माणिक प्रभूमाणिक प्रभू : (१८१७–६५). दत्ताचा चौथा अवतार समजले जाणारे एक दत्तोपासक. कर्नाटकातील लाडवंती (ता. कल्याणी) या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मनोहर नाईक हरकुडे हे रामभक्त होते. त्यांच्या आईचे नाव बयम्मादेवी असे होते. माणिक प्रभूंच्या लहानपनापासूनच त्यांनी केलेल्या चमत्कारांची व त्यांच्या साधुत्वाची ख्याती झाली होती. आयुष्याचा प्रारंभीचा भाग फिरण्यात व चमत्कार करण्यात घालविल्यानंतर त्यांनी हुमनाबादेजवळ (कर्नाटक) एका निर्जन ठिकाणी वास्तव्य केले. तेथे त्यांचे भक्त जमू लागले. सध्याचे ‘माणिकनगर’ त्याच ठिकाणी वसले आहे. १८६५ मध्ये त्यांनी जिवंत समाधी घेतली. त्यांच्या कार्यामुळे ⇨ दत्त संप्रदायाचा प्रसार होण्यास मोठी मदत झाली.

त्यांनी स्थापन केलेल्या संप्रदायाचे नाव ‘सकलमतसंप्रदाय’ असे आहे. त्याच्या नावावरूनच त्यात विविध धर्मांच्या व पंथांच्या तत्त्वांचा समन्वय साधल्याचे स्पष्ट होते. सर्व धर्म व संप्रदाय आपापल्या अनुयायांना ईश्वरप्राप्ती करून देतात, सर्व देवता एकरूप आहेत, विशिष्ट देवतेच्या मंत्रांचा आग्रह धरण्याचे कारण नाही इ. मते या संप्रदायात आहेत. हा संप्रदाय अद्वैती आहे. श्रीचैतन्यदेव (आत्मा किंवा चैतन्यतत्त्व) हे या संप्रदायाचे उपास्य दैवत आहे तसेच या संप्रदायात मधुमती नावाच्या शक्तीसह असलेल्या ⇨ दत्तात्रेयाची उपासना केली जाते. माणिक प्रभूंच्या समन्वयवादी वृत्तीमुळे शैव, वैष्णव, लिंगायत इ. हिंदू पंथच नव्हे, तर मुसलमान, शीख व पारशी लोकदेखील त्यांना पूज्य मानत. मुसलमान त्यांना ‘पिरान्‌पीर दस्तगीर’ म्हणत, तर शीख ‘जो गुरू नानक सोही गुरू मानक’ असे म्हणत. माणिकनगर येथे दत्तजंयती, मोहरम आणि जंगमांचा संक्रांति-महोत्सव हे तीनही उत्सव साजरे केले जात.

त्यांना संस्कृत, मराठी, कन्नड, हिंदी, उर्दू व फार्सी या भाषा अवगत होत्या. मराठी, हिंदी व कन्नडमधून त्यांनी अनेक मधुर पदे रचली (‘माणिकप्रभुसंस्थाना’ ने पद्ममाला नावाने त्यांची पदे व आरत्या प्रसिद्ध केल्या आहेत.). त्यांनी मल्हारी माहात्म्य, आत्मरूपप्रतीती, संगमेश्वर माहात्म्य, हनुमंतजन्म इ. ग्रंथ लिहिले आहेत. रा. चिं. ढेरे यांनी त्यांचा ‘ऐश्वर्यसंपन्न राजयोगी’ असा उल्लेख केला आहे. त्यांच्या अंगावर लहानपणापासूनच सोने व रत्ने होती. भक्तांनी दिलेल्या विपुल धनधान्याचा ते गोरगरिबांसाठी उपयोग करीत, अनेक दुःखीकष्टी लोकांचा ते आधार बनले होते.

माणिक प्रभूंच्या गादीवर बसणारांनाही माणिक प्रभू म्हटले जाते. त्यांची गादी त्यांच्या भावाच्या वंशजांकडे चालू आहे. श्रीमनोहर माणिक प्रभू आणि श्रीमार्तंड प्रभू हे दोन माणिक प्रभू प्रसिद्ध आहेत. त्यांनी संप्रदायविषयक बरेच ग्रंथ लिहिले असून त्यांचीही पदे रसाळ आहेत. मनोहर माणिक प्रभूंनी संप्रदायाची पूजापद्धती निश्चित केली.

संदर्भ : ढेरे, रा. चिं. दत्त संप्रदायाचा इतिहास, पुणे १९६४.

साळुंखे, आ. ह.