रति : हिंदू पुराणकथांमधील कामदेवाची पत्नी. ⇨कामदेव व रती म्हणजे स्त्रीपुरुषांमधील परस्पर आकर्षणाचे अनुक्रमे पुरुषतत्त्वाच्या व स्त्रीतत्त्वाच्या स्वरूपात केलेले दैवतीकरण होय. या स्वरूपाच्या दैवतीकरणामुळे स्त्रीपुरुषसंबंधाचे उदात्तीकरण झाले आहे. रती हा शब्द आनंद घेणे वा मैथुन करणे या अर्थाच्या रम्‌ या संस्कृत धातूपासून बनला आहे आणि त्या शब्दाचे आनंद, मैथुन, स्त्रीयोनी, साहित्यातील शृंगाररसाचा स्थायिभाव इ. अर्थ आहेत. हे पाहता रतिदेवतेच्या स्वरूपावर प्रकाश पडतो. किंबहुना, रतिदेवता हे स्त्री व पुरुष यांच्यात घडलेल्या विश्वातील आद्य समागमाचे म्हणजे रतीचेच दैवतीकरण आहे. कामदेव व रती यांच्यापूर्वी अयोनिज स्वरूपाची निर्मिती होत होती. परंतु त्यांच्यामुळे योनिज निर्मितीला प्रारंभ झाला, असे पुराणकथांमधून सूचित होते, ते त्यामुळेच.

कालिकापुराणानुसार⇨ ब्रह्मदेवाने दक्षादी प्रजापतींची व संध्येची मानसनिर्मिती केल्यानंतर त्याच्या मनापासून कामदेवाचा आणि त्यानंतर दक्षप्रजापतीच्या घामापासून रतीचा जन्म झाला. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार कामदेवाच्या डाव्या कुशीतून तिचा जन्म झाला. कामोद्भवानंतर रतिक्रिया हा निसर्गक्रम पाहता रतीचा जन्म कामदेवानंतर झाल्याची कथा सयुक्त्तिकच आहे. शंकराने कामदेवाला जाळल्यानंतर शंकराच्या उःशापामुळे त्याचे व रतीचे पुनर्मीलन झाले. कामदेवासाठी रतीने कसा शोक केला याचे प्रभावी वर्णन कालिदासाच्या कुमारसंभवामध्ये ‘रतिविलाप’ नावाच्या चौथ्या सर्गात आले आहे. एका कथेनुसार उःशापामुळे कामदेव अनंग बनला, तर दुसऱ्या कथेनुसार तो कृष्णपुत्र प्रद्युम्न आणि रती ही शंबरासुराची पत्नी (वा दासी) मायावती बनली. पुढे प्रद्युम्नाने शंबराला मारून तिचा स्वीकार केला. तृष्णा वा तृषा ही कामदेव व रती यांची कन्या मानली जाते. रतीला प्रीती ही सवत असल्याची कथा रतिदेवतेच्या स्वरूपात शारीरिकतेला प्राधान्य असल्याचे सूचित करते. रती ही स्त्रीसौंदर्याचा किंबहुना एकूण स्त्रीत्त्वाचाच आदर्श आहे. हातात दर्पण घेतलेल्या स्थितीत तिचे चित्र वा शिल्प असते. तिला कामी, कामकला, शुभांगी, रेखा, रागलता इ. नावे आहेत. पुराणे, काव्यग्रंथ इत्यादींचा आढावा घेतला असता, कामदेवाच्या तुलनेत रतिदेवीचे स्थान गौण असल्याचे आढळते. स्त्री-पुरुषांना परस्परांकडे आकृष्ट करण्याच्या बाबतीतील प्रेरक तत्त्व म्हणून बहुधा कामदेवाचाच उल्लेख होतो. तो शरसंधान करण्यासाठी संचार करीत असताना रती त्याच्याबरोबर असते हे खरे परंतु या बाबतीत ती स्वतः पुढाकार घेताना मात्र दिसत नाही.दैवतीकरणानंतरही कामदेवाला जसे व जितके स्पष्ट व्यक्त्तित्व प्राप्त झाले आहे, तितके तिला झालेले नाही.

माघ शु. पंचमी ही वसंतपंचमी असून त्या दिवशी वसंतोत्सवानिमित्त कामदेव व रती यांची पूजा केली जाते. चैत्र शु. द्वादशी, त्रयोदशी व चतुर्दशी या दिवशीही त्यांची पूजा केली जाते. यांपैकी त्रयोदशीला कामदेवाचा पुनर्जन्म झाल्याची कथा असून त्या दिवशी प्रत्येक स्त्रीने स्वतःला रती व पतीला कामदेव मानून त्याची पूजा करावी, असे व्रत आहे. रतीच्या कथेत आद्य दांपत्यभावाचे दैवतीकरण आहे, हे त्यातून स्पष्ट होते. भारतातील विविध कलांमध्ये कामदेव व रती यांच्या मिथ्यकथेचा उपयोग वारंवार करण्यात आला आहे. उदयनवासवदत्ता इ. नायक-नायिकांची वर्णने कामदेव-रती यांचे अवतार म्हणून करण्यात आली आहेत.

लेखक : साळुंखे, आ. ह.