धार्मिक प्रतीके : धार्मिक श्रध्देतून संकेताने एका पदार्थाच्या जागी मानलेला आणि विशेष शक्तीने युक्त असा मानलेला दुसरा पदार्थ म्हणजे धार्मिक प्रतीक होय. सूक्ष्म व इंद्रियातीत अशा पदार्थाला इंद्रियजन्य अनुभवाच्या कक्षेत आणण्यासाठी त्या पदार्थाच्या जागी सगुण, साकार व इंद्रियगम्य असे प्रतीक मानले जाते. उदा., इंद्रियगम्य शालिग्राम हे इंद्रियातीत विष्णूचे आणि लिंग हे शिवाचे प्रतीक होय. प्रतीक हे मूळ पदार्थाचे प्रतिनिधित्व करते. एखादा अनुभव, कल्पना, विचार, तत्त्व किंवा देवता यांच्या प्रभावी अभिव्यक्तीसाठी माणूस अशी प्रतीके मानतो. काही वेळा एका इंद्रियगम्य वस्तूचे प्रतीक म्हणून दुसरी इंद्रियगम्य वस्तू मानली जाते. उदा., वर्तुळ हे सूर्याचे आणि आपट्याची पाने हे सोन्याचे प्रतीक होय. समग्र सृष्टीत फक्त मानवप्राणीच प्रतीकांचा उपयोग करू शकतो, हे एक वैशिष्ट्य होय. जगातील सर्व धर्मांनी धर्मविषयक कल्पना व्यक्त करण्यासाठी प्राचीन काळापासून अशा प्रतीकांचा प्राचुर्याने उपयोग केला आहे. या धर्मांतर्गत प्रतीकांनाच धार्मिक प्रतीके म्हटले जाते.

विविध धार्मिक प्रतीके : (१) ओम् (हिंदू, बौद्ध, जैन), (२) स्वस्तिक (हिंदू, बौद्ध, जैन), (३) पवित्र अग्नी (पारशी), (४) चाँद-तारा (इस्लाम), (५) खंड (शीख), (६) यंत्रे (तांत्रिक), (७) धर्मचक्र (बौद्ध), (८) ‘यीन्-यांग’ (ताओ), (९) ‘मेनोराह’-दीपपात्र (ज्यू), (१०) लॅटिन क्रॉस (ख्रिस्ती), (११) ‘टोरी’ (शितो).

प्रतीक बनलेल्या पदार्थाचे भौतिक रूप नजरेआड करून त्याच्या रूपात मूळ पदार्थ पाहिला जातो. म्हणजेच प्रतीकांमध्ये एक प्रकारची रूपकात्मकता असते परंतु प्रतीक म्हणजे मूळ पदार्थाचे भ्रांत, विपर्यस्त किंवा आभासात्मक ज्ञान मात्र नव्हे. प्रतीक आणि मूळ पदार्थ यांमध्ये बहिरंगाच्या, अंतरंगाच्या अथवा दोन्ही बाबतींत काही सादृश्य असू शकते किंवा अन्य काही संबंध मानलेला असतो. काही वेळा हे सादृश्य वा संबंध स्पष्टपणे ध्यानात येत नाही. असे प्रतीक केव्हा तरी उत्स्फूर्त व स्वैर पद्धतीने स्वीकारले गेले असण्याची शक्यता असते किंवा काळाच्या ओघात त्याचा मूळ पदार्थाबरोबरचा संबंध दृष्टीआढ झालेला असतो. अशा वेळी त्या दोहोंतील संबंध गूढ बनतो. अशा प्रतीकांचा अर्थ लावू पाहणारे अभ्यासक वेगवेगळी स्पष्टीकरणे देतात. यासाठीच प्रतीकांचा उपयोग करणारे आणि त्यांचा अर्थ लावू पाहणारे अशा दोघांनाही प्रतीकांमागचे संकेत व सांस्कृतिक परंपरेची पार्श्वभूमी माहीत असणे आवश्यक असते. कारण कोणत्याही समाजाची संस्कृती, तत्त्वज्ञान, आचारविचार, परंपरा, रूढी, जीवनदृष्टी इत्यादींचा त्या समाजातील धार्मिक प्रतीकांच्या निर्मितीवर व स्वरूपावर परिणाम झालेला असतो. उदा., हिंदूनी ब्रह्माविषयी प्रतीके निर्माण केली आहेत, तर ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ताविषयी.

मुळात धार्मिक प्रतीक हे विशिष्ट धर्माची दीक्षा घेतलेल्या लोकांसाठीच असते. त्या लोकांनी विशिष्ट पदार्थाला प्रतीक म्हणून स्वीकारल्यामुळेच तो पदार्थ ‘प्रतीक’ बनलेला असतो. म्हणजे त्या विशिष्ट समाजात त्या प्रतीकाची मुळे खोलवर रुजलेली असतात. प्रतीक हे पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीच्याच मनात स्फुरत असले, तरी त्याला अंतिम स्वरूप व कायम मान्यता मिळण्याची प्रक्रिया मात्र सामाजिक असते. जोपर्यंत एखाद्याला त्या पंरपरेचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्याला त्या प्रतीकाचा अर्थ कळत नाही. म्हणूनच प्रतीक हे पदार्थाला व्यक्तही करते आणि अव्यक्तही ठेवते असे म्हटले जाते. कारण ज्यांना ती परंपरा ठाऊक असते त्यांना ते प्रतीक स्पष्ट रीतीने कळते परंतु ज्यांना ती ठाऊक नसते त्यांच्या दृष्टीने ते प्रतीक गूढ बनते.

पदार्थाच्या एका अवयवावरून त्या समग्र पदार्थाचे अस्तित्व कळत असल्यामुळे त्या अवयवाला त्या संपूर्ण पदार्थाचे प्रतीक मानण्याची कल्पना प्रारंभी निर्माण झाली असावी. प्रतीके निर्माण होताना बाह्यमन व अंतर्मन, अनुभव व विचार, इंद्रियज्ञान व अंतर्ज्ञान, कल्पनाशक्ती व बुद्धी ही सर्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कार्यरत झालेली असतात. काही अलौकिक अनुभव, दृष्टांत, धार्मिक भ्रमावस्था, विशिष्ट औषधे, हर्षावस्था इत्यादींचाही प्रतीकनिर्मितीवर परिणाम होतो.

अज्ञानी आणि दुबळ्या मनाच्या व्यक्तीला इंद्रियातीत देवतेच्या स्वरूपाची कल्पना करता येत नाही. अशा वेळी त्या व्यक्तीच्या पूज्य देवतेला तिच्यापुढे साकार करण्याचे काम धार्मिक प्रतीके करतात. अशा व्यक्तीला साकार प्रतीक मिळाले नाही, तर मन कोठेच एकाग्र न झाल्याने ती व्यक्ती संशय, अशांती व अविश्वास यांच्या भोवऱ्यात सापडून भटकत राहण्याचा धोका असतो. अशा व्यक्तीने हा धोका पतकरण्यापेक्षा प्रतीकाच्या पूजेद्वारा मनाची एकाग्रता साधणे अधिक चांगले, असे प्रतीकांचे पुरस्कर्ते मानतात. शिवाय प्रतीकांची उपासना ही अधिक उच्च तत्त्वाच्या उपासनेची पहिली पायरी असल्यामुळे प्रतीकांच्या उपासनेद्वारे मनुष्य क्रमाक्रमाने त्या उच्च तत्त्वाकडे जाऊ शकतो. तात्पर्य, मूळ पदार्थाचे ध्यान करण्यासाठी मनाला एकाग्र करण्याचे काम प्रतीकामुळे साधते.

मानसशास्त्र आणि पुराणकथा यांचा अभ्यास करणाऱ्या काही विद्वानांनी प्रतीकवाद हा धार्मिक अभिव्यक्तीचा मुख्य विशेष मानला आहे. जगातील धर्मांचे तुलनात्मक अध्ययन व आदिवासी संस्कृतींचा अभ्यास यांवरून धार्मिक प्रतीकांचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. धार्मिक प्रतीके म्हणजे मानव आणि दैवी शक्ती यांचे नाते टिकविणारा व दृढ करणारा एक दुवा होय. दैवी शक्तीची उपस्थिती या प्रतीकांच्या माध्यमातून व्यक्त होते. धार्मिक प्रतीके म्हणजे धर्मस्वरूप जाणण्याचे एक महत्त्वाचे साधन होय, तसेच या प्रतीकांमुळे वेगवेगळ्या धर्मांचा विकास व्हावयास मदत झाली आहे आणि धर्मांच्या अनुयायांची मानसिक क्षितिजेही विस्तृत झाली आहेत. प्रतीकांमुळे मूळ पदार्थाला एक नवा आशय प्राप्त होतो. धार्मिक प्रतीकांत अंतर्भूत अशी एक पवित्र शक्ती असते. अशी समजूत आहे. म्हणूनच ही प्रतीके साध्या चिन्हांपेक्षा वेगळी मानली जातात. समाजांच्या इच्छेनुसार एक चिन्ह टाकून दुसरे चिन्ह घेणे शक्य असते कारण त्यात शक्ती अंतर्भूत नसते, ती केवळ परंपरागत सोय असते. उदा., गणितातील ‘बरोबर’ या अर्थाचे ‘=’ हे चिन्ह होय. परंतु प्रतीकांच्या बाबतीत हे शक्य नाही. कारण प्रतीक व मूळ पदार्थ यांचे नाते सोयीसाठी मानलेले नसते. तर ते पवित्र, सत्याधिष्ठित, अंगभूत व दृढ असे नाते मानलेले असते. प्रतीक हे धार्मिक श्रद्धेचा विषय असते.


एखाद्या माणसाला विशिष्ट क्षणी एखाद्या सूक्ष्म तत्त्वाचा अनुभव आलेला असतो परंतु त्या असाधारण अनुभवाची पुनरावृत्ती घडणे शक्य नसते. अशा वेळी त्या अनुभवाला प्रतीकाद्वारे स्थिर रूप देता येते आणि त्या प्रतीकाच्या माध्यमातून पुन्हा तो अनुभव घेता येतो. पूर्वीच्या लोकांनी आपले असाधारण अनुभव अशा प्रतीकांमधून चिरंतन बनविले आहेत, असेच म्हटले पाहिजे. भाषेप्रमाणेच प्रतीकांद्वारे एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीला कळतो, त्यामुळे प्रतीके ही एक प्रकारची भाषाच होय. म्हणूनच प्रतीके ही भाषेच्या ऐवजी किंवा भाषेला अधिक प्रभावी बनविण्यासाठी वापरली जातात.

धार्मिक प्रतीकांत पवित्र बनविण्याचा गुणधर्म असल्यामुळे ती व्यक्तीला दैवी शक्तीच्या निकट घेऊन जातात. तसेच ज्या गोष्टी व्यक्तीला दैवी शक्तीकडे जाण्यात अडथळे आणतात त्या गोष्टींना ही प्रतीके दूर करतात. म्हणूनच पवित्र शक्तीचे संरक्षक व पावन अस्तित्व घरात असावे, यासाठी पशूच्या शिंगांसारख्या काही प्रतीकात्मक वस्तू घरावर ठेवण्याची प्रथा दिसून येते.

काही वेळा धार्मिक प्रतीके व पवित्र दैवी शक्ती यांचा तादात्म्य संबंध मानला जातो. उदा., ग्रीक देव डायोनायसस हा बैलाच्या रूपाने, ग्रीक देवता डीमीटर ही कणसाच्या रूपाने, रोमन देव ज्यूपिटर हा दगडाच्या रूपाने आणि ईजिप्तचा देव होरस हा ससाण्याच्या रूपाने साकार झाल्याचे मानले जाई. देवकप्रतीकांचेही मूळ पूर्वजांशी असेच तादाम्य मानले जाते. परंतु कधीकधी प्रतीक व मूळ पदार्थ यांत तादात्म्य न मानता प्रतीक हे मूळ पदार्थाचा निर्देश करणारे माध्यम आहे, असे मानले जाते. अशा वेळी त्या दोहोंमध्ये अंतर मानले जाते उदा., ध्यानामध्ये उपयोगात आणल्या जाणाऱ्या मुद्रा, मंत्र इ. प्रतीके पवित्र शक्तीची सूचक मानली जातात.

मंदिर, तपोवन, पूजास्थान, प्रार्थनास्थान, पवित्र इमारती, खांब, भिंती, छपरे, कमानी इ. स्थळे दैवी शक्तीची धार्मिक प्रतीके बनतात. मंदिर हे विश्वाचे प्रतीक, तर प्रत्यक्ष पूजास्थान हे जगाच्या नाभीचे प्रतीक तसेच स्तूप हे बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. छत हे स्वर्गाचे प्रतीक मानले जाते. ख्रिस्ती लोकांच्या चर्चचे घुमट हे स्वर्गाचे, तर चर्चमधील वेदी हे ख्रिस्ताचे प्रतीक होय. काही वेळा एखाद्या ठिकाणी कोणतेही प्रतीक न वापरणे हेदेखील ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतीक बनते. उदा., मुसलमानांच्या मशिदीतील प्रार्थनेचे रिकामे स्थान हे अल्लाच्या अस्तित्वाचे प्रतीक होय.

नववर्षाचा दिवस, पेरणीची व कापणीची वेळ, सूर्याचा अयनकाल किंवा रात्र व दिवस समान होण्याचा काल इ. काल पवित्र शक्तीची प्रतीके होत. सर्वभक्षक असुराच्या रूपातील बौद्धाचे भवचक्र आणि ग्रीक, रोमन व पारशी लोकांचे सापाने वेढलेले, पंख असलेल्या सिंहाचे मस्तक ही कालाची प्रतीके होत.

पूजा व कर्मकांड यांच्यासाठी लागणारे दिवे, मेणबत्त्या पात्रे, धार्मिक पुस्तके इ. वस्तूही पवित्र शक्तीची प्रतीके बनतात. वेगवेगळ्या धर्मांतून वस्त्रे ही व्यक्तीचे पवित्र आचरण व तिचे धार्मिक जीवन यांची प्रतीके बनतात. रोमन कॅथलिक धर्मोपदेशकाचा पांढरा झगा हे हृदयाच्या शुचितेचे प्रतीक असते. जैन व बौद्ध धर्मांत विशिष्ट वस्त्रे ही जीवनाच्या नव्या अवस्थेत प्रवेश केल्याची प्रतीके बनतात. शामानांच्या वस्त्रांवरील प्रतीके त्यांच्या कार्याची व दैवी शक्तीशी असलेल्या त्यांच्या नात्याची सूचक असतात.

मानवी रूपात देवतांचे रूप पहाण्याचा प्रकार हिंदूंच्या मूर्तींतून व अन्यत्रही आढळतो. देवतांची अनेक प्रतीके पशुरूपातूनही आढळतात. ईजिप्तमध्ये पशू हे देवाचे प्रतीक होते. ख्रिस्ती लोक कोकरू हे ख्रिस्ताचे प्रतीक मानतात. हिंदूंचे मत्स्य, वराह, कूर्म इ. अवतार याच प्रकाराचे होत. वनस्पतीच्या रूपातूनही काही प्रतीके आढळतात. ज्ञानाचे व जीवनाचे प्रतीक वृक्षरूपात आढळते. अश्वत्थ वृक्ष (वडाचे झाड) हे ब्रम्ह व संसार यांचे प्रतीक आहे, ख्रिस्ताची वंशावळ वृक्षापासून मानलेली आहे, ईजिप्तचा देव नेफर्टम हा कमळाच्या रूपात आढळतो. हिंदूंच्या नरसिंहाप्रमाणे मानव आणि इतर प्राणी यांच्या अवयवांचे मिश्रण करूनही प्रतीके बनतात. प्राण्यांच्या कवट्या, शिंगे, पंख, पाय इ. अवयवही प्रतीके असतात. स्वर्ग व पृथ्वी यांना दांपत्य मानून अनेक प्रतीके निर्माण होतात. मानवी नात्याचेही प्रतीकांतून दर्शन घडते. माता ही पृथ्वी, शेती, सुपीकता, जीवनाचे अखंडत्व इत्यादींचे प्रतीक तर पिता हा स्वर्ग, अधिकार, सत्ता, प्रयत्नशीलता इत्यादींचे प्रतीक बनतो. प्रेम, बंधुत्व, विवाह, समागम, कुटुंब व मैत्री यांनाही प्रतीकवादात महत्त्वाचे स्थान असते. देवकप्रधान जमातींत बंधुभगिनींच्या नात्यावर प्रतीके असतात. बालक अथवा गुलाम यांच्या प्रतिमा मानवाचे देवांशी असलेले नाते सूचित करतात. कामजीवनावरची प्रतीकेही असतात. स्त्रीपुरुषांच्या युग्मचित्रांतून वा स्तनपान देणाऱ्या मातेच्या चित्रातून जीवनाचा अखंड प्रवाह सूचित केलेला असतो. युद्ध, विजय, शांती, व्यवसाय, क्रिडा, शिक्षण इत्यादींची तसेच धर्मगुरू, पुरोहित, संत, धर्मसंस्थापक इत्यादींचीही प्रतीके आढळतात.

प्रतीकात्मक अभिव्यक्तीची रूपे अनेक असतात. काही प्रतीके आकृती, चिन्हे, रंग, अक्षरे, अंक, मूर्ती इ. स्वरूपांत असतात. वर्तुळ, मंडल, स्वस्तिक इ. आकृती सूर्य, विश्व वा तारा यांचे प्रतीक बनतात. चौकोन हे चार दिशांचे प्रतीक होय. फुलांची माळ, गुंतागुंतीचा वा नागमोडी रस्ता, वेणी व गाठ ही शाश्वत काल, कालप्रवाह इत्यादींची प्रतीके होत. पांढरा रंग हे आनंदाचे किंवा मृत्यू व विषाद यांचे प्रतीक होय. मेक्सिकोमध्ये लाल रंग पूर्वेचे, शुभ्र रंग उत्तरेचे, काळा पश्चिमेचे व पिवळा दक्षिणेचे प्रतीक मानला जातो. अक्षरांची प्रतीके बऱ्याच वेळा जादूटोणा व भविष्य यांच्याशी निगडित असतात. ग्रीक भाषेतील ‘A’ आणि ‘Ω’ (प्रारंभ व शेवट) ही अक्षरे ख्रिस्ताची प्रतीके होत. हिब्रु भाषेतील YHWH ही अक्षरे देवाचे, लॅटिनमधील IOM ही ज्यूपिटरचे आणि ग्रीकमधील IHS ही  येशूचे प्रतीक होत. एक ही संख्या ब्रह्माचे, दोन ही आत्मा व परमात्मा यांचे, तीन ही वेद वा गुण यांचे, अठरा ही पुराणांचे अशी अंकांची प्रतीके आढळतात. ब्रह्मा, विष्णु व महेश याची त्रिमूर्ती ही अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती व लय यांचे किंवा रजोगुण, सत्त्वगुण व तमोगुण यांचे प्रतीक होय. चित्रे, शिल्पे, मूर्ती, प्रतिमा इ. स्वरूपांत प्रतीके मांडण्याची परंपरा तर फार प्राचीन आहे. लिंग-योनी, हात, पायांचे ठसे इ. अवयवांवरून समग्र व्यक्ती सूचित करणारी प्रतीकेही खूप आढळतात.


काही प्रतीके कृती, आविर्भाव, हालचाली इ. स्वरूपांत असतात. पवित्र वस्तूंना शास्त्रोक्त पद्धतीने स्पर्श करणे, आशीर्वाद देणे, टाळ्या वाजवणे, ढकलणे, प्रहार करणे, कुरवाळणे इत्यादींमधून विशिष्ट भावना व्यक्त होतात. हिंदू व बौद्ध यांच्या ध्यानमुद्रांतील बोटांची स्थिती प्रतीकात्मकच असते. गुडघे टेकणे हे नम्रतेचे, प्रणाम करणे हे आदर दाखविण्याचे आणि प्रार्थनेच्या वेळी हात उचलणे हे स्वर्गस्थ देवांच्या राज्यात जाण्याचे प्रतीक होय. नृत्य, चुंबन, आलिंगन, मस्तक हुंगणे, उभे राहणे, बसणे इ. कृतीही प्रतीकात्मक असू शकतात.

शब्द, भाषा, ग्रंथ, संगीत, वाद्ये इ. स्वरूपांतही धार्मिक प्रतीके व्यक्त होतात. वेदांत ॐ हे ब्रह्माचे प्रतीक आणि व्याकरणात शब्द हे ब्रह्माचे प्रतीक मानतात. बायबल, कुराण आणि शिखांचा ग्रंथसाहिब ही दैवी शक्तीची प्रतीके होत. संगीतातील विशिष्ट राग-रागिणी, ध्वनी इ. दैवी शक्तीची, तर नगारे, घंटा, शंख, वीणा इ. वाद्ये पावित्र्याची प्रतीके होत. कोलंबियामधील उटेटो लोक आपल्या पूर्वजांचे आत्मे पूजेच्या नगाऱ्यामध्ये राहत असल्याचे मानतात. संगीताच्या साथीमुळे प्रतीकात्मक शब्दांची अर्थवत्ता वाढते.

क्वचित प्रतीकांच्या या सर्व प्रकारांचे मिश्रणही झालेले दिसते. चित्रांतून धर्मकल्पना रेखाटल्या जातात, तर याउलट प्रतीकात्मक चित्रांचा आशय शब्द अथवा संगीत यांनी स्पष्ट केला जातो. कर्मकांडात प्रतीकात्मक शब्द, सूर, आविर्भाव, चिन्हे, गंध, वर्ण व चित्रे यांचा संकर झालेला दिसतो.

धार्मिक प्रतीके आणि संस्कृतीची अन्य क्षेत्रे यांमध्ये विशिष्ट संबंध असतो. धर्माप्रमाणेच कला, मनोविश्लेषण, तर्कशास्त्र, गणित, विज्ञान इ. क्षेत्रांतून प्रतीकांचा उपयोग केला जातो. चित्र, शिल्प व वास्तु कलेमध्ये धार्मिक प्रतीकांचा उपयोग विशेषत्वे केलेला असतो. धार्मिक क्षेत्रात सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय इ. क्षेत्रांतून प्रतीके घेतली जातात, तर याउलट काही वेळा ती क्षेत्रे धर्मक्षेत्रामधून प्रतीके उचलतात. रूपककथा, नीतिकथा, परीकथा, दंतकथा, आख्यायिका, इतर ललित साहित्य, रूपण कला, शिल्पकला, संगीत इ. क्षेत्रे व धर्म यांच्यातही प्रतीकांची देवाणघेवाण होते. प्रतीकांभोवती घटना आणि पात्रे यांची गुफंण करून ⇨ पुराणकथा  बनतात. पुराणकथा ही प्रतीकापेक्षा आधिक व्यापक असली, तरी अनुभव व्यक्त करणे, हा दोहोंचा समान उद्देश असतो. गूढगुंजनात्मक व आध्यात्मिक कविता आणि सूफी कवींचे काव्य इत्यादींमध्येही धार्मिक प्रतीके आढळतात. ध्यानधारणेमध्ये ॐकार, कमल, वज्र, विशिष्ट रंग, आकृती, ध्वनी, चित्रे इ. प्रतीकांचा उपयोग करून ध्येय गोष्टींशी एकात्मता साधण्याचा प्रयत्न केला जातो. कर्मकांडामध्ये प्रत्येक कृती व वस्तू यांना प्रतीकात्मक अर्थ प्राप्त होतो. ⇨ जादूटोण्याच्या कर्मकांडातही प्रतीकांचा उपयोग केला जातो. वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, रसविद्या, वैद्यकशास्त्र इत्यादींचाही धार्मिक प्रतीकांच्या जडणघडणीवर परिणाम होतो. भौतिक, रसायनशास्त्र, विश्वरचनाशास्त्र इ. शास्त्रांतील काही कल्पना मांडण्यासाठीही धार्मिक व पुराणकथांतील प्रतीकांचा उपयोग केला जातो. उदा., अवकाशयानांना प्रतीकात्मक नावे देण्यात आली.

प्रतीकांचा अर्थ बऱ्याच प्रमाणात स्थिर असतो हे खरे असले, तरी त्यांचा अर्थ बदलल्याची उदाहरणेही आढळतात. तसेच काळाच्या ओघात काही नवी प्रतीके निर्माण होतात, तर काही जुनी लुप्तही होतात. त्रिकोण व डोळा ही ख्रिस्ती लोकांनी देवासाठी वापरलेली प्रतीके बरीच अर्वाचीन आहेत. याउलट, त्यांचीच मत्स्यासारखी प्रतीके मागे पडली, तर कुऱ्हाड व हातोडा ही महत्त्वाची धार्मिक प्रतीके जवळजवळ लुप्त झाली. एकंदरीत सांस्कृतिक, बौद्धिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रांतील बदलांचा धार्मिक प्रतीकांच्या स्वरूपावर परिणाम होऊन त्यामध्येही बदल होऊ शकतात.

प्रतीके मानू नयेत, कारण ती मिथ्या व मूळ पदार्थाला झाकून टाकणारी असतात आणि त्यांच्यामुळे बुद्धिगम्य सत्याची पवित्रता नष्ट होते, असे काही विद्वानांना वाटते. तसेच प्रगत मानवाच्या मनात व्यवहारी वृत्ती, मूळ सत्य शोधण्याची तळमळ, वस्तुनिष्ठ दृष्टी, बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठ संशयवाद, अज्ञेयवाद इत्यादींमुळे धार्मिक प्रतीके टाकून देण्याची इच्छा निर्माण होते परंतु प्रतीके टाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत येतात. कारण, मानवाला प्रतीकांचा जसा तिटकारा येतो तसेच त्यांचे आकर्षणही वाटत असते. वस्तुतः प्रतीकवाद म्हणजे केवळ कल्पनाविलास नसून तो मानवी जीवनाचाच एक अंतर्भूत घटक आहे. म्हणूनच एक प्रतीक घालवले, तर त्याच्या जागी दुसरे येते. मानवाला जेव्हा जेव्हा काही आगळे अनुभव व्यक्त करावेसे वाटतात, तेव्हा तेव्हा त्याला प्रतीकांचा आश्रय घेणे आवश्यक आहे असे वाटते. त्यामुळेच अनेक विद्वानांनी प्रतीकांना विरोध केला, तरी ती नष्ट झाली नाहीत.

पौर्वात्य धर्मांपैकी हिंदू धर्मामध्ये सर्वांत जास्त प्रतीकात्मकता आढळते. हिंदूंचे कर्मकांड व यज्ञसंस्था यांमध्ये प्रतीकांची विपुलता दिसून येते. यंत्र हे विश्वाचे, वेदी हे जगाचे, श्वासोच्छ्‌वास हे अग्निहोत्राचे आणि आचमनाचे जल हे अमृताचे प्रतिक होय. कर्मकांडात यांसारखी अक्षरशः असंख्य प्रतीके होती. प्राण, आकाश, मन, ॐकार, आदित्य, डोळ्यांतील सुवर्णपुरूष इ. ब्रह्माची प्रतीके होत. ब्रह्मदेवाचा हंस, विष्णूचा गरुड, शिवाचा नंदी, कार्तिकेयाचा मोर इ. वाहने ही त्या देवतांच्या उपस्थितीची प्रतीके मानली जातात. पादुका हेही देवतेच्या उपस्थितीचे प्रतीक होय. चक्र, शंख इ. विष्णूच्या सामर्थ्याची प्रतीके आणि त्रिशूळ हे शंकराच्या शासनाधिकाराचे प्रतीक होय. त्रिशूळ व कवटी ही कालीची प्रतीके, तर कमल हे लक्ष्मी, सरस्वती व शुचिता यांचे प्रतीक होय. गायत्री हे ब्रह्मा-विष्णु-महेश यांचे व त्रिवेदांचे प्रतीक होय. पिंड हे पितरांना दिलेल्या वाट्याचे प्रतीक. सूर्य व चंद्र यांची प्रतीके मंडलाच्या रूपात असतात. धनुष्य हे बुधाचे, चौकोन हे शुक्राचे, त्रिकोण हे मंगळाचे इ. ग्रहांची प्रतीके असतात. पिंपळ अनेक देवांच्या वसतिस्थानाचे, तुलसी व दर्भ हे पावित्र्याचे, विजया वनस्पती (भांग) हे विजयाचे, रुद्राक्ष हे रुद्राचे अशी वनस्पतींच्या रूपांतील प्रतीके आढळतात. हाताच्या विविध मुद्रा, आकृती, मंडले, संख्या इ. प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक हे शुभत्वाचे व दुष्टशक्तिनिवारणाचे प्रतीक आहे. यांखरेजी सुपारी, आंब्याची पाने, कलश, रांगोळी इ. पदार्थही प्रतीकात्मक म्हणून वापरतात. जैन धर्मात स्वस्तिक (नंद्यावर्त), ॐकार, श्रीवत्स, मत्स्य, दर्पण इ. प्रतीके महत्त्वाची आहेत. बौद्ध धर्मात चक्र हे धर्मप्रवर्तनाचे प्रतीक आहे. कृपणादी पंचककार ही शिखांची प्रतीके होत. दीक्षेच्या वेळी पाण्याचे अमृतात रूपांतर करणारे ‘खंडा’ हे त्यांचे पवित्र प्रतीक होय.

तंत्रशास्त्रात प्रतीकात्मकता मोठ्या प्रमाणात आढळते. अकारादी सर्व वर्ण हे देवदेवींची प्रतीके मानली जातात. मंडले वा यंत्रे ही तांत्रिकांची महत्त्वाची प्रतीके होत. श्रीयंत्र हे विश्व, विश्वात्मक देवी वा परमात्मा यांचे प्रतीक मानले जाते. इडा व पिंगला या नाड्या गंगा-यमुना यांची प्रतीके, त्यांत प्रवाहित होणारे श्वास व प्रश्वास हे दोन मत्स्यांचे प्रतीक आणि त्यांचे नियमन करून त्यांना सुषुम्नेत प्रवाहित करणे, हे मत्स्यभक्षणाचे प्रतीक होय. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन हे पंचमकार अनुक्रमे तेज, वायू, आप, पृथ्वी आणि आकाश यांची प्रतीके होत [ → तंत्रमार्ग व तांत्रिक धर्म].


विद्वानांच्या मते प्राचीन ईजिप्तची चित्रमय लिपी ही प्रतीकवादाचे उगमस्थान आहे. ईजिप्ती लोकांचा प्रतीकवाद ज्यू लोकांनी इतर राष्ट्रांतून पोहोचविला. ईजिप्ती लोक देवांचे प्रतीक म्हणून पशूची आकृती अथवा पशू आणि मानव यांचे मिश्रण असलेली आकृती उपयोगात आणत. उदा., लहान बहिरीससाणा हे होरस म्हणजे सूर्यदेवाचे प्रतीक होते. मंडल हे सूर्याचे प्रतीक, तर साप हे मृत्यूचे प्रतीक होते. कीटकांमधूनही प्रतीके निवडली जात. उदा., भृंग (बीट्ल) हे अंगठी वर कोरले जाणारे दैवी शक्तीचे प्रतीक होते.

बॅबिलोनियन लोकांत मंदिराची उंची हे देवाचे आद्य वसतिस्थान असलेल्या पर्वताचे प्रतीक होते. समुद्र हे त्यह्‌मॅतचे आणि बैल हे मार्डुकचे प्रतीक होते. तीन, चार व सात हे अंक पावित्र्याचे प्रतीक समजत. नर्गाल ह्या देवतेचे प्रतीक असलेले सिंह आणि एनलिल ह्या देवतेचे प्रतीक असलेले बैल ॲसिरियन मंदिराच्या प्रवेशद्वारावर असत. अपराधी मानवाला शासन करण्याचे त्या देवांजवळ असलेले साधनच या प्रतीकांच्या द्वारे व्यक्त होई. चंद्र हा काही वेळा शिंगासारखा दिसतो. म्हणून शिंगे असलेला म्हातारा मनुष्य हे चंद्राचे प्रतीक मानले जाई. शिंग हे मुकुटाप्रमाणे त्याच्या सामर्थ्याचे प्रतीक बने म्हणूनच असिरियन राजे शिंगे असलेला मुकुट देवत्वाचे प्रतीक मानून आपल्या मस्तकावर धारण करीत असत.

ग्रीसमधील स्थानिक पंथांतून प्रतीकवाद बऱ्याच प्रमाणात आढळत होता. देवतांची काही प्रतीके ग्रीकांनी प्रागैतिहासिक लोकांकडून घेतली, असे दिसते. दुधारी कुऱ्हाडी ही डायोनायसस या देवतेचे प्रतीक बनली. ग्रीकांनी सिरिया व मेसोपोटेमिया यांच्या कलेतूनही बरीच देवताप्रतीके घेतली. आर्टेमिस या देवतेला पंख असून तिच्या दोन्ही हातांत सिंह, वाघ  किंवा हंस आहेत. पंख हे तिच्या चापल्याचे प्रतीक आहे. सिंह वैगरेंच्या प्रतीकांद्वारा त्या देवतेची त्या प्राण्यांवरील अधिसत्ता सूचित होते. नंतरच्या काळात पंखांऐवजी तिच्या शरीराचे सौष्ठव व अंगयष्टीची कृशता या सूक्ष्म प्रतीकांद्वारे तिचे चापल्य दाखविले गेले. गरुड हे झ्यूसचे प्रतीक होते. त्याचे वज्र हे तो वादळाचा स्वामी असल्याने दर्शक होते. तर अपोलोच्या हातातील धनुष्य हे सूर्य देवतेच्या किरणांचे प्रतीक होते. ग्रीकांच्या कलेमध्येही अनेक धार्मिक प्रतीके आढळतात.

रोमन लोकांच्या धार्मिक समारंभांतून अनेक प्रतीके आढळत. नरबळी देण्याऐवजी त्याच्या जागी केवळ प्रतीके वापरण्याची प्रथा रोमन लोकांत होती. त्यांच्या थडग्यांवरील धार्मिक प्रतीकांतून मृत्यूनंतरच्या जीवनाची प्रतीकात्मक चित्रे आढळतात. रोमन कायद्यावरही प्रतीकात्मक कर्मकांडाचा प्रभाव होता. रोमन साम्राज्याच्या काळात तर प्रतीकवाद खूपच वाढला.

हिब्रू बायबलमध्ये प्रतीकात्मक क्रिया व प्रतीकात्मक कल्पना वारंवार आढळत. प्रत्येक सिनॅगॉगमध्ये आढळणारे सप्तशाखायुक्त मनोराह वा दीपपात्र हे ज्यू धर्मानुसार ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतीक होय. उपवास हे यज्ञाचे, शारीरिक पेशींचा नाश हे वेदीवर बळी दिल्या जाणाऱ्या यज्ञीय पशुचे, भोजनाचे मेज हे प्रत्यक्ष वेदीचे आणि विश्रांतीचा दिवस हे इझ्राएल आणि ईश्वर यांच्या संबंधाचे प्रतीक मानले जाई.

इसवी सनाच्या पहिल्या चारपाच शतकांतील रोमन लोकांच्या प्रेते पुरण्याच्या भुयारांतील शिलालेखांतून अनेक ख्रिस्ती प्रतीके आढळतात. या प्रतीकांतून मृत्यूनंतरच्या सुखी जीवनाचे चित्रण आढळते. गुलाब, फुलांचे ताटवे, झुडुप ही स्वर्गाची प्रतीके अनेक थडग्यांवरून आढळतात. मेंढपाळ हा मृतांचा स्वामी व संरक्षक आहे. भांड्यातील पाणी चाखणारे कबूतर म्हणजे जीवनाच्या पाण्याने ताजातवाना होणारा जीव होय.

जसजसे पृथ्वीवर पाप व दु:ख वाढू लागले तसतसे ख्रिस्ती चर्चच्या प्रतीकांतून भयाला अधिक स्थान प्राप्त झाले, असे म्हणतात. ख्रिस्त, मेरी, क्रूस व सैतान यांच्याविषयी अनेक प्रतीके निर्माण झाली. मेंढपाळ हे ख्रिस्ताचे प्रतीक तर ख्रिस्त हा शाश्वत जीवन देणाऱ्या शक्तीचे प्रतीक होय. कॉन्स्टंटीनच्या काळापासून ⇨ क्रॉसचे प्रतीक आढळू लागले. जीवनाच्या उद्यानातील वृक्ष तोडणारी व्यक्ती, हे मृत्यूच्या विनाशक शक्तीचे प्रतीक आणि असुराचा उघडलेला जबडा हे नरकाचे प्रतीक होय.

पारशी लोक फुले, संगंधी द्रव्ये, धूप इत्यादींचा प्रतीके म्हणून उपयोग करीत. वधूवरांच्या कपाळावरील वर्तुळाकार कुंकुमतिलक हे सूर्यकिरणाचे प्रतीक मानले जाई. अग्नी हे त्यांचे पवित्र प्रतीक होय.

मुसलमानांच्या अरबी, फार्सी इ. भाषांतून प्रतीकाला नेमका शब्द नाही. इस्लामामध्ये मूर्तिपूजेला स्थान नसल्यामुळे या धर्मात देवतांची प्रतिमात्मक प्रतीके आढळत नाहीत. इतर काही प्रतीके मात्र आढळतात. चाँद-तारा हे एक महत्त्वाचे प्रतीक होय. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीच्या अवस्था प्रतीकात्मक मानल्या जातात. हात वर उचलणे म्हणजे हातांतील सर्व वस्तूंचा त्याग करणे आणि अल्लापुढे याचक बनून उभे राहणे, हातांनी छातीला स्पर्श करणे म्हणजे आपल्यासमोर अल्ला उपस्थित असल्याचे मानणे, हात कानांना लावणे म्हणजे अल्ला आपल्यापेक्षा उच्च स्थानी असल्याचे मानणे, प्रार्थना करताना बसणे म्हणजे मालकापुढे सेवक बनणे असे समजले जाते. वाऱ्याची झुळुक ही अल्लाशी एकरूप होण्याच्या साधनाचे, काळोखी रात्र हे विश्वाचे आणि लाट हे दैवी ज्ञानाच्या आधिक्याचे प्रतीक होय.

चिनी लोकांमध्ये प्रतीकांची विपुलता आहे. त्यांच्या प्रत्येक सजावटीला प्रतीकात्मक अर्थ असतो. भांड्यांचे आकारही प्रतीकात्मक असतात. आठ हा अंक अनेक पदार्थांचे प्रतीक आहे. सप्ताळूचे फळ हे विवाह आणि दीर्घायुष्य यांचे प्रतीक, तर भोपळा आणि अळंबे ही दीर्घायुष्याची प्रतीके होत. बांबू, पाईन आणि बेदाणा वृक्ष ही तीन मित्रांची प्रतीके होत. यीन्-यांग हे प्रकृति-पुरुषांचे ताओ प्रतीक होय. जपानी लोकांच्या जीवनातही प्रतीकांना महत्त्वाचे स्थान आहे. बेदाणा व बांबू हे वृक्ष आणि क्रायसँथिमम व ऑर्किडची फुले या चार वस्तू म्हणजे कन्फ्यूशसच्या चार शहाण्या माणसांची प्रतीके होत. पाईन वृक्षाची फांदी, कडब्याची पेंढी व तांबडा लॉस्टर मासा ही नववर्षाची प्रतीके होत. चंद्र, बर्फाचा तुकडा आणि फूल ही एकत्रितपणे निसर्गाच्या बदलत्या स्थितीची प्रतीके होत. दोन खांबांवर झाडाचा बुंधा आडवा टाकून तयार केलेले शिंतो मंदिराचे ‘टोरी’ हे प्रवेशद्वार दुष्ट शक्तींच्या निवारणाचे प्रतीक होय.

संदर्भ : 1. Bosch, E. D. K. Trans. The Golden Germ : An Introduction to Indian Symbolism, Hague, 1960.

            2. Cirlot, J. E. Trans. Sage, J. A. Dictionary of Symbols, London, 1962.

           3. May, Rollo, Ed. Symbolism in Religion and Literature, New York, 1960.

            4. Mountford, C. P. Art, Myth and Symbolism, London, 1956.

            5. Zimmer, Heinrich, Myths and Symbols in Indian Art and Civilization, New York, 1946.

साळुंखे, आ. ह.