निझाम अल्-दीन अवलिया-दर्गा, दिल्ली.

दर्गा : मुसलमान साधूंची समाधी. भारतातील मुसलमान तसेच हिंदूही त्यांच्या दर्शनाला जातात. ⇨ ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती  (अजमीर), ख्वाजा कुत्ब अल्‌–दीन बख्तियार काकी (कुतुबमीनारजवळ), निझाम अल्–दीन अवलिया (दिल्ली), सय्यद बुऱ्हान अल्–दीन (आंध्र), नासीर अल्–दीन महमूद (चिराग–इ–दिल्ली), मुहंमद गिसूद–राझ (गुलबर्गा), शेख सलीम (फतेपुर सीक्री) इ. चिश्ती साधूंचे दर्गे प्रसिद्ध आहेत. सुऱ्हावर्दी पंथात शेख जलाल अल्–दीन तब्रीझी (बंगाल), बुऱ्हान अल्–दीन (कुत्ब–इ–आलम) आणि त्याचा मुलगा मुहंमदशाहा आलम (गुजरात) यांचे दर्गे वंदनीय मानतात. कादिरींपैकी ⇨ अब्दुल कादिर जीलानी  भारतात आला नसतानाही त्याच्या समाध्या भारतात (उदा., लुधियाना येथील) दाखविल्या जातात. सय्यद महमूद (उंछ) व ताज अल्–दीन (औरंगाबाद) यांच्याही कबरी त्यांना पूज्य आहेत. ग्वाल्हेरची मुहंमद घौसची, अहमदाबादला वाजीह अल्–दीन गुजरातीची, मैरठला शाहा पीरची या शत्तारींच्या कबरी आहेत. नक्षलबंदींपैकी एकट्या शाहा मुसाफिरचाच दर्गा औरंगाबाद येथे आहे. वह्‌हाबींचा त्यांना विरोध होता पण तो निष्प्रभ ठरला. मार्ह जमीरान साहिबा या संतिणीचीही  समाधी फिरोझपूरला आहे. या दर्ग्यांना कशिद्याचे ध्वज, पांढरे कोंबडे, साखर वेलदोडे, मातीचे घोडे, छोटे पाळणे, रूदार कपडे, मिठाई, अन्न, बकरे इ. वाहतात. त्याचे उरूस म्हणजे ईश्वर व भक्त यांचा संयोग मानतात. संतांचे वंशज वा नियुक्त प्रतिनिधी त्यांची व्यवस्था पाहतात. काही दर्गे हिंदू मंदिरे पाडून तेथेच बांधलेले आहेत. उदा., काश्मीरमधील बामदीन साहिबाच्या दर्ग्याच्या जागी काबूलच्या शेवटच्या भीमसींग राजाने बांधलेले मंदिर होते. सुन्नींना दर्ग्यांची पूजा मान्य नाही.

करंदीकर, म. अ.