बौद्ध धर्मप्रसारक त्सोङ्‌--खा-पा (चौदावे शतक) ह्याचे अठराव्या शतकातील टंकचित्र.लामा धर्म : लामा किंवा श्रेष्ठ जेथे राहतात, तेथला धर्म म्हणजे लामा धर्म. त्या दृष्टीने लामा धर्म हा तिबेटचा धर्म आहे. बौद्ध धर्माचा प्रवेश तिबेटात होण्यापूर्वी तेथे फ्युन् (बॉन) हा धर्म लोकांत प्रचलित होता. मंत्रतंत्र, जादूटोणा ह्यांवर ह्या धर्माची भिस्त होती. इ. स. चे आठवे शतक ते चौदावे शतक ह्या कालखंडात पद्मसंभव (इ. स.चे आठवे शतक), ⇨ अतीश दीपंकर (९८२–१०५४) आणि त्सोङ्-खा-पा (चौदावे शतक) ह्यांसारखे बौद्ध धर्मप्रचारक तिबेटात गेले होते. त्यांपैकी पद्मसंभवाच्या आगमनामुळे तिबेटमध्ये तांत्रिक बौद्ध धर्माचीच भरभराट झाली. पुढे अकराव्या शतकात विक्रमशील विद्यापीठातून तिबेटमध्ये गेलेल्या अतीश दीपंकराने तेथे धर्मसुधारणेचे नवे युग सुरू केले. त्सोङ्-खा-पा ह्याने अनेक मूलगामी सुधारणा घडवून आणून कठोर नैतिक आचरांवर विशेष जोर दिला. गुंतागुंतीचे तांत्रिक विधी त्याने नाकारले आणि ब्रह्मचर्यपालनावर भर दिला. जादूटोणा आणि मंत्रतंत्र ह्यांच्यावर भर देणारे जे होते, त्यांना त्यांच्या लाल रंगाच्या टोप्यांवरून ‘लाल टोपीवाले’ (म. अर्थ) ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. भूत पिशाच, डाकिणी ह्यांना खूष ठेवून सुरक्षितता संपादन करण्यावर ह्या लाल टोपीवाल्यांची भिस्त. भारतात तांत्रिक काळात उत्पन्न झालेल्या नवीन कल्पनांप्रमाणे उपलब्ध झालेले अनेक प्रकारचे ध्यानी बुद्ध, त्यांच्याबरोबर येणाऱ्या त्यांच्या स्त्री-शक्ती व त्यांचे बोधिसत्त्व त्याचप्रमाणे हेरूक, कालचक्र, वज्रभैरव, हयग्रीव, यम, महाकाल, यमान्तक, संवर, हेवज्र, संभल, कुरूकुल्ला ह्या देवता स्वीकारून पुन्हा काही पूर्णपणे स्थानिक अशा देवतांचा स्वीकारही करण्यात आला. मंत्रतंत्र, धारणी, मुद्रा-मंडले, होम ह्यांचे प्रस्त वाढले. मांत्रिक सिद्धी कशी प्राप्त करता येईल, ह्याच विचाराला महत्त्व मिळाले. त्यामुळे ‘ॐ मणिपद्मेहुं ’ सारख्या मंत्रांचा उच्चार व लेखन सार्वत्रिक दिसते. ही मंत्राक्षरे लिहिलेली पंचपात्रीवजा चक्रे जागोजाग स्थापन करण्यात येऊन ती फिरवीत राहण्याने पुण्य संपादन करता येते, अशी भावना बहुजनसमाजात रूढ झाली. बौद्धांच्या वस्तीतून प्रार्थनेच्या पताका उभारल्या जाऊन त्यांवर घोडा, वाघ, सिंह, गरुड, नाग ह्यांच्या आकृत्या दिसू लागल्या. ‘बौद्ध धर्माचा उत्कर्ष होवो अशा आशयांचे शब्दही ह्या पताकांवर असत. अशा तऱ्हेच्या पताका उभारणे हे पुण्यकृत्य समजले गेले. गळ्यांत मंतरलेले ताईत वा छोट्या डब्या टांगणे हेही सुरू झाले. बौद्धांच्या मठांतून तोंडावर निरनिराळे मुखवटे बांधून लामा लोक नाच करीत. पूजेच्या वेळी १०८ दिवे लावले जात. कोणत्या देवदेवतांची पूजा करावयास हवी, ह्याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या ज्योतिषांनाही महत्व प्राप्त झाले. मनुष्य मेल्यानंतर लामाला बोलवायचे, लामाने प्रेताच्या डोक्याजवळ बसायचे व प्रेताच्या डोक्यात बारीक छिद्र पाडायचे, त्यातून त्या मृताच्या आत्म्याने बाहेर येऊन अमिताभ बुद्धाच्या स्वर्गाप्रत कसे जावे, ह्यासंबंधी आदेश देणारे मंत्र म्हणत राहायचे असा एक विधी होता. 

चौदावे दलाई लामा (१९३५ - ) त्सोङ्-खा-पा ह्याच्या मूलगामी सुधारणांचा ज्यांनी स्वीकार केला, त्यांना ‘पिवळी टोपीवाले’ (म. अर्थ) असे म्हटले जाऊ लागले. शुद्ध आचरणावर त्यांचा भर होता. ह्याच पिवळ्या टोपीवाल्यांच्या संप्रदायातून दलाई लामांसारखे धार्मिक व त्या अनुषंगाने राजकीय प्रशासक निवडले जाऊ लागले. [⟶ तिबेट, ⟶ बौद्ध धर्मपंथ]. आपल्या मठांत अध्ययन, अध्यापन, ध्यान, चिंतन ह्यांत लामा मग्न असत. ल्हासा येथील गान्देन (गान-डेन), द्‌गह्-ल्दन्‌, दे-पुंग (ड्रे-पुंग), हब्रस-स्पुङ्, से-रा, स-क्य इ. सुप्रसिद्ध मठांतून भिक्षूंना धर्मशिक्षण देण्यात येऊ लागले. हे मठ म्हणजे विद्यापीठेच. भिक्षू होण्यासाठी अशा मठांनी घेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक मानले जाऊ लागले. पंडित राहुल सांकृत्यायन ह्यांनी तिबेटमधील कुन्-दे-लिंग (कुन-ब्दे-ग्लिंग), प्यो-खांग् (स्पोस्-खांग), शा-लु ह्यांसारख्या ठिकाणाच्या मठांतून अनेक संस्कृत ग्रंथांची छायाचित्रे किंवा नकला आणल्या. त्या पाटणा येथील ‘बिहार रिसर्च सोसायटी ’ व ‘जयस्वाल संशोधन संस्था’ ह्यांच्या ग्रंथालयांत जतन करून ठेवलेल्या आहेत. कित्येक संस्कृत ग्रंथांच्या पोथ्या बुद्धमूर्तींच्या पोटांत ठेवलेल्या आढळतात. ज्यांच्या मूळ संस्कृत पोथ्या भारतातून नष्ट झालेल्या आहेत, अशा 

चित्र (अक्षोम्य विज्ञान)अनेक संस्कृत ग्रंथांच्या पोथ्या तिबेटी मठांतून प्राप्त होणे शक्य आहे. कारण तेराव्या शतकात बिहारमधील विद्यापीठांचा उच्छेद मुस्लीम आक्रमकांनी केल्यानंतर अनेक बौद्ध भिक्षू आपला ग्रंथसंग्रह बरोबर घेऊन नेपाळमार्गे तिबेटमध्ये गेले व तेथील मठांतून स्थायिक झाले. मठांतून ध्यानी बुद्ध, त्यांच्या शक्ती व त्यांचे बोधिसत्त्व ह्यांची पूजा केली जाते. ह्या ध्यानी बुद्धांतही वैरोचन, शक्तींमध्ये तारा आणि बोधिसत्त्वांत अवलोकितेश्वर ह्यांना महत्त्व प्राप्त झाले. एखादा लामा आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशा दुसऱ्या लामाला गुरू करतो व त्याच्या मदतीने, खाली दाखविलेल्या आकृतीसारखे मंडल तयार करतो. त्या मंडलावर ध्यान व चिंतन करून, स्वत्व विसरून ध्येय बनविलेल्या बोधिसत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो.

उपर्युक्त दलाई लामांपैकी सध्याच्या चौदाव्या दलाई लामांना (१९३५ –   ) वयाच्या पाचव्या वर्षी ते पद मिळाले. तिबेटी जनतेने तिबेट व्यापणाऱ्या चिनी सेनेविरुद्ध उठाव केला (१९५९) तेव्हा भारतात येऊन त्यांनी राजकीय आश्रय घेतला. तिबेटच्या मुक्ततेसाठी त्यांनी दिलेल्या शांततापूर्ण, अहिंसक लढ्यासाठी १९८९ साली त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. तिबेटचा ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा जतन केला जावा आणि तिबेटच्या प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघावा, म्हणून ते प्रयत्नशील आहेत.

बापट, पु. वि.