शिया पंथ : इस्लाम धर्मातील एक प्राचीन व प्रमुख पंथ. शिया या अरबी शब्दाचा अर्थ ‘अनुयायी’ किंवा ‘समर्थक’ असा आहे. शिया म्हणजे प्रेषित ⇨ मुहंमद पैगंबरांचे चुलत बंधू आणि जावई हजरत ⇨ अली यांचे अनुयायी किंवा समर्थक.

प्रेषित मुहंमदांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांत असणारे मतभेद तीव्र झाले आणि उत्तराधिकाऱ्यांच्या प्रश्नावरून सुन्नी आणि शिया असे दोन पंथ उदयास आले. शिया पंथीय मतानुसार, प्रेषित मुहंमदांच्या महानिर्वाणानंतर इस्लामी कायदा आणि दैवी संकेत यांनुसार हजरत अली यांचाच खलीफा या पदावर हक्क होता. प्रेषित मुहंमदांशी असलेल्या त्यांच्या जावई आणि चुलत बंधू या दुहेरी नातेसंबंधांमुळे तेच खलीफापदाचे खरे वारसदार होते. शियांची दुसरी श्रद्धा अशी आहे, की प्रेषित मुहंमद यांनीच अल्लाच्या आदेशानुसार हजरत अलींना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते व कुराणातील ‘सुरत-अल्-बकरा’ या दुसऱ्या अध्यायातील १२४ व्या आयतात (कुराणातील पद्यवचन किंवा श्लोक) तसे सूचितही करण्यात आले आहे. प्रेषित मुहंमद पैगंबरांनी आपल्या महानिर्वाणाच्या आधी केलेल्या भाषणात म्हटले होते, की ‘जे कोणी माझा स्वीकार करीत आहेत, ते हजरत अलीचा स्वीकार करतील’. सुन्नी मतानुसार संबंधित पैगंबरवचन (हदीस) हे ठोस व विश्वसनीय पुराव्याचे नाही तसेच प्रेषित मुहंमदांनी तशा स्पष्ट सूचना केलेल्या नाहीत. म्हणून, मान्यवरांच्या एकमताने खलीफाची होणारी निवड, ही वैध आणि प्रेषितांच्या आदेशाचे पालन करणारीच असते. म्हणून मुहंमद पैगंबरांनंतरचे चारही खलीफा वैध उत्तराधिकारी आणि ‘ खुलफा-ए-राशिदिन ’ (न्याय्य खलीफा) ठरतात. [→ खिलाफत]

बहुसंख्य युरोपीय प्राच्याविद्यापंडितांनी ‘सुन्नी’ आणि ‘शिया’ हे पंथ प्रेषितांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या प्रश्नावरून उद्भवलेल्या राजकीय संघर्षातून निर्माण झाल्याचे म्हटले आहे परंतु सईद हुसेन नासर यांसारख्या इस्लामी पंडितांच्या मते, हा पंतभेद वरपांगी जरी राजकीय संघर्षजनित भासत असला, तरी त्याच्या मुळाशी, धार्मिक आणि ईश्वरविद्याशास्त्रीय मतभेद आहेत कारण या पंडितांच्या मते, प्रेषितांचा उत्तराधिकारी आणि त्याच्या पात्रतेचा प्रश्न, या बाबी प्रेषितांनंतरच्या धार्मिक अधिसत्तेच्या सिद्धांतावर आधारित आहे. उदा., सुन्नी मतानुसार खलीफा हा फक्त ⇨ शरीयत-प्रणीत इस्लामी जीवनपद्धतीचा संरक्षक असतो तर शियांच्या मते खलीफा हा प्रेषितांचा धार्मिक-आध्यात्मिक उत्तराधिकारी असून प्रेषित मुहंमदांना प्राप्त झालेल्या प्रज्ञानातील किंवा साक्षात्कारातील गूढ ज्ञानाचा आणि ईश्वरी संकेतांचा विवेचक असतो. म्हणून शियांच्या मते हे पद प्रेषितांच्या कुटुंबीयांत आणि प्रेषित इब्राहिम यांच्या वंशजांतच असू शकते. प्रेषित मुहंमदाचे कुटुंबीय हेच प्रज्ञानामधील संदेश व शिकवणूक यांचे माध्यम असतात.

इस्लामी सिद्धांतानुसार प्रेषित मुहंमदांनंतर प्रेषितत्त्वाचे दरवाजे बंद झालेले आहेत. म्हणून प्रज्ञानातील अंतर्ज्ञान आणि दैवी आदेशांचा अर्थ सांगण्याची गरज निर्माण होते. शियांच्या मते हे कार्य ⇨ इमाम किंवा खलीफा यांचे असून ते प्रेषितांच्या कुटुंबीयांतीलच असावे. शियांचे आणखी एक प्रतिपादन असे आहे की बारावे इमाम ‘इमाम मुहम्मद-अल-महदी’ हे अंतर्धान पावलेले असून ते अदृश्य स्वरूपात अस्तित्वात आहेत आणि ते मार्गदर्शनासाठी योग्य वेळी प्रकट होतील.

शिया पंथीयांतही किती इमामांना म्हणजे खलिफांना मानावयाचे, यावरून उपपंथ निर्माण झाले आहेत. उदा., बारा इमामांना मानणारे द्वादश–इमामी शिया, सात इमामांना मानणारे इस्माइली शिया [→ इस्माइली पंथ], पाच इमामांना मानणारे झईदी शिया तसेच दाउदी शिया वगैरे. इस्लाम धर्मात एकूण ७३ पंथ असून त्यांपैकी ३२ पंथ शियांमध्ये आहेत.

सुन्नी आणि शिया हे दोन्ही पंथ मूळ सनातन इस्लामचे प्रतिपादक असून शिया म्हणजे इस्लाम धर्मातील सुधारणावादी पंथ म्हणता येणार नाही. हे दोन्ही पंथ परंपरावादी आणि पोथीनिष्ठ आहेत.

युरोपीय अभ्यासकांनी सुन्नी व शिया यांच्याबद्दल वेगवेगळी मते मांडली आहेत. काहींच्या मते शिया आणि सुन्नी हा भेद इराणी आणि अरबी या दोन संस्कृतींमधील भेदाचा निदर्शक आहे, तर अन्य मतानुसार हा पंथभेद तत्कालीन सामाजिक गटांच्या भिन्न भूमिकांतून निर्माण झाला आहे. उदा., राजाकडे दैवी शक्तीचा प्रतिनिधी म्हणून पाहण्याची परंपरा असणाऱ्या दक्षिण अरबस्तानातील टोळ्यांच्या भूमिकेतून शिया पंथ उदयास आला. काहींच्या मते मध्यमवर्गीय कारागीर जमातींतून शिया निर्माण झाले. मार्क्सवादी अभ्यासकांनी सुन्नी आणि शिया हे भेद सधन जमीनदार आणि छोटे शेतकरी यांच्यातील वर्गीय संघर्षाचा परिणाम आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

पहा : इस्लाम धर्म इस्लामी धर्मपंथ सुन्नी पंथ.

संदर्भ : 1. Enayat, Hamid, Modern Islamic Political Thought, London, 1982.

           2. Guillaume, Alfred, Islam, Londo, 1977.

           3. Hughes, Thomas Patric, Dictionary of Islam, New Delhi, 1977.

           4. Nasr, Seyyed Hossein, Ideals and Realities of Islam, London, 1975.

बेन्नूर, फकरूद्दीन