सामूहिक नमाज : जामा मशीद, दिल्ली

नमाज: (सलात). इस्लाम धर्मातील प्रार्थनाविधीस फार्सी भाषेत ‘नमाज’ आणि अरबी भाषेत ‘सलात’ अशी संज्ञा आहे. कुराणात ‘सलात’ शब्द अनेकदा आलेला आहे. खाली वाकणे, भूमीवर डोके टेकवून प्रणाम करणे आणि कुराण पढणे ही नमाजची तीन प्रमुख अंगे होत. मुहंमदांना प्रार्थना करता येईना आणि म्हणून त्या तळमळीतून कुराणात प्रगट झालेली सूरा (क्रमांक ९६) ही नमाजचे उगमस्थान आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने यथासमय नमाज पढलीच पाहिजे जो नमाज पढत नाही तो काफीर होय. मद्यपानाने नमाज पढण्यात व्यत्यय येतो, म्हणून मद्यपान करणे इस्लाममध्ये निषिद्ध मानले आहे. नमाज पढण्यापूर्वी स्नान करावे लागते. दैनंदिन नमाजप्रमाणेच आपत्कालीन, साप्ताहिक व नैमित्तिक नमाजही सांगितलेले आहे. नंतरच्या काळात नमाज पढण्याबरोबरच मुहंमदांची स्तुती व तस्लीमा (प्रणाम) सुरू झाली. मुहंमदांनी दररोज पाच वेळा नमाज पढण्यास सांगितल्याच्या उल्लेखावरून प्रारंभी अशी प्रथा नव्हती, असे काही अभ्यासक मानतात. दुसऱ्या मतानुसार पाचाहून अधिक वेळा (पन्नास वेळा, पंचवीस वेळा इ. मते आहेत) नमाज पढली जात असावी, असे दिसते. सुबह का फज्र (उषःकालीन), जुहर (मध्यान्हीची), अस्र (सायंकालीन), मग्रिब (सूर्यास्तानंतरची) व अतमा किंवा आइशा (रात्रीची) अशी दररोज पाच वेळा नमाज पढणे रूढ आहे. यांतील एखाद्या वेळची नमाज चुकल्यास दिवसातून ती केव्हा तरी पढावीच लागते नाही तर मृत्युदंडही विहित आहे. तोंड, हात, डोके व पाय धुणे रेतीने स्नान करणे अथवा पाण्याने स्नान करणे यांमुळे नमाज पढण्यास आवश्यक ते पावित्र्य लाभते. पुरुषांनी अधोवस्त्र नेसावे व स्त्रियांनी हात व तोंड वगळता सर्वांगी वस्त्र नेसावे. नमाज कोठेही पढली तरी चालते मात्र ती पढताना तोंड मक्केकडेच असावे लागते. हत्यास्थानांसारखी अपवित्र ठिकाणे व समाधिस्थाने मात्र नमाज पढण्यास वर्ज्य मानली आहेत. मोठ्याने आपल्या इच्छेचा उच्चार करून (नीया) ‘अल्लाहु- अक्‌बर’ म्हणावे (तक्‌बीरात). नंतर उभ्याने दुवा मागून फातिहा (कुराणातील पहिली आयत) म्हणावी. नंतर पंजे गुडघ्याला लागेतो खाली वाकावे (रुकूअ). त्यानंतर ताठ उभे राहून व हात उंचावून ‘अल्लाची स्तुती करणाऱ्याकडे अल्ला लक्ष देतो’, अशी इच्छा करावी. मग भूमीवर डोके टेकून प्रणाम करावा आणि गुडघे टेकावे. नंतर पुन्हा भूमीस प्रणाम करावा. ही क्रिया दोन-चार वेळा करावी. नंतर धर्मश्रद्धेचा उच्चार करून (तशह्‌हुद) ‘सल्ला अल्लाहु अलैहि’ व ‘सल्लमा’ अशी पैगंबराची प्रार्थना म्हणावी. शेवटी सलाम (‘अल्-सलाम अलैकुम’ व ‘रहमत्तुहल्लाहि’) म्हणावा. शक्य तो सामुदायिक नाही तर एकट्याने नमाज पढावी. सामुदायिक व मशिदीत पढलेल्या नमाजामुळे अधिक पुण्य लाभते. मशिदीतील नमाजच्या वेळी रांगा करून नेतृत्व करणाऱ्या इमामचे पूर्णानुकरण करावे. मशिदीत स्त्रियांची रांग सर्वांत मागे असते. शत्रूचे आक्रमण झाल्यास एका रांगेने शस्त्रसज्ज राहून दुसऱ्या रांगेने नमाज पढावी. शेवटी करावयाचा सुजूद किंवा तशह्‌हुद (गुडघे टेकून केलेला प्रणाम) सर्वांनी मिळून करावयाचा असतो. यावेळी म्हटली जाणारी प्रार्थना संक्षिप्त असली, तरी चालते. तोंडही किब्ल्याकडेच करण्याचे बंधन नसते.

सश्रद्ध मृतांसाठी पढावयाच्या नमाजला ‘सलात अल्-जिनाजा’ म्हणतात आणि ती थोडी भिन्न असते. मृत पुरुषाच्या डोक्याकडे व स्त्रीच्या पायाकडे उभा राहून इमाम नीया, पाच तक्बीरा, फातिहा, मुहंमदांची स्तुतिपर प्रार्थना, मृतासाठी व साहाय्यकांसाठी दुआ आणि शेवटी दोन तस्लीमा म्हणतो. नियमित नमाज पढल्यावाचून स्वर्ग लाभत नाही. नमाजमुळे रोगांचे आणि संकटांचेही निवारण होते. ‘सलात’ म्हणजे ईश्वराशी संवाद. सलातमधूनच इस्लाममध्ये गूढवाद (काहींच्या मते साक्षात्कारवाद) शिरला. सलातवर अनेकांनी ग्रंथ लिहिले. सामान्य मुस्लिम व्यक्ती काटेकोरपणे पाचही वेळा नमाज पढण्याचा उत्साह दाखवत नाही.

पाचवेळा पढल्या जाणाऱ्या नमाजशिवाय दर शुक्रवारी (जुम्मअ) पढण्यात येणाऱ्या साप्ताहिक नमाजला महत्त्व आहे. ही नमाज मध्यान्हसमयी (जुहर) पढतात. या वेळी इमाम नमाज चालू होण्यापूर्वी जे प्रवचन करतो, त्यास ‘खुत्‌बा’ (राजासाठी केलेली प्रार्थना आणि तो गादीवर आल्याची घोषणा) म्हणतात. बक्र-इ-ईद, रमजान ईद ह्या प्रसंगीही सामुदायिक नमाज पढली जाते. नमाज पढणे हे इस्लाममधील अत्यंत आवश्यक व महत्त्वाचे कर्मकांड मानले जाते.

करंदीकर, म. अ.