डेव्हिड : (इ.स.पू. सु. १०१६–सु. ९७२). प्राचीन इझ्राएलचा दुसरा राजा. बायबलमधील इतिहासाप्रमाणे डेव्हिडचा जन्म बेथलीएम येथे ज्यूडा जमातीत झाला. जेसी याच्या आठ पुत्रांपैकी डेव्हिड हा सर्वांत धाकटा पुत्र. डेव्हिड हा आपल्या वडिलांचा मेंढपाळाचा व्यवसाय करी. संगीत, वाद्यवादन कौशल्य आणि असामान्य कवित्वशक्ती यांसाठी डेव्हिड प्रसिद्ध होता. सॉल राजाची मानसिक व्याधी त्याने आपल्या दिव्य संगीताने बरी केली. त्याबद्दल राजाने त्याला आपल्या पदरी नोकरीस ठेवले. फिलिस्टाइन लोकांविरुद्धच्या लढायांत डेव्हिडने प्रत्यक्ष भाग घेऊन उत्तम कामगिरी बजावली म्हणून राजाने राजकन्या मिकॅल हिच्याशी त्याचे लग्न लावून दिले. राजपुत्र जोनाथनशी त्याची चांगली मैत्री होती परंतु पुढे काही कारणास्तव राजाची डेव्हिडवर गैरमर्जी झाल्याने त्याला ते राज्य सोडून पळून जावे लागले. नंतर तो फिलिस्टाइन लोकांचा एक मांडलिक बनला. या स्थितीत त्याने दीड वर्ष राज्य केले. लवकरच गिल्बोआ पर्वतावरील लढाईत सॉल राजा व त्याचे तीन पुत्र मारले गेले. इझ्राएलचे राज्य धुळीस मिळण्याचे हे चिन्ह होते. डेव्हिडने फिलिस्टाइनचा राजा झिकलाग याच्याशी तह केला व स्वतः हीब्रन ह्या ठिकाणी प्रथम ज्यूडाचा व नंतर इझ्राएलचा तो राजा बनला. डेव्हिडने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. फिलिस्टाइन लोकांचा त्याने युद्धात पराभव करून आपली राजधानी हीब्रन येथून हलवून जेरूसलेम येथे नेली.

डेव्हिडचे प्राचीन शिल्प, फ्लॉरेन्स.

नाईल व युफ्रेटीस नद्यांच्या मधील सर्व प्रदेश डेव्हिडने पादाक्रांत करून इझ्राएल हे एक अत्यंत सामार्थशाली राज्य बनविले. अशा प्रकारे ह्या राज्यात लोकांची एकी निर्माण करून प्राचीन भटक्या हिब्रू लोकांचे स्वप्न त्याने प्रथमच साकार केले. आपल्या ह्या आदर्श आणि सुखी राजवटीत डेव्हिडने बॅथशीबा हिचा पती युरिआ याचा खून करून बॅथशीबाशी व्यवहार केला. ह्या पापाबद्दल डेव्हिडवर पुढे बऱ्याच आपत्ती आल्या. म्हातारपणी त्याने बॅथशीबाचा मुलगा सॉलोमन (इ. स. पू. ९७१–९३१) याला आपल्या गादीचा वारस नेमले. 

डेव्हिड असामान्य गायक व कवी होता. सॉल व जोनाथन यांच्या मृत्यूनंतर त्याने लिहिलेल्या अंत्ययात्रागीतांतून त्याच्या वाङ्‌मयीन सामर्थ्याचा प्रत्यय येतो. त्याचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग, पण गोंधळात टाकणारे होते. तो शूर, बुद्धिमान, इमानदार, धर्मनिष्ठ असला, तरी प्रसंगी अनैतिक व क्रूरही होता. त्याच्या नंतरच्या अनेक पिढ्यांना एक आदर्श वीरपुरुष व राजा म्हणून तो पूज्य होता. त्याचे स्थान ज्यू धर्मात मोझेसच्या खालोखाल महत्त्वाचे मानले जाते.

संदर्भ :

1. Maly, U. H. The World of David and Soloman, New York, 1961.

2. Parmiter, Geoffrey de C. King David, New York, 1961.

माहुलकर, दि. द.