रमण महर्षि : (३० डिसेंबर १८७९ – १४ एप्रिल १९५०). एक आधुनिक द. भारतीय संत. त्यांनी कोणताही नवा पंथ प्रवर्तित केला नाही कोणताही विशिष्ट आचार सांगितला नाही वा कोणत्याही ग्रंथाचे पारायण करावयास सांगितले नाही. मनाच्या बेड्या तोडल्याशिवाय मानवाचा विकास होणार नाही, असा त्यांचा उपदेश होता.

रमण महर्षीतामिळनाडू राज्यातील तिरुच्युळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव वेंकटरामन असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदर अय्यर असे होते आणि आईचे अळगम्माळ असे होते. ते बुद्धिमान होते आणि त्यांची प्रकृतीही उत्तम होती. फुटबॉल, कुस्ती, पोहणे इत्यादींमध्ये ते प्रवीण होते. ते बारा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारले. त्यानंतर ते मदुराईला चुलत्यांकडे आले. तेथे मीनाक्षी मंदिरात ते एकाग्रतेने प्रार्थना करीत. प्राणायामामुळे चित्त एकाग्र करण्याची कला त्यांना प्राप्त झाली होती. ते संतांची चरित्रे वाचत. पेरियपुराणाम्‌ या शैव संतांच्या चरित्राचा त्यांच्या मनावर खूपच परिणाम झाला होता.

एके दिवशी त्यांच्या मनात मृत्यूची भीती निर्माण झाली. परंतु आत्म्याचे अमरत्व ध्यानात आल्यावर ती नष्ट झाली. यानंतर काही काळ अस्वस्थतेत घालविल्यानंतर १ सप्टेंबर १८९६ रोजी ते अरुणाचल म्हणजेच तिरुवन्नामलई येथे जाऊन पोहोचले. येथे त्यांनी गत जीवनाची सर्व चिन्हे टाकून दिली मुंडन केले, जानवे तोडून टाकले, लंगोटी लावली आणि मौन धारण केले. एकदा तेथे गेल्यानंतर ते आयुष्यभर तेथेच राहिले.

अरुणाचलावर ध्यानासाठी त्यांनी अनेक स्थाने निवडली. पाताळगुहेत डास, मुंग्या इत्यादींच्या त्रासात साधना केली. मुलांचा व साधुवेषातील भोंदूंचाही त्रास सहन केला. परंतु पळणीस्वामी, मौनी साधू, शेषाद्रिस्वामी इत्यादींनी त्यांची सेवा केली. ११ वर्षे मौन पाळल्यानंतर ते मोजके बोलू लागले. हळूहळू तेथे आश्रम तयार झाला. त्यांची आईही १९१६ साली आश्रमात येऊन राहिली. धाकटा भाऊही संन्यास घेऊन तेथे आला.

त्यांच्या भक्त्तांनी अरुणाचलाच्या पायथ्याला मठ, भोजनशाळा, स्वयंपाकगृह, गोशाळा, पुष्पवाटिका इ. इमारती बांधल्या. त्यांच्या चर्चांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन व विक्री विभाग काढण्यात आला. आश्रमाचे कार्यालय तयार झाले. पाहुण्यांची ये-जा सुरू झाल्यामुळे अतिथिगृह बांधले गेले. पोस्ट, दवाखाना, गुरांचा निवारा इ. सोयी झाल्या. आश्रमात शिस्त व स्वच्छता होती. आश्रमाची दैनंदिनी ठरलेली असे. रमण महर्षी भाजी चिरणे, पत्रावळ्या लावणे इ. कामांतही मदत करीत असत.

जगातील विविध ठिकाणांहून त्यांच्या भेटीसाठी जिज्ञासू येत असत. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा चालत. रमण महर्षी तमिळमधून बोलत आणि दुभाषा त्यांच्या बोलण्याचे भाषांतर करी. एफ्‌. एच्‌. हम्फ्री हे त्यांचे पहिले पाश्चात्त्य भक्त्त होत. पॉल ब्रंट्न या इंग्रजाने लिहिलेल्या पुस्तकामुळे पाश्चात्त्य जगाला रमण महर्षींचा विशेष परिचय झाला.

स्वतः रमण महर्षींनी क्वचितच लेखन केले. त्यांनी शास्त्रांचे अध्ययनही फारसे केले नाही. स्वानुभवातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा त्यांनी उपदेश केला आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या विचारांना ग्रंथरूप दिले. त्यांचे श्रीसद्‌दर्शन, रमणगीता, उपदेशसार आणि रमणोपनिषद इ. ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या उपदेशातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगितला असून तो स्थूलमानाने अद्वैत वेदान्ताला अनुसरणारा आहे. तथापि त्यांच्या शिष्यवर्गात अद्वैत, द्वैत, विशिष्टाद्वैत इ. विविध मार्ग अनुसरणाऱ्या व्यक्त्तींचा अंतर्भाव होता. शिष्यांनी त्यांना ‘भगवान’, ‘महर्षी’ इ. उपाधी लावल्या होत्या, तसेच ते स्कंदाचे अवतार असल्याचेही मानले होते.

संदर्भ : 1.Mahadevan, T. M. P. Raman Maharashi and His Philosophy of Existence, Madras, 1960.

2. Osborn, A. Ed., The Collected Works of Raman Maharshi, Tiruvannamalai, 1968.

३. थत्ते, यदुनाथ, आधुनिक भारत महर्षी, पुणे, १९६५.

४. भिडे, रा. गो. भगवान रमण महर्षी, १९५३.

साळुंखे, आ. ह.