लाल वालुकाश्मापासून घडविलेले, मथुरा येथील गुप्तकालीन शिवलिंग (इ. स. सु. ४००).लिंगपूजा : पुरुषाच्या वा स्त्रीच्या जननेंद्रियांची (लिंग वा योनी) उपासना, पूजा किंवा भक्ती ही बहुतेक प्राथमिक धर्मांत, आजच्या काही आदिम जमातींच्या धर्मांत, तसेच काही उच्च धर्मांतही आढळते. स्त्री-पुरुषाच्या प्रजोत्पादनक्षमतेचे. तसेच निसर्गाच्या सुफलतेचे वा सर्जनाचे प्रतीक म्हणून लिंग व योनीपूजा प्रचलित झाली. दगड, स्तंभ, लाकूड, चित्रे इत्यांदींतून या लिंग व योनीप्रतिमा पुराणाश्म युगापासून सर्वत्र आढळून येतात. विविध धर्मांच्या विकासाच्या इतिहासावरून काही देशांत व संस्कृतींत अशी स्त्री पुरुषांच्या जननेंद्रियांची देवता रूपात उपासना पद्धती प्रधान व प्रचलित असल्याचे दिसून येते. सर्व सामान्यतः ह्या उपासनेत कोठेही अभ्यासतेच्या व अश्लीलतेच्या कल्पनेचा लवलेशही दिसत नाही. प्रजोत्पादन व निसर्गाची सर्जनक्रिया ही अत्यंत नैसर्गिक अशीच क्रिया मानली गेली आणि म्हणून लिंग वा योनी यांच्या पूजनाबाबतचे कर्मकांड तसेच यातुक्रिया, विधी व उत्सव हे नेहमीच विश्वातील मानववंश, प्राणिसृष्टी व वनस्पतिसृष्टी यांच्या सातत्यासाठी व समृध्दीसाठी अत्यावश्यक म्हणून उदात्त व पवित्र अशा धार्मिक भावनेतूनच पार पाडले गेले व आजही काही समाजांत पार पाडले जातात. 

सर्वच उच्च धार्मिक प्रतीकांप्रमाणेच लिंग व योनी यांतूनही गूढ अशा दैवी सत्याचा निर्देश होतो. त्यांच्याभोवती गूढात्मकतेचे आवरण आहे. प्राचीन ग्रीसमधील अनेक गूढमार्गी पंथांत लिंगपूजेस अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले होते. लिंगपूजेतील लिंगाचे प्रतीक हे नेहमीच उत्थित अशा लिंगाचे असते. उत्थित अशी लिंगरूप देवता ही या ना त्या प्रकारे सर्जनशीलता, नवजीवनदान व सुफलता यांचे प्रतीक होय. आशिया मायनरमधील एटिसची पुरानकथा (मिथ) नंतर रोमन धर्मातही महत्त्व पावली. एटिस हा मर्त्य गुराखी तरूण सिबली ह्या देवमातेच्या (आदिमाता) प्रेमात पडला पण वचनभंग केल्यामुळे शिक्षा म्हणून एटिसला आपले लिंग कापून प्राणत्याग करावा लागला, अशी ही मूळ पुराणकथा आहे. फ्रिजियन व नंतर रोमन पुराणकथांत एटिसच्या कापलेल्या लिंगाचे पाइनवृक्षामध्ये रूपांतर झाले. तेथील पुरोहीत वर्ग एटिसचे अनुकरण म्हणून स्वतःचे

खच्चीकरण करून घेत. देवाचे खच्चीकरण म्हणजे नवजीवनाचा आरंभ. ग्रीक पुराणकथेत क्रोनसने त्याचा पिता युरानस ह्याचे लिंग कापून टाकले. त्या रक्तातून एरिनीझ व तर ‘जायंट्‍स’, निर्माण झाले. कापलेले लिंग समुद्रात फेकले. त्याचा फेस होऊन त्यापासून ॲफ्रोडाइटी ही सौंदर्याची व प्रेमाची देवता उत्पन्न झाली.

प्राचीन ईजिप्शियन धर्मातही लिंगपूजा प्रचलित होती. ओसायरिसच्या पुराणकथेतून त्याचे सुफलतारूप दिसून येते. हीरॉडोटसने वर्णिल्यानुसार ईजिप्तमध्ये ओसायरिस व मिन ह्या देवांच्या भव्य लिंगरूप प्रतिमांची दोरखंडांनी ओढून मिरवणूक काढली जाई. अशीच प्रथा ग्रीसमध्येही डायोनायसियन उत्सवात प्रचलित होती. हर्मीझ, डीमीटर व प्रायपस यांच्या उपासनेतही अशाच प्रकारची लिंगसदृष रूपे अस्तित्वात होती. डायोनायसस हा वनस्पतींच्या-विशेषतः द्राक्षवेलींच्या-सुफलतेचा ग्रीक देव होता व त्याची प्रचंड लिंग असलेल्या प्रतिमारूपात पूजा होत होती. फ्रे हा प्राचीन ट्यूटॉनिक देवही सुफलता व समृध्दीचा देव म्हणून प्रसिद्ध होता व त्याची प्रतिमा उत्थित अशा प्रचंड लिंगासह असे. विवाहप्रसंगी त्याला बली अर्पण करत असत. प्राचीन मेक्सिको व पेरू या देशांतही लिंगपूजा प्रचलित होती, तसेच ती उत्तर अमेरिकेतील आदिवासी जमातींमध्येही रूढ होती. आफ्रिकेतील अनेक जमातींत आजही लिंग वा योनीपूजेचे विधी व यातुक्रिया प्रचलित आहेत. बायबलमध्येही लिंगपूजेसंबंधी निर्देश आढळतात. बेथल येथे असलेल्या ज्या दगडावर याकोव झोपला, तो दगड लिंगप्रतिमाच असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. मध्ययुगीन अनेक चर्चमधूनही लिंगचिन्हे आढळतात, तसेच युरोपातील खेड्यापासून आजही क्वचित प्रसंगी जे धार्मिक विधी केले जातात, त्यांचे स्वरूपही लिंगपूजनात्मकच आहे. फ्रान्समध्ये जे अनेक संतांचे दगडी पुतळे आहेत, ते मुळात कोणातरी पेगन देवांचेच असावेत आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेले उठावदार लिंग. अनेक शतकांच्या कालावधीत ह्या पुतळ्यांचा लिंगभाग निपुत्रिक स्त्रियांनी पुत्रप्राप्ती होईल ह्या समजुतीने फोडून नेऊन त्याची पूड करून विधिवत औषधात वापरला असावा. 

जपानी लोकधर्मात डोसोजिन हा उत्थित लिंगरूपात पूजिला जाणारा सुफलतेचा व क्षेत्रपाल असा देव आहे. दोन लिंगांच्या वा मिथुनरूपातीलही त्याच्या काही प्रतिमा आढळतात. तो सुफलतेचे व वैवाहिक मर्यादेचे प्रतिक असून सुगीच्या आरंभी साजऱ्या होणाऱ्या त्याच्या उत्सवात आपल्याकडील होळीप्रमाणेच अश्लील बोलण्याची व बोंब मारण्याची मुभा असे. वृषभ, नाग मेंढा इ. लिंगांचीच प्रतिके बहुतांश ठिकाणी मानली जात. 

उठावदार योनीभाग व पुष्ट स्तन अशा स्वरूपात जगात अनेक ठिकाणी तसेच भारतातही देवीमूर्ती व कोरीव आकृत्या सापडल्या आहेत. उदा., युफेसस येथील आर्टेमिस ह्या सुफलतादेवीची मूर्ती अनेक पुष्ट स्तनांची आहे, तर आफ्रिकेतील योरूबा जमातीची देवी दिवस भरत आलेल्या गर्भवतीच्या रूपात आहे. आदिमातेच्या लज्जागौरीच्या रुपात सर्जनाचे व सुफलतेचे प्रतीक म्हणून त्यांची पूजा होत असे. 

सुर्वे, भा. ग. 


तंजावर येथील एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग (इ.स.चे दहावे शतक)भारतातील लिंगपूजा : शिवोपासनेचा प्रमुख आचार म्हणून जगातील अनेक समाजांत प्राचीन काळापासून लिंगपूजा प्रचारात आहे. इतिहासाच्या आदिकालापासून आजतागायत भारतात लिंगपूजेची परंपरा चालू आहे. योनी आणि लिंग यांच्या संयोग हे जीवसृष्टीचे कारण आहे. अर्थात अखिल सृष्टीचे आदिकारण तेच असले पाहिजे, या कल्पनेने सयोनी लींगाची पूजाअर्चा सुरू झाली. भारतातील द्रविडपूर्व जमातींमध्ये लिंगपूजा होत असे. द्रविड लोकांत शिव या नावाने त्याची पूजा होत असे. वैदीक आर्यांची ⇨ रुद्र ही संहारक देवता आणि द्रविडांची शिवदेवता यांचे एकिकरण होऊन रुद्रशिवाची उपासना भारतात सुरू झाली. ही उपासना मूर्तीचीही असे आणि लिंगाचीही असे. मात्र ऋग्वेदात लिंगपूजक लोकांना तिरस्करणीय तसेच यज्ञविरोधी मानलेले आहे, असे दिसते ( ७.२१.५) त्याचप्रमाणे इंद्राचे वर्णन शिस्‍नदेवहन असे केले आहे (१०.९९.३).

लिंग, या शब्दाचा मुख्य अर्थ चिन्ह असा आहे. जगाचे आदिकारण जे अव्यक्त, निर्गुन परब्रह्म, त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे शिवलिंग, अशी उच्च आध्यात्मिक कल्पना अनेक पुरानांत मांडण्यात आली आहे. लिंगोत्पत्तीसंबंधी अनेक कथा पुराणांत सांगितल्या आहेत. लिंगपुराण, शिवपुराण, कूर्मपुराण (अध्याय २६), वामनपुराण (अध्याय ४६) इत्यादींमध्ये शिवाची उत्पत्ती त्याचे पराक्रम, लिंगाची अर्चना, ठिकठिकाणच्या लिंगांचे माहात्म्य इ. अनेक विषय आले आहेत. दक्षिण भारतात शिवालये पुष्कळ आणि विविध प्रकारची आहेत. शिवपंचायतनाच्या देवळात मध्यभागी शिवलिंग आणि चारी बाजूंना सूर्य, गणेश, देवी आणि विष्णू यांची छोटी देवळे असतात. सामान्यतः सर्व दर्जाचे लोक शिवलिंगाची स्पर्शपूर्वक पूजा करतात. शैव ब्राह्मण किंवा गुरव वा _ जंगम या नावाची शिवलिंगाच्या पुजाऱ्याची एक स्वतंत्र उत्पन्न झाली आहे.

लिंगे ही चल आणि अचल अशा दोन प्रकारची असतात. लिंगप्रतिष्ठा, पुनःप्रतिष्ठा, अर्चना, स्‍नानविधी यांचे वर्णन बौधायन गृह्यसेषसूत्रात (२.१६ – २२) केले आहे. पूजा षोडशोपचारांनी किंवा कृत्रिम अशी दोन प्रकारची असते. कृत्रिम लिंगे लाकूड, दगड, धातू, रत्ने, शिंपला, स्फटिक, माती, वाळू इ. वस्तूंची बनविलेली असतात. नर्मदेत सापडणारी बाणलिंगे जुन्या काळापासून प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध बारा ⇨ ज्योतिर्लिंगे शिवाच्या वीर्यातून निर्माण झाली, अशी पुराणकथा आहे. पंचमहाभूतांची प्रतीके म्हणून काही देवालयांतील लिंगे प्रसिद्ध आहेत. शिवभक्त बाणासुराने चौदा कोटी शिवलिंगे ठिकठिकाणी स्थापन केली, असी कथा आहेत. काही लिंगामंध्ये पृष्ठभागावर एकशे आठ किंवा एक हजार लिंगे खोदलेली असतात. काही प्राचीन देवालयांत मुखलिंगे असतात. त्यांत लिंगावर एकापासून पाचपर्यंत मुखे खोदलेली असतात. कर्नाटकातील लिंगायत हे लिंगपूजक आहेत [⟶ वीरशैव पंथ]. ते पाषाणाचे शिवलिंग शरीरावर नित्य धारण करतात.

काशीकर, चिं. ग. 

पहा : आमाता तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म देवदासी देवी संप्रदाय पुराणकथा रुद्र शक्तिपीठ शाक्‍तपंथ शिवदेवता सुफलताविधि.

संदर्भ : 1. Forlong, J. G. R. Rivers of Life, 2 Vols., London, 1883.

           2. Howard, Clifford, Sex Worship, Chicago, 1902.

           3. Kerenyi, Karoli, Dionysos, Princeton, 1976.

           4. Neumann, Erich, The Great Mother, London, 1955.

           5. Scott, G. R. Phallic Worship, New York, 1951.

           ६. ढेरे, रा. चिं. लज्‍जागौरी, पुणे, १९७८.