पंचाचार्य : वीरशैव (लिंगायत) पंथातील एक संकल्पना. भगवान शंकराच्या पाच मुखांतून उत्पन्न झालेले वीरशैवांचे हे पाच मूळ आचार्य असल्याचे मानतात. त्यांनीच वीरशैव धर्माची स्थापना केल्याचेही काही वीरशैव अनुयायी मानतात. त्यांची नावे रेवणाराध्य, मरुळाराध्य, एकोरामाराध्य, पंडिताराध्य व विश्वाराध्य अशी आहेत. त्यांपैकी रेवणाराध्य तथा रेणुकाचार्यांनी अगस्त्य ऋषींना शिवाद्वैत सिद्धांताचा उपदेश केला. या उपदेशावरच आधारित सिद्धांत-शिखामणि हा ग्रंथ आपण रचिला, असे शिवयोगी शिवाचार्यानी आपल्या ग्रंथात प्रतिपादिले आहे. ह्या पंचाचार्यांनी अनुक्रमे बाळेहळ्ळी (रंभापुरी–कर्नाटक), उज्जिनी (कर्नाटक), ऊखीमठ (केदारक्षेत्र–उत्तर प्रदेश), श्रीशैलम्‌क्षेत्र (आंध्र प्रदेश) व जंगमवाडी (काशीक्षेत्र) ही पाच धर्मपीठे स्थापिली. ही धर्मपीठे सांप्रतही अस्तित्वात आहेत. ह्या धर्मपीठांचे अधिपती ‘जगद्‌गुरू’ उपाधीने संबोधिले जातात. या  पंचाचार्यांनी उपनिषदादी ग्रंथांवर भाष्ये लिहिली होती असे म्हणतात पण ती आजतरी उपलब्ध नाहीत.

पाटील, म. पु.