सरस्वती : पारंपरिक चित्र.

सरस्वती : भारतीय संस्कृतीतील एक श्रेष्ठ देवता. प्राचीन वाङ्मयातून वाक्, वाणी, वाग्देवता, वागीश्वरी, शारदा, भारती, वीणापाणी, ब्रह्मी, भाषा, गीर, वर्णमाला, विशाला, मेघा, कुटीला इ. भिन्न नावांनी तिचा उल्लेख आढळतो. सरस्वती या शब्दाची व्युत्पत्ती सृ = वाहणे, हलणे या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ गतिमती असा आहे. आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रिय ब्रह्माचे सक्रिय रूप असून तिला ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिवर्गांना गती देणारी शक्ती म्हटले आहे. ऋग्वेदा त तिला नदीचे मानवी रूप मानले आहे आणि एके ठिकाणी देवतांची राणी म्हटले आहे (ऋग्वेद, ८·८९·१०-११). उपनिषदात सरस्वतीची वाणीशी एकरूपता दर्शविली आहे. त्यामुळे तिचा पुढे वाग्देवी असा उल्लेख होऊ लागला. कालांतराने वाणीची ती स्फूर्तिदेवता आणि विज्ञान व साहित्य यांची अधिष्ठात्री बनली. शतपथ, ऐतरेय, तैत्तिरीय आदी बाह्मणगंथातही वाणीलाच सरस्वती म्हटले आहे तर बृहदारण्यका त तिचा वाचारूपी धेनू म्हणून उल्लेख येतो. ⇨ गंधर्व आणि देवांनी वाग्देवीला प्रसन्न करण्यासाठी संगीत व तंतूवादय यांचा मेळ घातला. त्यामुळे ललित कलांची अधिष्ठात्री ही उपाधी तिला मिळाली आणि चौसष्ट कलांची ती तज्ज्ञ मानण्यात येऊ लागली. पुराणांनी व तंत्रांनी तिची महती मातृदेवता म्हणून वर्तविली. पुढे मातृदेवतेतून तिचे शक्तिदेवतेत रूपांतर झाले. या सर्व संकल्पनांतून सर्वश्रेष्ठ माता, विदयादेवता, शारदा अशी तिची प्रतिमा तयार झाली. सर्व मंत्रांतील श्रेष्ठ गायत्री मंत्रात सरस्वती एकरूप झाली आणि नंतर ही गायत्री-वाग्देवी सरस्वतीच बनून राहिली. यावरून ऋग्वेद ते पुराणकाळ्या दीर्घ कालात सरस्वतीच्या नदी-नदीदेवता, वाक्-वाणी आणि अखेर मातृदेवता-विदयादेवता अशा तीन प्रमुख भूमिका आढळतात. पुराणांनी तिला पूर्ण मानवी रूप दिले आणि तिची प्रतिमा बहुविध विषयांची देवता म्हणून स्थिरावली व तिचे मूर्तिविधान निश्चित झाले.

सरस्वतीच्या उत्पत्तीविषयी पुराणांत अनेक कथा आढळतात. मूळात ही ब्रह्मदेवाची कन्या होय. देवी भागवता मध्ये सरस्वतीची उत्पत्ती राधेच्या जिव्हागापासून झाली, असे म्हटले असून दुसऱ्या एका कथेत ती श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर आली, असे सांगितले आहे. शिवाय ती ⇨ दुर्गा व ⇨ शिवदेवता यांपासून झालेली कन्या मानली जाते सरस्वतीच्या वैवाहिक जीवनाविषयीही अनेक मनोरंजक कथा आढळतात. ती प्रसंगोपात्त अनेकांची पत्नी असल्याचे वाङ्मयीन दाखले मिळतात त्यावरून ती ब्रह्मदेव, विष्णू, शिव यांची पत्नी. एका कथेत विष्णूच्या लक्ष्मी, गंगा या दोन पत्नींबरोबर सरस्वती या तिसऱ्या पत्नीची कथा आढळते. विष्णूने सरस्वती ब्रह्मदेवाला, गंगा शिवाला व लक्ष्मी आपल्या जवळ ठेवली. सरस्वतला सुद्धा सरस्वतीचा पती मानले आहे. याशिवाय सरस्वती ह ⇨ अश्विनीकुमारां ची सहचारिणी असल्याचे उल्लेख वैदिक साहित्यात येतात. अश्विनीकुमारांकडून तिने आयुर्वेदीय ज्ञान संपादन केले. याव्यतिरिक्त ⇨ इंद्र, अग्नी, धर्म ⇨ मनू यांची ती पत्नी असल्याचे तुरळक उल्लेख वाङ्मयातून आढळतात. नंतरच्या साहित्यात ती ⇨ गणपती च्या पत्नींपैकी एक असल्याचा उल्लेख आढळतो. मंगलकार्यात शुभारंभापूर्वी गणपति-सरस्वती पूजन रूढ झाले. एकूण सरस्वतीचे गृहिणीपद नेमके कुठे होते, हे एक गूढच आहे !

वैदिक धर्माप्रमाणे ⇨ जैन धर्म व ⇨ बौद्ध धर्मा तही सरस्वतीची पूजा प्रचलित असल्याचे लिखित दाखले मिळतात आणि तिचा कलात्मक आविष्कारही तिच्या आयुध-लांछनांसह मूर्तिशिल्पात आढळतो. ⇨ जैन दर्शना त ती श्रूतदेवी या नावाने तर बौद्ध धर्मात प्रज्ञापारमिता या स्वरूपात आढळते. सरस्वती कल्प,शारदास्तवन,पठितसिद्धसारस्वतस्तव,सरस्वती स्तुती वगैरे ग्रंथातून-काव्यातून तिची महती जैनांनी वर्णिली असून बौद्धांच्या साधनमाला या ग्रंथात तिच्या अनेक साधना वर्णिलेल्या आहेत. मंजुश्री या ज्ञानदेवाबरोबर त्याची शक्ती वा सहचारिणी म्हणून ती शिल्पात दर्शवितात. तिचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात महासरस्वती, आर्यवजा, वजवीणा, वजशारदा अशा भिन्न नावांनी करतात. मंजुश्रीचे साधर्म्य वैदिक धर्मातील बह्मदेवाशी करण्यात येते.

नृत्य सरस्वती, इ. स. ११५०, होयसळेश्वर मंदिर, हळेबीड, कर्नाटक.

कुलदेवता वा कुलाचार यांबाबतीत इतर देवांच्या तुलनेत सरस्वतीला दुय्यम दर्जा आहे. त्यामुळे या देवीचे पूजाविधान वा नित्यनैमित्तिक पूजा फारशी प्रचलित नाही. आश्विनी नवरात्रातील अखेरचे तीन दिवस (सप्तमी, अष्टमी व नवमी) सरस्वती पूजनाचे दिवस मानतात. तसेच या काळात ‘सरस्वती शयनसप्तमी’ नावाचे एक व्रत करण्याची प्रथा आहे. दसऱ्याला श्रवण नक्षत्रावर तिचे विसर्जन करावे, असे धर्मशास्त्र सांगते. ⇨ नवरात्रा व्यतिरिक्त कार्तिक शुक्ल पंचमी आणि माघ शुक्ल पंचमी या दोन तिथींनाही सरस्वती-शारदेची पूजा करण्याची प्रथा बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान आदी राज्यांतून विशेषत: – जैन ज्ञातीतून आढळते. या तिथींना पाटीपूजन, पुस्तकांची पूजा, तसेच अध्ययनाच्या साहित्याची पूजा करण्याची रूढी आहे. मुलांना मुळाक्षरांची ओळख व्हावी, म्हणून शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रियाही या तिथींना करतात. कालीपूजना बरोबर सरस्वतीच्या मूर्ती बनविण्याची प्रथा काही राज्यांत आढळते. सरस्वतीची स्वतंत्र अशी थोडी मंदिरे आहेत. त्यांपैकी नवव्या शतकातील शृंगेरीचे शारदाम्बा, अकराव्या शतकातील गदगचे (कर्नाटक) सरस्वती मंदिर आणि बाराव्या शतकातील कुथनूर (तंजावर जिल्हा, तमिळनाडू) येथील सरस्वती मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. सरस्वतीचा आविष्कार मूर्तिशिल्पांतून आढळतो. तत्संबंधी अपराजितपृच्छा, विष्णुधर्मोत्तर, अंशुमद्भेदागम, पूर्णकारणागम, रूपमण्डन, शिल्परत्न आदी ग्रंथातून माहिती मिळते.

सरस्वती, १२ वे शतक, उपलब्धी बिकानेर जिल्हा, राजस्थान, राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली.

देवीच्या मूर्ती द्विभूजेपासून सोळा हातांपर्यंत आढळतात. पाषाण, काष्ठ, धातू, चुनेगच्ची वगैरे माध्यमांतील काही मूर्ती अवशिष्ट असून सर्वांत प्राचीन मूर्ती भारहूत (इ. स. पू. पहिले शतक) व मथुरा (इ. स. दुसरे शतक) येथील उत्खननांत सापडल्या, त्यांपैकी अभिलिखित वीशीर्ष मथुरेची मूर्ती लक्षणीय आहे. याशिवाय राजस्थानातील परमारकालीन काही सुरेख मूर्ती दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात तसेच ब्रिटिश म्यूझीयममध्ये (लंडन) आहेत. या मूर्तिशिल्पांतून सरस्वतीच्या मूळ नदीदेवतेपासून उत्कांत झालेले विकसित शारदादेवीचे रूप दृग्गोचर होते. सरस्वती शुभवर्ण, शुभवस्त्रधारिणी, अलंकार-विभूषित, चुतुर्भुज, पुंडरिक, माला, वीणा व कमंडलू धारण करणारी असावी. पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख आयुधे सर्वत्र दिसतात. तिचे मूर्तिशिल्पांतून कमळ, हंस, मोर, सिंह, मेंढा हे वाहन/आसन खोदलेले आढळते. क्वचित तिचे वाहन नंदीही दर्शवितात मात्र हंस आणि मोर ही लांछने (वाहने) तिची लाडकी असून त्याचे शिल्पांकन अधिकतर आहे. शिल्पशास्त्रीय ग्रंथात ती कमलासनस्थ दाखवावी, असेही म्हटले आहे.

संदर्भ : 1. Chaturvedi, B. K. Saraswati, Delhi, 1996.

            2. Nandkumar,Prema, Mahasaraswati, Chennai, 2003.

            ३. देशपांडे, सु.र., सरस्वती-दर्शन,पुणे, २००२.

देशपांडे, सु.र.