कर्ण: कुंतीस सूर्यापासून कौमार्यावस्थेत  झालेला पुत्र. त्याच्या अंगावर जन्मतःच कवच-कुंडले होती. त्याला कुंतीने लोक निंदेच्या भीतीने पेटीत घालून नदीत सोडले. सूतजातीचा धृतराष्ट्राचा सारथी अधिरथ याला तो सापडला. राधा नावाच्या त्याच्या पत्नीने याचे नाव‘वसुषेण’असे ठेवले व त्याचे संगोपन केलेम्हणून त्यास‘राधेय’असेही म्हणत. हा धनुर्विद्येत अर्जुनापेक्षा निष्णात होता. द्रोणाचार्यांनी त्याला ब्रह्मास्त्र न दिल्यामुळे त्याने‘मी ब्राह्मण आहे, असे खोटेच सांगून परशुरामापासून अस्त्रविद्या मिळविली. एका प्रसंगी त्याचे क्षत्रियत्व उघड झाल्यामुळे,‘ऐनवेळी तुला अस्त्रविद्या स्मरणार नाही’असा परशुरामाने त्याला शाप दिला. भारतीय युद्धाच्या वेळी इंद्राने ब्राह्मणवेष घेऊनत्याची कवच-कुंडले मागून घेतली आणि त्याला एक प्रभावी शक्ती दिली. हा अंगदेशाचा राजा होता. कौरवांशी तो शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिला. भारतीय युद्धात अर्जुनाने त्याला मारले. महाभारतातील त्याची व्यक्तिरेखा लोकोत्तर गुणावगुणांनी युक्तअसल्यामुळे, अनेक भारतीय साहित्यकृतींचा तो विषय बनलेला आहे.

केळकर, गोविंदशास्त्री.