अप्पर (सातवे शतक), तिरुज्ञानसंबंधर (सातवे शतक), ⇨ माणिक्कवाचगर (सातवे शतक) व सुंदरर वा सुंदरमूर्ती (आठवे शतक) अशी या चार अध्वर्यूंची नावे असून त्यांनी शिवभक्तिपर विपुल काव्यरचना केली आहे. ह्या चार समयाचार्यांनी अनुक्रमे दासमार्ग, सत्पुत्रमार्ग वा गुणमार्ग, सन्मार्ग व सखामार्ग ह्या चार भक्तिमार्गांचे आदर्श निर्माण केले.

१.तिरुज्ञानसंबंधर : चोलकालीन ब्राँझमूर्ती, श्रीलंका. २. सुंदरर : कुट्टालम् (जि. तंजावर) येथील चोलीश्वरम् मंदिरातील चोलकालीन (दहावे शतक) ब्राँझमूर्ती.

शैव धर्मग्रंथांचे शास्त्र, चरित्र व स्तोत्र असे तीन विभाग पडतात. शास्त्रे १४, चरित्रे वा पुराणे १८ आणि स्तोत्रे वा भजन-संकलने १२ असून ह्या स्तोत्रग्रंथांनाच ‘तिरुमुरै’ म्हणतात. नायन्मारांची भक्तिपर सर्व काव्यरचना वा स्तोत्रे नंबी-आंडार-नंबी (सु. दहावे – अकरावे शतक) नावाच्या एका शिवभक्ताने संकलित करून ती अकरा तिरुमुरैंमध्ये म्हणजे पवित्र ग्रंथांत संगृहीत केली. नंबी-आंडार-नंबी हा राजराज चोल (९८५ – १०१८) याचा समकालीन होता. ही सर्व रचना नंबी आणि राजराज चोल यांनी कर्नाटक संगीतात बद्ध करून ती प्रमुख शैव मंदिरांतून गाण्याची व्यवस्था केली. आजही ही रचना तमिळनाडूत त्याच पद्धतीने ह्या मंदिरांतून मोठ्या श्रद्धेने गायिली जाते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात पेरियपुराणम् नावाचे शेक्किळारचे पुराण बारावे तिरुमुरै म्हणून या तिरुमुरैंमध्ये अंतर्भूत होऊन त्यांची संख्या बारा तिरुमुरै निश्चित झाली. ह्या बारा तिरुमुरैंतील पहिल्या सात तिरुमुरैंना मिळून ⇨ तेवारम् असे नाव आहे. तेवारम्‌मध्ये तिरुनावुक्करसर, तिरुज्ञानसंबंधर व सुंदरर यांची रचना संगृहीत आहे. आठवे तिरुमुरै तिरुवाचगम् नावाने ओळखले जाते आणि त्यात माणिक्कवाचगर ह्या एकाच नायन्माराची रचना आहे. नववे तिरुमुरै तिरुइशैप्प हे असून त्यात अनेक नायन्मारांची संकीर्ण रचना आहे. तिरुमंत्रम् हे दहावे तिरुमुरै असून त्यात ⇨ तिरुमूलर (सु. सहावे – सातवे शतक) ह्या नायन्माराची रचना आहे. अकराव्या तिरुमुरैत नक्कीररपासून नंबी – आंडार – नंबीपर्यंतच्या शैव संतांची संकीर्ण रचना अंतर्भूत आहे. शेवटचे बारावे तिरुमुरै म्हणजे ⇨ शेक्किळारचे पेरियपुराणम् हे होय.

 

तमिळनाडूतील काही शैव मंदिरांतून प्रदक्षिणामार्गांवर ह्या नायन्मारांच्या मूर्ती विराजमान झालेल्या असून त्यांची तेथे आजही उपासना केली जाते. ह्या त्रेसष्ट नायन्मारांची पदे २७४ शैव मंदिरांतून आजही मोठ्या श्रद्धेने व पारंपरिक चालींवर आळविली जातात. नायन्मारांच्या पादस्पर्शाने ही मंदिरे पुनीत झाल्याचे शैवानुयायी मानतात. तेलुगू भाषेतही ह्या नायन्मारांची चरित्रे शिवभक्तचरित्रमु नावाने आलेली आहेत.

संदर्भ : 1. Bhandarkar, R.G. Vaisnavism, Saivism and Minor Religious Systems,  Banaras, 1965.

           2. Gopinath Rao, T. A. Elements of Hindu Iconography, Vol. II, Par II, Delhi, 1968.

सुर्वे, भा. ग. जोशी, पु. दि.