धर्म : निसर्गातीत, अत्यंत पवित्र, संपूर्ण मानवी भवितव्याशी संबद्ध, जीवन व विश्व अथवा निसर्ग यांची नियंत्रक अशा अलौकिक शक्तीवर (किंवा अशा शक्तींवर) माणसाची श्रद्धा असते त्या शक्तीचा (वा शक्तींचा) स्वतःशी अनुकूल, पवित्र व घनिष्ठ संबंध स्थापित करणारी वैयक्तिक अथवा सामाजिक मनःप्रवृत्ती व त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म (रिलिजन) होय आणि त्या शक्तीशी (वा शक्तींशी) प्रतिकूल मनःप्रवृत्ती व आचरण म्हणजे अधर्म होय.

काही धर्मचिंतक तत्त्वज्ञांचे असे मत आहे की, धर्माच्या मुळाशी वर वर्णिलेल्या उच्चतम शक्तीकडे वळलेली मानवाची संपूर्ण मनःप्रवृत्ती असते. भावना, इच्छा आणि ज्ञान या प्रवृत्तीतूनच निर्माण होतात उच्चतम शक्तीचा विशिष्ट अनुभव काही माणसांना येत असतो या अनुभवामध्ये या शक्तीबद्दल आश्चर्य, विलक्षण भय, नितान्त प्रेम, अपरंपार शांती, नम्रता, शरणागती, अहंकारनिवृत्ती म्हणजे आपण क्षुद्र किंवा कोणी नाही अशी वृत्ती इ. भावना निर्माण होतात.

त्या शक्तीला मनुष्य अनुकूल किंवा वश करण्याचा प्रयत्न करतो किंवा तन्मय होण्याकरिता किंवा त्या शक्तीत आत्मविसर्जन व्हावे म्हणून प्रयत्नशील असतो किंवा शाश्वत सलगी व्हावी म्हणून झटत असतो. त्याकरिता ध्यान, जप, प्रार्थना, यज्ञ, पूजा, व्रतपरिपालन इ. प्रकारचे आचरण मनुष्य व्यक्तिशः किंवा सामुदायिक रीतीने करतो आणि प्रतिकूल मनोवृत्ती व आचरण टाळतो. थोडक्यात सांगायचे, म्हणजे इष्टप्राप्त्यर्थ व अनिष्टनिवारणार्थ अलौकिक शक्तीची साधना किंवा आराधना म्हणजे धर्म होय. अलौकिक म्हणजे निसर्गातीत, निसर्गाचे व जीवनाचे नियमन करणारी, निसर्गाला अंतर्बाह्य व्यापणारी शक्ती होय. म्हणूनच तिला परमसत्य मानतात. अलौकिक म्हणजे अतींद्रिय असाही अर्थ करता येतो. ती शक्ती दृश्य वस्तुरूप आणि व्यक्तिरूपही असते आणि केव्हाकेव्हा इंद्रियगम्य किंवा मनोगम्यही होऊ शकते, अशी श्रद्धा धार्मिक आचरणाच्या मुळाशी असते. ती शक्ती हे शाश्वत आणि उच्चतम सत्य होय, असे धर्मसंकल्पनेत गृहीत धरलेले असते. मानवाचे उच्चतम ध्येय किंवा आदर्श आणि परम अंतिम शाश्वत सत्य हे त्या शक्तीचेच स्वरूप होय, असे जगातील उच्च धर्म मानतात त्या शक्तीच्या संपूर्ण अनुग्रहाने किंवा कृपेने उच्चतम शाश्वत ध्येयाची प्राप्ती होते, असेही उच्च धर्म मानतात. म्हणून जागतिक उच्च धर्मांची व्याख्या अशी करता येते :  जीवन परिपूर्ण व कृतार्थ करणारी, हे अपरिपूर्ण, दोषमय, अशांत जीवन बदलून टाकणारी, उच्चत्तम ध्येयाच्या म्हणजे दिव्यत्वाच्या प्राप्तीची पद्धती म्हणजे धर्म होय. त्या ध्येयातच शाश्वत सत्य असते, असे उच्च धर्म मानतात. एकेश्वरवादी धर्मांच्या अनुसारे परमपवित्र ईश्वर, अद्वैतवादाप्रमाणे परमात्मा आणि प्राथमिक बौद्ध धर्माप्रमाणे निर्वाण म्हणजे शाश्वत सत्य व उच्चतम ध्येय होय.

सर्वच प्राथमिक वा उच्च धर्म अलौकिक शक्तीचे दोन प्रकार मानतात : (१) पवित्र तारक वा उपकारक. उदा., माना, कॅरिझ्म, पुण्य, तीर्थंकर, बोधिसत्त्व, प्रज्ञापारमिता, देव, अहूर मज्द, ताओ, परमात्मा, अल्ला इ. आणि त्याच्या उलट, (२) अपवित्र, पतनकारक अथवा अपकारक. उदा., असुर, राक्षस, पाप, सैतान, मार इ. शब्दांनी त्यांचे वर्णन करतात. अपवित्र शक्तींचा संसर्ग होणार नाही असे वर्तन करणे, हे माणसाचे कर्तव्य ठरते.

सर्व उच्च धर्मांचे तीन महत्त्वाचे विषय सांगता येतात : (१) सत्याचा वा अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ व त्यात जीवनाचे स्थान अंतिम सत्य व ध्येय यांची एकरूपता. (२) जीवनाचे सत्यस्वरूप आणि जीवनाची धार्मिक परिणती किंवा रूपांतर. (३) जीवनाच्या उच्चतम उद्देशाचे साधन व जीवनातील अन्य उद्देशांची आणि त्या उद्देशांच्या साधनांची अंतिम उद्देशाशी आणि त्याच्या साधनांशी संगती घालणे आणि विसंगती टाळणे. विसंगती अपवित्र शक्तीशी संबंध आल्याने उत्पन्न होते.

वर जी धर्माची सामान्य व्याख्या व उच्च धर्माची विशेष व्याख्या अशा दोन व्याख्या सांगितल्या, त्या सर्वसंमत होतील असे म्हणता येत नाही. त्याचे कारण असे की, भूतकालीन अस्तंगत मानवी समाज संस्कृतीच्या अनेक पातळ्यांवर जगत होते व त्यांच्यामध्येही निरनिराळ्या पातळीवरच्या धर्मसंस्था होत्या, असे इतिहासपूर्वकालीन संस्कृतीच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. गेल्या दोनशे वर्षांत पृथ्वीवरील संस्कृतीच्या उच्चनीच पातळ्यांवर जगणाऱ्या विद्यमान मानवी समाजांमध्येही धर्म या संज्ञेस पात्र अशा संस्था आणि मानवी प्रवृत्ती आढळून येतात त्या सर्व धर्मांची व्यापक, समर्पक, सर्वसंमत व्याख्या करणे कठीण आहे. जे. एच्. ल्यूबा यांनी विद्वानांच्या ४८ निरनिराळ्या व्याख्या सांगून स्वतःच्याही अधिक दोन व्याख्या सांगितल्या आहेत. त्या सर्वांचा विचार करून ⇨ विल्यम जेम्स (१८४२—१९१०) याने असे म्हटले आहे की, यांपैकी कोणतीही व्याख्या अपुरीच पडते धर्म (रिलिजन) हा जगातील सर्व धर्मांचा केवळ समष्टिबोधक अस्पष्ट अर्थाचा शब्द आहे. भिन्नभिन्न मानवी प्रवृत्तींप्रमाणे आणि संस्कृतीच्या उच्चनीच स्तरांप्रमाणे धर्माचे प्रत्यक्ष दिसणारे स्वरूप भिन्नभिन्न दिसते, असे विल्यम जेम्सने सांगितले तरी दिव्य शक्तीकडे ओढा असलेली, स्वतःच्या असहायतेच्या जाणिवेने भरलेली माणसाची त्यागमय मानसिक प्रवृत्ती, अशी धर्माची सामान्य व्याख्या त्याने सांगितलीच. त्याच्या मते, धार्मिक जीवनातील श्रद्धेचे पुढील पाच भाग होत : (१) दृश्य जगत हा उच्च अशा चैतन्यमय विश्वाचा भाग असून त्या विश्वाकडून या जगताला मुख्य अर्थवत्ता प्राप्त झाली आहे. (२) त्या उच्चतम विश्वाशी निगडित करणारा संवादी संबंध स्थापित करणे, आपले वास्तव ध्येय आहे. (३) त्या चैतन्याशी—त्याला ईश्वर म्हणा वा नियामक तत्त्व म्हणा —प्रार्थनेने किंवा अंतरंगाचा संबंध स्थापण्याने पूर्ण समाधान प्राप्त होते आणि त्यामुळे चैतन्यशक्तीचा या दृश्य विश्वात प्रवाह दिसू लागतो मानसिक व भौतिक अशी इष्ट फले प्राप्त होतात. धर्मानुभवाची फलद्रूप होणारी जी मानसिक लक्षणे उत्पन्न होतात, ती अशी : (४) नवीन उत्साह प्राप्त होतो, दिव्य सौंदर्यानुभवाने मन भारले जाते किंवा धैर्य व शौर्य निपजते. (५) पूर्ण सुरक्षिततेचे आश्वासन मिळते, शांत मनःस्थिती प्राप्त होते आणि इतरांबद्दलच्या शुद्ध प्रेमाने मन भरून जाते. जेम्सने धर्मचिंतनाचा वरील जो निष्कर्ष काढला, तो ऋषी, संत, प्रेषित, गूढानुभव घेणारे योगी इत्यादिकांच्या वैयक्तिक धर्मानुभवांच्या आधारे काढला आहे. संघटित संस्थारूप सामाजिक धर्माचे निष्कर्ष त्याने काढण्याचे टाळले आहे.

धर्माचे संस्थारूप व वैयक्तिक असे दोन प्रकार त्याने पाडले आहेत. यज्ञ वा पूजा म्हणजे कर्मकांड, देवताविषयक व्यवस्थेचे तंत्र, देवविद्या, ⇨ सण व उत्सव तसेच पुरोहितसंघटना या गोष्टी संस्थारूप धर्मात मुख्यतः अंतर्भूत होतात. देवाची वा देवांची कृपा संपादन करण्याची कला, असे या धर्मास म्हणता येते. वैयक्तिक धर्म हा व्यक्तीच्या हृदयाचा धर्म असतो. देवतेची कृपा संपादन करता येणे वा अवकृपा होणे, यासंबंधी विचार यात फारसा नसतोच, देवविद्या ही यात गौण असते, आचरणाचे स्वरूप कर्मकांड हे नसते, पुरोहितसंस्थेचा संबंध महत्त्वाचा नसतो कारण भक्त किंवा योगी स्वतःच, कर्मकांड वा पुरोहितवर्ग यांच्याशिवायच, मनाने देवाशी संबंध स्थापतो. हा हृदयाचा हृदयाशी संबंध असतो परंतु संस्थारूप धर्मालाच धर्म ही संज्ञा प्राधान्याने लागू होते. त्यात वैयक्तिक धर्म हा दुय्यम अंश मानला जातो. वस्तुतः हा वैयक्तिक धर्मच सर्व धर्माचा मूलभूत भाग आहे. ऋषी, सिद्ध, बुद्ध, ख्रिस्त, मुहंमद किंवा पंथप्रवर्तक साधुसंत यांचाच हा वैयक्तिक धर्म होय. एकांतात दिव्य तत्त्वाबद्दल आलेले अनुभव व घडणारे वर्तन या धर्माचे स्वरूप होय. हे अनुभव म्हणजे तार्किक विचार नव्हेत. त्यातून तार्किक विचार निघू शकतात. परंतु तर्कबुद्धी तेथे अपुरी पडते.

मानवशास्त्रज्ञ ⇨ जेम्स फ्रेझर (१८५४—१९४१) याने संस्थारूप व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या धर्मांना लागू पडणारी व्याख्या सांगितली आहे. जीवनव्यापी, विश्वनियंत्रक, श्रद्धेय दिव्य तत्त्वाची आराधना म्हणजे धर्म होय, असे तो म्हणतो.


फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨ एमील द्यूरकेम (डुरखाइम् १८५८—१९१७) याने जगातील प्राथमिक समाजांच्या ‘टोटेमिझम’ म्हणजे कुलचिन्ह संप्रदाय वा देवकपूजा या स्वरूपाच्या धर्मसंस्थेचा अभ्यास करून आचरणाचे सामाजिक नियम म्हणजे धर्म होय, अशी व्याख्या सांगितली आहे. पूर्वमीमांसकांच्या व्याख्येशी ही व्याख्या बरीचशी जुळते. चोदनेने ज्ञापित विषय म्हणजे धर्म होय. चोदना म्हणजे विधिवाक्य वा आज्ञापक वाक्य होय. दैवी शक्तीची आज्ञा वा दैवी शक्तीने सांगितलेले हुकूम असे जरी धर्माचे स्वरूप लोक मानत असले, तरी मनुष्याच्या अबोध मनावर समाजाच्या शक्तीचे दडपण कायम असते व बोधात्मक मन ती देवाची शक्ती आहे असे मानते. धर्मातील विधिनिषेध हे वस्तुतः समाजाचेच विधिनिषेध असतात. समाजाचे दडपण व्यक्तीच्या मनावर सतत प्रभाव गाजवीत असते. नियम मोडले, तर समाजच व्यक्तीची निंदा करून व बहिष्कार घालून वा अन्य प्रकारचे शासन करून व्यक्तीला नियम पाळावयास लावतो. प्राथमिक समाज असे समजतो, की ⇨ देवक म्हणजे कुल वा गोत्राचा मूळचा जनक किंवा जननी होय. त्या देवकाचेच रक्त त्या कुळातील सर्व व्यक्तींमध्ये भरलेले असते. म्हणून देवक म्हणून मानलेला प्राणी किंवा वनस्पती अवध्य अथवा अच्छेद्य होय, असे प्राथमिक समाज मानत असतो. कुळाच्या किंवा गोत्राच्या बाहेरील स्त्रीशी अथवा पुरुषाशीच लग्न करण्याची प्रथा देवकपूजेच्या कुलधर्मात निर्माण झाली आहे. एका विशिष्ट धार्मिक समारंभातच वनस्पतिरूप अथवा प्राणिरूप देवकाला बळी देऊन त्याचा अंश किंवा रक्त प्रसाद म्हणून सगळ्यांनी सेवन करावयाचा विधी असतो. त्यामुळे कुलाची एकात्मता निर्माण होते. द्यूरकेमने ज्याप्रमाणे धर्माचे मूळ प्राथमिक स्वरूप टोटेमिझमवरून शोधण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे सिग्मंड फ्रॉइडनेसुद्धा टोटेम अँड टॅबू या पुस्तकात केला आहे. दोघेही प्राथमिक धर्माची सामाजिक उपपत्ती देवकपूजा संप्रदायावरून सांगतात.

मानवशास्त्रज्ञ ⇨ ब्रॉनीस्लॉ मॅलिनोस्की (१८८४—१९४२) याने प्राथमिक धर्मांपासून उच्च धर्मांपर्यंतच्या सर्व धर्मांना लागू पडणारी अशी धर्माची व्याख्या केली आहे. ‘सेक्रेड’ म्हणजे पवित्र, कल्याणमय, मंगल व ‘प्रोफेन’ म्हणजे पवित्रेतर, केवळ ऐहिक असे मानवी जीवनाचे आणि आचरणाचे दोन घटक त्याने मानले आहेत. ⇨ माना, देवक, देव, परब्रह्म किंवा निर्वाण आणि तत्संबंधी अनुकूल आचरण हे सर्व पवित्र होय. काही मानवशास्त्रज्ञ असे मानतात की आधुनिक युगापूर्वीचे समाज व विशेषतः प्राथमिक समाज ह्यांचे सर्व जीवन धर्माने व्यापलेले होते परंतु याउलट, मॅलिनोस्कीने काही प्राथमिक विद्यमान मानवी समाजांचे अध्ययन करून असा निष्कर्ष काढला, की धर्माशी म्हणजे पावित्र्य किंवा अपावित्र्य यांच्याशी संबंध नसलेले केवळ ऐहिक आचार व व्यवहार प्राथमिक समाजांतही आढळतात [⟶ पवित्र व पवित्रेतर].

जी. गॅलोवे याच्या मताप्रमाणे व्यक्तीच्या धार्मिक अनुभवाचे दोन भाग आहेत : भावना व जाणीव. जाणीव हीच श्रद्धेचे रूप घेते आणि भावनांची दिव्य वस्तूच्या जाणिवेशी सांगड घालते. जीवनेच्छा ही प्राण्यांत प्रबळ असते. जीवन टिकविण्याची अपरिहार्य इच्छा माणसाच्या स्वाभाविक गरजांतून निर्माण होते. जीवनाला सतत धोका व बंधने दिसतात. धोक्यातून व बंधनातून निसटण्याच्या इच्छेने प्रकट वा अप्रकट रूपात पूजा, भक्ती व सेवा घडते. हेच धर्माचे स्वरूप होय. योग्य व अयोग्य भावना, अनुकूल व प्रतिकूल विचार, विहित व निषिद्ध आचार, भक्ती व प्रार्थना त्याचप्रमाणे पूजा वा सेवा यांमध्ये भावना, विचार व आचार येतात.

ल्यूबा याने धर्माचे दोन प्रकार सांगितले आहेत : बहिर्मुख (ॲक्टिव्ह) आणि अंतर्मुख (पॅसिव्ह). इच्छाशक्तीने घडणारा बाह्य आचार—आराधना, शरणागती, पूजा इ.—पहिल्या प्रकारात अंतर्भूत होतो आणि विधिनिषेधास कारण अशा पवित्र किंवा मंगल तत्त्वाबद्दलच्या भावनांची इच्छाशक्तीने जागृती होते भक्तिभाव हे त्या भावनांचे उत्कृष्ट रूप होय हा दुसरा प्रकार होय.

भारतीय तत्त्ववेत्त्यांनीही धर्माच्या अनेक व्याख्या सांगितल्या आहेत: स्वतःप्रमाण अशा वेदांतील चोदना म्हणजे विधिवाक्य वा आज्ञा हे धर्मज्ञापक प्रमाण होय. विधिवाक्याने आज्ञापिलेले कर्म धर्म होय कर्म म्हणजे आचरण. निषेधवाक्याने निषिद्ध [⟶ निषिद्धे] म्हणून सांगितलेले कर्म अधर्म होय ही ⇨ पूर्वमीमांसेतील व्याख्या होय. ⇨ वैशेषिक दर्शनात दुसरी व्याख्या सांगितली आहे, ती अशी : ज्याच्या योगाने म्हणजे ज्या अदृष्टाने अभ्युदय वा निःश्रेयस (मोक्ष) यांची प्राप्ती होते, तो धर्म म्हणजे पुण्य होय. विहिताचरणाने पुण्यरूप अदृष्ट आत्मगुण निर्माण होतो तोच धर्म, असे येथे अभिप्रेत आहे. महाभारतात म्हटले आहे, की ज्याच्या योगाने प्रजेचे धारण होते, तो धर्म होय. तेथेच असेही पुन्हा म्हटले आहे, की प्राण्यांची ⇨ अहिंसा म्हणजेच धर्म होय. महाभारतातील या दोन्ही वाक्यावरून, प्रजेचे ज्यामुळे रक्षण व पोषण होत नाही, हिंसा होते तो अधर्म होय असाही निष्कर्ष निघतो.

काही मानवशास्त्रज्ञांनी यातुविद्या हे धर्माचे मूळ होय, असे मानले आहे. या लेखाच्या प्रारंभी ज्या तऱ्हेच्या शक्तीची किंवा शक्तींची संकल्पना धर्माच्या व्याख्येत अंतर्भूत केली आहे, त्या तऱ्हेची संकल्पना व तीवरील श्रद्धा यातुविद्येमध्येही अंतर्भूत होते परंतु जेम्स फ्रेझरच्या मते यातुविद्या म्हणजे धर्म नव्हे. ⇨ जादूटोण्यात या अलौकिक शक्तीला किंवा शक्तींना माणूस स्वाधीन करतो. याबाबतीत विज्ञानतंत्राशी यातुविद्येचे हे साम्य आहे. याउलट, धर्मामध्ये त्या शक्तींना स्वाधीन करण्यापेक्षा त्या शक्तींच्या आधीन होऊन त्यांच्याशी अनुकूल संबंध माणूस स्थापित करतो, अशी श्रद्धा असते. पहिल्यात शक्ती स्वाधीन किंवा वश करावयाच्या असतात दुसऱ्यात शक्तींना वश किंवा त्यांच्या आधीन स्वतः व्हावयाचे असते, हा महत्त्वाचा फरक आहे. याच्याशी जुळणारी गोष्ट म्हणजे यातुविद्येचा स्पष्ट निषेध उच्च धर्मांमध्ये केलेला आढळतो परंतु यावर असेही म्हणता येते की, तिचा निषेध करणाऱ्या धर्मपंथामध्येही कळत वा नकळत शुक्ल किंवा शुद्ध यातूचे कर्मकांड तसेच प्रसंगी कृष्ण यातूचेही कर्मकांड अंतर्भूत केलेले असते. ⇨ प्रार्थना, ⇨ पूजा, मंदिरस्थापना, यात्रा [⟶ जत्रा], उत्सव, ⇨ व्रते, ⇨ जप, ⇨ योग, वा ⇨ नवस इत्यादिकांचा उपयोग माणसे जादूसारखा करतात.

धर्माचे मानसशास्त्र : बुद्धिवादी उपपत्ती : श्रद्धायुक्त धर्माचरण हे ऐहिक वा पारलौकीक हिताकरिता घडते केवळ पारलौकीक हिताकरिता घडत नाही. विशेषतः प्राथमिक अवस्थेतील समाजांत ऐहिक हितच महत्त्वाचे असते आर्थिक संबंध आधिक महत्त्वाचे असतात. कायम दारिद्र्य व गाढ अज्ञान यांमुळे अनपेक्षित वा अपेक्षित संकटाच्या भयाने तो कायम ग्रस्त झालेला असतो आश्चर्यचकितही होतो. सूर्योदय व सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा व उन्हाळा, तारांगणाने भरलेले गगन, विजेचा लखलखाट, अनपेक्षित रीतीने येणारा पर्जन्य इ. सृष्टीतील घटना त्याच्या आश्चर्याचे कायम विषय असतात. अवचित व अनुकूल घटनांनी तो उत्साहितही होतो परंतु भयभावनेचा पगडा त्याच्यावर कायमच राहतो. निसर्गावर विजय मिळविणारी विज्ञान व तंत्र ही साधने विज्ञानयुगापूर्वीच्या स्थितीत अत्यंत अपुरी होती. विज्ञानयुगातही त्या साधनांची समृद्धी अपुरीच पडते भय हे राहतेच. अनुकूल वा प्रतिकूल महत्त्वाच्या घटनांचा निश्चित कार्यकारणभाव विज्ञानपूर्वयुगात इंद्रिय व बुद्धी यांच्या साहाय्याने निश्चितपणे कळत नाही तेव्हा माणूस भयातून पार पडण्याकरिता वा उत्साह वृद्धिंगत करण्याकरिता अलौकिक शक्तीची किंवा तत्त्वांची संकल्पना करून नैसर्गिक व सामाजिक घटनांचा, स्वतःशी संबंध असलेल्या विश्वाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. मूर्त पदार्थांत प्राणरूप किंवा आत्मरूप तत्त्वांची व आचरणात पाप-पुण्याची संकल्पना तो करतो. जीवात्मे, मृतात्मे, पितर, झपाटणारी भूते, घातक पिशाच, राक्षस वा असुर, मंगल आणि कल्याणकारक शक्ती असलेले अनेक देव किंवा एक देव, सजीव व निर्जीव वस्तूंतील पवित्र व अपवित्र सामर्थ्ये इ. अलौकिक तत्त्वे अथवा शक्ती अगम्य घटनांच्या उपपत्तीकरिता माणूस कल्पितो व त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो. आपल्या साधनसामग्रीत व सत्-असत् आचरणातही अलौकिक किंवा अपूर्व शक्ती असते असे तो कल्पितो. ही उपपत्ती, माणूस हा मुख्यतः बुद्धिवादी (रॅशनल) आहे, या धारणेतून उत्पन्न झाली आहे.


माना, आरेंदा, मागा, कॅरिझ्म (विभूतितत्त्व) अशा त्या शक्तींच्या दर्शक संज्ञा आधुनिक मानवशास्त्राने प्राथमिक समाजाच्या भाषांमधून निवडल्या आहेत. पवित्र व अपवित्र पदार्थ, शुभ व अशुभ देश-काल-शब्द-वस्तू वा प्राणी त्याचप्रमाणे विहित प्रकारच्या क्रियेतील पुण्य आणि निषिद्ध प्रकारच्या क्रियेतील पाप या संकल्पना अलौकिक शक्तीच्या बोधक आहेत. मानवशास्त्रज्ञ ⇨ आर्. आर्. मॅरेट (१८६६—१९४३) म्हणतो, की समाजाच्या प्राथमिक स्थितीत कित्येकदा असेही आढळून आले आहे, की प्राण-आत्मा, देव-देवता, असुर-राक्षस, ⇨ पाप-पुण्य ह्या गोष्टी भौतिक पदार्थांपासून वेगळ्या आहेत, अशी कल्पना नसते. भेदाची कल्पना संस्कृतीच्या वरच्या थरावर गेलेल्या समाजातच असते.

अपूर्व म्हणजे अलौकिक शक्ती दोन प्रकारची कल्पिलेली असते: (१) स्वंयसिद्ध व (२) आचरणाने निर्माण होणारी. माना, प्राण किंवा आत्मा, देव-देवता, असुर-राक्षस, शुभ व अशुभ सामर्थ्ये या गोष्टी स्वतः सिद्ध असतात. ज्या व्यक्तीत किंवा पदार्थात अलौकिक शक्ती निसर्गतः स्वतःसिद्ध नसते, त्या व्यक्तीत वा वस्तुत मंत्रतंत्राने किंवा पूजा, यज्ञ, जप, भजन, गायन, ध्यान इ. प्रकारच्या विहित वा निषिद्ध आचरणाने ती निर्माण होते अथवा स्थापिली जाते. विहिताचरण वैयक्तिक व सामुदायिक असे दोन प्रकारचे असते. धार्मिक नृत्य, पूजा, यात्रा, यज्ञ, भजन, प्रार्थना इ. कर्मकांड सामुदायिकही असते. व्यक्तीला व समुदायाला ही शक्ती तीर्थस्नान, उत्सवप्रसंगी किंवा श्राद्धप्रसंगी केलेले भोजन वा भंडारा यांतूनही प्राप्त होते. देवतेला अर्पण केलेल्या अन्न, मिठाई, मद्य, मांस, हुक्का, चरस, भांग, निर्माल्य यांमुळेही पवित्र शक्ती प्राप्त होते.

पवित्र व अपवित्र शक्ती आणखी दोन प्रकारच्या : (१) दृश्य भौतिक वस्तूंत कायम राहणाऱ्या म्हणजे स्थिर आणि (२) अशा वस्तूंत प्रवेश करून निघून जाणाऱ्या म्हणजे अस्थिर. सूर्यचंद्रादी ग्रह, हिमालयादी पर्वत, गंगादी नद्या इत्यादींमध्ये पवित्र अपूर्व शक्ती स्थिर राहते त्याचप्रमाणे प्रेत, कावळा, घुबड, मूत्र-विष्ठा इत्यादिकांमध्ये अपवित्र शक्ती स्थिर राहते. मूर्ती, मंदिर इत्यादींमध्ये कर्मकांडाच्या योगाने त्या पवित्र शक्ती प्रवेश करतात व अपवित्र कर्माने त्या निघून जातात. माणसांमध्ये त्या सत्कर्माने निर्माण होतात आणि दुराचरणाने निघून जातात.

अशा ह्या अलौकिक शक्तींच्या संकल्पना मनुष्याने जीवनातील व विश्वातील घटनांच्या कार्यकारणभावाची उपपत्ती लावण्याकरिता केलेल्या आहेत, असे काही नास्तिक मानसशास्त्रज्ञ बुद्धीवादाच्या आधाराने सांगतात. मरणोत्तर जीवन, अमरत्व आणि ईश्वर यांच्या बद्दलच्या संकल्पना या भ्रमात्मक आहेत. या संकल्पनांच्या भ्रमांमध्ये मानव का सापडला, आजपर्यंत अस्तित्वात आलेले सर्व मानवसमाज धर्मभ्रमात का गुंतून गेले, याची उपपत्ती काही बुद्धीवादी मानसशास्त्रज्ञांनी वरीलप्रमाणे लावली आहे. शुद्ध बुद्धीवादाने म्हणजे युक्तिवादाने अमरत्व, ईश्वर यांचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही आणि जे जे युक्तिवाद तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, ते ते युक्तिवाद व बुद्धीवादी नास्तिकाला पटू शकत नाहीत. त्यांच्यात काहीतरी तर्कदोष दाखविताच येतो.

श्रद्धा, हृदय किंवा अनुभव : बुद्ध, शंकराचार्य किंवा कांटसारखे तत्त्वज्ञ यांचेही असेच म्हणणे आहे. ईश्वर व आत्मा यांचे अस्तित्व बुद्ध मान्य करीत नाही. शंकराचार्य हे ईश्वर व आत्मा यांचे अस्तित्व सिद्ध करणारा केवळ युक्तिवाद निर्दोष आहे, असे मान्य करीत नसले, तरी वेदांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांच्या श्रद्धेला बळकटी आणण्यास वरील युक्तिवाद उपयुक्त ठरतो, असे म्हणतात. ⇨ टॉमस अक्वाय्‌नस (१२२५?—७४) सारखे ख्रिस्ती संत किंवा इतर उच्च धर्मातील तत्त्वज्ञ संत श्रद्धेनेच ईश्वर, आत्मा व अमरत्व हे सिद्ध होते असे म्हणतात कारण श्रद्धा हे सुद्धा तत्त्वज्ञानाचे बुद्धिवादापेक्षा वेगळे प्रमाण आहे, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या मताप्रमाणे प्रकटित (रिव्हील्ड) धर्मग्रंथावरील श्रद्धा किंवा ईश्वरप्रणीत स्वतःप्रमाण अशा वेदांवरील श्रद्धाच देव वा अमरत्व सिद्ध करण्याचे साधन आहे.

झां झाक रूसो (१७१२—७८) सारखे तत्त्वज्ञ म्हणतात, की ईश्वर वा अमरत्व यांचे सत्यत्व एकांतात बसलेल्या माणसाच्या हृदयाने सिद्ध होते, बुद्धीने नव्हे. धर्माचे प्रमाण मानवी हृदय आहे प्रकटीत धर्माचे ग्रंथसुद्धा मानवी हृदयाचेच आविष्कार आहेत धर्मतत्त्व कळायला शुद्ध मानवी हृदयच समर्थ आहे शुद्ध मानवी हृदय म्हणजे अहंकारजन्य कामक्रोधादी मनोविकारांतून मुक्त असे हृदय होय या हृदयाला ईश्वराचे सत्यत्व व अंतिम नीतितत्त्वांचे मूल्य कळण्याकरिता प्रकटित धर्मग्रंथांची गरज नाही. या रूसोच्या सिद्धांताला नैसर्गिक धर्माचा सिद्धांत मानतात. गटेसारखे महाकवीही या सिद्धांताला पुष्टी देतात.

परमात्म्यातून, चिरंतन सर्वव्यापी अबोध आत्म्यातून आलेली धार्मिक प्रवृत्ती ही मौलिक मनःप्रेरणा आहे, असे विल्यम जेम्स म्हणतो. डोळा जसा स्वभावतःच प्रकाशाचे आकलन करतो, पक्षी जसे आपल्या घरट्याकडे वळतात, तसे मानवी हृदय देवाकडे आकर्षित होते. आपल्या मानसशास्त्रीय प्रबंधात तो म्हणतो, की प्रार्थना ही घडते, कारण ती अनिवार्य असते. मनुष्य अनुभवाने असे शिकतो, की त्याचा आत्मा हा परमात्म्याशी अविभाज्य रीतीने संलग्न आहे. म्हणूनच चुंबकाकडे लोह ज्याप्रमाणे त्याप्रमाणे परमात्म्याकडे मानव आकर्षित होतो. कलानुभूती अथवा नैतिक पावित्र्याची अनुभूती जीवनाच्या उच्च परिणतीची दर्शक असते, तशीच स्वयंश्रेष्ठ धर्मानुभूतीही असते.

रॉबर्टसन स्मिथ म्हणतो, की धर्म हा सत्य की असत्य किंवा कोणता धर्म सत्य व कोणता असत्य या प्रश्नापेक्षा धर्म ही मानवी स्वभावाची एक फार महत्त्वाची बाजू आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. जगातील खालच्या-वरच्या मानवजमाती वा राष्ट्रे यांच्या भिन्नभिन्न काळांतील धर्माचारांमध्ये व श्रद्धेय सिद्धांतांमध्ये खूप विभिन्नता, विरोध वा वैचित्र्य असले, तरी समानत्व व मौलिक सादृश्यही आहे. अस्तित्वाच्या गूढ स्वरूपाबद्दल मानसिक प्रतिक्रिया हे सर्वव्यापी धर्मलक्षण होय. दृश्याचा समावेश करणारे दृश्यापुरते मर्यादित नसलेले पलीकडचे अस्तित्व, हे अधिक सत्य आहे ते सर्व स्त्रीपुरुषांच्या अनुभवांचा विषय आहे. धर्मसंकल्पनाचा प्राथमिक समाजाच्या पातळीपासून आधुनिक समाजापर्यंत विकास झालेला दिसतो. ⇨ निसर्गपूजा, यातुविद्या ⇨ पितृपूजा, कुलदेवकपूजा, एकेश्वरपूजा यांतील सर्व संकल्पनांमध्ये मौलिक सादृश्य दिसते. अगदी प्राथमिक धर्मामध्ये पवित्र व लौकिक संकल्पनांची विभागणी झालेली असते. यानंतर विचार अधिक सूक्ष्म व स्पष्ट होत जातो. लौकिक संकल्पनांमध्ये कार्यकारणभावाची स्पष्ट संकल्पना असते. त्यातूनच बुद्धिवाद व वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली. अलौकिक पवित्र तत्त्वाच्या अनुभवाचा विषय गूढ कार्यकारणभाव होय. यातूनच श्रद्धा व श्रद्धेय तत्त्वज्ञान निर्माण झाले.


मनोविश्लेषणवादी उपपत्ती : आधुनिक मनोविश्लेषणाने अबोध आत्मा अथवा मन (अन्‌कॉन्शस) हे धर्मानुभवाचे अधिष्ठान मानले आहे. अबोध आत्मा वा मन हे तत्त्व सिग्मंड फ्रॉइड आणि युंग या दोघांनी स्वीकारले आहे. ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६—१९३९) हा स्वभावतःच अनिश्वरवादी नास्तिक आहे व युंग हा आस्तिक आहे. त्यामुळे दोघांनी भिन्न धर्मोपपत्ती सांगितल्या आहेत. अबोध आत्मा किंवा मन हे सामाजिक असते, असे दोघेही भिन्न अर्थाने मानतात.

फ्रॉइडच्या मते, धर्म हा भावनातिरेकग्रस्त मनाच्या विकृतीतून (ऑब्सेशनल न्यूरोसिस) निर्माण झालेला आहे. माणसाच्या सहज प्रवृत्तींवर कुटुंबाची वा कुटुंबाधिपतीची वा वडिलधाऱ्या माणसांची जन्मापासून सारखी बंधने पडत असतात स्वाभाविक प्रवृत्ती दडपल्या जातात. कुटुंबावर स्वामित्व गाजविणाऱ्या पिता, माता इ. व्यक्तिंबद्दल त्याला जसे प्रेम वाटते तसेच त्यांच्या दडपणामुळे त्यांच्याबद्दल द्वेषही उत्पन्न होतो, भयही उत्पन्न होते. प्रेम, द्वेष, भय इ. भावनांची गुंतागुंत होऊन ⇨ गंड वा मनोग्रंथी (कॉम्प्लेक्स) तयार होतात. मज्जातंतूंवर त्यामुळे सारखा ताण पडून त्या मनोग्रंथी रोगट बनतात. दडपलेल्या त्याच्या मनोभावना स्वप्नात उफाळून येतात. विविध प्रकारची स्वप्ने पडतात. ‘लिबिडो’ म्हणजे कामुक ऊर्जा, ही सर्व मानवी प्रवृत्तिनिवृत्तींचे अधिष्ठान असते. मज्जेचे कार्य हे तिचेच कार्य असते. मनःप्रवृत्तीवरील बंधने म्हणजे तिच्यावरीलच बंधने होत. स्वप्नातील आविष्कार तिचेच आविष्कार असतात. जागृतीमध्येदेखील या कामुक ऊर्जेमुळेच विलक्षण ⇨ कल्पनाजाल (फँटसी) निर्माण होते. हे कल्पनाजाल म्हणजे अनुभवच असतात. पण हे अनुभव आभासात्मक असतात. इच्छा, द्वेष आणि अन्य भावना हे त्याचेच रूप असते. वास्तव जीवनातील अडचणींमुळे इच्छांचा सारखा विघात होत असतो. परंतु इच्छा, द्वेष, प्रेम, सुखवासना या अदम्यच असतात. या अदम्य वासना अबोध मनामध्ये साठलेल्या असतात. जाणीव, इच्छा व भावना ज्या सहज मनःप्रवृत्तींतून निर्माण होतात, त्या सहज मनःप्रवृत्तींना यांची साथ मिळते आणि कल्पनाजाल तयार होते. देव, असूर, पिशाच, पाप-पुण्य इत्यादिकांची कल्पनाजालात निर्मिती होते व ते कल्पनाजाल खरे वाटू लागते. म्हणजे मनाने जे कल्पिलेले असते, ज्यांचा आभास होतो, त्याचे बहिःप्रक्षेपण होते. कारण इच्छापूर्ती व्हावयासच पाहिजे, हा माणसाचा हट्ट असतो. स्वप्नात स्त्रीपुरुष संभोग होतो म्हणजे स्वप्नावस्था होते, हे त्याचे उदाहरण आहे. देव, राक्षस, पिशाच, भूते माणसांना अंधारात, दरीत, विजनस्थानात दिसतात हेही बहिःप्रक्षेपणाचेच उदाहरण आहे. वास्तव साधनांनी जी इच्छा तृप्त होत नाही, ती इच्छा हट्टाने, दुराग्रहाने मनुष्य कल्पनाजालांच्या साहाय्याने पुरी करतो कल्पित साधने निर्माण करतो. धार्मिक आचरण वा यातुविद्या ही कल्पित साधने होत. जीवनात अनपेक्षित रीतीने जे घडते, त्याचा कार्यकारणभाव कल्पनाजालाच्या साहाय्याने मनुष्य कल्पितो. सगळ्या धार्मिक संकल्पना या अशाच कल्पनाजालांची अपत्ये होत. अस्वस्थ व रोगी अशा सामाजिक मनाची ही सृष्टी असते. मरणाची भीती असते मरण टाळावेसे वाटते. जीवनेच्छा अदम्य असल्यामुळे मनुष्य मरणोत्तर स्थिती वा अमरत्व त्या कल्पनाजालातून पाहतो, ते खरे वाटते आणि अमरत्वाची इच्छा तृप्त करतो. काही प्राथमिक समाजांतील कुटुंबाचा पिता हा संरक्षक असतो तसा कुटुंबाचा दंडुकेशहाही असतो. ईश्वर म्हणजे अतिभावित, अतिरंजित अशी वास्तव पित्याचीच प्रतिमा असते. पित्याबद्दल प्रेम, द्वेष व भय वाटते तसेच ईश्वराबद्दलही वाटत असते. पित्याच्या प्रभुत्वाचा अर्थ बालमनाला नीट कळत नाही. ते त्याला एक आश्चर्यच असते. तसेच कल्पित विश्वपित्याबद्दलही त्याला आश्चर्य वाटते. प्राथमिक अवस्थेतून बाहेर पडलेल्या मानव समाजांमध्ये सहजप्रवृत्तींवर विविध बंधने पडलेली असतात म्हणून अशा या सुधारलेल्या समाजांमध्येसुद्धा व्यक्तींच्या मनावर ताण आणि दडपण पडून ⇨ मज्जाविकृती (न्यूरोसिस) अनिवार्यपणे उत्पन्न होते. अबोध मनावर ती प्रभाव गाजविते. कल्पनाजालनिर्मित धर्मसंस्था ही सुधारलेल्या समाजांमध्येसुद्धा समाजशास्त्यांना आवश्यक वाटते याचे कारण केवळ राजशासनाने आणि समाजशक्तीने व्यक्ती पूर्णपणे नियंत्रित करता येत नाही. जोपर्यंत निर्बंधप्रधान समाजव्यवस्था नियमपालनार्थ आवश्यक राहील, तोपर्यंत भ्रमात्मक धर्मसंस्थेची आवश्यकताही राहील. निर्बंधप्रधान समाजसंस्थेतील माणसे ही भावनातिरेकग्रस्त मनोविकृतीतून किंवा मज्जाविकृतीतून मुक्त होणे फार कठीण आहे, असा फ्रॉइडचा थोडक्यात भावार्थ आहे.

समाजातील सर्व माणसे जन्मापासून सामाजिक निर्बंधांच्या कारागृहात वावरत असतात, म्हणून ती सर्व भावनाग्रस्त मनोविकृतीने पछाडलेली असतात, हा फ्रॉइडचा सिद्धांत अनेक आस्तिक व धार्मिक मनोविश्लेषणशास्त्रज्ञांना मान्य होत नाही कारण रोगट कल्पनाजालांच्या बंधनातून मुक्त ऐहिकवादी धर्मनिरपेक्ष विचारांचे फ्रॉइडसारखे शास्त्रज्ञ किंवा अज्ञेयवादी तत्त्वज्ञ वा विज्ञानवेत्ते प्राचीन काळापासून समाजात वावरलेले दिसतात. म्हणून कठोपनिषदात म्हटले आहे, की मनुष्य मेल्यावर सर्वच संपते आत्मा वगैरे काही शिल्लक राहत नाही. असे म्हणणारे परलोक न मानणारे विचारवंतही असतात. दुसरे असे, की पूजा, ध्यान, प्रार्थना इ. धार्मिक साधनांनी अनेक मनोविश्लेषणशास्त्रज्ञ किंवा धर्मगुरू अथवा संत माणसांचे मानसिक किंवा शारीरिक रोग बरे करतात. धर्म ही रोगट मनोवृत्ती असेल, तर रोग, विशेषतः मनोरोग, बरे न होता वाढावयास पाहिजेत. कल्पनाजाल हे रोगट व निरोगी असे दोन प्रकारचे असते. वैज्ञानिक संशोधकांच्या ठिकाणी कल्पनाजाल निर्माण करण्याची विलक्षण शक्ती असते. म्हणून ते अवलोकिलेल्या वा प्रयोगाने निश्चित केलेल्या तथ्यांवरून गृहीतके निश्चित करतात हे निरोगी कल्पनाजालाचे म्हणजे कल्पनाविलासाचेच कार्य आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी रामायणरचनाकाली पुष्पक विमानाची कल्पना माणसास आली, विमानाच्या या अनेक युगांपूर्वीपासून निर्माण झालेल्या कल्पनेमुळेच खरे वास्तव विमान माणूस निर्माण करू शकला. मंत्राने रोग बरे करण्याची कल्पना अनेक युगे माणसाने हृदयाशी बाळगली म्हणून आश्चर्यकारक रीतीने रोग बरे करणारी औषधे मनुष्य निर्माण करू लागला. मनुष्य दृश्य वास्तवाच्या पलीकडे कल्पनेने पाहतो, म्हणूनच जीवनाची नवीन नवीन साधने निर्माण करू शकतो.

धर्मकल्पना किंवा धर्मभावना यांच्या योगाने माणसात धैर्य निपजते, शौर्याने कामे करण्याचा उत्साह उत्पन्न होतो. धार्मिक उपासनांच्या बळावर अपार परिश्रमांनी आणि प्रयत्नांनी ऐहिक जीवनात तो यशस्वी होऊ शकतो. म्हणून धर्मभावना आणि धार्मिक कल्पना ह्या केवळ मनोरोगातूनच निर्माण होतात असे नाही, तर मनाच्या शुद्ध सामर्थ्यातूनही निर्माण होतात, असे मानावे लागते. धार्मिक पंडित धार्मिक उपासनेच्या बळामुळे व्याकरण, न्याय, ज्योतिष इ. शास्त्रे निर्माण करू शकतात अनेक धार्मिक शूरवीर धार्मिक श्रद्धेच्या बळावर युद्धे जिंकतात आणि कलाकार, शिल्पकार धार्मिक श्रद्धेच्या बळाने महनीय कृती निर्माण करतात. या गोष्टीचे प्रत्यंतर सुसंस्कृत समाजांच्या इतिहासामध्ये वारंवार मिळते म्हणून धर्मभावनेचे मूळ अधिष्ठान, फ्रॉइड म्हणतो त्याप्रमाणे, अबोध आत्मा किंवा मन आहे हे जरी खरे असले, तरी ते विकृतिजन्य आहे याचे निश्चित गमक मिळत नाही. माणसे विवेक व विचार यांच्या साहाय्यानेच सामाजिक निर्बंध निर्माण करतात आणि विवेकशक्तीच्या प्रबोधनामुळे बाल्यावस्थेतून उत्तीर्ण झालेली मने त्या निर्बंधांची विवेकपूर्णता ओळखून त्यांचे पालन करतात. याला फ्रॉइड भावनांचे व मनःप्रवृत्तींचे उन्नयन (सब्लिमेशन) म्हणतो. विवेक (रीझन) ही मानवी मनाची महत्त्वाची निराळी देणगी आहे. विवेक मनोविकृति निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतो. कित्येकदा विवेक हाही धर्मभावनांचा महत्त्वाचा घटक बनतो असे दिसते.


आधुनिक मनोविश्लेषणशास्त्रज्ञ ⇨ सी. जी. युंग (१८७५—१९६१) याच्या मते धर्मानुभव घेणारी व्यक्ती हाच मुख्य धर्माचा आधार होय. माणसाच्या बोधयुक्त मनाखाली अबोध आत्मा असतो. या आत्म्यात मनुष्यजातीच्या प्राथमिक अवस्थेपासूनच्या अनुभवांचा साठा असतो. मनुष्यत्व प्राप्त होण्यापूर्वीचाही अनुभवसंचय त्यात असतो. या अबोध आत्म्याच्या बळामुळे धर्मतत्त्वे व्यक्तीच्या अनुभवाचा विषय बनतात व त्यानंतरच संस्थारूप धर्म निर्माण होतो. आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत पोहोचलेल्या व्यापक अबोध आत्म्याची प्रेरणा असलेल्या व्यक्ती धर्मसंस्थेच्या बाहेर पडतात आणि धार्मिक अनुभव घेतात. उदा., धर्मसंस्थापक, संत, योगी यांना जेव्हा अमर चिरंतन सर्वव्यापी अबोध आत्म्याची प्रेरणा लाभून प्रकटीकरण लाभते, तेव्हा ते संस्थांच्या बाहेर पडलेले असतात. नंतर संस्थारूप धर्म निर्माण करून त्यात ते सामील होतात. या प्रक्रियेलाच युंग व्यक्तीभवन (इंडिव्हिज्युएशन) असे नाव देतो. वैयक्तिक धार्मिक अनुभवस्थितीलाच ही संज्ञा आहे. यात व्यक्ती स्वायत्त बनते.

जन्मापासूनच्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अबोध मन वा आत्मा होय, असे फ्रॉइड मानतो. व्यक्तीचे मन हे केवळ वैयक्तिक मन नसते तर मानवपूर्वस्थितीतील आणि मानवाच्या उदयापासूनच्या अनंत अनुभवांचा म्हणजे मानवजातीच्या अनुभवांचा तो साठा असतो, असे युंग म्हणतो. तो असेही म्हणतो, की अबोध मन हे सामुदायिक मन असते. हा अबोध आत्मा पूर्वानुभवांच्या साहाय्याने माणसाच्या स्पष्ट जाणिवेच्या प्रवाहाला मार्गदर्शन करतो. प्रतिक्षणी जाणीव ही अत्यंत अल्प विषयाचे ग्रहण करीत असते, तिच्या मर्यादेत फारच थोडे असते परंतु या जाणिवेच्या योगाने इच्छाशक्तीने प्रबोधन होऊन क्रिया घडत असतात. कुशल चित्रकार अचूक रीतीने चित्र निर्माण करतो, त्यात जाणिवेचा भाग थोडा व उद्देशही अस्पष्ट असतो परंतु अबोध मनातील अनुभवांच्या साठ्यामुळे तो यशस्वी होतो. गणिती, शास्त्रज्ञ, कवी, निबंधकार, यंत्रनिर्माता, अभियंता इ. सर्वांच्या यशस्वी कृतींना अबोध मनाचे संपूर्ण सहाय्य असते. यशस्वी कृतीची अंगोपांगे व परिसर यांची जाणीव अपुरी असूनही कृतीला पूर्णरूपता येते.

अबोध मनात सहजप्रेरणांचा वास असतो. जीवनातील अपूर्णता पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सहजप्रेरणा दैनंदिन स्पष्ट जाणिवांच्या पातळीखाली राहून इच्छा, भावना व जाणीव यांचे साहाय्य घेत असतात. खोल दरी, प्रचंड प्राणी, वादळ, आगीचा भडका इत्यादींपासून पळून जाण्याच्या प्रेरणेतून भयभावना उत्पन्न होते, मातृप्रेरणा वात्सल्यभावना जागृत करते, शोधक प्रेरणा आश्चर्य निर्मिते, शरणप्रेरणेने नम्रतेची भावना तयार होते. काही भावना ह्या अनेक भावनांचा संकर असतो, त्यालाच जटिलभावना म्हणतात. उदा., आदरभावनेत सुख, आश्चर्य व नम्रता यांचा संकर असतो. या संकरात भयभावना मिसळली, की भव्यतेची भावना निर्माण होते. तिच्यासह धार्मिक भावना उच्चतम भावना बनते. त्या भावनेत विश्व, संपूर्ण जीवन यांची प्रतिक्रिया असते किंवा प्रतिबिंब असते. ज्या प्रकारची व्यक्ती असेल, त्या प्रकारे धर्मभावनांचे खालचे-वरचे थर तयार होतात. सहजप्रेरणांचा रोख अपूर्णता निरस्त करून पूर्णतेकडे जाणे असा असतो. माणसाच्या सहजप्रवृत्तींचे पूर्णतेकडे असलेले आकर्षण म्हणजेच धार्मिक प्रेरणा होय. ही पूर्णता निरनिराळ्या सांस्कृतिक कालखंडात, निरनिराळ्या धर्मांमध्ये, निरनिराळ्या प्रकारे वर्णिलेली दिसते. धर्म म्हणजेच पूर्ण शांतीचा, पूर्ण समाधानाचा मार्ग होय, असे अनेक धर्मशास्त्रे सांगतात हे याचे उदाहरण होय.

बहिःप्रक्षेपण : सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परमदयामय असा ईश्वर आहे आणि त्याचे सहाय्य, सान्निध्य किंवा तादात्म्य प्राप्त करून घेता येते, अशी जीवनाच्या पूर्णतेची कल्पना सर्व ईश्वरवादी धर्मांनी गृहीत धरलेली असते. ही कल्पना म्हणजे मनाने केलेले बहिःप्रक्षेपण होय, असे एसन्स ऑफ क्रिश्चॅनिटी  या पुस्तकात जर्मन तत्त्वज्ञ ⇨ लुडविग फॉयरबाख (१८०४—७२) याने प्रतिपादिले आहे. तो म्हणतो, की मनुष्याला ज्ञान व सुख अपुरे असते भयनिवारणशक्ती, जीवनसाधने निर्माण करण्याची शक्ती फार अपुरी असते. त्याला निसर्गाचे भय असते निसर्गावर पूर्ण ताबा मिळविण्याची शक्ती नसते. सर्व विश्वाचे ज्ञान व्हावे, निरंतर आनंद मिळावा, संपूर्ण विश्वावर ताबा मिळवावा अशी अदम्य इच्छा असते. क्लैब्याची म्हणजे असामर्थ्याची व अपूर्णतेची जाणीव त्याला डाचत असते. याच जाचातून बाहेर पडण्याचा प्रयत्न म्हणजे सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, दयामय आणि कृपाळू ईश्वराची कल्पना करून तो खरोखर आहेच, असे बहिःप्रक्षेपण तो करतो. हे त्याचे स्वतःच्याच अपूर्ण आत्म्याचे पूर्ण रूपातले ⇨ प्रक्षेपण आहे. फॉयरबाखच्या या विचारांचे ⇨ कार्ल मार्क्स (१८१८—८३) याने स्वागत करून त्याचे सामाजिक व आर्थिक दृष्टीकोनातून मूल्यमापन केले. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे : देवाच्या इच्छेनेच सर्व काही घडत असते, देवाची कृपा झाली म्हणजे सर्व तऱ्हेची दुःखे, संकटे वा हालअपेष्टा टळतात, असा धर्मसंस्थेचा एक महत्त्वाचा मूलभूत सिद्धांत आहे. धर्मसंस्था ही उच्च धनिक सत्ताधारी वर्गाने निर्माण केलेल्या विचारसरणीतून निर्माण झालेली संस्था आहे. आजपर्यंतची समाजरचना शोषक व शोषित अशा भिन्नभिन्न वर्गांची रचना आहे. शोषित वर्गाने बिनतक्रार अशी ही विषम समाजरचना मान्य करून जगावे. वरिष्ठ, सत्ताधारी शोषक वर्गाच्या विरुद्ध बंड करून उठू नये, शांतता राखावी याकरता समाजातील विषमतेची व सुखदुःखांची सर्व जबाबदारी देवावर टाकली व ती देवाची संकल्पना शोषित वर्गाने खरी मानली. तात्पर्य, धर्म म्हणजे शोषित बहुजनसमाजाला चारावयाची अफूची गोळी ठरली. या अफूच्या नशेत राहून हा शोषित वर्ग निमूटपणे शोषणजन्य दुःखे सहन करू शकतो. धर्म हा परमशांतीचा मार्ग आहे, या सिद्धांताचा हाच गर्भितार्थ आहे. शोषक व शोषित अशी समाजरचना बदलून साम्यवादी समाजरचना स्थापित झाली म्हणजे अशा तऱ्हेच्या अफूच्या गोळीची गरज राहणार नाही. शोषित वर्ग शोषित राहणार नाही. संघटित शोषित वर्गच साम्यवादी समाजरचना क्रांतीच्या द्वारे करू शकेल. या क्रांतीच्या पूर्वतयारीच्या स्थितीत शोषित वर्गाच्या बुद्धीचा विकास होतो. आपल्या दुःस्थितीला कारण सत्ताधारी वर्गाचे राजकारण व अर्थकारण आहे, त्याचे कारण देव नाही अशा तऱ्हेचा विचार म्हणजे बुद्धिवाद जेव्हा प्रभाव गाजवू लागतो, तेव्हाच शोषित वर्ग क्रांतीचा उठाव करून साम्यवादी क्रांतिकारक समाजरचना निर्माण करतो. मानवी इतिहासाचा कर्ता माणूस आहे, देव नाही असा इतिहासवादाचा मूळ सिद्धांत लक्षात घेऊन दलित वर्ग समाजवादी व साम्यवादी क्रांतीकरिता सिद्ध होतात [⟶ क्रांति — २].


धर्म व समाज : सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञांना असे आढळले आहे, की गेल्या दीडशे-दोनशे वर्षांत पृथ्वीवर पसरलेल्या प्राथमिक अवस्थेतील मानवी समाजांपासून तो औद्योगिक व वैज्ञानिक क्रांती पूर्ण झालेल्या समाजांपर्यत धर्मसंस्था नाही, असा एकही समाज आढळत नाही. समाजात धर्म न मानणाऱ्या नास्तिक व्यक्ती व त्यांच्या सामुदायिक संघटना अपवादादाखलच सापडतात. धर्म हा मानवी मनाची निर्मिती आहे. मनुष्याच्या मनाला निसर्गनियमांचे आकलन होते परंतु संपूर्ण आकलन होत नाही. जेथे निसर्गनियमांचा इष्टाशी किंवा कल्याणाशी संबंध मनाला बांधता येत नाही, तेथे मन निसर्गातीत अलौकिक शक्तीची संकल्पना करते. ईश्वरोपासना, कर्मकांड, प्रार्थना, यज्ञ, यातुविद्या इत्यादिकांची फलिते किंवा तज्जन्य चमत्कार निसर्ग नियमाला अपवाद आहेत हे जरी खरे असले, तरी निसर्गनियम व धर्मनियम हे एकमेकांत गुंतलेले असतात त्यांचा संबंध गृहीत धरलेला असतो. निसर्गनियमांचाही आधार घेऊन अलौकिक शक्ती कार्य करीत असतात. निसर्गाचे नियंत्रण त्या करतात, म्हणून निसर्गापेक्षा त्या श्रेष्ठ मानलेल्या असतात. या सर्व श्रेष्ठ शक्तींच्या नियामकतेचा सामाजिक नियमबद्धतेशीही धर्मसंस्थेने संबंध जोडलेला आहे तो असा : सामाजिक जीवनाला व्यापक नियमबद्धतेची आवश्यकता असते. वस्तुतः व्यापक सामाजिक नियम माणसेच निर्माण करतात परंतु माणसांना सामाजिक नियमन करण्यात आपली शक्ती अपुरी आहे, असे दिसून येते. आपले सामाजिक हितसंबंध नियमनाच्या अभावी बिघडतात, म्हणून माणसापेक्षा वरिष्ठ अशी निसर्गनियामक अलौकिक शक्ती माणसांनी संकल्पिलेली असते त्याच संकल्पनेच्या आधारावर सामाजिक जीवनाचे नियंत्रण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केला जातो. हीच सामाजिक न्यायाधीश असलेल्या उच्चतम सत्ताधारी देवाची संकल्पना होय. देवाधीन वा देवनियंत्रित समाजजीवन ही शांततापूर्ण मोठ्या सामाजिक-राजकीय गटांची गरज असते. वरिष्ठ सत्ताधारी दिव्य शक्तीची संकल्पना व्यवस्थित रीतीने सामाजिक कायद्यांचे नियमन करू शकते, याचे कारण ती विश्वाचेही नियमन करते. त्यातच तिचे वरिष्ठत्व आहे. समाजाच्या या राजकीय अवस्थेत चिरंतन, सुसंबद्ध असे हे विश्व आहे, अशा तऱ्हचे बौद्धिक आकलन व्हावयास लागते अशा बौद्धिक आकलनाचा ध्यास वाढतो. हा तत्त्वज्ञानाच्या उदयाचाच समय होय. या आकलनाचे मूळ हवापाण्याचे व ऋतूंचे कालचक्र यांचे ज्ञान होय. स्थिर कृषिप्रधान आर्थिक जीवनाचे अधिष्ठान हे कालज्ञान असते. आणखी असे, की नवेनवे संकेत ठरून मानवी जीवन वाढते व बदलत जाते. मानवी संबंध बदलत असताना व वाढत असताना नियमबद्ध करावे लागतातच. माणसांचे परास्परावलंबित्व व परास्परांवरील क्रिया-प्रतिक्रिया अशा नियमांच्या पालनानुरोधाने घडत असतात. या नियमांच्या पाठीशी दैवी संकेताचे बळ आवश्यक ठरते. आणखी असे, की भागीदार, मित्र, अधिकारी व प्रशासक वर्ग यांची कार्ये अभिवचनावर चालत असतात. सामाजिक व आर्थिक संबंधांची वाढ दिलेल्या शब्दामुळे होत असते. दुसरा मनुष्य कसा वागेल, याचा अंदाज आल्यामुळेच जबाबदारीच्या विश्वात माणूस नैतिक विश्वास असेल तरच आत्मीयतेने जगू शकतो. ज्या श्रेष्ठ देवाला शरण जाऊन मनुष्य रक्षण व तारण व्हावे असे अपेक्षितो, तो देव ही सामाजिक व नैतिक नियमबद्धता निर्माण करतो किंवा तिचे पालन व्हावे असे इच्छितो त्याच्या इच्छेचा विषय ती नियमबद्धता असते.

या नियमबद्धतेचे पालन देवसमुदाय वा एकटा एक श्रेष्ठ देव करतो. ही नियमबद्धता स्वयंसिद्ध असते किंवा देवनिर्मित असते. वैदिक ऋषी देवांना नियमबद्धतेचे म्हणजे ऋतांचे रक्षक मानतात. ऋत हे स्वतःसिद्ध व अबाधित असते. देव ऋतातून जन्मतात आणि ऋताचे रक्षण करतात. ग्रीक धर्मात दैव (फेट) देवांनाही टाळता येत नाही. यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम हे धर्म नियमबद्धता ईश्वरनिर्मित असते, असे मानतात. ती स्वतःसिद्ध असो अथवा देवनिर्मित असो, ती समजावून घेण्यानेच मनुष्य आपला जीवनमार्ग व्यवस्थित आक्रमिण्यास समर्थ होतो, असे सर्व धर्म मानतात. ईश्वर जीवात्म्याच्या कर्मानुसारे म्हणजे पाप व पुण्य यांच्याप्रमाणे जीवात्म्याला फल देतो, जीवात्म्यांच्या कर्मानेच विश्वव्यवस्था चालते, असे हिंदू, बौद्ध व जैन धर्म मानतात. यासच कर्मसिद्धांत म्हणतात [⟶ कर्मवाद]. हा कर्मसिद्धांत प्रथम क्षत्रियांना म्हणजे राज्यकर्त्यांना सुचला म्हणून क्षत्रियांच्या हाती राज्यशासन राहिले, असे उपनिषदांत म्हटले आहे. चिनी धर्माप्रमाणे म्हणजे ⇨ कन्फ्यूशस व ⇨ लाव ज (लाउत्स) यांच्या विचारसरणीप्रमाणे वैश्विक आणि सामाजिक व्यवस्थेला देवदेखील बांधलेले आहेत.

धर्म व सामाजिक वा आर्थिक जीवन : धार्मिक आचरणाची दोन स्वरूपे होत : नैसर्गिक आणि सांकेतिक. नैसर्गिक आचरण मुख्यतः धर्माच्या प्राथमिक स्थूल अवस्थेत घडत असते. उदा., मृतांची अंत्यक्रिया करताना त्याला अत्यंत प्रिय असलेल्या बायको, दास इ. व्यक्ती कुत्रा, गाय इ. प्राणी वस्त्रे, आयुधे, अलंकार त्याला लागणारे अन्नपाणी त्याच्या बरोबर पुरतात किंवा जाळतात. पवित्र वृक्षदेवतेला खतपाणी देणे, अग्निदेवतेला समिधा व आहुती देणे, देवदेवतांच्या मूर्तीला स्नान घालून वस्त्रे नेसवणे, माळा घालणे थोडक्यात, पंचोपचार, षोडशोपचार इ. प्रकारे पूजा करणे देवाला दुपारची वामकुक्षी आणि रात्रीची निद्रा हवी म्हणून शय्येवर निजवणे, त्याकरिता मंदिराच्या गर्भगृहाचे दार बंद करणे स्तोत्र, गायन व नृत्य यांनी रंजविणे नमस्कार इ. उपचार करणे, या नैसर्गिक आचरणाच्या बाबी होत. तप, व्रत व उपवास पवित्र व अपवित्र दिवस मानून तद्‌नुसारे वर्तन करणे विशिष्ट मंत्राचा जप करणे विशिष्ट दिशेस संमुख होऊन पूजा वा प्रार्थना करणे वैष्णवांची एकादशी, शैवांची कृष्णचतुर्दशी किंवा शिवरात्र, ख्रिश्चनांचा रविवार, मुसलमानांचा शुक्रवार हे पवित्र दिवस मानून त्या दिवशी काही व्रतांचे वा निर्बंधाचे पालन करणे तुळशी, रुद्राक्ष इत्यादिकांच्या माळा, भगवी, पिवळी, काळी इ. रंगाची वस्त्रे, भस्म, गंध, ⇨ ताईत इ. धारण करणे विशिष्ट स्थान, गाव इ. पवित्र मानून त्यांच्या यात्रा करणे समाधी, थडगे इत्यादिकांचे दर्शन घेणे इ. सांकेतिक धार्मिक आचरणाचे प्रकार होत. हे प्रकार निसर्गतः नव्हे, तर पौराणिक मिथ्यकथांच्या योगाने निश्चित केले जातात.

नैसर्गिक वा सांकेतिक आचरणांचे घटक व त्यांच्या अवस्था स्थिर होऊन त्यांच्या प्रथा निर्माण होतात. या प्रथांनाच कालांतराने अपरिवर्तनीय नियमबद्ध स्वरूप प्राप्त होते. पवित्र ते पवित्रच व अपवित्र ते अपवित्रच असा सामाजिक संकेत निर्माण होतो. हे सर्व धर्मग्रंथात ग्रथित होते व हे धर्मग्रंथ नित्य पूज्य ठरतात.

एकमेकांपासून अलग राहणाऱ्या मानवगटांचे निरनिराळे संप्रदाय तयार होतात. प्रत्येक गटाच्या देवदेवता, त्यांच्या त्यांच्या भौतिक व आर्थिक परिस्थितीत निर्माण होत असतात. उदा., काही गटांच्या संस्कृतीत जलदेवतांना, काहींच्या संस्कृतीत भूदेवतांना, तर काहींच्या संस्कृतीत अग्निदेवतांना प्राधान्य येते. हीच गोष्ट सूर्यदेवता, चंद्रदेवता, नक्षत्र-ग्रहदेवता यांनाही लागू आहे. वेदपूर्वकालीन भारतीय संस्कृतीत जलदेवतांना प्राधन्य होते. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी इ. जलदेवतांची पूजा या संस्कृतीत महत्त्वाची ठरली होती, असा कयास आहे. तिचे महत्त्व अजूनही संपलेले नाही. वेदांच्या संस्कृतीत पहिल्यांदा अग्नी व सूर्य या देवांना प्राधान्य आले. अग्निदेव सर्व अग्नींमध्ये एकच आहे, असे मानले गेले त्याचप्रमाणे अनेक निरनिराळे अग्निदेवही मानले गेले. हीच गोष्ट जलदेवतेलाही लागू आहे. गंगा, यमुना इ. अनेक देवता मानल्या गेल्या आहेत. गंगेच्या काठचे मानवी गट गंगादेवता आणि यमुनाकाठचे मानवी गट यमुनादेवता मानू लागले. भयनिवारणार्थ व हितसाधनार्थ असे अनेक देव माणसांनी कल्पिले.


धर्म व राज्यसंस्था : अनेक पृथक् पृथक् मानवी समाज एकत्र येऊन राहू लागले. त्यामुळे त्यांचे देवही एकत्र येऊ लागले. योगायोगाने व अव्यवस्थित रीतीने प्रथम तयार झालेले अनेक देव अव्यवस्थित रीतीने पूजिले जातात. वेदांमध्ये ⇨ अनेकदेवतावाद वा बहुदेवतावाद दिसतो. वैदिक देवतांमध्ये विशेष सुसंगती दिसत नाही परंतु सुसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो. प्रमुख, प्रभावी, अधिक सुसंस्कृत वा सत्ताधारी गटांचे वर्चस्व जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा प्रभावी गटाचा धर्मसंप्रदायही वर्चस्व गाजवू लागतो व हे वर्चस्व सत्तेच्या दुय्यम स्तरावर असलेले गट स्वीकारतात. देवतांची उच्चनीच स्थानांमध्ये अदलाबदल होते.

अनेक गटांमिळून निर्माण झालेल्या समाजांची छोटी छोटी राज्ये तयार होतात. राज्यांचे सामाजिक, सामुदायिक आचारधर्म म्हणजेच सामाजिक संस्थाचे विधिनिषेध अथवा कायदे तयार होतात. या कायद्यांना निधर्मी रूप पहिल्या अवस्थेत नसते. त्यांना धार्मिक रूढीचे रूप असते. प्रत्येक राज्याचे आचारधर्म काहीसे भिन्न असतात. उदा., ग्रीक धर्मसंस्था. राज्यसंस्था मोठी बनते तेथे राष्ट्रधर्म निर्माण होतो. उदा., यहुदी धर्म, रोमन धर्म, चिनी धर्म किंवा हिंदूचा वर्णाश्रमधर्म हे या संदर्भात राष्ट्रधर्म म्हणून मानण्यास हरकत नाही. कुलदेवता, ग्रामदेवता [⟶ ग्रामदैवते], नगरदेवता, गणदेवता, राज्यदेवता अशा अनेक देवता राष्ट्रधर्मात अंतर्भूत होतात. समाजसंघटना राजकीय बनते तेव्हा कुल, ग्राम, नगर, गण इत्यादिकांच्या देवता राज्यदेवतेच्या उपदेवता बनतात. ऋग्वेदातील समाजाचा इंद्रदेव हा युद्धदेव बनला युद्धदेव बनून राज्यदेव हे स्वरूप त्याला प्राप्त झाले. ऋग्वेदातील समाजाचा ऋग्वेदपूर्वकालीन राज्यदेव वरूण होता. त्याचे ‘मुख्य देव’ हे स्थान जाऊन ते स्थान इंद्राला प्राप्त झाले. राजकीय दृष्ट्या विजयी समाजाचा मुख्य देव जित समाजाच्या देवापेक्षा अधिक श्रेष्ठ मानला जातो. भारतात वैदिक समाज स्थिरावल्यानंतर अवैदिक समाजाचा प्रभाव वाढला. त्यामुळे इंद्रापेक्षा अवैदिक समाजाचे शिव आणि विष्णू हे देव मुख्य बनले.

भारतात अवैदिक व वैदिक अशा अगणित देवदेवतांचा समूह मान्यता पावला. भारतीय हिंदू समाज वेदकालापासून आतापर्यंत बहुदेवतावादीच राहिला. निरनिराळ्या सामाजिक गटांनी एक कोणता तरी देव वरिष्ठ व इष्ट मानला असे जरी दिसते, तरी एक-इष्टदेवतावादी समाजांनी बहुदेवतावादाचा त्याग केलेला दिसत नाही. त्या बाबतीत अनिश्चिततेचे स्वरूप कायम राहिले. ज्या नैसर्गिक भौतिक शक्तींच्या देवता असतात त्यांची विशिष्ट सामर्थ्ये ही त्या नैसर्गिक भौतिक वस्तूंचीच सामर्थ्ये असतात परंतु नैसर्गिक भौतिक शक्तींचे वैशिष्ट्य ज्या देवतेच्या स्वरूपातून वगळले जाऊ लागते, त्या देवतेचे वैशिष्ट्य मात्र कायमच राहते. सरस्वती ही मूळची एक भारतीय नदी होय ती नदी विद्यमान भारतीय सरस्वतीच्या स्वरूपातून वगळली गेली आहे. भारतीय समाजात विद्येला महत्त्व आले, ते सरस्वती नदीच्या काठी म्हणून ⇨ सरस्वती ही विद्यादेवता म्हणून मानली गेली असावी. ⇨ इंद्र, ⇨ वरुण, ⇨ ब्रह्मदेव, ⇨ विष्णू, शिव [⟶ शिवदेवता] आणि ⇨ गणपती वा गणेश या देवता कोणत्या भौतिक शक्तीचे प्रतिनिधित्व करतात, हे सांगणे जरा कठीण आहे परंतु बल, साम्राज्य, जनन, स्थैर्य, विनाश व विघ्ननाश ही क्रमाने वरील देवतांची सामर्थ्ये म्हणून मानली आहेत. असे असले, तरी वरीलपैकी ज्या देवास उपासक इष्ट व श्रेष्ठ मानतो, त्याच्या दृष्टीने त्या देवात वरील सर्व सामर्थ्ये एकवटलेली असतात. माणसाच्या नैसर्गिक व सामाजिक परिस्थितीवर देवांची स्वरूपे जशी अवलंबून असतात, त्याचप्रमाणे देवतागणांमध्ये कोणता देव श्रेष्ठ ठरतो वा एकटाच देव बनतो, हेही अवलंबून असते. यहुदी व इस्लाम धर्मांनी एकच एक देव तत्त्वतः मानला. कोणत्याही उच्च ⇨ एकदेवतावादी धर्मांमध्ये एकदेवतावादाबरोबर अनेक उपदेवता वा ⇨ सैतान, ⇨ राक्षस, ⇨ असुर यांच्या अस्तित्वाची कल्पनाही कायम राहिली आहे. बहुदेवतावाद हा शुद्ध एकदेवतावादाच्या खाली कायम झाकलेला राहिला आहे. याचे कारण, धर्म व अर्थिक जीवन यांचा सांधा पक्का राहिलेला असतो. तो लवकर निखळत नाही. पशुरक्षण व पशुसंवर्धन, वंशवृद्धी, कृषिसमृद्धी, वर्षण, अतिवर्षण, अवर्षण, रोगोत्पत्ती व रोगनिवारण, जन्म, मृत्यू व दीर्घायुष्य, माणसांचे संबंध इ. गोष्टी देवताधीन असतात असे मानले जात असल्यामुळे अनुकूल होण्याकरिता त्या त्या देवतांची साधना व आराधना करावीच लागते. सूर्य आणि आकाशातील ग्रह-नक्षत्रादी तारका यांचे प्रभुत्व पृथ्वीवरील जीवनावर चालते. त्याचप्रमाणे भूदेवता अथवा मातृदेवता [⟶ आदिमाता] यांचे आधिपत्य पृथ्वीवर चालते. भूदेवता आणि सूर्यादी आकाशस्थ देवता यांचा कृषिकर्माशी संबंध असतो. म्हणून इष्ट-श्रेष्ठ एकदेववादी किंवा एकदेवतावादी समाजांमध्ये बहुदेवतावादाला स्थान राहतेच.

विश्वव्यवस्था व सामाजिक व्यवस्था यांचे नियंत्रण करणारा बहुदेवसमूह असून त्या देवसमूहामध्ये सुसंगती राखणारा असा एकच श्रेष्ठ देव आहे, असा बुद्धिवादी विचार विकसित उच्च धर्मसंस्थेचा पाया बनतो. नभोमंडलातील तारांगणाची व ग्रहणाची नियमबद्ध व्यवस्था व अबाधितपणे चालणारे नियमित गतिचक्र, सूर्यचंद्रांचे नियमित उदयास्त, वार्षिक ऋतुचक्र ही विश्वव्यवस्थेची गमके होत. सामाजिक जीवनातील आर्थिक उत्पादन व वितरण आणि त्याचप्रमाणे निरनिराळ्या व्यवसायांचे परस्परावलंबित्व या गोष्टी सामाजिक व्यवस्थेची गमके होत. विश्वव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्था यांचे नियामक वरुण व मित्र हे देवताद्वंद्व प्रथम वेदकालीन धार्मिक पुरोहितांनी कल्पिले व पूजिले. परंतु वैदिक लोक भारतात आले तेव्हा युद्धव्यवसायी क्षत्रिय आर्यांना अनेक शतके युद्धव्यवसाय चालवावा लागला. त्यामुळे मेघांचा देव इंद्र याला प्राधान्य देऊन वरूण व मित्र या द्वंद्वाला काहीसे दुय्यम स्थान आले. अनेक देवांमध्येच एकच श्रेष्ठ देव आहे किंवा एकच एक श्रेष्ठ ब्रम्ह वा परमात्मा देव आहे, अशा प्रकारचे विचार उपनिषदांतील ऋषींनी सांगितले. एकदेवतावाद यहुदी धर्माचे प्रेषित आणि ग्रीक तत्त्वज्ञ यांनी पुरस्कारिला. भारतात अनेक गणराज्यांनी मिळून निर्मिलेली राजसंस्था, ब्राम्हणांचे सार्वत्रिक वर्चस्व, इराणी, रोमन वा चिनी साम्राज्य ज्या कालखंडात निर्माण होऊ लागले, त्याच कालखंडात हे विचार निर्माण झाले. अनेक गणराज्यांचे एकीकरण, सार्वत्रिक एकमुखी वर्चस्व किंवा साम्राज्य स्थिरावण्यास हे विचार सामर्थ्य देतात. एकदेवतावाद किंवा श्रेष्ठ-एकदेववाद मानणारी विचारसरणी जेव्हा प्रभाव गाजवू लागते, तेव्हा तिचा प्रभाव सर्वसामान्य जनांच्या विविध स्तरांवर कमी पडतो. म्हणून कोणत्याही प्रगल्भ समाजसंस्थेत अधिकाराचे वा सत्तेचे उच्चनीच स्तर राहतात, तसे धर्मांचेही उच्चनीच स्तर टिकाव धरून राहतात. धर्मगुरू, पुरोहित, मांत्रिक, पाद्री, मौलाना, मौलवी हे उपदेवतांना राबविण्याचे कार्य सोडत नाहीत किंवा मंत्रतंत्र व महंत यांचीही महती उपदेवतांपेक्षा कित्येकदा अधिक मानली जाते.

धर्म व पुरोहितवर्ग : पुरोहित, धर्मोपाध्याय, ⇨ आचार्य हे धर्मसंस्थेचे व धार्मिक समाजसंस्थेचे अधिकारी असतात मग ते नेमलेले असोत अथवा न नेमलेले असोत. खऱ्या ⇨ पुरोहिताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला धर्मविद्येच्या सिद्धांतांचे ज्ञान असावे लागते. मात्र त्या त्या धर्माचे द्रष्टे, ऋषी, महात्मे, संत अथवा प्रेषित हे पुरोहितांपेक्षा श्रेष्ठ असतात. पुरोहितवर्ग हा सामाजिक संघटनेचा भाग असतो. सामाजिक संस्थेत त्याला निश्चित स्थान असते. सामाजिक संघटनेच्या आचारधर्माचा तो उपदेशक, न्यायाधीश आणि नियंत्रक असतो. पुरोहितांचा वर्ग वा जातही असते. हा वर्ग किंवा जात सामाजिक संस्थेतील एक उच्च श्रेणी म्हणून निश्चितपणे मानलेली असते. हिंदू, यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम यांच्या समाजसंस्थेत आचारधर्म व नीतीधर्म यांचा प्रशासक पुरोहितवर्ग निर्माण झाला, तसा चिनी समाजसंस्थेत वा भारतातील प्राचीन बौद्ध धर्मात निर्माण झाला नाही, ही गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे. प्राचीन बौद्ध धर्माच्या बौद्ध भिक्षूंचा सामान्य गृहस्थाच्या विवाहादी संस्कारांशी संबंध नव्हता. ब्राम्हण पुरोहितच बौद्धानुयायी गृहस्थी जीवनातील आचारधर्माचा प्रशासक राहिला. भारतात बौद्ध धर्म अस्त पावला याचे हेही एक महत्त्वाचे कारण संभवते. धर्मविद्येचे अध्यापन करणे धर्मदीक्षा देणे पूजा, यज्ञ, उपासना यांचे शिक्षण देणे धार्मिक कर्मे धार्मिक व्यक्तीकडून करवून घेणे जन्म, नामकरण, विवाह, अंत्यकर्म इ. सामाजिक कर्मातील धार्मिक विधी यजमानाकरिता करणे वा करवून घेणे सामाजिक व धार्मिक निर्बंधाचा अतिक्रम झाला की नाही, यासंबंधी न्यायनिर्णय घेणे इ. पुरोहितवर्गाची कार्ये होत.


धर्म व समाजसुधारणा : धर्मसंस्था ही परंपरागत समाजसंस्थेचे आणि त्या संस्थेतील व्यक्तींचे परंपरागत व्यवहार व परस्परसंबंध स्थिर ठेवून ते दृढ करण्याचाच प्रयत्न करते. समाजपरिवर्तन आणि समाजसुधारणा करण्याचे ती साधन नसते. रूढीचे रक्षण आणि दृढीकरण हेच कार्य धर्मसंस्थेचे असते, असे काहींचे मत आहे परंतु ते एकांगी आहे. धर्माचा जो इतिहास आज उपलब्ध आहे त्यावरून समाज परिवर्तन, समाजसुधारणा व रूढींचे परिवर्तन हेही धर्माचे आणि धर्मसंस्थांचे कार्य आहे, हे निश्चित करता येते. हे कार्य केल्यावर धर्म हा स्थितिशील समाजसंस्था निर्माण करून सर्व प्रकारच्या समाजसंस्थांच्या व कायद्याच्या गतिशीलतेला पूर्ण बंदी घालतो प्रगतीचा शत्रू बनतो. कारण मानवी विवेकशक्तीवर पारलौकिक श्रद्धेचे तो बंधन घालतो. पारलौकिक श्रद्धेचा आधार देव वा देवाचा प्रतिनिधी असतो. माणूस त्याच्यापुढे दुर्बल व अज्ञानी ठरतो.

उपनिषत्काली ⇨ यज्ञसंस्थेत परिवर्तन घडून आले. यज्ञ म्हणजे एक प्रकारचे बाह्य कर्मकांड होय. भौतिक द्रव्यांनी आणि बाह्य साधनांनी वा बाह्य कर्मांनी देवतांना यज्ञभूमीत आवाहन करून अग्निद्वारा संतुष्ट करणे व त्यांची कृपा संपादन करणे, हे या कर्मकांडाचे स्वरूप होते. या बाह्य कर्मकांडाशिवायही आध्यात्मिक तत्त्वचिंतनाने किंवा ध्यानाने देवाची किंवा परमात्म्याची कृपा लाभते कर्मकांडाची जरूरी नाही. विशेषतः निसर्गशक्ती असलेल्या देवांच्या पेक्षाही श्रेष्ठ असे परब्रह्मरूप तत्त्व आहे, ते सत्यातले सत्य आहे, असा विचार उपनिषदांत सांगितला असून त्या सच्चिदानंद ब्रह्माची मनोमय उपासना हेच मानवाच्या अंतिम श्रेयाचे साधन आहे, असा सिद्धांत उपनिषदांनी स्थापन केला. त्यामुळे समाजातील कर्मकांडी पुरोहितवर्गाचे महत्त्व कमी झाले आणि संन्यासी, बैरागी, योगी किंवा योगपंथी माणसे त्याचप्रमाणे पुरोहित वर्गाच्या बाहेरचे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे वर्ण किंवा वर्ग यांचे समाजातील महत्त्व सार्वत्रिक ब्रह्मोपासनेने वाढले. एवढेच नव्हे, तर वैदिकेतर धर्मपंथही एका दृष्टीने विविध रूपांत एकाच अंतिम तत्त्वाची उपासना करतात, असे मानल्यामुळे त्या धर्मपंथाचे लोकही परंपरागत वैदिक समाजाच्या पवित्र कक्षेत समाविष्ट झाले. उपनिषदांनंतर सर्व मानवांना आणि उच्च व कोणत्याही खालच्या-वरच्या सामाजिक स्थानांत असलेल्या व्यक्तींना पूर्ण पावन करणारे शैव धर्म आणि वैष्णव धर्म प्रभाव गाजवू लागले. त्यामुळे तत्कालीन म्हणजे प्राचीन भारतीय समाजाला धार्मिक समानत्व प्राप्त झाले [⟶ वैष्णव संप्रदाय शैव संप्रदाय].

शैव व वैष्णव धर्मांनी कालांतराने वैदिक धर्माशी जुळवून घेतले परंतु उपनिषदांनंतर इ. स. पू. सहाव्या शतकात गौतम ⇨ बुद्धाचा जन्म झाला. त्याने वैदिक कर्मकांड, उपनिषदांमधील विश्वरचनाशास्त्र व आत्मविषयक तत्त्वज्ञान यांच्यावर टीका केली आणि सृष्टीरचना, विश्वाचा जनक व शाश्वत आत्मतत्त्व, यांसंबंधी अनेक आक्षेप घेऊन मानवी जीवनातील दुःखास कारण असलेली अनीती आणि विकारवशता नाहीशी कशी होईल, ह्या प्रश्नांना महत्त्व दिले आणि शुद्ध नैतिक तत्त्वे व वासनानाश यांचा उपदेश केला. त्याचा परिणाम असा झाला, की या शुद्ध नैतिक तत्त्वांचा धर्म हा सर्व मानवांचा आणि मानवसमाजांचा धर्म आहे, याचे प्रत्यंतर बुद्धाच्या काळात आणि त्याच्या नंतरच्या काळात मिळू लागले. जुने परंपरागत धर्मांचे समाज बौद्ध धर्माचा अवलंब करू लागले. सर्व भारत तसेच श्रीलंका व्यापून मध्य आशिया, ईशान्येकडील देश, चीन व जपान येथपर्यंत बौद्ध धर्म पसरला आणि नैतिक धर्माच्या प्रभावाने मानवी गटांचे संकुचित भेद पाडणारे कडक संबंध शिथिल झाले.

भारताच्या पश्चिमेकडे एकेश्वरवादी धर्माचा म्हणजे क्रमाने यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम यांचा उदय झाला. या धर्मांनी इतिहासकाळात सामाजिक परिवर्तन आणि विभिन्न देवातावादी भिन्न भिन्न सामाजिक गट यांच्या एकीकरणाची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया सुरू असताना या धर्मांनी जुने सामाजिक धर्म उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय शैव, वैष्णव किंवा बौद्ध या धर्मांनी मात्र परंपरागत फुटीर प्रवृत्तीचे धर्मपंथ नष्ट न करता त्यांना गौण स्थान देऊन आपल्या व्यापक कक्षेत समाविष्ट केले. अशा तऱ्हेची ही उच्च धर्मांच्या सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. प्राचीन इझ्रायली समाज ईजिप्तमध्ये यहुदी धर्मसंस्थापक ⇨ मोझेसच्या पूर्वी निर्वासित होता. ईजिप्तमध्ये बहुदेवतावादी धर्म होता. एका ईजिप्शियन धार्मिक पुरुषाने एकेश्वरवाद बहुदेवतावादाचा अव्हेर करून प्रतिपादिला. प्रेषित मोझेस याला तो पटला नंतर सिनाई वाळवंटी प्रदेशात परमेश्वर मोझेसशी बोलला. नंतर मोझेसने एकेश्ववादाचा पुरस्कार करून त्या वेळच्या पॅलेस्टाईनमध्ये परतलेल्या अनेक इझ्रायली जमातींना आपल्या प्रकटीत धर्माचा संदेश दिला. एकेश्वराने दिलेल्या ‘दश आज्ञा’ म्हणजे वर्तनाचे नियम उपदेशिले. त्यामुळे इस्त्रायली विविध जमातीचे एक एकसंघ राष्ट्र बनले फाटाफूट नाहीशी झाली. इसवी सनाचा प्रारंभ होण्याच्या सुमारास येशू ख्रिस्ताचा अवतार झाला. येशू ख्रिस्ताने सर्व मानवांना मूलभूत पातकातून मुक्त करणारा एकेश्वरभक्तीचा व उच्चतम नैतिक तत्त्वांचा संदेश दिला. हा संदेश मुळात त्याला देवाने सांगितलेला होता तो स्वतःच देवाचे एक रूप होता, असे मानले जाते. इस्त्रायली एकेश्वर हा कडक हुकूम देणारा व हुकुमाच्या अंमलबजावणीत झालेली कसूर सहन न करणारा असा जबरदस्त पिता मानला आहे. ख्रिस्ताने तोच एकेश्वर क्षमाशील, दयामय व करुणामय आहे असे सांगून ‘फ्लेश’ म्हणजे शरीर हे बंधन आहे या बंधनातून मुक्त होऊन सर्व मानवजातीवर, शत्रूवरही प्रेम करावे ऐहिक भौतिक जीवनसाधनांचा हव्यास धरू नये निरहंकार व नम्र व्हावे, असा येशूच्या संदेशाचा भावार्थ आहे. विशेषतः जे नम्र आणि गरीब आहेत, धनिक नाहीत, त्यांच्या वर ईश्वराची कृपा असते असेही सांगितले. या संदेशामुळे राष्ट्रवादाच्या मर्यादा तोडून ख्रिस्ती धर्म पश्चिमेकडे, विशेषतः यूरोपमध्ये पसरला. यूरोपमध्ये शेकडो धर्मपंथ व रोमन लोकांचा बहुदेवतावाद होता. त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न ख्रिस्ताच्या एकेश्वरवादी धर्माने केला. इस्लामनेही सातव्या शतकात हीच प्रक्रिया अधिक जोमाने सुरू केली. प्रथम ⇨ मुहंमद पैगंबर आणि नंतरचे मुसलमानी सत्ताधारी म्हणजे खलीफा यांनी अरबांच्या बहुदेवतावादी निरनिराळ्या टोळ्यांना वा गणांना एकेश्वरी धर्माच्या छत्राखाली एकरूपता आणली आणि हा धर्म आफ्रिकेत आणि इराण, भारत, इंडोनेशिया इ. राष्ट्रांमध्ये पसरून मुसलमान सत्ताधाऱ्यांनी स्थानिक धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत ख्रिस्ती धर्माप्रमाणे इस्लामलाही बरेच यश मिळाले. अरब राष्ट्रांमध्ये त्यामुळे सांस्कृतिक परिवर्तन झाले. कायद्यावर आधारित संघटित नवी राज्यसंस्था निर्माण झाली. पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील अन्य देशातील विद्या, कला, शिल्पे आणि तत्त्वज्ञान यांचे अध्ययन करून अरब राष्ट्रांनी प्रगती केली.

प्रस्थापित उच्च धर्मसंस्थांमध्येसुद्धा समाजाची प्रगती खुंटविणारे आचारविचार आणि संस्था उत्पन्न होतात. नंतर परंपरागत धर्मसंस्था बदलणारे नवे तात्त्विक विचार उत्पन्न होतात. नवे धार्मिक चिंतन होऊ लागते. त्याचाही सामाजिक परिवर्तन व सुधारणा यांना नवीन शक्तीच्या रूपाने लाभ होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यूरोपातील पंधराव्या शतकात निर्माण झालेले प्रबोधनाचे आंदोलन आणि सत्तराव्या शतकातील ⇨ मार्टिन ल्यूथर (१४८३—१५४६) व ⇨ जॉन कॅल्व्हिन (१५०९—६४) यांनी निर्माण केलेले ख्रिस्ती धर्मसुधारणेचे आंदोलन हे होय. मागासलेल्या धर्मश्रद्धेतून किंवा पवित्र धर्मग्रंथांच्या श्रद्धेतून मुक्त झालेले पश्चिमी कोपर्निकस, गॅलिलीओ यांनी विज्ञानाचा पाया घातला. प्रकटित धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म हाच ईश्वरी साक्षात्काराचा मार्ग नाही, मनुष्याच्या हृदयात जो अंतश्चक्षू आहे, तो अंतःकरण शुद्ध झाल्यावर ईश्वराला पाहू शकतो, असे मत रूसोने प्रतिपादिले. या सिद्धांतामुळे पश्चिमी विद्या, कला, राज्यपद्धती, समाजरचना यांना अधिक प्रगती करण्यास आवश्यक अशी शक्ती लाभली.

विसाव्या शतकाच्या अंतिम कालखंडात जगातील भिन्नभिन्न मानव समाज व राष्ट्रे यांची आर्थिक आणि राजकीय दृष्टीने एकात्मता वाढण्याकरता समाजपरिवर्तनाची निकडीची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. ही निकड परंपरागत हिंदू, ख्रिस्ती, इस्लाम, यहुदी, बौद्ध इ. धर्मांना लागलेली दिसत नाही. या धर्मांमध्ये कितीही नवीन सुधारणा झाल्या तरी धर्मसंस्थानिष्ठ समाजातील भेद व मानसिक दूरत्व कायमच राहते. म्हणून ऐहिक व सार्वत्रिक अशा नैतिक तत्त्वांच्याच अधिष्ठानावर मानवी समाजाच्या एकात्मतेची निर्मिती होणे आवश्यक आहे. एका अर्थी धर्मातीत एकसंघ मानवसमाजाच्या निर्मितीची गरज आहे. परंतु धर्म ही खाजगी, वैयक्तिक जीवननिष्ठा राहू शकते व राहीलच, यात शंका नाही. [⟶ धर्मसुधारणा आंदोलन प्रबोधनकाल].


मोक्षमार्ग : मोक्ष म्हणजे दुःखातून, अज्ञानातून, पापातून किंवा देहबंधातून कायम मुक्तता व मृत्यूनंतरची शाश्वत परमशांती वा सद्‍गती होय. ही परमशांती काही तत्त्ववेत्त्यांच्या मते जिवंत स्थितीतही प्राप्त होऊ शकते. ज्यांना ती प्राप्त होते किंवा जन्मपासूनच असते, त्यांना सिद्ध वा जीवन्मुक्त म्हणतात. जीवात्म्याचे मुख्य आणि अंतिम साध्य ⇨ मोक्ष होय, असे जगातील सगळे उच्च धर्म मानतात. ही सद्‍गती म्हणजे शाश्वत स्वर्ग, नित्य ईश्वरसान्निध्य, ब्रह्मप्राप्ती किंवा निर्वाण होय. मनच मनुष्याच्या बंधास व मोक्षास कारण आहे, असा सर्व मोक्षवादी धर्मांचा सिद्धांत आहे. कर्मकांड, नैतिक कर्तव्य, योगमार्ग, भक्तियोग व साक्षात्कार वा ज्ञानयोग यांपैकी काही धर्मज्ञांनी कोणतातरी एक मार्ग वा काहींनी या अनेक मार्गांचा कमीजास्त प्रमाणात समुच्चय हे मोक्षाचे साधन मानलेले आहे. वस्तुतः हे मार्ग एकमेकांपासून अगदी अलग नसतात कोणत्यातरी एकाला प्राधान्य देऊन इतर दुय्यम ठरतात एवढेच किंवा हे मार्ग म्हणजे मोक्षाच्या भिन्नभिन्न पायऱ्याही मानलेल्या असतात. काहींनी त्यांचा समुच्चय समान रूपाने स्वीकारलेला असतो. हे सर्व मार्ग मुख्यतः मानसिकच आहेत. या मार्गांत देव वा गुरू यांचे साहाय्य लागते, असे काही अपवाद सोडल्यास बहुतेकांचे मत आहे. पूर्वमीमांसा, हीनयान बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांत स्वतःच्याच प्रयत्नाने मोक्ष साध्य होतो, असेही सांगितले आहे. या सर्व मार्गांत पापांचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय, चित्तशुद्धीशिवाय, शाश्वत सद्‍गती प्राप्त होत नाही मोक्षाचे द्वार उघडले जात नाही असा सिद्धांत गृहीत धरलेला आहे. पापांतून मुक्त संत हा मोक्षाचा मार्गदर्शक असतो. त्यातील एखादा संत ईश्वराचा प्रेषित बनून ईश्वराचे आदेश सांगतो. असा एखादा संत किंवा अनेक संत प्रेषित बनून जो धर्मोपदेश करतात, तो धर्मोपदेश ज्यात सांगितलेला असतो, तो मुख्य पवित्र धर्मग्रंथ प्रमाण म्हणून जे सामाजिक गट मानतात, त्यांच्यात विशिष्ट, स्थिर, संघटित धर्मसंस्था निर्माण होते. ती चर्चसारखी धर्मसंस्था ही प्रमाणभूत दिव्य आदेश देण्यासही समर्थ असते, असे मानले जाते.

कर्मकांड : धार्मिक कर्मकांडात सर्व जीवन समाविष्ट करण्याची पद्धती सांगणारे हिंदू , बौद्ध, जैन, यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इ. धर्म आहेत. सर्व जीवनव्यवहारांना वेधणारे कर्मकांड, हे धर्म सांगतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने ऐहिक फलांची वासना न ठेवता कर्मकांड आचरणाऱ्यांना मोक्षाचे द्वार उघडले जाते. श्रद्धा या मानसिक वृत्तीशिवाय आचरण्यात येणारे कर्मकांड व यातुविद्या यांत फरक नसतो. मोक्षसाधक कर्मकांड सांगणाऱ्या धर्माचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रुतिस्मृतिपुराणोक्त कर्मकांड होय. कर्मकांडाचा भागच व्रते होत. व्रतांच्या अनेक प्रकारांमध्ये काम्य व्रते वगळून नैतिक नियमांना प्राधन्य असते. एकपत्नीव्रत, पातिव्रत्य, ब्रह्मचर्य, सत्यभाषण, कामक्रोधादी विकारांचा संयम, उपवास, दान इ. नियमांना व्रतांमध्ये अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पापनाश होतो. पवित्र कर्माने पापनाश होतो, असे कर्मकांडास मुख्य स्थान देणारे सर्व धर्मपंथ मानतात परंतु पापनाशाच्या आवश्यकतेची उत्कटता ख्रिस्ती धर्मात पराकाष्ठेला गेली आहे. पश्चात्तापपूर्वक ⇨पापनिवेदन म्हणजे पापाची कबुली ख्रिस्ती धर्माचे वैशिष्ट्य होय. हिंदू धर्मातही पापनिवेदन हे ⇨ प्रायश्चित्ताचे एक अंग मानलेले आहे. पापनिवेदनात पापनिवृत्तीचा निश्चय सर्व जीवनव्यापी असावा, अशी अपेक्षा असते परंतु बहुतेकांच्या बाबतीत ती तात्पुरतीच ठरते. काहींच्या हृदयात पवित्र कर्मकांडाने ज्ञान व भक्तिभाव कायम रूजण्याची शक्यता असते. त्या ज्ञानाचा व भक्तिभावाचा दैनंदिन व्यवहारावरही प्रभाव दिसू लागतो.

जीवनभर आचरणात येणारे ⇨ कर्मकांड, भक्तियोग वा योगमार्ग यांचे आर्थिक परिणाम चांगले होत नाहीत. आर्थिक अवनतीच होते. ऐहिक आर्थिक व्यवहारांत यश मिळविण्यास लागणारा सर्व उत्साह, यजन-पूजन-भजनात व ध्यानातच संपतो. सांपत्तिक स्थिती उत्तम असलेल्यांना किंवा संपन्न लोकांनी ज्यांची हमी घेतली आहे, अशा लोकांनाच हा मोक्षमार्ग परवडतो. काही धर्मपंथांत—उदा., प्रॉटेस्टंट प्यूरिटन यांमध्ये—आर्थिक व्यवहारांचे महत्त्व कमी होणार नाही, अशी खबरदारी घेतलेली असते. जे लोक कर्मकांडात, यजन-पूजन-भजनांत, स्वतः प्रत्यक्ष भाग न घेता त्याकरिता दान देऊन व केवळ दर्शन आणि तिर्थप्रसाद घेऊन मोकळे होतात. त्यांनाही मोक्षाचे द्वार उघडे ठेवलेले असते. कारण त्यांची मनोभावना त्या कर्मकांडात सामील असते. तात्पर्य असे की, कर्मकांड प्रधान मानणारे पंथ बौद्धिक दृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहारांना दुय्यम स्थान देतात, त्यामुळे सामाजिक जीवनाची अधोगती होते. ज्या ज्या समाजात अशा कर्मकांडाचे स्तोम माजते त्यांची आर्थिक अवनती झाल्याशिवाय राहत नाही. हा एक प्रकारे निवृत्तिमार्गच आहे. ऐहिक जीवनापासून निवृत्ती असाच याचा अर्थ असतो. आत्मकेंद्रित मनोवृत्तीनेच माणसाचा कबजा घेतलेला असतो. परलोकपर कल्पनाजालात मन अडकलेले असते. पुरोहितवर्गाचा स्वार्थ यात फारच साधला जातो.

नैतिक कर्तव्य : काही सामाजिक नैतिक कर्तव्यांमुळेही मोक्षमार्ग खुला होतो, असे कित्येकदा धर्मग्रंथांत म्हटलेले असते. उदा., रणांगणात पतन पावणाऱ्या शूर पुरुषास सर्व पापांचा क्षय होऊन परमगती प्राप्त होते. नातवाचे मुखावलोकन केलेला राजा रणांगणात शिरून पाठ न फिरविता पतन पावल्यास मोक्ष मिळवितो. समाजोपकारक कर्मे नित्य केल्याने पाप-पुण्यांचा हिशेब होऊन मोक्षपदाची प्राप्ती होते. मात्र ही परोपकाराची कृत्ये व्यक्तीच्या शुद्ध नैतिक व्यक्तिमत्त्वाची द्योतक असावी लागतात. भरतकुलातील रंतिदेव राजा दुष्काळात स्वतःचे अन्न स्वतः न घेता बुभुक्षितास देत असताना उपासमारीने मरण पावला व त्यामुळे सद्‌गतीस प्राप्त झाला, असे श्रीमद्‌भागवतात म्हटले आहे.

केवळ नैतिक जीवनाचा आदर्श असलेली व्यक्ति मोक्षाधिकारी होते, असा ऐकांतिक दृष्टिकोन काही धार्मिक तत्त्वज्ञानांत व काही ख्रिस्ती विचारसरणींमध्ये व्यक्त झालेला दिसतो. बौद्ध धर्मात याला ‘पारमिता-तत्त्वज्ञान’ असे म्हणतात. शुद्ध नैतिक व्यक्तिमत्त्वात अंतर्मुखता असावी लागते. नैतिक मूल्यांचे चिंतन व आत्मनिरीक्षण करून मनःशांती साधलेली असावी लागते. यात संकुचित स्वार्थी अहंकाराचे विसर्जन सर्वांच्या हिताकरिता होते. एका किंवा अनेक सद्‍गुणांच्या पूर्णतेचा आदर्श म्हणजे पारमिता होय. सामाजिक हिताशी समन्वित असा नैतिक व पारमार्थिक आकृतिबंध व्यक्तीच्या जीवनाला प्राप्त होतो. उच्च नीतिप्रधान बौद्ध धर्मासारख्या धर्माचा हा दृष्टीकोन आहे. हा नैतिक कर्तव्याला प्राधान्य देणारा मोक्षमार्ग कर्मकांडाच्या विरुद्ध असलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त झाला. यजन-भजन-पूजन-भोजन, लैंगिक संभोग इ. कर्मकांडीय विधींत उत्साहाने सामील होण्यात ज्यांना स्वर्ग आणि मोक्ष यांची प्राप्ती दिसते, त्यांच्या विरुद्ध ही प्रतिक्रिया होय.

अलीकडे परंपरागत सामाजिक रचनेत उच्च नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावर परिवर्तन घडवून नवी समतावादी जीवनपद्धती आणण्याकरिता आधुनिक संतमार्गी समाजसंघटना तयार होऊ लागल्या आहेत. ब्रिटनमध्ये क्रॉम्बेलच्या नेतृत्वाखाली ‘संत संसद’ निर्माण झाली होती. ⇨ महात्मा गांधी (१८६९—१९४८) आणि त्यांच्या अनुयायांनी ‘सत्याग्रहाश्रम’ व ‘सर्वसेवक संघ’ स्थापन केला. गांधीनी यावज्जीव ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतलेला व जीवनदानी सत्याग्रह्यांचा पंथ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पश्चिमी देशांतही क्रांतीच्या ध्येयवादाला वाहिलेल्या किंवा समाजवादी व साम्यवादी ध्येयाच्या सिद्ध्यर्थ सर्वस्व अर्पण करण्याची प्रतिज्ञा केलेल्या लोकांचे संघ निर्माण झाले. त्यांतील अध्यात्मवादी विचारवंतांची अशी धारणा आहे, की अहंकार, विषय, भोग व देहासक्ती ही असेपर्यंत सामाजिक न्याय व समता यांची स्थापना करण्याचे क्रांतीचे प्रयत्न निष्फळ होतील. परंतु क्रांतिकारकाच्या इहवादी संघटना ज्या कारणास्तव यशस्वी होणे कठीण होते, त्याच कारणास्तव अध्यात्मवाद्यांच्या संघटनाही यशस्वी होणे कठीण आहे कारण अहंकारजन्य सत्ताभिलाषा सर्वांनाच भोवते. शासनमुक्त वर्गविरहित साम्यवादी क्रांतीचा ध्येयवाद याच मोक्षमार्गाचे ऐहिक रूप आहे [⟶ नीतिशास्त्र].


योगमार्ग : कर्मकांड व नीतिमार्ग याशिवाय तिसरा एक मोक्षमार्ग म्हणजे योगमार्ग होय. यासच समाधिमार्गही म्हणतात. समाधीत परमतत्त्वाचा साक्षात्कार होतो. कर्मकांड हा बहिर्मुख निवृत्तिमार्ग होय, तर योगमार्ग हा अंतर्मुख असा निवृत्तिमार्ग होय. ‘चित्तवृत्तिनिरोध’ बाह्य जगापासून पूर्ण निवृत्ती किंवा परम वैराग्य, हे त्याचे अंतिम स्वरूप होय. त्यामुळे दिव्य शक्तीचा लाभ होतो, साक्षात्कार होतो. ही निवृत्ती दोन प्रकारची असते : लौकिक व्यवहारातून प्रत्यक्ष निवृत्त होणे किंवा लौकिक व्यवहारात राहूनही अलिप्त राहणे. या प्रकारांचे अवांतर भेद पुष्कळ आहेत. ते एकमेकांत मिसळतात. निवृत्तीच्या अनेक पायऱ्या असतात. नैसर्गिक कामक्रोधादी विकार कसे नियंत्रित करावे, हे हा धर्ममार्ग शिकवितो. भय, क्रौर्य, विषयोपभोग अथवा स्वैर नैसर्गिक प्रवृत्ती यांच्या योगाने दिव्य सामर्थ्य प्राप्त होण्यास अडथळा येतो. धर्मनिष्ठ मुसलमान खलिफा, फकीर, ख्रिस्ती वीर आणि चिनी, जैन, बौद्ध वा हिंदू साधू वा राजा यांची दिव्य शक्ती विकारवशतेने कमी होते, तिला विकार हिरावून नेतात. नैसर्गिक स्वैर प्रवृत्तीतून अनेक पातके आणि महापातके माणसाकडून घडतात. महापातकांनी दिव्य शक्तीचा पूर्ण लोप होतो व त्यांमुळेच महापातकी सामाजिक बहिष्कारास वा देहदंडासही पात्र ठरतो.

इंद्रियसंयम आणि मनोनिग्रह यांनी प्रत्यक्ष देवाचा, देवत्वाचा वा देवाच्या शक्तीचा साक्षात्कार होतो वैराग्यशील मनुष्यात यांचा प्रवेश होतो. देवत्व वा दिव्य शक्ती येते, असे मानणाऱ्या धर्माचे तत्त्वज्ञान ⇨ चराचरेश्वरवाद वा विश्वात्मक देववाद हे असते. योगशक्ती ही दिव्य शक्ती आहे, असे हे धर्म मानतात. विश्वात्मक देववाद न मानणारी ⇨ सांख्यदर्शन व ⇨ योगदर्शन ही दर्शने तसेच बौद्ध व जैन धर्मही योग ही दिव्य शक्ती आहे, असा सिद्धांत स्वीकारतात. विश्वात्मक देववाद न मानणारे एकेश्वरवादी यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, पारशी इ. धर्म असे मानतात, की देव हा वस्तुतः विश्वातीत असून विश्वातही भरून राहतो आणि वरील प्रकारच्या योगसाधनेने अथवा वैराग्याने योगी मनुष्य देवाच्या आधीन असलेले साधन वा निमित्त बनतो.

योगसंकल्पना ही मूळची भारतीय आहे. अभारतीय धर्मांमध्ये ही संकल्पना नाही. ती निराळ्या प्रकारे अभारतीय धर्मांत आलेली आहे परंतु या योगमार्गासच निवृत्तिमार्ग म्हणता येते. हा मार्ग मानणाऱ्या साधकांच्या व सिद्धकांच्या व सिद्धांच्या सामाजिक संघटना असतात. त्यांची जातही असते. मठसंस्था, भिक्षुसंघ, देवालय, चर्च, मशीद इ. स्वरूपाच्या या सामाजिक संघटना धर्मनियंत्रित समाजसंस्थेची केंद्रे बनतात. या केंद्रांतील मठपती वा सदस्य हे सामान्य जनांना धर्मदीक्षा देत असतात. या संघटनांचे नियंत्रण बाह्यतः प्रवृत्तिमार्गी दिसणारे, परंतु उपासनेत आयुष्य घालविणारे गृहस्थधर्मीही करतात तथापि अंतर्बाह्य निवृत्त असणारे यतिधर्मी लोक विशेषेकरून अशा संस्था चालवितात. सिद्ध वा साधक असलेले गृहस्थ व यतिधर्मी आत्मोद्धारार्थ जसे यत्नशील असतात तसेच त्यातील काही लोक जगदुद्धारार्थही यत्नशील असतात. जगत् म्हणजे सामान्य जन आणि वरच्या स्तरातीलही लोक होत. या सर्वांना सांसारिक बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न म्हणजे जगदुद्धारार्थ यत्न होय.

भक्तिमार्ग : हाही एक मोक्षमार्ग आहे. जग आहे तसे स्वीकारून इंद्रियगम्य विश्वाच्या मोहात न सापडता करुणामय ईश्वरच परमप्रेमास्पद करणे, त्याला सर्वस्व अर्पण करून सर्व भावांनी शरण जाणे म्हणजे भक्ती होय. जगातील अन्य विषय मातापिता, स्त्री, पुत्र इ. परिवार व सर्व संबंधी जन गृह, वित्त किंवा दृश्य विश्वातील सुखदुःखकारक विषय इत्यादींबद्दलचा अनुराग वा द्वेषभावना ईश्वराच्या भक्तीत व्यत्यय आणतात म्हणून बाह्य विश्वाबद्दल औदासीन्य स्वीकारणे, हे भक्तीचे अंग आहे. आपण स्वतः आणि अन्य सर्व विश्व ईश्वराच्याच हातातील साधने वा बाहुली आहेत कारण तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे, असे मानणे हे भक्तीचे अंग आहे. भक्त हा निवृत्तिमार्गी अथवा प्रवृत्तिमार्गी असा दोन्ही प्रकारचा असू शकतो परंतु प्रवृत्ती किंवा निवृत्ती ईश्वराधीन आहे, अशी त्याची श्रद्धा असते.

या परमप्रेमास्पद ईश्वराचा भक्तीने भक्तावर अनुग्रह होतो. पश्चातापाने शुद्ध झालेली व्यक्ती ईश्वराच्या करुणेचा विषय बनते. कारण ईश्वर हा स्वभावतःच प्रेममय व करुणामय आहे. म्हणून तो भक्तीने वश होऊन जीवाला देहबंधातून मुक्त करतो व निरंतर सानिध्य देतो.

योगमार्गात स्वतःच्या प्रयत्नाने चित्तवृत्तींचा निरोध करून देहाच्या आणि विश्वाच्या बंधानातून मुक्त होता येते, असा विश्वास असतो. परंतु अहंकार व भेदभाव, कामक्रोध, रागद्वेष या द्वंद्वातून मनास मुक्त करण्याच्या प्रयत्नात मनोबल कमीच पडते विषयप्रीतीची पकड सुटतच नाही, विषयप्रीती हा मनःस्वभाव आहे, स्वभाव हा दुरतिक्रम असतो. काही काळ इंद्रियांचा संयम करण्यात यशही येते परंतु ते यश अस्थिर असते याकरिता ⇨ भक्तिमार्ग अनुसरावा लागतो. विषयबंधनातून स्वतःच्या मनोबलाने सुटता येत नाही, म्हणून करुणामय सर्वसमर्थ अशा शक्तीची किंवा व्यक्तीची म्हणजे ईश्वराची साहाय्यार्थ आवश्यकता निश्चितपणे भासते. दुसरे असे, की बाह्य विषयांच्या पेक्षा अधिक आनंददायक म्हणून अधिक जबरदस्त, असा प्रीतीचा विषय मनाला लाभला तरच नैसर्गिक स्वभाव जिंकणे शक्य आहे. ईश्वर हा असा सर्व कल्याणगुणांचे व सर्व मंगलांचे निधान म्हणून सापडला, तरच योगमार्गातही प्रगती होणे आणि पूर्ण यश येणे शक्य आहे. म्हणून बाह्य विषयांचा भोगच देवाला अर्पण करून भजन-पूजन-गायनांनी मनाची देवामध्ये एकाग्रता साधणे, हा योगापेक्षा सोपा उपाय ठरतो. या उपायामध्ये विषयप्रीतीचाही मर्यादितपणे अंतर्भाव होतो. त्यामुळे आत्मवंचनाही शक्य होते विषयप्रीतीला ईश्वरप्रीतीचा रंग दिला जातो. सकाम भक्ती ही विषयप्रीतीचाच एक पर्याय आहे. त्यात आत्मवंचना खूपच वाढते. ही आत्मवंचना टाळण्याकरिता निष्कामतेचा अभ्यास करावा लागतो. पूर्ण नम्रता स्वीकारून आत्मनिरीक्षण करावे लागते. स्वतःच्या पापाची निरंतर जाणीव असली, तरच खरीखुरी नम्रता शक्य होते.

विश्वातीत विश्वनिर्माता ज्यांना मान्य आहे, असे धर्म ईश्वरभक्तीचा मार्ग सांगतात. जैन व बौद्ध हे धर्मसुद्धा मुख्यतः योगमार्गी असले, तरी त्यांनाही भक्तिमार्गाचा योगमार्गाला जोडून आश्रय करावा लागतो. निर्वाण वा परमशांती हीच परमप्रीतीचे आलंबन बनते. त्यामुळे बाह्य विषयांच्या प्रीतीला संपूर्ण मर्यादा पडते. भक्तीला परमप्रेमास्पद म्हणून व्यक्तीची गरज असते. ही व्यक्ती म्हणजे परमपदाचा स्वामी होय. अर्हत तीर्थंकर, बुद्ध अथवा सिद्ध हा परमपदाचा स्वामी असतो. या स्वामीला शरण जाऊन त्याचा अनुग्रह झाला, तरच साक्षात्कार व मोक्ष प्राप्त होतो.

भक्तिमार्गात नैतिक जीवन आणि ईश्वरशरणता यांचे ऐक्य मूलभूत मानले आहे. ‘दया क्षमा शांती | तेथे देवाची वसती |’ हा विचार भक्तीचाच भाग आहे. सर्व भूतांच्या आतला देव शुद्ध नैतिक जीवनातच प्रत्ययास येतो, अशी निष्ठा सर्व एकेश्वरवादी आणि विश्वेश्वरवादी धर्मांमध्ये व्यक्त झालेली आहे.


भेदाच्या जाणिवेतूनच प्रथम भक्तिभावनेचा उदय होतो. ईश्वर आणि जीवात्मा यांच्यात संपूर्ण भेद आहे जीवात्मा बद्ध, अज्ञानी, असमर्थ व पापी आहे आणि देव पूर्ण स्वतंत्र, पूर्ण समर्थ, सर्वज्ञ, करुणासागर व तारक आहे असा या परस्परभेदाचा अर्थ आहे. देवाच्याच इच्छेने सर्व घडते, विश्व ही त्याचीच योजना आहे, जीवात्मा हा त्याच्या हातची कळसूत्री बाहुली आहे, अशी जाणीव दृढ करणे, हे भक्ताचे पहिले उद्दिष्ट असते. ईश्वरास वाटले तरच तो तारतो  आपल्या हातात काही नाही म्हणून त्याचे दास्य पतकरणे, ही भक्तीची अद्वैतवादाप्रमाणे पहिली पायरी आहे आणि दास्य हीच संपूर्ण निष्ठा असून तीच खरीखुरी भक्ती होय, असे ⇨ द्वैतवाद मानतो. अद्वैतवादाप्रमाणे दास्यभावात अहंभावाचे विसर्जन होते. म्हणून ही पहिली पायरी होय. ईश्वर हा पिता, माता, पती, पत्नी, मित्र इत्यादींपैकी कोणत्याही एक स्वरूपात भक्तीच्या दुसऱ्या पायरीवर भक्ताचा विषय होतो. काही द्वैतवादी धर्मतत्त्वज्ञानाने उदा., ख्रिस्ती, यहुदी वा भारतीय द्वैती धर्मपंथ ही दुसरी पायरी हीच अंतिम निष्ठा समजतात. अद्वैतवादाप्रमाणे अथवा ⇨ द्वैताद्वैतवादाप्रमाणे परिपूर्ण ईश्वराचे जीवात्मे हे अंश आहेत. हा अंशांशीभाव अंतःकरणात पूर्ण रुजणे अंतिम निष्ठा ठरते. अद्वैतवादाप्रमाणे ही भक्तीची तिसरी पायरी होय ही अंतिम निष्ठा नव्हे. भारतीय अद्वैतवादाप्रमाणे सर्व दृश्य बाह्य विश्वाचा भेदात्मक भास भक्तीने मावळतो आणि जीव, विश्व व विश्वेश्वर यांच्यातील भेदाचा भाव निरस्त होऊन सच्चिदानंदरूप देवच शिल्लक राहतो, अशी जाणीव किंवा असा साक्षात्कार भक्तीने प्राप्त होतो हीच अंतिम निष्ठा होय. या अद्वैतवादाप्रमाणे विश्वात्मक देव हा विश्वातीतही आहे. शांकर अद्वैतवाद सोडल्यास वरील अद्वैत साक्षात्कार हा भक्तिमयच असतो, असे अद्वैतातील ⇨ चिद्‌विलासवादी विचारसरणीप्रमाणे मानलेले आहे. परंतु भारतीय तंत्रमार्गानुसारे [⟶ तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म], द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, ⇨ विशिष्टाद्वैतवाद आणि अद्वैतवाद [⟶ केवलाद्वैतवाद] ही बौद्धिक तत्त्वज्ञाने असून ईश्वरभक्ती या बौद्धिक तत्त्वज्ञानांच्या कक्षेच्या बाहेर राहते, असे सांगतात.

भक्तिमार्गाचेही मोठे कर्मकांड असते परंतु हे कर्मकांड वैकल्पिक रीतीने मान्यता पावलेले असते. भजन-पूजन, यात्रा, उत्सव इ. गोष्टी भक्तीच्या प्राथमिक अवस्थेतील म्हणून स्वीकारलेल्या असतात. तीर्थक्षेत्रे [⟶ तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा] आणि देवालयातील नृत्य, नाट्य, गायन-वादन इ. गोष्टींना भक्तीमार्गात ऊत आलेला असतो. ⇨ मठ, मंदीर, ⇨ चर्च, ⇨ मशीद इ. संस्थांची उभारणी आणि संरक्षण भक्तिमार्गात चालते. मूर्ती, मंदीर, उद्यान, चित्र, संगीत इ. कलांचा विकास आणि विस्तार भक्तिमार्गाने केला आहे. एका दृष्टीने हे सगळे आर्थिक व्यवहार होत कारण उत्सव व यात्राप्रसंगी मोठमोठे बाजार भरतात खेळ व तमाशे होतात. उद्योग, कला आणि शिल्पे ही भक्तिमार्गाची अंगे बनतात. ⇨ देवालय, चर्च, मशीद, ⇨ सिनॅगॉग या केंद्रांच्या भोवती सामाजिक आणि आर्थिक जीवनाची संघटना प्रामुख्याने चालते.

ईश्वराची प्रार्थना किंवा नामस्मरण एवढेच भक्तीचे मुख्य साधन होय, असे संत व प्रेषित सांगत आले आहेत. कर्मकांड योग, ⇨ संन्यास, ⇨ तप इत्यादींची भक्तीला आवश्यकता नाही. नामस्मरण व प्रार्थना करीतच शेती, विणकाम, लोहारकाम, चांभारकाम, खाटिककाम, युद्ध किंवा अन्य राजकीय व्यावहार करीत रहावे आणि प्रपंचातच परमार्थ साधावा, असा आर्थिक-सामाजिक दृष्टिकोन भक्तीमार्गाने सांगितला आहे. चिनी, ख्रिस्ती, पारशी आणि मुस्लिम धर्मांमध्ये नैतिक आणि व्यावहारिक जीवनालाच अत्यंत महत्त्व दिले आहे.

ज्ञानमार्ग : येथे ज्ञान शब्दाचा परम परिपूर्ण तत्त्वाचा, परमेश्वराचा किंवा परमात्म्याचा साक्षात्कार असा अर्थ आहे. कर्म सामाजिक नीती किंवा भक्ती अथवा योग ही ज्ञानाची बहिरंग किंवा अंतरंग साधने आहेत, असे ज्ञानमार्गी मानतात. यहुदी, ख्रिस्ती, इस्लामी, किंवा काही हिंदू धर्मपंथ ईश्वराचा साक्षात्कार सत्कर्माने आणि भक्तीने स्वर्गप्राप्तीच्या वेळी होतो, या ऐहिक जीवनामध्ये होत नाही, असे सांगतात.

सत्कर्माने आणि भक्तीने संपूर्ण पापक्षय होऊन चित्त शुद्ध झाल्याने या जन्मातच परमतत्त्वाचा किंवा परमात्म्याचा साक्षात्कार होतो, असे अद्वैती ज्ञानमार्गी मानतात. त्या परमात्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो, मोक्षाचा अन्य मार्ग नसतो, असे उपनिषदांत व ⇨ ज्ञानमार्गप्रधान अन्य धर्मग्रंथांत म्हटले आहे. परमात्म्याला लाव ज या चिनी धर्मप्रवर्तकाने ‘ताओ’ अशी संज्ञा दिली आहे. जीवनात व सर्व निसर्गात ‘ताओ’ भरला आहे, त्याच्याशी तादात्म्य संपादन करणे, हे उच्चतम मानवी उद्दिष्ट आहे, असे लाव ज च्या धर्मात सांगितले आहे [⟶ ताओ मत]. यहुदी, ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्मसंस्थापकांना ईश्वराचे दर्शन झाले आणि त्यांनी धर्ममार्ग सांगितला, असे बायबल आणि कुराण यांमध्ये म्हटले आहे. काही यहुदी आणि ख्रिस्ती संतांना मांसविकारांवर म्हणजे इंद्रियांच्या विकारांवर पूर्ण विजय मिळल्यानंतर एकांतात गूढ साक्षात्कार वा ईश्वरदर्शन झाले, असे ही म्हटले आहे यास गूढानुभववाद म्हणतात. परंतु सामान्यपणे यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम धर्माच्या दृष्टीने स्वर्गातच ईश्वराचा साक्षात्कार होतो. मुसलमान धर्मातील ⇨ सूफी पंथाप्रमाणे ईश्वरभक्ताला या जन्मातच साक्षात्कार होऊ शकतो. हे साक्षात्कारी बहुतेक संत निवृत्तिमार्ग फकीर असतात. हिंदू धर्मात द्वैताद्वैतवादी, शांकर अद्वैतवादी, शैव चिद्‌विलासवादीही परमात्म्याचा ⇨ साक्षात्कार या जन्मातही चित्त पूर्ण शुद्ध झाल्यानंतर होतो, असे सांगतात परंतु विशिष्टाद्वैतवाद किंवा द्वैतवाद परमात्म्याचा पूर्ण साक्षात्कार देह पडल्यानंतरच होतो असे म्हणतात. जे या देहातच साक्षात्कार होऊ शकतो असे मानतात, ते जीवन्मुक्ती मानतात. जीवन्मुक्ती म्हणजे देह जिवंत असतानाच साक्षात्कार होऊन प्राप्त झालेली मुक्ती. विशिष्टाद्वैतवाद किंवा द्वैतवादप्रमाणे मुक्ती ही विदेहमुक्ती म्हणजे देहपातानंतरची मुक्ती होय.

पहा: इस्लाम धर्म ख्रिस्ती धर्म जैन धर्म ज्यू धर्म पारशी धर्म बौद्ध धर्म हिंदू धर्म.

संदर्भ : 1. Durkheim, Emil, The Elementary forms of Religious Life, London, 1954.

            2. Egner, R. E. Denonn, L. E. Ed. The Basic Writings of Bertrand Russell : 1903—1959, Part XV, London, 1961.

            3. Fordham, Frieda, Introduction to Jung’s Psychology, London, 1953.

            4. Frazer, James G. The Golden Bough, London, 1925.

            5. Freud, Sigmund, Civilisation and its Discontents, London, 1939.

            6. Freud, Sigmund, The Future of an Illusion, London, 1934.

            7. Freud, Sigmund, Totem and Taboo, London, 1938.

            8. Fromm, Erich, Psycho-Analysis and Religion, London, 1951.

            9. Galloway, G. The Philosophy of Religion, Edinburgh, 1914.

          10. Grensted, L. W. The Psychology of Religion, London, 1952.

           11. Hartmann, E. Von, Philosophy of the Unconscious, London, 1931.

           12. Hostie, Raymond, Religion and the Psychology of Jung, London, 1957.

           13. James, William, Principles of Psychology, 2 Vols. London, 1901.

           14. James, William, The Will to Believe, London, 1927.

           15. James, William, Varieties of Religious Experience, London, 1928.

           16. Jung C. G. Psychology of the Unconscious, London, 1933.

           17. Leuba, J. H. The Psychological Origin and the Nature of Religion, London, 1909.

           18. Malinowski, Bronislaw, The Foundation of Faith and Morals, London, 1936.

           19. Marett, R. R. The Threshold of Religion, London, 1914.

          20. Northridge, W. L. Modern Theories of Unconscious, London, 1924.

          21. Otto, Rudolf, The Idea of the Holy, London, 1930.

          22. Pratt, J. Bissett, The Relligious Consciousness, London, 1930.

          23. Schaer, Hans, Religion and the Cure of Souls in Jung’s Psychology, London, 1951.

          24. Thouless, R. H. An Introduction to the Psychology of Religion, Cambridge, 1936.

          25. Tillich, Paul, Systematic Theology, Vol . I, London, 1953.

          26. Tylor, E. B. Primitive Culture, 2 Vols., London, 1903.

          27. Weber, Max, The Sociology of Religion, London, 1963.         २८. काठकोपनिषत्सटीकाद्वयशांकरभाष्योपेता, आनंदाश्रम प्रत, पुणे, १८८८.

         २९. कमलाकरभट्ट, निर्णयसिंधु:, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९०१.

         ३०. काशीनाथोपाध्याय, धर्मसिंधु:, श्रीव्यकंटेश्वर प्रत, मुंबई, १९०७.

         ३१. नित्यानंदपंत पर्वतीय, संस्कारदीपक:, चौखंबा प्रत, बनारस, १९३४.

         ३२. भट्टगोपीनाथदीक्षित, संस्काररत्नमाला, आनंदाश्रम प्रत, पुणे, १८९९.

         ३३. मनुस्मृति:, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९२०.

         ३४. महाभारत, शांतिपर्व, ३ भाग, भांडारकर प्रत, पुणे, १९५४, ६१, ६६, ३५.

         ३५. मित्रमिश्र, वीरमित्रोदय:, चौखंबा प्रत, बनारस, १९२९—३२.

         ३६. मीमांसादर्शनम्, केवलानंदसरस्वती—संपादित प्रत, वाई, १९४८.

         ३७. याज्ञवल्क्यस्मृति:, निर्णयसागर प्रत, मुबंई, १९२६.

         ३८. वैशेषिकदर्शनम्, गुजरात मुद्रणालय प्रत, मुंबई, १९३०.

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री